Thursday, April 25, 2024
Homeब्लॉगBlog : टीका-टिपणी, चिमटे, हसू आणि आसू!

Blog : टीका-टिपणी, चिमटे, हसू आणि आसू!

राजकारण म्हटले की, टीका-टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप होणारच! राजकीय नेते एकमेकांवर कितीही तोंडसुख घेताना दिसत असले तरी तीसुद्धा शेवटी माणसेच आहेत. माणूस म्हणून त्यांनाही भाव-भावना, राग-लोभ असणे अपरिहार्यच! त्यामुळेच काही भावनिक प्रसंगांमध्ये राजकीय नेत्यांमधील माणूस कधी-कधी चुकून डोकावतोच. ते पाहिल्यावर आमजनता तत्काळ काहीशी आवाक झाल्याशिवाय राहत नाही.

गेल्या आठ-पंधरा दिवसांत काही बड्या नेत्यांच्या भाव-भावना त्यांच्या भाषणांतून प्रकटल्या. नेत्यांचे भावूक चेहरे आणि हळवे बोल देशवासियांना दीर्घकाळानंतर ऐकावयास मिळाले. एकशे तीस कोटी जनतेपैकी अनेकांनी छोट्या पडद्यावरील वृत्तवाहिन्यांवर त्या भावना ऐकल्या आणि त्या भाव-भावनांनी ओले झालेले नेत्यांचे रुमालही पाहिले.

- Advertisement -

काहींनी वृत्तपत्रांतून त्या वाचल्या. नेटकर्‍यांनी चालबोलवर समाज माध्यमांवर नजरेखालून घातल्या. गेल्या २६ जानेवारीपासून नेत्यांच्या भाव-भावना जास्तच अनावर झाल्याचा अनुभव शेतकरी वगळता देशवासीय घेत आहेत. भावनावश झालेले नेते पाहून हळव्या मनाची माणसे अधिकच भावूक झाली असतील. याउलट नेत्यांचे भावविभोर चेहरे पाहून ’मोले घातले रडाया…’ अशा प्रतिक्रिया काही विरोधकांना व्यक्त करावीशी वाटली असल्यास करोत बापडे!

प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर दिल्लीच्या सीमांवरील आंदोलनस्थळावरचा वीज आणि पाणीपुरवठा तोडण्यात आला. गैरसोय झाल्यावर आंदोलनातून माघार घेऊन शेतकरी घराकडे परतील हा त्यामागील हेतू असावा. अनेक शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. तिरंग्याचा अपमान केल्याचा आळ घेऊन राजधानीत हिंसाचार भडकवल्याचा ठपका गेला.

शेतकरी नेत्यांवर गुन्हे दाखल झाले. त्यामुळे व्यथित झालेले शेतकरी नेते राकेश टिकैत यांना माध्यमांशी बोलताना आपल्या भावना आवरणे कठीण गेले. व्यथा मांडताना सरकारच्या अन्यायी भूमिकेबद्दल त्यांनी तीव्र नाराजी प्रकट केली.

पोलीस बळाच्या जोरावर शेतकरी आंदोलन चिरडण्याचे प्रयत्न आंदोलनाच्या आरंभापासून सरकार करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आत्महत्या करीन, पण शेतकर्‍यांना बरबाद होताना पाहणार नाही, असे सांगताना टिकैत यांना रडू कोसळले.

त्यांचे ते अश्रू शेतकरी आंदोलनाला सिंचित करणारे ठरले. टिकैत यांची अश्रूभरी ध्वनिचित्रफित समाज माध्यमांवर वेगाने फिरू लागताच शेतकरी आंदोलनाला जणू नवी धार चढली. दिल्लीतून काढता पाय घेणार्‍या आंदोलक शेतकर्‍यांची पावले पुन्हा दिल्लीकडे वळाली. उत्तर प्रदेश आणि हरियाणा राज्यांत टिकैत यांच्या उपस्थितीत अनेक ठिकाणी शेतकरी महापंचायती झाल्या.

त्या महापंचायतींना शेतकर्‍यांचा भरभरून प्रतिसाद लाभला. शेतकरी माघारी फिरण्याची शक्यता मावळल्यावर दिल्लीच्या सीमांवर आता काटेरी तारा, लोखंडी खिळे आणि सिमेंटचे अडथळे आदींचा वापर करून पाकिस्तानी सरहद्दीवर दिसणारे चित्र देशाच्या राजधानभोवतीच तयार झाले. शेतकर्‍यांविरोधात सरकारने केलेली भरभक्कम तटबंदी देशाच्या सीमांवरसुद्धा नसल्याच्या टीकेची झोड विरोधी पक्षांनी उठवली आहे.

आंदोलनाला देशव्यापी स्वरूप देण्याच्या इराद्याने टिकैत आणि त्यांचे सहकारी नव्या जोमाने कामाला लागले आहेत. लवकरच महाराष्ट्रासह अनेक राज्यांत शेतकऱ्यांच्या महापंचायती घेऊन शेतीविषयक कायद्यांविरोधात रान उठवण्याचा त्यांचा निर्धार त्यांनी केला आहे. टिकैत यांचे अश्रू अग्निफुले बनली आहेत.

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यंदाच्या अधिवेशनात पंतप्रधानांची तीन भाषणे ऐकण्याची संधी जगभरातील समस्त ‘भाई-बहनों’ना मिळाली. काहीशी मिश्किल, कठोर आणि भावूक अशी पंतप्रधानांची तिन्ही रुपे पाहावयास मिळाली.

एका भाषणातून पंतप्रधानांच्या हळवेपणाची प्रचिती सर्वांना आली. अर्थात भावविभोर होण्याची त्यांची ही पहिलीच वेळ नाही. तथापि एखाद्या विरोधी पक्षनेत्याच्या निरोपादाखल भावना व्यक्त करताना पंतप्रधानांचे डोळे पाणावल्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. निवृत्त होणाऱ्या व्यक्तीला निरोप देताना वक्ते त्या व्यक्तीच्या कारकिर्दीतील आठवणींना उजाळा देतात. त्याच्या कार्याचे कौतुक करतात.

स्वतः भावूक होतात आणि इतरांनाही रडवतात. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधानांनी दोनदा आभारपर भाषण केले. पहिले भाषण राज्यसभेत आणि दुसरे लोकसभेत! हळव्या मनाचे पंतप्रधान प्रसंगी वज्राहून कठोर झाल्याचे त्यांच्या या दोन्ही भाषणांतून जनतेला समजले.

विरोधकांना सुनावताना त्यांनी शाब्दिक चिमटेही काढले. राज्यसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्यासह चार सदस्य नुकतेच निवृत्त झाले. पंतप्रधानांच्या उपस्थितीत त्यांचा एकत्रित निरोप समारंभ झाला.

प्रमुख नेत्यांच्या स्तुतीगानाचा सगळा झोत मात्र आझादांवरच होता. वेगवेगळ्या कारणांवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे नेहमी तापणारे सभागृह निरोपाच्या सोहळ्याने भावूक बनले होते. जम्मू-काश्मीरमधून निवडले गेलेले खासदार गुलाम नबी आझाद यांना निरोप देताना पंतप्रधानांच्या अश्रूंचा बांध फुटला.

सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते परस्परांवर कितीतरी आगपाखड करतात. मात्र ती आगपाखड त्या-त्या वेळेची गरज म्हणून असते. त्यात रागलोभ वा मत्सर नसतो, ती तात्कालिक असते याची प्रचिती दोन्ही नेत्यांनी आपापल्या भावना व्यक्त करताना आणून दिली.

पंतप्रधान मोदी यांनी आझाद मुख्यमंत्री असतानाचा प्रसंग सांगताना दोघांच्या घट्ट मैत्रीचे गुपीतही उघड केले. मीही तेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो. गुजरातचे काही नागरिक काश्मीरमध्ये गेले होते. त्यांच्यावर दहशतवादी हल्ला झाला. त्यात आठ जणांचा मृत्यु झाला.

त्या घटनेबद्दल सर्वात आधी आझाद यांनी मला फोन केला होता. गुजरातमधील नागरिकांच्या आणि मृतदेह घेऊन निघालेल्या विमानाला निरोप देताना आझाद यांचे अश्रू थांबत नव्हते. हा प्रसंग सांगताना पंतप्रधान मोदींनाही अश्रू अनावर झाले. आझाद यांच्यासारखा हळवा नेता सभागृहातून निवृत्त होत असल्याचे सांगताना त्यांनी तितकेच हळवेपण अश्रू वाहवून प्रकट केले.

राज्यसभेतून निवृत्त होताना आणि सभागृहाकडून निरोप घेताना आझाद यांनाही भरून आले होते. सर्वांचे आभार व्यक्त करताना राजकीय जीवनातील काही अनुभव आणि किस्से त्यांनी सांगितले. भारतीय मुस्लिम असल्याचा अभिमानही त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी मुक्तकंठाने आझाद यांच्या कार्याची स्तुती केली. त्याबद्दल आझाद यांनी कृतज्ञता व्यक्त केली. भावूक झालेल्या पंतप्रधानांची स्तुती करून त्या उपकाराची आझाद यांनी लगेचच परतफेडही केली.

पंतप्रधानांनी केलेल्या स्तुतीनंतर आझाद यांना भाजपकडून एखादे मोठे पद मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात लगेचच सुरू झाली होती. मात्र ‘काश्मिरात काळा बर्फ पडायला सुरूवात होईल तेव्हा मी भाजपत प्रवेश करील’ अशा शब्दांत आझाद यांनी त्या चर्चांना पूर्णविराम दिला. सत्तापदासाठी नेतेमंडळी विचार आणि तत्वे गुंडाळून एका पक्षातून दुसर्‍या पक्षात उड्या मारताना दिसतात. अशा वेळी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा आझाद यांचा संकल्पच त्यांच्या स्पष्टोक्तीतून ध्वनीत होतो.

गेल्या आठवड्यात देशाचे गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. राज्यातील तीन पक्षांचे सरकार पडण्याचे आणि सत्तांतराचा चमत्कार घडण्याबाबतचे बरेच मुहूर्त अनेक राजकीय जोतिषाचार्य वर्षभर सांगत होते, पण तसे काही घडले नाही.

निदान गृहमंत्र्यांच्या पायगुणाने तरी राज्यातील सरकार जाईल, अशी आस विरोधी बाकांवर तळमळणार्‍या काही नेत्यांना लागली होती. महाराष्ट्रातील पक्षसत्ता गेल्यानंतरचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या उदघाटनानिमित्त आलेल्या गृहमंत्री शहा यांचा हा तसा पहिलाच दौरा! त्यांचा हा दौरा पूर्वाश्रमीच्या मित्रपक्षाला सुनावण्यासाठीच खास करून असावा, असे काही राजकीय निरीक्षकांना उगाच वाटले असेल.

गृहमंत्र्यांच्या परखडपणाचा प्रत्यय मराठी मुलखाला आला. ‘शब्दाला जागणारी आम्ही माणसे आहोत, दिलेला शब्द पाळतो’ असे सांगून शहांनी बिहारचे उदाहरण दिले. मुख्यमंत्रीपदाबाबत बंददाराआड शिवसेनेला कोणताही शब्द दिला नव्हता, असा खुलासा त्यांनी जाहीरपणे केला. काहींना हा गौप्यस्फोट वाटला असेल. महाराष्ट्राच्या राजकारणात आता मोठी खळबळ उडेल, असेही काही जणांना उगाच वाटले होते, पण तसे काहीही झाले नाही.

शेतकरी नेते टिकैत, काँग्रेस नेते आझाद यांचे भावूक होणे लोकांना भावले. या नेत्यांच्या डोळ्यांतील पाणी पाहून अनेक जण गहिवरले, पण पंतप्रधानांचे भावूक होणे हा काही नेत्यांना अभिनय का वाटावा? भावनावश होण्याचे अनेक प्रसंग देशात हल्ली घडत आहेत.

राज्यकर्त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा महापूर यावा, अशीच स्थिती सध्या देशात निर्माण झाली आहे, दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांची मात्र थट्टा सुरू आहे, अशीही टिपण्णी काही नेते करीत आहेत.

देशात आता ‘आंदोलनजीवीं’ची नवी जमात तयार झाली आहे, या पंतप्रधानांच्या विधानाने समस्त आंदोलकांचे मन दुखावले गेले आहे. त्यांच्या दु:खावर फुंकर कोण घालणार? आंदोलनातूनच नवी वाट सापडते, न्याय मिळतो हे विसरून चालेल का? आंदोलनातूनच पंतप्रधानपद मिळवणारे पंतप्रधान मोदी ते कसे विसरतील?

- Advertisment -

ताज्या बातम्या