तेरे बिना जिंदगीसे...

- डॉ अरूण स्वादी
तेरे बिना जिंदगीसे...

नाशिक | Nashik

अभिनेता संजीव कुमार (Actor Sanjeev Kumar) यांची आज पुण्यतिथी. त्यांना जाऊन आता ३२ वर्षे होतील, पण त्यांच्या अदाकारीच्या आठवणी आजही चिरतरुण आहेत. आजच्या पुण्यतिथीनिमित्त (Death Anniversary) या अभिनय सम्राटाच्या कारकिर्दीचे पुनःस्मरण...

राजेश खन्ना (Rajesh Khanna)हा परवलीचा शब्द असताना आणि अमिताभ बच्चनशिवाय (Amitabh Bachchan) कोणत्याही निर्मात्याचे पान हलत नसताना आम्ही एका अभिनय सम्राटाशी मात्र कायमचे प्रामाणिक राहिलो होतो. तो होता हरी जरीवाला म्हणजे संजीव कुमार! सगळ्या मातब्बर अभिनेत्यांना टक्कर देऊनही आपले स्थान अबाधित राखणारा हा अतिशय संवेदनशील व कसदार अभिनय करणारा संजीव कुमार! ६ नोव्हेंबरला त्याची पुण्यतिथी असते.

संजीव कुमारची काहीशी तुलना जुन्या जमानातल्या बलराज सहानीशी होऊ शकते. बलराज उत्स्फूर्त अभिनय करणारे होते .त्यांना टक्कर घ्यावी लागली ती दिलीप कुमार व राज कपूर (Dilip Kumar and Raj Kapoor) यांच्या सारख्या दिग्गज नटांबरोबर ..पण आजही इतक्या वर्षांनी बलराज सहानींचे चित्रपट लोकांच्या लक्षात आहेत ते त्यांच्या उत्कट अभिनयामुळे. तीच गोष्ट संजीव कुमारची त्याला जाऊन आता ३२ वर्ष होतील. आश्चर्य पहा ज्या संजीव कुमारने आपल्या आयुष्यात वयोवृद्धांच्या अजरामर भूमिका केल्या त्याला आयुष्यात दीर्घायुषी व्हायचे भाग्य वाट्याला आले नाही.उलट तो आयुष्याचे अर्धशतकही पुरे करू शकला नाही. लाखो रसिकांचे हृदय काबीज करणारा संजीव कुमार हृदयविकाराचा बळी ठरला या दैव दुर्विलासाला काय म्हणायचे? मात्र त्याने अल्पायुषी कारकिर्दीत आपल्या चेहऱ्यावरची एक अन् एक रेषा वापरून अभिनय कसा करतात हे दाखवून दिले. म्हणूनच हा ठाकूर बलदेव सिंग आजही लोकांच्या स्मरणात आहे.

सुरुवातीच्या काळात त्याने 'संघर्ष' या सिनेमात त्या वेळचा बॉलीवूड (Bollywood) किंग दिलीप कुमार यांच्या बरोबर टक्कर घेतली होती. लोकांना वाटले, हा काय युसुफ मियाबरोबर टक्कर घेणार? पण त्याने तोडीस तोड काम केले. मग १९६९ मध्ये सच्चाई सिनेमात त्याने शम्मी कपूर (Shammi Kapoor)आणि साधना बरोबरही काम केले होते. ही काही काँटेकी टक्कर नव्हती, पण पुढे अशा बऱ्याच टक्कर झाल्या. अमिताभ, शशी कपूर, धर्मेंद्र आणि बरेच कुणी. किंबहुना अशी शिंग भिड व्हायची त्याला हौस होती. त्याचे वैशिष्ट्य हेच होते की तो विविध रंगी, विविध अंगी भूमिका करायचा. हिंदी चित्रपट सृष्टीतल्या धांगडधिंग्यात आणि त्याच्या गदारोळात, मारामारीत आणि हिंसाचारात निव्वळ अभिनयाच्या जोरावर त्याने आपले सदाबहार स्थान निर्माण केले.

संजीव कुमारचे अभिनय कौशल्य हिमालया एवढे मोठे होते यात थोडीही अतिशयोक्ती नाही. साध्या-सुध्या हलक्या-फुलक्या भूमिका त्याच्यासाठी बाये हाथका खेल होत्या. मनचली, अंगूर,पती पत्नी और वो या चित्रपटांत विनोदी भूमिका त्याने जबरदस्त पेश केल्या होत्या. 'मनचली'तला डेहराडूनवाला लीना चंदावरकरला चिडवणारा तरुण त्याने जितक्या सहजतेने उभा केला. तेवढ्याच सहजतेने त्याने 'ठंडे ठंडे पानी मे नहाना चाहिये'वाला पती रंगवला. 'मनोरंजन'मधला त्याचा 'गोयाके चू नाचे' हवालदार तर धमाल होताच आणि 'यही है जिंदगी'मधील किशन महाराजांशी संवाद साधणारा त्याचा दिलखुलास अभिनय कोण विसरू शकेल? 'स्वर्ग नरक' हा पण असाच एक छान चित्रपट, पण तरीही मला स्वतःला आवडलेला त्याचा लाईट विनोदी रोल असलेला चित्रपट 'मनचली'!

त्यातला 'डेहराडून' आणि सफरचंदाच्या बागा सर्वांच्या कायम स्मरणात राहतील. सस्पेन्स थ्रिलर 'कातील' किंवा 'उलझन'सारखे सिनेमे त्याने गाजवले होते. नायकाप्रमाणे खलनायकाचे चित्रपटसुद्धा तो आपल्या करांगुलीवर पेलून न्यायचा. चरित्र अभिनेता किंवा को-ऍक्टर म्हणून कोणाबरोबरही काम करायला तो तयार असायचा. बहुतेक चित्रपटात असे करून त्याने मुख्य हिरोवर कुरघोडी केली होती. त्याचे काही अतिशय गंभीर चित्रपट त्याच्यातल्या अभिनय संपन्नतेची दाद देऊन गेले. उदाहरणार्थ 'खिलोंना'... यातल्या वेड्याची भूमिका इतकी सुरेख रंगवली होती की वाटावे आपण एखाद्या मेंटल असायलममध्येच गेलो आहोत. 'शोले'मधला ठाकूर तर निव्वळ अविस्मरणीय आहे.

'नया दिन नई रात'मध्ये त्याने नऊ वेगळे रोल केले होते आणि यशाचे गौरीशंकर गाठले होते. 'कोशिश'मधला त्याने रंगवलेला मुका पाहून लोकांना संजीव कुमार खराच मुका नाही ना, असे वाटून गेले. 'शिकार'मधला त्याचा पोलीस इन्स्पेक्टर चांगला होता की, 'अनोखी रात'मधला बायकोवरील बलात्काराचा सूड घेणारा डाकू श्रेष्ठ होता? हा वादाचा विषय ठरू शकतो. 'आंधी'मध्ये पत्नीने त्याग केल्यामुळे झोंबणारी व्यथा घेऊन राहणाऱ्या पतीच्या भूमिकेत तो जितका तन्मय झाला होता, तितकाच तो 'अनुभव'मध्ये बायकोच्या लग्नापूर्वीच्या प्रियकरामुळे भरकटून गेला होता. 'दस्तक'मध्ये वेश्येने खाली केलेल्या खोलीत आपल्या पत्नीला घेऊन बिऱ्हाड थाटणाऱ्या नवऱ्याच्या आगळ्या व्यथा त्याने पुरेपूर बोलून दाखवल्या होत्या. ती कुचंबणा, तो चोरटेपणा त्याच्या अभिनय सामर्थ्याची ताकद दाखवून देत होता. संजीव कुमारने एकसांची भूमिका कधीच केल्या नाहीत. शिवाय आपल्यापेक्षा सात-आठ वर्षांनी लहान असणाऱ्या नट्यांबरोबर झाडाभोवती फेऱ्या फारशा मारल्या नाहीत.

अर्थात काही अपवाद जरूर होते. उदाहरणार्थ 'सीता और गीता'. 'हवा के साथ साथ, घटा के संग संग'... पण एकूण असे रोल कमीच होते.निव्वळ अभिनयाचा विचार करायचा तर तो राजेश खन्नापेक्षा निश्चितच सरस होता हे माझे प्रामाणिक मत आहे. 'आप की कसम'मध्ये त्याने राजेशकडून गालावर चपराक खाल्ली तेव्हा आम्ही त्याचे चाहते बराच वेळ आपला गाल चोळत बसलो होतो. या थपडेचा बदला संजीव कुमार कधी घेईल, असे आम्हाला झाले होते. पुढे लोकांची रुची बदलली आणि राजेश खन्नाला बऱ्याच थपडा खायला लागल्या ही गोष्ट निराळी, पण संजीव कुमार मात्र जिथे होता तिथेच राहिला.

एकूणच हरी जरीवाला हिंदी चित्रपट सृष्टीतील एक मौल्यवान हिरा होता. त्याच्या अभिनयाचे मूल्य जाणण्यासाठी 'मौसम' हा चित्रपट पुरेसा ठरावा. या चित्रपटाचा विषय तसा वेगळा होता. आपली प्रेयसी आपली प्रतीक्षा करत वेड लागून जगत राहिली हे कळल्यावर हमसाहमशी रडणारा संजीव ज्यांनी पाहिला नाही त्यांनी आपले आयुष्य व्यर्थ समजावे. ती वेदना, ती आर्तता, ती तडफड त्याने अश्रूच्या थेंबा-थेंबातून वटवली आहे.आपल्या तरुणपणीच म्हाताऱ्या माणसाचा मेकअप करायचा आणि काम करायचे धैर्य त्या काळात तरी आगळे वेगळेच! तरुण नट अशी रिस्क घ्यायचे नाहीत, पण संजीवकुमारने ती घेतली. मात्र त्याचा पुढे-पुढे त्याला खूप कंटाळा येऊ लागला.

आपण खरंच म्हातारे झालो आहोत असे त्याला वाटले. मग त्याने अशा भूमिका करणे बंद केले, पण आमचे दिग्दर्शक इतके विद्वान की त्यांनी संजीव कुमारला दिलीप कुमारचा बाप व्हायची गळ घातली. अर्जुन पंडित, संबंधसारख्या खास भूमिका ही त्याला करवेनात. तरीही 'सारांश'मध्ये आपण पाहिजे होतो ही रुखरुख त्याला लागली होती.संजीव कुमारच्या असंख्य चांगल्या भूमिकांमधून काही सर्वोत्कृष्ट भूमिका निवडणे तसे अवघड आहे .परंतु 'शोले'मधील जमीनदाराच्या भूमिकेचा उल्लेख करणे इथे आवश्यक आहे. ठाकूर बलदेव सिंगचे हात तोडलेले असतात. अभिनयात हातांच्या हालचालीचे काय महत्त्व असते हे सांगायला नको. संजीव कुमार निव्वळ डोळ्यांच्या सामर्थ्यावर ही भूमिका जगला आहे. त्याचे ते डोळे म्हणजे फक्त फुलबाज्या नव्हत्या ते तर शोले होते.

संजीव कुमार आक्रस्ताळेपणाने कधीच भूमिका करायचा नाही. संयत मुद्राभिनय ही त्याची खासियत होती. आवाज कुठे चढवायचा आणि कुठे उतरवायचा ते लक्षात ठेवूनच तो भूमिका फुलवायचा.संजीव कुमारला खाण्याचे खूप वेड होते. जिभेवर अंकुश नव्हता. तो म्हणे किचनमध्ये झोपायचा. अमर्याद वाढलेले वजन आणि हृदयविकार यामुळे त्याची हार्ट सर्जरी पण होऊन गेली होती. त्यानंतर तो खूप बारीक पण झाला, पण एकूणच त्याने प्रकृतीकडे थोडे दुर्लक्ष केले असे नाइलाजाने म्हणावे लागेल. त्याच्या अकाली निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टी एका अतिशय संवेदनक्षम कलाकाराला मुकली. अशोक कुमार, मोतीलाल, दिलीप कुमार, बलराज सहानी यांच्या परंपरेतला हा अभिनेता वयाच्या ४७ व्या वर्षी रुपेरी नव्हे तर काळाच्या पडद्याआड होतो यापेक्षा हिंदी चित्ररसिकांचे दुर्दैव कोणते? संजीवकुमारच्याच 'आंधी'मध्ये सुचित्रा सेन म्हणते तेच खरे असावे...

'तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही,

तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नही'...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com