रविवार ‘शब्दगंध’ : ‘नाराजी’नाम्यांचा सिलसिला थांबेल का?

- एन. व्ही. निकाळे
रविवार ‘शब्दगंध’ : ‘नाराजी’नाम्यांचा सिलसिला थांबेल का?

रकारी सेवेत मोठ्या हुद्द्यांवर काम करणारे काही अधिकारी बरेच धोरणी असतात. निवृत्तीनंतरच्या सोयीसाठी सत्तारूढ पक्षांशी ते सलगी ठेवून असतात. सरकारला अनुकूल कामे करून वा निर्णय घेऊन सत्तापतींची मर्जी संपादन करतात. निवृत्तीनंतर त्यातील काही जणांना राज्यसभेची जहागिरी हमखास मिळते. एखाद्या नशीबवानाला राज्यपालपदाची लॉटरीसुद्धा लागते. सरकारचे ‘भाट’ बनून स्वत:चे चांगभले करून घेण्याची प्रथा हल्ली रूढ होऊ पाहत आहे. डॉ. जमील वा डॉ. राजन यांच्यासारखे विद्वान त्याला अपवाद ठरतात.

-----

अलीकडच्या दशकात भारतापुढे अनेक अडचणी आणि संकटे ओढवत आहेत. त्यातील काही नैसर्गिक तर काही ओढवून घेतलेली... मानवनिर्मित! त्या संकटांतून मार्ग काढण्यासाठी त्या-त्या क्षेत्रांतील निष्णात ‘वाटाड्यां’ची दमदार फौज सरकारच्या हाताशी असणे कोणत्याही देशाच्या दृष्टीने आवश्यक असते.

भारतालाही अशा ‘वाट्याड्यां’ची तीव्रतेने गरज भासत आहे. मात्र देशातच उपलब्ध असणार्‍या वाटाड्यांनासुद्धा ‘वाटेला लावण्याचे’ प्रयत्न आजकाल पद्धतशीरपणे सुरू आहेत का? असा प्रश्न कोणालाही पडावा. विशिष्ट तज्ञांचे मार्गदर्शन जाणून-बुजून दुर्लक्षिले अथवा अव्हेरले जात असावे. तसे सुचवणार्‍या काही घटना जनता अनुभवत आहे. नाराज झालेली विद्वान माणसे सरकारी सेवेतून स्वत:च बाहेर पडत आहेत की त्यांना बाहेर पडायला प्रवृत्त करणारी परिस्थिती निर्माण केली जात असेल?

ताजे उदाहरण ज्येष्ठ विषाणूतज्ञ डॉ. शाहीद जमील यांचे! केंद्र सरकारगठीत वैज्ञानिकांच्या सल्लागार समूहाचे (इन्सॉकॉग) प्रमुख म्हणून डॉ. जमील यांना नेमले गेले होते. मात्र त्यांनी नुकताच बैठकीतच पदाचा राजीनामा दिला. डॉ. जमील यांच्या राजीनाम्याने केंद्र सरकारवर निशाणा साधायला विरोधी पक्षांना पुन्हा संधी मिळाली आहे.

वैद्यकीय क्षेत्रातूनदेखील डॉ. जमील यांचा राजीनामा दुर्दैवी असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. डॉ. जमील यांनी स्वखुशीने राजीनामा दिला, असेही आता याबाबत कदाचित म्हटले जाईल. तथापि त्यांना तो देण्यास भाग पाडले गेले असावे, असाही अनेकांचा आक्षेप निश्चितच राहणार का? करोनाच्या त्सुनामीचे तडाखे देशाला बसत आहेत.

अशा प्रतिकूल काळात वैज्ञानिकांची आणि तज्ञांची देशाला नितांत गरज आहे. डॉ.जमील यांच्यासारख्या ज्येष्ठ विषाणूतज्ञाने राजीनामा देणे ही देशासाठी धक्कादायक घटना आहे. सरकारने सोपवलेली जबाबदारी कर्तव्यभावनेतून पूर्ण करणे व संभाव्य संकटांबाबत सरकारला सावध करणे यात गैर काय? डॉ. जमील यांची तत्परता व जागरूकता का बरे खटकावी?

गेल्या वर्षी भारतात करोनाचा शिरकाव होऊन पुढे त्याचा कहर वाढला. त्यानंतर सावध होऊन केंद्र सरकारने गेल्या वर्षी वैज्ञानिकांचा सल्लागार समूह स्थापन केला होता. करोना विषाणूच्या उत्परिवर्तनाबाबत सरकारला माहिती देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी डॉ. जमील यांच्या नेतृत्वातील या समूहावर सोपवण्यात आली.

डॉ. जमील अशोक विद्यापीठात त्रिवेदी स्कूल ऑफ बायोसायन्सचे संचालक आहेत. आपले विचार ते परखडपणे मांडतात. एका आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रात त्यांनी लेख लिहिला होता. करोनाविरुद्धच्या लढाईसाठी सरकारने केलेल्या तयारीवर त्यात भाष्य केले होते. वैज्ञानिकांचा सल्ला सरकार ऐकत नसल्याचा खेदही व्यक्त केला होता.

करोनाबाबत धोरण बनवण्यासाठी सरकारने हटीवादीपणा रेटू नये व वैज्ञानिकांचे म्हणणे जाणून घ्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला होता. विषाणूतज्ञ म्हणून गेल्या वर्षापासून मी करोना आणि लसीकरणावर लक्ष ठेऊन आहे. करोनाचे अनेक प्रकार (व्हेरिएंट) देशात पसरत आहेत. पुढच्या लाटेला ते कारणीभूत ठरू शकतात, असेही डॉ. जमील यांनी सूचित केले होते.

त्यांचे विचार सरकारला परिस्थितीची जाणीव करून देणारे होते. तरीही ते सरकारला रुचले नसावेत का? देशावर करोना संकट ओढवल्यानंतर त्याबाबतच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी बरीच विधाने आणि कारनामे केंद्रसत्तेतील पक्षाचे काही मंत्री आणि नेते वरचेवर करीत आहेत. दिवे लावणे, टाळ्या-थाळ्या वादन आदी प्रकार गेल्या वर्षी गाजले. सूजाण लोकांनी आणि विरोधी पक्षांनी त्या बालीशपणावर बरीच टीका केली. आता उपचार आणि लसीकरणाबाबत लोकप्रबोधन करण्याऐवजी काही नेते होमहवन, पूजापाठ करून लोकांचा विज्ञानावरील विश्वास डळमळीत करीत आहेत.

काही जण तर खात्रीचा उपाय म्हणून लोकांनी गोमूत्र पिण्यावर भर द्यावा, असेही वरचेवर सुचवत आहेत. करोनासंबंधीचे नियम पुढार्‍यांची मर्जी सांभाळण्यासाठी घटनादत्त स्वायत्त संस्थांकडून पायदळी तुडवले जात आहेत.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका घेण्याचा रेटून नेलेला निर्णय असो वा हरिद्वारचा कुंभमेळा स्थगित न करता तो भरवायला दिली गेलेली संमती; यातून करोनाला वेगाने हातपाय पसरायला अनुकूल वातावरण निर्मितीसाठी सढळ हातभार लावला गेला. मग डॉ. जमील यांच्यासारख्या ज्येष्ठ तज्ञाचा सल्ला कसा रूचावा? करोनाबाबत अधिक अभ्यास व संशोधन करून अंदाज वर्तवणे शक्य होईल, अशी माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी विनवणी देशातील 800 वैज्ञानिकांनी महिनाभरापूर्वी केली होती, पण ती माहिती उपलब्ध करून देण्याची गरज सरकारला वाटू नये यातच सरकारचा विज्ञानावरचा ठाम विश्वास स्पष्ट होतो.

‘संकट हीच संधी’ असे गेल्या वर्षी सांगणारे आता मात्र संकटाकडेच पाठ फिरवू लागले आहेत. हटीवादीपणा कायम ठेवल्याने देशापुढील संकटे आणि प्रश्न वाढत आहेत. करोना महामारीची पहिली लाट थोपवण्यात यश आल्याबद्दल भारताचे जगभर कौतुक करवून घेता आले होते.

याउलट दुसर्‍या लाटेत करोनाच्या गैरव्यवस्थापनातून भारतातील आरोग्य सुविधा आणि व्यवस्थेचे जगभर धिंडवडे निघाले आहेत. विदेशी माध्यमांनी त्याबद्दल टीकेची झोड उठवली आहे. भारताचा वाढता प्रभाव सहन न झालेल्यांचे ते कटकारस्थान आहे, असा जावईशोध भारतीय ‘ट्रोल फौजे’ने लावला आहे. करोनाच्या दुसर्‍या लाटेबाबत तज्ञांनी सरकारला सावधगिरीचा इशारा दिला होता.

मात्र तेव्हा केंद्र सरकारचे म्होरके पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत दंग होते. विधानसभा निवडणुका आणि हरिद्वारच्या कुंभमेळ्यानंतर त्या-त्या राज्यांतील करोनाबाधितांच्या संख्येला चांगलीच बरकत आल्याचे आढळले आहे. मात्र करोनास्थिती हाताळण्यास राज्ये समर्थ असल्याचे सांगून वाढत्या संसर्गाची जबाबदारी राज्यांवर ढकलण्याचा चाणाक्षपणा केंद्र सरकारने तातडीने दाखवला आहे.

सरकारच्या वैज्ञानिक सल्लागार समूहातून डॉ.जमील स्वत: बाहेर पडले की त्यांना तसे करावे लागले? या प्रश्नाचे उत्तर यथावकाश मिळेल अथवा मिळणारसुद्धा नाही, पण देशहितासाठी चांगले निर्णय घेण्यासाठी सल्ला देऊ पाहणार्‍या अनेक तज्ञांना याआधी डॉ.जमील यांचाच मार्ग पत्करावा लागला.

गेल्या सहा वर्षांत अनेक हुशार आणि देशाभिमानी अधिकार्‍यांनी राजीनामा देणे पसंत केले. डॉ. रघुराम राजन यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची कारकीर्द बरीच गाजली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत काम केलेल्या डॉ.राजन यांनी तत्कालीन अर्थतज्ञ पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासाठी प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून काम केले आहे. यूपीए सरकारच्या कारकिर्दीत 2013 मध्ये डॉ. राजन यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नेमणूक झाली.

देशाच्या अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करताना सत्ताधार्‍यांना खूश करणारे निर्णय घेणे डॉ.राजन यांनी कटाक्षाने टाळले. सत्तांतर होऊन नवे सत्तापती केंद्रात आले तरी देशहिताला प्राधान्य देणार्‍या डॉ. राजन यांच्या भूमिकेत कोणताही बदल घडला नाही. 2016 मध्ये मुदत संपल्यावर त्यांनी पदाचा राजीनामा दिला.

डॉ.राजन युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोत अध्यापनकार्य करीत असले तरी भारताचे सुपुत्र या नात्याने त्यांचे देशातील आर्थिक घडामोडींवर बारकाईने लक्ष आहे. नोटबंदी, जीएसटी लागू करण्याचा निर्णय तसेच करोना काळातील दिशाहीन आर्थिक धोरणांवर त्यांनी सडकून टीका केली. सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करणारे, कर्तव्यनिष्ठ आणि हुजरेगिरी न करणारे असे तज्ञ सरकारला कसे आवडणार?

डॉ. राजन यांच्यानंतर ऊर्जित पटेल यांना रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी संधी मिळाली. मात्र पुढे जाऊन काही मुद्द्यांवरून त्यांचेही सरकारशी मतभेद झाले. त्याचे पर्यावसान पटेल यांनी मुदतीआधीच राजीनामा देण्यात झाले. त्याआधी अरविंद सुब्रम्हण्यन यांनी देशाचे मुख्य आर्थिक सल्लागारपद सोडले होते. रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी निवृत्तीआधी राजीनामा दिला.

दुसरे डेप्युटी गव्हर्नर एन. एस. विश्वनाथन यांनी 5 मार्च 2020 ला पदत्याग केला. 16 मार्च 2021 ला पंतप्रधानांचे मुख्य सल्लागार पी. के. सिन्हा पदावरून पायउतार झाले. महत्त्वाच्या पदांवरील यापैकी बहुतेक अधिकार्‍यांनी पद सोडताना दिलेल्या कारणात साम्य आढळते. सरकारशी मतभेद झाल्याचे सांगणे टाळून त्यांनी वैयक्तिक कारणच पुढे केल्याचे दिसते. अर्थात अचानक उच्चपद सोडण्यामागे केवळ वैयक्तिक कारणेच होती, असे त्यांचे म्हणणे भारतीय जनतेला पटेल का?

सरकारी सेवेत मोठ्या हुद्द्यांवर काम करणारे काही अधिकारी बरेच धोरणी असतात. निवृत्तीनंतरच्या सोयीसाठी सत्तारूढ पक्षांशी ते सलगी ठेवून असतात. सरकारला अनुकूल कामे करून वा निर्णय घेऊन सत्तापतींची मर्जी संपादन करतात. निवृत्तीनंतर त्यातील काही जणांना राज्यसभेची जहागिरी हमखास मिळते. एखाद्या नशीबवानाला राज्यपालपदाची लॉटरीसुद्धा लागते.

सरकारचे ‘भाट’ बनून स्वत:चे चांगभले करून घेण्याची प्रथा हल्ली रूढ होऊ पाहत आहे. डॉ. जमील वा डॉ. राजन यांच्यासारखे विद्वान त्याला अपवाद ठरतात. डॉ.जमील यांच्या जागी दुसर्‍या एखाद्या तज्ञाला सरकार आणून बसवेल, पण त्या तज्ञाचे विचार आणि सल्ला तरी सरकारला मानवेल का? आणखी काही तज्ञांचे ‘नाराजी’नामे पत्करण्यापेक्षा तज्ञांच्या नेमणुकाच रद्द केल्या तर असे वादंग टाळणे सहज शक्य होईल का?

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com