Monday, April 29, 2024
HomeनाशिकBlog : स्मरणरंजनातले पेठे हायस्कूल आणि आजचे शिक्षण

Blog : स्मरणरंजनातले पेठे हायस्कूल आणि आजचे शिक्षण

आठवणीतली शाळा… तुमच्या माझ्या मनात, आठवणीतली शाळा रोजच भरत असते. पाठीवर दप्तर घेउन, मनातला लहानगा मुलगा घरातून निघतो, गल्ली, बोळ पार करीत, कधी मेनरोडवरच्या दरडीवरून तर कधी रविवार कारंजावरून पेठेच्या प्रांगणात पोहोचतो. साठ, सत्तरच्या दशकातले पेठे हायस्कूल, आमच्यासाठी केवळ नव्या पेशवे वाड्याची वास्तू नव्हती…

शालेय शिक्षणाबरोबर, विविध कला, प्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची इथे रेलचेल असायची. राष्ट्रप्रेम, राष्ट्रभावना, सौजन्य, सहिष्णुता, अशा साऱ्या गोष्टी शाळेतच आम्ही शिकलो. तू कोण ? तुझी जात कोणती? तुझा धर्म कोणता? असे कधीच आम्हाला कोणी विचारले नाही. शाळेत सरस्वतीची प्रार्थना व्हायची. विद्यार्थी ती सुरात म्हणायचे. जेवणाचा डबा वाटून खायचे. शाळेच्या नळावरच सारे पाणी प्यायचे.

- Advertisement -

तरी कोणी आजारी पडत नव्हते. मित्रांमधे दंगामस्ती चालायची. सकाळचा शुभ्र पांढरा शर्ट, घरी जाईपर्यंत मळलेला असायचा. काही शिक्षक प्रसंगी आम्हाला चोपही द्यायचे पण त्याची तक्रार करायला आमचे पालक कधी शाळेत आले नाहीत. साठ वर्षांपूर्वी सारे गावच मध्यवर्गिय होते. कोणाच्याही वागण्यात, बोलण्यात बडेजाव नव्हता. परिस्थिती नाजूक असली तरी कोणाला त्याची लाज वाटत नव्हती.

शाळेतला प्रत्येक अनुभव जीवनाचे संचित असायचा. शाळेनेच आम्हाला मैत्री शिकवली. पेठेची ७१ सालची आमची मॅट्रिकची बॅच, आजही परस्परांच्या संपर्कात आहे. अलिकडे गावोगावी लाखो रूपयांची वसुली करणाऱ्या शाळांची बाजारपेठ तयार झाली आहे. विद्याथ्र्यांना घ्यायला, सोडायला शाळेची बस येते. शाळेने सांगितलेल्या एजन्सीकडूनच गणवेष, शालेय साहित्य विकत घ्यावे लागते. आनंदी आणि सृजनशील वातावरणाचा लोप झाला आहे. लेखन, वाचन, श्रवण आणि संभाषण ही चार प्राथमिक कौशल्ये (मल्टी स्कील्स) जर शाळा शिकवीत नसेल, तर अशा शाळा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त नाहीत, असे मला वाटते.

भारतातले ख्यातनाम अर्थतज्ज्ञ जिन ड्रेझी यांनी अलीकडेच ‘स्कुल चिल्ड्रन ऑनलाईन अँड ऑफलाईन लर्निंग’ या विषयावर एक सर्वेक्षण केले. सर्वेक्षण व्यापक होते. जवळपास १५ राज्यांचा सर्वेक्षणात समावेश होता. शहरी आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी बोलून, या सर्वेक्षणाचे निष्कर्ष काढण्यात आले. काय आहेत ते निष्कर्ष? कोरोनाच्या महासाथीत दिड वर्ष शाळा बंद होत्या.

५० टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नव्हते. ग्रामीण भारतात ३७ टक्के विद्यार्थ्यांनी त्यामुळे शाळेला कायमचा रामराम ठोकला. शहरी भागात ५१ टक्के तर ग्रामीण भागात ५८ टक्के, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची गाठभेटच या काळात झाली नाही. शालेय जीवनातली एक संपूर्ण पिढी त्यामुळे बर्बाद झाली आहे. असे निष्कर्ष पाहिले की दिड वर्षांत ऑनलाईन शिक्षण कसे झाले असेल, विद्यार्थ्यांच्या डोक्यात किती प्रकाश पडला असेल? याची शंका येते. शाळा हाच विद्यार्थ्यांच्या जीवनाचा खरा पाया असतो.

महासाथीमुळे तो उध्वस्त झाला. जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्यवानाच मूलतः बालरोगत आहेत. त्या म्हणतात, ‘दिड वर्षापासून बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक आणि शारीरिक परिणाम झालाय. त्यातून पूर्ण बरे व्हावला यांना बराब काळ लागेल. अजिम प्रेमजी फौडेशननेही एक सर्वेक्षण केले. यानुसार ८२ कोणतीही भाषा नीट येत नाही. मग ते ज्ञान कसे संपादन करणार? या १५ वर्षात या ८२ टक्के विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमयच आहे. ‘प्रथम’ संस्थेच्या अहवालानुसार, अनेक मुलांना वाचता येत नाही. गुणाकार, भागाकारही येत नाहीत. अशा स्थितीत आपण नेमके कुठे आहोत, याचे आत्मपरीक्षण सर्वांनीच केले पाहिजे.

आमच्या पिढीने १९७१ साली मॅट्रिकची परीक्षा ११ व्या इयत्तेत दिली. त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण आयोगाने १० २. ३ चा फॉर्म्युला आणला. आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार ५३३४चा फॉर्म्युला आला आहे. नव्या धोरणानुसार ६ वी पासून कौशल्य (व्होकॅशनल) शिक्षणाचा प्रारंभ होईल. भाषेच्या कौशल्यावरही मेहनत घेतली जाईल, असे म्हणतात. १० वी १२ वीच्या बोर्ड परीक्षांचे महत्व कमी करण्याचे उद्दिष्टही नव्या धोरणात आहे.

एका अर्थाने हे धोरण चांगले आहे. इन्फर्मेशन (माहिती), स्कील्स (कोशल्य), डिप लर्निंग (सखोल अभ्यास), क्रिटीकल थिंकींग (समीक्षा) आणि शेअरिंग (आदान प्रदान) या ५ गोष्टींना शालेय शिक्षणात विशेष महत्व दिलेच पाहिजे. अर्थात नव्या धोरणाने त्याकडे कितपत लक्ष दिले आहे? शिक्षण व्यवस्थेत त्यातून नेमका कोणता बदल घडेल? याचे भाकीत आज लगेच करणे घाईचे ठरेल.

शिक्षक प्राध्यापकांचे शिकवणे पूर्वी स्फूर्तीदायक असायचे. सर्जनशील शिक्षक शाळेत जीव तोडून शिकवायचे. त्यांचे वाचन भरपूर असायचे. आमच्या सर्व शिक्षकांना शाळेतच नव्हे तर साऱ्या नाशिक शहरात प्रतिष्ठा होती. रस्त्याने निघाले तर आदराचे शेकडो नमस्कार त्यांच्या वाट्याला यायचे.

अलीकडे शिक्षकांचे अवांतर वाचन घटले आहे. विद्यार्थ्यांना पूर्वीसारखे शाळा कॉलेजचे प्रेम वाटत नाही. कारण विचारले तर म्हणतात, आम्हाला जे हवे, ते सारे गुगलवर मिळते. विद्यार्थी प्रॉडक्ट बनला, तेव्हापासून विद्यार्थी शिक्षक नात्यातही घसरण झाली. ‘मागणी तसा पुरवठा’ हा सिध्दांत आता शिक्षणालाही लागू झाला आहे. शैक्षणिक संस्थांकडे ‘पैसा वसूल ‘मॉडेल’ म्हणून पाहिले जाऊ लागले.

शिक्षणाचे बाजारीकरण झाले म्हणजे नेमके काय झाले? आर्थिक नफ्यासाठी ज्ञान मिळवायचे. त्यात महाविद्यालयीन शिक्षणाची सद्यस्थिती तर आणखीनच बिकट बनली. नव्या शतकात ज्ञानाविषयो संभ्रमाची अवस्था दिसते. भारतापुरते बोलायचे तर देशात केंद्रीय, राज्यस्तरिय, खाजगी, अभिमत आणि परदेशी विद्यापीठांची संख्या ९८१ आहे.

महाविद्यालयांची संख्या ३९९३१ आहे. तंत्रज्ञानाचे शिक्षण देणाऱ्या संस्थांमधेही हजारोंची भर पडली आहे. इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीचे शिक्षण देणाऱ्या संस्थांची संख्या त्यात सर्वाधिक आहे. शिक्षणाच्या व्यापक खाजगीकरणानंतर सरकारला वाटते हाच शिक्षणाचा विकास, खाजगी संस्थांमुळे आपले काम बहुदा संपले आहे. कॉलेजच्या शिक्षणातून ज्ञान हरवत चालले आहे. बाजारपेठेत काय विकले जाते, त्यानुसार ज्ञान संपादन करायचे याकडे विद्यार्थ्यांचा कल आहे.

नोकरीच्या व्यापारीकरणात शिक्षणाचा मूळ उद्देशच हरवत चालला आहे. शैक्षणिक धकाधकीच्या अशा काळातही १०० व्या वर्षात पदार्पण करणारे माझे पेठे हायस्कूल, अजूनही पूर्वीचे स्वत्व टिकवून आहे, ही निश्चितच आनंददायक बाब आहे.

– सुरेश भटेवरा, लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या