रावी काठी देवाची नगरी

jalgaon-digital
7 Min Read

नानकांनी भाई मरदाना यांच्या समवेत अखंड प्रवास करत समाजाला समजून घेतले,तसेच समाजाला समजावले. त्यांच्या प्रवासाबद्दल

आणि भेटी दिलेल्या ठिकाणांबद्दल विविध अभ्यासकांनी विविध मते मांडली आहेत.

शीख धर्मपरंपरेत मक्का-मदिना, बगदाद, तिबेट, श्रीलंका इत्यादी ठिकाणी ही गुरू-शिष्याची जोडी भेट देऊन आल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यांच्या प्रवासातील अनेक प्रसंग आणि भेटलेल्या व्यक्ती याविषयी देखील अनेक कथा सांगण्यात येतात. सुप्रसिद्ध लेखक- विचारवंत खुशवंत सिंह यांच्या मते, गुरू नानकांनी केलेल्या प्रवासाबद्दल विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही. त्यांच्या निर्वाणानंतर साठ-सत्तर वर्षांनी जेंव्हा त्यांचे चरित्र लिहिले गेले, तोवर त्यांच्या आयुष्यातील घटना आणि प्रसंगांभोवती अनेक दंतकथा तयार झाल्या होत्या. असे असले तरी खुशवंत सिंह नानकांनी संपूर्ण भारतभर आणि भारताबाहेर पर्शिया (ईराण) व अरबस्थानापर्यत प्रवास केला होता, हे र्निविवाद मान्य केले आहे.

नानकांचे उभे आयुष्य हिंदू-मुसलमानांना एकत्र आणण्याचा प्रयत्नात व्यतीत झाले. आपल्या निर्मोही, निगर्वी, निष्काम, निर्मळ आणि निखळ व्यक्तिमत्वामुळे त्यांना या प्रयत्नात लक्षणीय यश प्राप्त करता आले. जगाला समजावून घेत आपली शिकवण जगाला समजवण्यासाठी त्यांचा हा प्रवास होता. त्यामुळे त्यांच्या प्रवासाला शीख धर्मपरंपरेत उदासी असे संबोधले गेले. त्यांची काही काळाची ही उदासी मानवाच्या जीवनात चिरंतन प्रसन्नता पेरण्यासाठी होती. जीवनाकडे पाठ फिरवण्यासाठी नव्हे,तर प्राप्त झालेल्या अमूल्य जीवनाच्या सन्मुख होण्यासाठी होती. आपण एक दिवस कायमचे आपल्या परिवारासमवेत राहणार,असा त्यांचा निर्धार होता.

प्रत्येक मोठया प्रवासानंतर नानकमरदानासह आपल्या परिवाराच्या व आप्तस्वकीयांचा भेटीला आले. नानकांवर अत्यंत प्रेम करणारे आणि त्यांच्या अलौकित्वाची जाणीव असलेले पहिले व्यक्ती तळवंडीचे मुस्लिम जमिनदार राय बुलार जेंव्हा वृद्ध होऊन मरणशय्येवर खिळले होते, तेंव्हा त्यांनी नानकांची भेट घेण्याची ईच्छा व्यक्त केली. नानकांनी त्यांची ईच्छा पूर्ण केली,कारण भाई मरदाना यांच्या आधी नकळतपणे त्यांचे शिष्यत्व पत्करणारा पहिला व्यक्ती म्हणजे राय बुलार होते. नानकांच्या जन्मस्थळ असलेल्या तळवंडीला म्हणजे आजचे नानकाना साहिब येथील गुरूद्धारा राय बुलार यांच्या जागेतच बांधण्यात आला आहे. नानकांच्या जंयतीनिमित्त निघणार्‍या मिरवणुकीचे नेतृत्व राय बुलार यांचे वंशज करतात. आज नानकाना साहिब पाकिस्तानातील पंजाब प्रांतात आहे. राय बुलार यांचे घराणे विश्वस्त म्हणून त्याचा कारभार पाहतात. राय बुलार यांच्या शीख धर्माप्रती अमूल्य योगदानाच्या सन्मानार्थ 2018 साली शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक कमिटीने अमृतसर येथील शीख संग्राहलयात त्यांचे तैलचित्र लावले. कोणत्याही धर्माला आणि त्याच्या धर्मसंस्थापकाला त्याची एक धर्मनगरी असावी लागते.

नानकदेवांचा बंदोबस्त करण्यासाठी आलेल्या एका सरकारी अंमलदारामुळे शीख धर्माची ही धर्मनगरी उभी राहिली. लाहोरला करोडिया खत्री नावाचा सुलतानाचा एक अत्यंत निष्ठावान आणि हुषार अधिकारी होता. नोकरशाहीचा चांगला अभ्यास अरणार्‍या करोडियाला गुरू नानक यांचा वाढता प्रभाव व प्रस्थ आपल्या सुलतानाला धोकादायक ठरू शकते,याचे आकलन होण्यास वेळ लागला नाही. राजाची सर्वात अधिक काळजी त्याच्या मर्जीतील अधिकार्‍यांना असते. कारण त्याच्या मर्जीमुळेच या अधिकार्‍यांना हरतर्‍हेच्या सुखांचा उपभोग घेता येत असतो. करोडियाच्या सूक्ष्म समाज निरिक्षण दृष्टीने हे हेरले की नानकांना हिंदू-मुसलमान दोन्ही समाजातील संत,संन्यासी,फकीर,पीर वश झाले आहेत. हे वश होतात म्हणजे सर्वसामान्य समाजाचे सांगायलाच नको. शेतकरी,जमीनदार,सावकार लोकही त्यांच्या शिष्यगणांमध्ये वाढत आहेत. एवढेच नव्हे तर असामाजिक तत्त्व म्हणजे दरोडेखोर,लूटारू,ठग इत्यादी देखील त्यांना शरण जात आपला पेशा सोडत आहेत.

सामाजिक सलोखा,शातंतामय सहजीवन आणि नीतिमान समाज निर्माण होणे कोणत्याही राज्यकर्त्याला परवडणारे नसते. त्याच्या सत्तेला याचा सर्वात मोठा धोका असतो. समाज विभाजीत असला आणि अपराधी असला तर तो एकवटत नाही. तसेच आपल्या समस्यांवर त्याचे लक्ष केंद्रित होत नाही. करोडियासारख्या चाणाक्ष अधिकार्‍याला यामुळेच नानकांचा बंदोबस्त करणे आवश्यक वाटले. त्याने आपल्या अत्यंत तत्पर प्रशासनाची चुणूक दाखवत नानकांना लाहोर परिसरातून हद्दपार करण्याचे ठरवले. तो स्वतः सैनिकांची तुकडी घेऊन यासाठी निघाला. लोकांना त्याची ही कृती आवडली नव्हती. आपल्या मालकाला खुष करण्याचा करोडियाने चंग बांधला होता. आपल्या सैन्य शक्तीचा गर्व त्याला होता आणि तिचे सामर्थ्य दाखवत तो घोडयावर स्वार झाला,त्याची पलटण त्याच्या मागे चालत होती. नानकदेवांच्या राहुटीपर्यंत हे लोक पोहचले.

तेथे गेल्यावर काही अद्भूत घडू लागले. करोडियाचे डोक गरगरू लागले आणि त्याचा घोडा अडखळू लागला. शिपाई आणि त्यांच्या घोडयांची हीच अवस्था होती. त्याच्या सहका-यांनी नानकांना पाहण्याची आधीच अशी अवस्था आहे,तर पुढे काय होईल? असा प्रश्न केला. त्याच्या देखील लक्षात आले होते आणि त्याला आपल्या चूकीच्या कृतीची जाणीव एव्हाना होऊ लागली होती. करोडिया घोडयावरून उतरला आणि नानकांच्या राहुटीत त्यांना सामोरा गेला. त्यांना प्रणाम करत म्हणाला,मी तुमचे सामर्थ्य समजू शकलो नव्हतो. मला क्षमा करावी मला सन्मार्ग दाखवावा. नानकांनी त्याची स्थिती समजून घेतली आणि ते म्हणाले, एक अधिकारी म्हणून तू तूझे कर्तव्य चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेस मात्र तुझी राज्यव्यवस्थाच बिघडली आहे. तिला सुधारण्याचे प्रयत्न केल्यास,प्रजाहितकारी निर्णय व काम केलेस तर तुला ही यातायात करावी लागणार नाही. याठिकाणी आदर्श राजा आणि प्रशासनक यांचा उपदेश करोडियाला केले.

राज्यकर्ते हे स्वतःच्या नावलौकिकासाठी,प्रसिद्धीसाठी,प्रतिष्ठेसाठी,मानमरातबासाठी सर्व काही करत असतात. अशावेळी प्रामाणिक अधिकारी जनतेसाठी हितकारी काम करू शकतो. राजाची चाकरी कितीही इमानाने केली तरी पुण्याचा घडा रिकामाच राहतो. आपण आपल्या अधिकारांना परमार्थाची जोड दिल्यास समाजाच्या कल्याणचे कार्य आपल्या हातून होते आणि समाजाचा समतोल राखला जातो. तसेच त्या अधिका-याचा लौकिक कायम राहतो. असे देखील नानकांनी सांगितल्यावर करोडिया अंतरबाहय बदलला. त्याने नानकांचे शिष्यत्व पत्कारले. ज्या स्थानावर नानकांनी गुरूपदेश केला,सन्मार्ग दाखवला,अंधारातून प्रकाशाकडे नेले आणि जेथे त्यांचा आपल्याला सहवास लाभला.

असे हे स्थान इतिहासात अजरामर करावे असा विचार त्याच्या मनात आला. रावी नदीच्या काठावर आपल्या गुरूंसाठी आणि त्यांच्या धर्ममार्गासाठी एक गाव उभारावे यासाठी त्याने प्रयत्न केले. तो आणि त्याचे सहकारी काही दिवस तेथे राहिले. त्याने नव्या गावाची सर्व व्यवस्था लावली. नानकांनी त्या गावाचे नामकरण कर्तारपूर असे केले. परमात्म्याची नगरी किंवा देवनगरी असा कर्तारपूरचा अर्थ होतो. नानकदेवांचे गाव म्हणून कर्तारपूर साहिब आज शीख धर्माची देवनगरी आहे. एक श्रेष्ठ तीथक्षेत्र आहे. काही दिवसांपूर्वी भाविकांना कर्तारपूरला जाऊन सरदार साहिबचे सहजपणे दर्शन घेता यावे. तसेच यासाठी व्हिसा आवश्यक असणार नाही. यासंदर्भात भारत-पाकिस्तान यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यालाच कर्तारपूर कॉरिडॉर असे संबोधण्यात आले. यापूर्वी देखील नानकाना साहिब,सच्चा सौदा इत्यादी नानकांच्या वास्तव्याने आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या क्षेत्रांविषयी भारत-पाकिस्तान यांच्यात करार मदार झालेले आहेत. त्याची अंमलबजावणी मात्र दोन्ही देशातील त्या-त्यावेळच्या परिस्थितीवर अबलंबून राहिली आहे.

प्रा.डॉ.राहुल हांडे । 8308155086

(लेखक धर्म, इतिहास व साहित्य अभ्यासक आहेत)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *