बिबट्या
बिबट्या
ब्लॉग

नेमिची येतो येथे बिबट्या...

- अशोक निसाळ

Gokul Pawar

Gokul Pawar

निसर्ग म्हटला की, डोळ्यांसमोर चित्र उभे राहते ते डोंगर-दर्‍या, हिरव्यागर्द झाडाझुडपांनी वेढलेला जंगल परिसर व वन्यप्राण्यांचा संचार! मात्र या आधुनिक युगात मानवाने निसर्गाचा हा आविष्कार हिसकावून घेतला आहे. सिमेंट काँक्रिटने या परिसरात कब्जा केला. मोठमोठ्या इमारती उभ्यारल्या गेल्या आहेत. त्यामुळे या वनराईतील वन्य मुक्याप्राण्यांनी जावे कुठे, काय खावे, हा प्रश्न तर पडणारच ना? मानवाने त्यांची जागा बळकवल्याने हे वन्यप्राणी अन्नपाण्याच्या शोधात मानवी वस्तीत मुक्त संचार तर करणारच!

वृत्तपत्रात बिबट्याच्या मानवावरील हल्ले करण्याच्या अनेक बातम्या, घटना नेहमी वाचायला-ऐकायला सध्या मिळत आहेत. एक-दोनदिवसाआड कुठल्यातरी भागात बिबट्याचा हल्ला होतो वा तो लोकांच्या नजरेस पडत आहे. त्यामुळे बिबट्याच्या भीतीपोटी लोक ‘सातच्या आत घरात’ असे चित्र काही ठिकाणी पाहावयास मिळत आहे. निसर्गाची देणगी लाभलेले दारणा-वालदेवी नदीकाठच्या नाशिकरोड, देवळाली परिसरात बिबट्या नावाच्या वन्यप्राण्याचा मुक्त संचार वाढला आहे. धुमाकूळ घालत त्याने गेल्या महिन्यापासून आतापर्यंत नाहक चार बळी घेतले. यात तीन बालके व एक वृद्धाचा समावेश आहे. काही बालकांचे प्राण आजी-आजोबांंच्या प्रसंगावधानतेमुळे वाचले.

यामुळे जाखोरी, हिंगणवेढे, सामनगाव, नानेगाव, दोनवाडे, शेवगेदारणा परिसरातील नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत. नाशिक शहरातही गेल्या महिन्यात काही नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. नाशिक तालुक्यातील पश्चिम भाग हा जंगलाने वेढला गेलेला परिसर आहे. मात्र या भागात वास्तूविशारदांनी पडीत जमिनी आणि माळरान विकत घेऊन त्या विकसित करून भव्यदिव्य इमारतीचे मनोरे उभारले आहेत.

त्यामुळे या ठिकाणी वावरणार्‍या बिबट्यासारख्या हिंस्त्र प्राण्याने नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात मोर्चा वळवला आहे. मानवी वस्तीत भरदिवसा त्याचा मुक्तसंचार बिनधिक्कतपणे सुरू असून यात प्राणघातक हल्ले करीत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दारणा परिसरातील एका शेतकर्‍याला एकाच वेळेस पाच बिबट्यांनी दर्शन दिले. यात तीन मोठे तर दोन छोटे बिबटे असल्याचे त्याने सांगितले. या बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभाग कसोशीने प्रयत्न करीत आहे.

परिसरात अनेक शेतीलगत पिंजरे लावण्यात आले आहेत. मात्र बिबटे हुलकावणी देऊन मुक्तपणे संचार करीतच आहेत. वनविभागाने अनेक युक्त्या केल्या, पण बिबटे पिंजर्‍यात कैद न होता दुसर्‍या परिसरात मानवाला दर्शन देत आहेत. परराज्यातून या बिबट्यांना पकडण्यासाठी या परिसरात विशेष पथक तैनात केले आहे. जवळजवळ महिना होत आला आहे. तरीही या पथकाच्या हाती बिबटे लागले नाहीत. त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आमदार, खासदार, विविध पक्षांनी वनविभागाला निवेदने दिली आहेत.बकर्‍या, कुत्रे, मांजर, डुक्कर आदी प्राणी बिबट्याचे खाद्य आहेत. त्यांना खाण्यासाठीच ते लोकवस्तीत दचकून प्रवेशतात.

बिबट्या माणसाना खायला येतात हा लोकांचा गैरसमज आहे. मानवाने त्यांचे अधिराज्य हिसकावल्याने असे प्रकार घडत आहेत. ‘बिबट्याचे शहर’ म्हणून नाशिक शहराची नवी ओळख निर्माण झाली आहे. शहरातसुद्धा वर्दळीच्या ठिकाणी बिबटे दर्शन देत आहेत. ‘नेमेची येतो येथे बिबट्या...’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना या नेहमीच घडत राहणार. मानवावर बिबट्याचे हल्ले का होतात? मुक्या प्राण्याचा यात काय दोष? याला कारणीभूत कोण? यापूर्वी असे होत होते का? या हल्ल्याबद्दल वनविभागाला जबाबदार धरणार का? याची उत्तरे आपणच शोधली पाहिजेत. नाही का?

Deshdoot
www.deshdoot.com