ब्लॉग : भाग - ०१ माहितीचा आणि मेंदूचा भुलभुलैय्या

- डॉ. मुक्तेश दौंड, मनोविकारतज्ज्ञ, एनआयएमएस हॉस्पिटल, नाशिक
ब्लॉग :  भाग - ०१ माहितीचा आणि मेंदूचा भुलभुलैय्या

लीकडेच एक बातमी वाचनात आली की, राजकीय दबावामुळे भारतातील एक खूप प्रसिद्ध व्यक्ती इंग्लंडला निघून गेली. अडचणी वाढल्या की राजकीय मंडळी चिंतन-मनन सुट्टी घेतात. इतर क्षेत्रातील माणसेही काही काळ विरंगुळा शोधून ताजेतवाणे होतात. मात्र सध्या भारतात सगळ्या बाजूंनी सगळ्यात जास्त अडचणीत असणारे वैद्यकीय क्षेत्रातील लोक याला अपवाद! सुटी न घेता ते टिच्चून कामे करीत आहेत.

करोना मार्‍यापुढे सगळी यंत्रणा हतबल झालेली आहे.जिथे सगळ्याच गोष्टींची कमतरता आहे तिथे स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची आहुती देऊ खिंड लढवत आहेत. खिंड कसली... फाटलेले आभाळ आपल्या तोकड्या हातांनी झेलत आहेत. तरीही प्रसार माध्यमे, समाज माध्यमे आणि लोकांकडून त्यांनाच लाथाडले जात आहे. हो, आम्हांला हे नवीन नाही आणि रडगाणं तर नाहीच नाही, पण आयुष्यात खूप कष्ट करून डॉक्टर होणारी नवी पिढी अशा वातावरणात आणि अडचणीच्या काळात खचत असेल, काही जणांनी आत्महत्या केल्या असतील तर ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

या सर्व बाबींच्या मुळाशी आहे माणसाचा मेंदू! आपण सगळे विचार करतो किंवा समजतो त्यापेक्षाही नक्कीच गुंतागुंतीचा आहे आपला मेंदू! भावना आणि विचार यांची टक्कर झाली तर भावनेला झुकते माप देतो तो आपलाच मेंदू! गणिताची क्लिष्ट आकडेवारी लक्षात ठेवण्यापेक्षा त्या संदर्भातील गोष्टी लक्षात ठेवतो तो आपलाच मेंदू! चूक आणि बरोबरमध्ये हा चुकत नाही, पण दोन चूक आणि दोन बरोबर अशा प्रकारच्या अडचणींमध्ये हमखास गोंधळ घालतो तो आपलाच मेंदू! जग खूप अनिश्चित आहे, पण ते निश्चित आहे असे आभासी जग मनातच तयार करतो तो आपलाच मेंदू! आपल्याला न कळणार्‍या गोष्टी बेमालूमपणे आपल्याला कळूच देत नाही. म्हणजे आपल्याला हे माहिती नाही हेच तो आपल्याला कळू देत नाही. असा आहे आपला मेंदू! आणखी खूप खुबी आहेत त्याच्या!

विषय काय आणि हे काय मेंदू महात्म्य लावलंय? असा विचार आता तुमच्या मेंदूने केला असेलच. हे सगळे सांगायचे कारण, आपण करोनाविषयी ज्या चुकीच्या गोष्टी पाहतोय, ऐकतोय आणि शहानिशा न करता पुढे पाठवतो त्यामागे तुमची चूक नाहीच. अडचणी आणि संकट काळात आपला मेंदू असेच काम करतो.

कल्पना करा, तुम्ही जंगलात गेला आहात आणि अचानक तुमच्यासमोर वाघ आला तर काय करणार तुम्ही? तो खरंच वाघ आहे का? त्याचा आवाज कसा आहे? अगदी सध्याच्या काळातील फेमस गोष्ट म्हणजे त्याच्यासोबत सेल्फी घेणार का? कुठून आलाय? कुठे चाललाय? वाघ आहे का वाघीण? त्याचे जेवण झाले असेल की नाही? आणि असे बरेच वेगवेगळे विचार करणार आणि जीव गमावणार की, तिथून धूम ठोकून आपला जीव वाचवणार? तुमची इच्छा असेल-नसेल, पण तुम्ही एक तर पळणार;

अन्यथा भीतीने तरी मटकन बसणार! याला आम्ही मेंदूचा ‘फाईट’ किंवा ‘फ्लाईट रिस्पॉन्स’ म्हणतो. आजच्या धकाधकीच्या आधुनिक युगाने आणलेल्या ताणामुळे आणि त्या ताणात प्रचंड भर घातलेल्या करोनामुळे आपल्यासमोर म्हणजे मेंदूत कायम या प्रकारच्या भितीचा काल्पनिक वाघ तयार करून ठेवला आहे.

असे झाल्यामुळे आपल्याला वाटते की आपण बरोबर विचार करतोय, पण ते तितकेसे बरोबर नसतात बरं का! हे तुम्हांला पटले तरी खूप. कारण आपण विचार केलाय ते सोडून सत्य वेगळे असू शकते. आपल्याला दाखवली गेलेली बातमी प्रत्यक्षात वेगळीच असू शकते हे तुम्हांला पटले असेलच. आणखी एक उदाहरण आपल्याला राग आला की आपण कसे वागतो? कसे बोलतो? किती दुखावणारे बोलतो? हे राग थंड झाल्यावर आपल्याला कळते की नाही? कारण रागाच्या म्हणजे मेंदूच्या ‘फाईट सिस्टिम’च्या भरात आपली सारासार विचार करणारी विवेकबुद्धी काम करू शकत नाही.

हेच तत्त्व छोट्या पडद्यावरील माध्यमे (टेलिव्हिजन मीडिया) भरभरून वापरतात. आजकाल बातम्या डोळे बंद करून ऐकल्या तरी ते घाबरवणारे आणि दु:खी करणारे संगीत त्याचे काम जोरदारपणे करते. त्याच्या जोडीला तीच-ती भयानक चित्रं दाखवली की त्यांचे काम म्हणजे धंदा यशस्वी झाला. कारण असे झाले की तुमचा मेंदू मनातल्या मनात छान भुकेला वाघोबा तयार करतो आणि तो मग तुम्हाला त्याच्या पुढच्या बातम्यांवर सारासार विवेकबुद्धीने विचार करू देत नाही.

हेच होते आहे आपल्या सगळ्यांचे आजच्या आधुनिक आणि धकाधकीच्या जीवनात! स्वतःकडून असलेल्या अवास्तव अपेक्षा, न संपणारी टारगेट्स, कमी काळात यशस्वी होण्याचा हव्यास, शारीरिक आणि मानसिक आरोग्याची होणारी प्रचंड हेळसांड, वाढणारी व्यसनाधीनता, पैशांच्या जीवावर सगळे मिळू शकते, ही चंगळवादीवृत्ती, त्यातून पुरेशी झोप हा टाईमपास वाटावा इतका टोकाचा विचार!

हे सगळे आपण करीत आहोत तरी आपल्याला त्यात काही चुकीचे आहे आणि त्याचा पुनर्विचार करावा असा विचार आपला मेंदू करू देत नाही. हा किंवा असा विचार व्हायला हवा. कधीतरी टार्गेट्स आणि डेडलाईन्स बाजूला ठेवून तटस्थपणे स्वतःच्या आयुष्याचा विचार व्हायला हवा. मग हा काल्पनिक, आपण तयार केलेला वाघोबा शांत होईल आणि आपल्यालाही शांतपणे विचार करू देईल.

एखादे शास्र जेवढे पुढे जाते तेवढे त्यातला गुंता वाढत जातो. इतर क्षेत्रातील लोकांच्या आकलनाबाहेर होत जातो. मेंदू आपल्या विचारांचे केंद्र आहे. त्याला मर्यादा आहेत. त्यामुळे असे होते, पण मी आधी म्हणालो तसे काही वेळेस आपला मेंदू आपल्याला असे काही होते आहे हे कळूच देत नाही. त्यामुळे सामान्यांसाठी प्रत्येक वेळेस, प्रत्येक रुग्ण, प्रत्येक ठिकाणी बराच झाला पाहिजे ही भावना तयार होते.

त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील गुंतागुंत कितीही सोपी करायचा प्रयत्न केला तरी ती सामान्यांच्या आवाक्याबाहेर असते हे इथे मुद्दाम नमूद करतो. तरीही हा समजावण्याचा प्रयत्न. आधीच्या काळात ना औषधे होती ना सुविधा! कल्पना करा, हा करोना स्वातंत्र्य मिळाल्या-मिळाल्या आला असता तर? हाहाःकार झाला असता, सध्याची व्यवस्था तोकडी पडत आहे. तरी एवढी वाट लागली आहे.

अशी व्यवस्थाच नसती तर? कल्पना नाही करवत ना? नकाच करू, पण आज जी काही अत्यवस्थ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी जात आहेत त्याचे श्रेय हे विज्ञानाला, आधुनिक वैद्यक शास्राला आणि कितीही लोकांनी गैरसमज करून घेतले असले तरी ते वापरून लोकांना बरे करणार्‍या डॉक्टरांना जातेच जाते. मी हे अभिमानाने सांगतो. मला सार्थ अभिमान आहे आधुनिक वैद्यकशास्राचा विद्यार्थी असल्याचा!

दुसरे उदाहरण, आधी लोक रक्त द्यायला घाबरायचे. आता डॉक्टरांनी नाही सांगितले तरी स्वतःच तपासण्या करून घेऊन स्वतःच स्वतःचे निदान करून मोकळे होतात. बर्‍याच वेळा डॉक्टरांना निदान करण्याऐवजी त्यांचे निदान चुकीचे आहे हेच समजावून सांगत बसावे लागते. काय तुम्ही असे करीत नाही? ठीक आहे भरपूर आहेत बरं का असे करणारे.

जेवढी सिस्टिम गुंतागुंतीची होते तेवढी ती फेल होण्याची शक्यतासुद्धा वाढते. त्यातून उद्भवणारे गुंतेसुद्धा मोठे असतात. व्हेंटिलेटर हे असेच सामान्यांना न समजलेले मशीन! आता करोनाने त्याचे महत्व अधोरेखित केले आहेच. एक किंवा दोन टोकाची उदाहरणे घेऊन त्यावरून सर्व प्रक्रियेविषयी शंका घेणे किती अक्कलशून्यतेचे लक्षण असते ते आपल्याला अमीर खान या इसमाने दाखवून दिले आहेच. किती लोकांचे जीव वाचले व्हेंटिलेटरमुळे वाचले याचा डेटा कधी पाहिला आहे का हो तुम्ही?

(उर्वरित विचार पुढच्या भागात)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com