Friday, April 26, 2024
Homeब्लॉगजुनं ते सोनं!

जुनं ते सोनं!

नाशिक | Nashik किरण वैरागकर Kiran Vairagkar

आमची श्रीमंती जवळ जिंकलेल्या कंच्यावरून ठरायची. मोठा डालडाचा डब्बा भरून कंचे म्हणजे गर्भश्रीमंत! प्रत्येक खेळाप्रमाणे स्ट्रायकर कंचा वेगळा असायचा. अगदी लहान नेम धरायला, मोठ्ठा कंचा रिंगण! लहानपणी आम्ही काचेच्या गोटीने, कंच्याने स्क्वॅशसारखा खेळ खेळायचो हे नंतर मोठेपणी स्क्वॅश बघितल्यावर कळले.

सारं कसं शांत-शांत! संध्याकाळची वेळ. एरव्ही याच गजबजलेल्या रस्त्यावर कोणालाही कोणाकडे बघायलाही फुरसत नसायची.

त्यामुळे निर्मनुष्य रस्ता आणि पावसाळी वातावरणातला कुंदपणा अधिकच उदास करीत होता. इतर काही करण्यासारखे नाही. दूरचित्रवाणी बघणे कधीच बंद केलेय. वाचन, दिवसभराच्या टेलिकॉन्फरन्सनंतर तसाही कंटाळाच आला होता.

- Advertisement -

घरातल्या घरात पर्यटन सुरू होते. दिवाणखाना ते गॅलरी स्वयंपाकघरमार्गे चकरा सुरू होत्या. तेवढ्यात समोरच्या इमारतीकडे लक्ष गेले. एक छकुली दोरीवरच्या उड्या मारण्याचा प्रयत्न करीत होती.

तिच्या उंचीच्या मानाने दोरी मोठी अथवा लांब असावी. सारखी अडकत होती, पण ती प्रयत्न सोडत नव्हती.

एक किंवा दोन पूर्ण उड्या झाल्या तरी आनंदित होत होती आणि स्वतःलाच जणू शाबासकी देत होती. तिच्या फ्लूरोसेन्ट केशरी टी-शर्टमधल्या उड्या मारणे एकदम उल्हासित करून गेले.

आलेली मरगळ नकळत चेहर्‍यावर आलेल्या हसूबरोबर गायब झाली. मी तसाच तिचा खेळ बघू लागलो. तो मिळालेला एक निर्व्याज आनंद नकळत भूतकाळात घेऊन गेला.

मला दोरी वरच्या उड्या मारता येत नसत. बहीण मात्र सटासट उद्या मारायची. आम्ही ‘नाचता येईना अंगण वाकडे’ युक्तीप्रमाणे वेगवेगळी करणे देऊन, दोर्‍या घेऊन, गाठी बांधून, लांबी कमी-जास्त करूनही शेवटी फज्जी ढांगच!

कमी जमायचे बहिणीसारखे आणि पळून जायचो दरवेळेस हा मुलींचा खेळ आहे म्हणून. मात्र आता ती छकुली तर एकटीच मन लावून प्रयत्न करीत होती. ती कसर बहिणेने दुसर्‍या एक खेळाने भरून काढली.

आमची बहिणाबाई आमच्यापेक्षा मुलांचा समजला जाणारा भोवरा खेळ सफाईदार खेळायची. तिथे मात्र पराभव मानण्याव्यतिरिक्त पर्याय नसायचा. त्या छकुलीच्या दर उडीगणिक मी अजून-अजून खेळांच्या भूतकाळात शिरू लागलो.

कंचे म्हणजे काचेच्या गोट्या, त्याचे आणि खेळाचे अगणिक प्रकार जिंकणे. एक वेगळ्या डब्यात भरून ठेवणे. आमची श्रीमंती जवळ जिंकलेल्या कंच्यावरून ठरायची. मोठा डालडाचा डब्बा भरून कंचे म्हणजे गर्भश्रीमंत!

प्रत्येक खेळाप्रमाणे स्ट्रायकर कंचा वेगळा असायचा. अगदी लहान नेम धरायला, मोठ्ठा कंचा रिंगण! लहानपणी आम्ही काचेच्या गोटीने, कंच्याने स्क्वॅशसारखा खेळ खेळायचो हे नंतर मोठेपणी स्क्वॅश बघितल्यावर कळले.

आम्ही त्याला ‘दिवाल-टच’ म्हणायचो. बिलियर्ड्सपेक्षा कैक पटीने आमचे खेळाडू लिलया नेम धरून कंचे गोलात ढकलायचे. आमच्या मित्रमंडळास हे माहीत असते तर नक्कीच ढीगभर बिलियर्ड्स, स्क्वॅशपटू नक्कीच तयार झाले असते.

पुढे हेच कंचे परत एक ब्रेनविटा नावाचा खेळ आला होता; तेव्हाच परत हातात घातल्याचे आठवले. कंचे, ढाबाधुबी, सूरपारंब्या, खुपसणी, लगोरी, आणि इतर तमाम शालेय खेळ डोळ्यांसमोर तरळून गेले.

झालेल्या शर्यती, गमती-जमती सुखावून गेल्या. हे बालपणाचे किस्से आमच्या प्रशांत कुलकर्णींना सांगितल्यावर त्यांनी तर अफलातून किस्सा सांगितला त्यांच्याच शब्दांत.

काल मी पण एक मस्त दृष्य पाहिले, सिग्मा वनकडे जाताना. साधारण दूरदर्शनसमोरच्या बंगल्याच्या कंपाउंडमध्ये मोठ्या म्हणजे वयस्कर आजीचा ‘रेडी का’ असा आवाज आला. मी आणि मित्र बरोबर त्या बंगल्यासमोरच होतो.

आवाज बंगल्याच्या पुढील बाजूने आला. आम्हाला वाटले आजी नातवंडांच्या सोबत खेळत असाव्यात आणि त्वरित एका सिनिअर माणसाचाच जाणवेल, असा आवाज बंगल्याचा मागील बाजूने आला ‘हां रेडी रेडी’! आम्ही चालायचा वेग कमी केला आणि पाहतो तर आजी डोलत-डोलत लपलेल्या त्या ‘वयस्कर बाळाला’ शोधायला त्यांच्या परीने डोलत-डोलत वेगाने गेल्या.

आम्हाला वाटले अजून कोणीतरी लहान मुलं असणार, पण थोडे तिथेच रेंगाळल्यावर कळले की आजी-आजोबा लपंडाव खेळतायत. खरं तर मनापासून त्या खेळात दोन भिडू म्हणून सामील व्हावेत, असेच वाटले, पण आपला भिडस्तपणा अशा वेळी मागे खेचतो. एक मन प्रसन्न करणारा प्रसंग! यावरून तर नक्कीच पटलं आपलंच मन ठरवते की आपण किती वर्षांचे व्हायचे ते. जुन्या गोष्टीत रमायला होते म्हणूनही ‘जुनं ते सोनं’ पण म्हणत असावे.

त्या छकुलीएवढंच लहान होऊन माझा मुक्त विहार सुरू होता मनातल्या मनात. आणि ही शृंखला भंग झाली फोनच्या रिंगने! येणारा फोन होता तरी डोक्यात भिनली आहे ‘करोना’ ट्यून आणि त्यात जाणवले गोखरू किंवा धोत्र्याचे फळ ज्याच्याशी आम्ही बिनधास्त खेळायचो; ते मात्र ‘करोना’ व्हायरससारखे दिसायचे.

तसेच मुलांना ‘करोना’सारखा दिसणारा एक लारीलप्पा आणलेला आठवला. ते आठवून परत चेहर्‍यावर एक स्मितरेषा उमटली. मनाशीच म्हणालो, अरे ‘करोना’शी तर लहानपणीच खेळलोय आपण आणि आता काय बाऊ करतोय त्याचा!

- Advertisment -

ताज्या बातम्या