Blog : विजय ‘एनडीए’चा, पण ‘सामनावीर’ तेजस्वी!

jalgaon-digital
8 Min Read

एन. व्ही. निकाळे | बिहार निवडणुकीत एनडीएला काठावरचे बहुमत मिळाले असले तरी 75 जागा जिंकून विधानसभेत तेजस्वींचा राजद अव्वल पक्ष ठरला आहे. तेजस्वींच्या तरूण-तडफदार नेतृत्वाच्या जोरावर ‘राजद’ने मारलेली मजल नजरेत भरणारी आहे. एक दमदार आणि सक्षम नेतृत्व त्यांच्या रुपाने पुढे आले आहे. बिहारी तरुणाई तसेच मातब्बरही तेजस्वींच्या उदयाने प्रभावित झालेच असणार! बलाढ्य एनडीएला टक्कर देण्यासाठी काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी तेजस्वींचे नेतृत्व निर्विवादपणे स्वीकारले. तेजस्वींनी स्वत:ला प्रचारकार्यात झोकून दिले. 200 हून जास्त सभा घेतल्या. त्यांच्या सभांना तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी फारशी प्रभावी ठरली नाही. अन्यथा तेजस्वी हेच मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले असते. बिहारचा निवडणूक सामना ‘एनडीए’ने जिंकला खरा, पण निवडणुकीतील चमकदार कामगिरी पाहता खरे ‘सामनावीर’ तेजस्वी यादवच!…

आयपीएलचा हंगाम यंदा प्रेक्षकांविना दुबईत रंगला. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल या संघांमधील अंतिम लढत रंगतदार ठरली. याच दिवशी बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी झाली. आयपीएल सामन्यांपेक्षाही बिहारची निवडणूक जास्त रोमांचक ठरली. आयपीएलच्या अंतिम लढतीचा निकाल नियोजित वेळेत लागला, पण बिहारच्या निकालाची बरीच प्रतीक्षा करावी लागली.

मतमोजणी ‘सुपर ओव्हर’मध्ये पोहोचली. एनडीए आणि महागठबंधन यांच्या जागांचे आकडे दर फेरीत सतत बदलत होते. निवडणूक यंत्रणा आता स्मार्ट आणि डिजिटल झाली आहे. मतपेट्यांच्या जागी मतदान यंत्रे आली आहेत.

त्यामुळे हल्ली निवडणूक निकाल काही तासांत हाती येतात, पण बिहार निवडणुकीचे अंतिम निकाल यायला मध्यरात्र उलटून गेली होती. त्याबद्दल अनेक संशय आणि शंका उपस्थित केल्या जात आहेत. या लढतीत अखेर एनडीएने बाजी मारली. 125 जागा जिंकून काठावरचे बहुमत (बहुमताचा आकडा 122) कसेबसे गाठले. महागठबंधनने 110 जागांपर्यंत मजल मारली.

मैदानात अतिरथी-महारथी उभे ठाकले असताना महागठबंधनचे केवळ 31 वर्षे वयाचे तरुण नेते तेजस्वी यादव यांनी एकाकी, पण चमकदार झुंज दिली. ‘राजद’ला विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष होण्याचा सन्मान मिळवून दिला. ‘तेजस्वी’ चमत्काराने देशभरातील नेते आणि विश्लेषकांनी तोंडात बोटे घातलीच असतील.

आता ‘लालटेन’ची गरज उरलेली नाही, अशी खिल्ली उडवणारेसुद्धा तेजस्वींच्या कामगिरीने आता कदाचित विजेचीही गरज नाही, असे म्हणू लागतील. बिहार जिंकण्यासाठी एकट्या तेजस्वींपुढे आव्हान उभे करताना सत्ताधार्‍यांना लोकसभा निवडणुकीसारखा बड्या नेत्यांचा भलामोठा फौजफाटा जमवावा लागला.

बरीच ताकद पणाला लावावी लागली. ‘मोदी अस्त्र’ही वापरावे लागले. तरीसुद्धा नितीश सरकारमधील 10 मंत्री पराभूत झाले. ‘जंगलराजचा युवराज’ म्हणून तेजस्वींना हिणवून आणि कमी लेखून मोठी चूक केली हे आता सर्व संबंधित मनोमनी समजून चुकले असतील.

राजकीय महत्त्वाकांक्षेने स्वबळावर निवडणूक लढवणार्‍या चिराग पासवान यांचा लोजप जागा जिंकण्यात चमत्कार दाखवू शकला नाही. तथापि जदयूच्या जागा आणि राजकीय बळ घटवण्यात लोजपला पुरेपूर यश आले. मात्र अपयशाचे दु:ख करावे की नितीशकुमारांच्या पक्षाचे नुकसान केल्याचा आनंद साजरा करावा, अशा संभ्रमात चिराग पडले असतील. चिराग यांनी एनडीएसोबत निवडणूक लढवली असती तर एनडीएची कामगिरी चांगली होऊन कदाचित मजबूत जनादेश मिळाला असता, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

बिहार विधानसभेत तेजस्वींचा राजद 75 जागा जिंकून अव्वल पक्ष ठरला. भाजप 74, जदयू 43 तर काँग्रेसला 19 जागा मिळाल्या आहेत. तेजस्वींच्या तरूण-तडफदार नेतृत्वाच्या जोरावर ‘राजद’ने मारलेली मजल नजरेत भरणारी आहे. एक दमदार आणि सक्षम नेतृत्व त्यांच्या रुपाने पुढे आले आहे.

बिहारी तरुणाई तसेच मातब्बरही तेजस्वींच्या उदयाने प्रभावित झालेच असणार! बलाढ्य एनडीएला टक्कर देण्यासाठी काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी तेजस्वींचे नेतृत्व निर्विवादपणे स्वीकारले. तेजस्वींनी स्वत:ला प्रचारकार्यात झोकून दिले. 200 हून जास्त सभा घेतल्या. राज्य पिंजून काढले. त्यांच्या सभांना तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी फारशी प्रभावी ठरली नाही. राहुल गांधी यांच्या सभांखेरीज इतर नेत्यांच्या सभा गाजल्या नाहीत. कामगिरी सुधारण्याची संधी स्थानिक काँग्रेस नेत्यांना निवडणुकीनिमित्त मिळाली होती, पण स्थानिक नेतृत्वाची अवस्था भाजपसारखीच निष्प्रभ ठरली.

अन्यथा तेजस्वी हेच मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले असते. बिहारचा निवडणूक सामना एनडीएने जिंकला खरा, पण निवडणुकीतील चमकदार कामगिरी पाहता खरे ‘सामनावीर’ तेजस्वी यादवच! राजकारणात वर्षानुवर्षे राहूनसुद्धा आपापल्या पक्षांना असे ‘तेजस्वी’ यश अनेक नेत्यांना आजवर मिळवता आलेले नाही. अशा अनेक पक्षांच्या ज्येष्ठांनी तेजस्वींच्या यशाचे कौतुक केले आहे. भाजप नेत्या उमा भारती यांनीसुद्धा तेजस्वींच्या कामगिरीला मनापासून दाद दिली आहे. तेजस्वी बिहारचे नेतृत्व करू शकतात, असे प्रमाणपत्रच त्यांनी दिले.

आताच्या निवडणुकीत यशाच्या सीमारेषेपासून तेजस्वी यांची उडी थोडी कमी पडली तरी बिहारमधील सर्व विद्यमान नेत्यांच्या मनात धडकी भरवणारे चमकदार यश त्यांनी नक्कीच मिळवले आहे. त्यांची नेतृत्वक्षमता पाहता पुढच्या निवडणुकांमध्ये ते यशाला नक्कीच गवसणी घालतील, असाही आशावाद तरुणाईला वाटू लागला असेल. एनडीएच्या यशाबद्दल विजयोत्सव साजरा होत असला तरी मोठी ताकद लावूनसुद्धा मिळालेले यश तेवढे लखलखीत नाही तर बरेच तोकडे आहे याचे भान ठेवले जाईल का?

यावेळी भाजपची कामगिरी जदयूपेक्षा वरचढ ठरली आहे. जदयूच्या तुलनेत जवळपास दुप्पट जागा भाजपने जिंकल्या आहेत. त्यामुळे सरकारच्या नेतृत्वाबाबत पुनर्विचार व्हावा, असा सूर आता भाजप गोटातून निघू लागला आहे. एनडीएतील कोणत्याही पक्षाला जास्त जागा मिळाल्या तरी मुख्यमंत्री नितीशकुमारच होतील, असा शब्द भाजप नेतृत्वाने निवडणुकीआधी दिला होता. अर्थात राजकारणात दिले जाणारे शब्द कधी-कधी स्थानिकांच्या महत्त्वाकांक्षेमुळे अनिच्छेने का होईना मोडले जातात, पण तसे यंदा होणार नाही, असे ठासून सांगितले जात आहे.

‘भाजप शब्दाला पक्का आहे, मुख्यमंत्री नितीशकुमारच होतील’ असे बिहारचे पक्ष प्रभारी तसेच उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्रीपद नितीशकुमार यांनाच देण्याचा शब्द खुद्द पंतप्रधानांनी दिल्लीतील विजयोत्सवात जाहीरपणे दिला. मुख्यमंत्रीपद देऊन निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीमुळे खचलेल्या मित्राच्या घावावर फुंकर घालण्याचा हा प्रयत्न असेल का? स्वत: नितीशकुमार मात्र त्यामुळे फारसे आनंदी नसावेत.

उपकाराच्या ओझ्याखाली पुढची वाटचाल करावी लागण्याच्या नुसत्या कल्पनेने कदाचित ते हतबल असावेत. मुख्यमंत्रीपदाचा काटेरी मुकुट डोक्यावर ठेवला गेला तरी तो किती काळ शिरावर राहील याबद्दलही त्यांना खात्री नसावी. ‘मुख्यमंत्रीपदासाठी मी दावा केलेला नाही, नेता निवड एनडीए बैठकीत होईल’ असे नितीश यांनी म्हटले आहे.

यावरून त्यांची असहाय्यता स्पष्ट होते. पराभूत मानसिकतेतून नितीशकुमार राज्याचा गाडा आत्मविश्वासापणे हाकू शकतील का? आक्रमक आणि मजबूत विरोधी महागठबंधनचे तगडे आव्हानही त्यांच्यासमोर उभे आहे. संख्याबळानुसार नव्या मंत्रिमंडळात भाजपचे वर्चस्व राहील. आग्रहाखातर मुख्यमंत्रीपद स्वीकारले तरी स्वाभिमान राखून कारभार करण्याचे स्वातंत्र्य नितीश यांना राहील का? महाराष्ट्रात युतीला बहुमत मिळूनही सत्ता हातातून निसटल्याची रुखरुख भाजपला लागून आहे.

वर्षभरापूर्वीची ती जखम अजून भरलेली नाही. त्याची आवृत्ती बिहारात होऊ नये याबद्दल भाजप नेतेसुद्धा जागरूक असावेत. दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड या राज्यांत पदरी अपयश आले. अर्थात मध्य प्रदेशात नंतर ज्योतिरादित्य कृपेने सत्ता मिळवली गेली हा भाग अलाहिदा! विविध कारणांनी शिवसेना, अकाली दलासह अनेक मित्र पक्षांनी एनडीएची साथ सोडली. आता केवळ जदयू आणि रिपाइं (ए) हे दोनच पक्ष उरले आहेत. नवे मित्र दृष्टिपथात नाहीत.

अशा स्थितीत जदयूला गमावून चालणार नाही. नितीश यांना मुख्यमंत्रीपदासाठी डावलल्यास कदाचित ‘महाराष्ट्र पॅटर्न’चा मार्ग ते अवलंबू शकतात याची भीती भाजप नेतृत्वाला वाटणे साहजिक आहे. म्हणून नितीश यांना चुचकारण्याशिवाय भाजपपुढे आज तरी पर्याय नाही. चिराग यांनी चांगल्या जागा जिंकून विजयाचा लख्ख प्रकाश पाडला असता तर कदाचित वेगळी खेळी खेळली गेली असती.

जदयूला रोखल्याची कोणती बक्षिसी चिराग यांना भाजपकडून मिळते यावरही नितीश यांचे लक्ष असेलच. बिहारात एनडीए आणि महागठबंधन यांच्यातील संख्याबळात नगण्य अंतर आहे. त्यामुळे नितीशकुमार मुख्यमंत्री झाल्यावर काही काळानंतर सत्ताधारी पक्षांतील एखाद्या नाराज गटामुळे राज्यात सत्तासंघर्ष उभा राहणे अशक्य नाही.

कारण तोसुद्धा भाजपनीतीचाच भाग आहे. तिसर्‍या क्रमांकाचा पक्ष सरकारचे नेतृत्व कसा करतो हासुद्धा पुढील काळात ठिकठिकाणच्या स्थानिक नेतृत्वाचे लक्ष वेधून घेणारा मुद्दा असू शकेल.

[email protected]

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *