Thursday, April 25, 2024
HomeनगरBlog : नो मिन्स नो

Blog : नो मिन्स नो

स्वातंत्र्याची सरळ व्याख्या म्हणजे कोणत्याही व्यक्तीला नाही म्हणण्याचा अधिकार हवा. परंतु कुटुंबात आणि समाजात स्त्रियांना नाही म्हणायचा अधिकार आहे का? किंवा तिच्या ‘नाही‘चा आदर करणारे किती पुरुष आहेत? भारतात आणि जगभरात स्रियांच्या प्रश्नावर अनेक चित्रपट आले. त्यामध्ये अलिकडेचं ‘पिंक’ आणि ’छपाक’ चित्रपटांनी महिलांच्या जीवनावर नव्याने प्रकाश टाकला. पिंकमधून अमिताभ बच्चन पोटतिडकीने कोर्ट रूममध्ये म्हणतो, ’ना का मतलब ना होता है ’ नाही म्हणणारी व्यक्ती कोणतीही स्त्री असो. मग ती असो पत्नी, गर्लफ्रेंड किंवा इतर कोणीही असो. त्या नाहीचा अर्थ नाहीच असतो.

भारतीय पुरुषसत्ताक संस्कृतीमध्ये स्त्रियांवर अधिकार गाजवण्याला किंवा त्यांना आपल्या काबूत ठेवण्याला मर्दांगी समजले जाते. यावरून समाजात ‘पायातील चप्पल पायात ठेवली पाहिजे’ ही म्हण प्रचलीत झाली. यातून स्त्रियांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन प्रतीत होतो. महिलांच्या साहसी कामगिरीला देखील मर्दानी म्हणून कौतूक होते. स्त्रीच्या जन्मापासून मनावर बिंबवलं जातं की, तो तुझ्यापेक्षा जास्त खास आहे. तिला लहानपणीपासूनच मेकअप बॉक्स दिला जातो तर खेळायला भांडे-कुंडे, बाहुली दिली जाते. याउलट मुलांना वेगळी वागणूक दिली जाते. तो रडत असला तर काय मुलींसारखा रडतोस म्हणून हिणवलं जातं. त्याला खेळायला मैदानी खेळाचे साहित्य पुरवितात. आपल्या समाजात स्त्री जन्माला येते आणि पुढे समाजात तिला दुर्बल किंवा कनिष्ठ वागणूक दिली जाते.

- Advertisement -

10 फेब्रुवारीला (तसं रोज घडत आहेत) महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावणार्या घटना घडल्या. वर्धा येथील हिंगणघाटच्या पीडितेचा मृत्यू… गडचिरोली येथे मुलीने आंतरजातीय लग्न केले म्हणून आई, वडील आणि भावाची आत्महत्या… पुणे येथे एका शाळकरी मुलीला अ‍ॅसिड टाकण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार करण्याचा प्रकार… परभणीत ऊसतोड टोळीतील महिलेचा प्रियकराकडून खून… भंडारा येथे पोलीस असल्याचे सांगून अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न… या सर्व घटना एकाच दिवशी घडल्या आहेत. अजूनही असू शकतात. कारण काही घटना दबल्या किंवा दाबल्या गेल्या असतील. हा तोच महाराष्ट्र आहे का, जिथून महिलांच्या क्रांतीची बीजं देशभरात रोवली गेली?
समाजाला प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट हवा असतो.

घटना घडल्यानंतर लोक सोशल मीडियातून तावातावात भडक प्रतिक्रिया देतात. फेसबुक अन् व्हाट्सअ‍ॅपचे डीपी बदलून सहानुभूती दाखविण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा काही दिवसांत परिस्थिती ‘जैसे थे’! आपल्या शहरात किंवा अवतीभवती महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडत असतात त्यावेळी मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातं. एखाद्या अत्याचाराच्या घटनेची जेव्हा ठळक बातमी होते, त्यावेळी लोकांचं संवेदनशील मन कमालीचं जागं होतं

रोजच जळतीय ती
वासनेच्या अग्निकुंडात
केली जातीय मनाची चिरफाड
अन् देहाची विटंबना समाजात
पिढ्यानपिढ्या शोषल जातय
तिच्या धमण्यांतलं रक्त
अन् नर-नारी एकसमान
हा शब्द मारला जातोय तिच्या माथी
नाहीस तू अबला
हो रणरागिणी अन् दुर्गा
येणार नाही मदतीला
इथला कृष्ण अन् राम
हल्ली असतो अपडेट तो
फेसबुक अन् व्हाट्सअ‍ॅपवर
निषेधही व्यक्त करतो
सोशल मीडियातून
जातीची असले तर
कर्तव्य समजून मॅसेज व्हायरल करतो
अन् समाधानाने पब्जी खेळतो
असाच घडतोय आमचा कृष्ण अन् राम
तु हो स्वावलंबी अन् मुक्तपणे जग

कोपर्डीच्या घटनेनंतर महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने मूक मोर्चे निघाले. या मोर्चाने पूर्ण समाज ढवळून निघाला. मात्र तरीही अत्याचाराच्या घटना घडतच राहिल्या. हे समाज आणि सरकारचे अपयशचं म्हणायला हवं. काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये एका डॉक्टर मुलीला जिवंत जाळले. या घटनेचे संपूर्ण देशभरात ‘सोशल‘ पडसाद उमटले. पोलिसांनी काही तासांत आरोपींना अटक करून त्यांचा एन्काउंटर केला. एन्काउंटर करणार्‍या पोलिसांचे हारतुरे घालून स्वागत करण्यात आले. पण काही प्रश्न मनात कायम राहतात… एन्काउंटर केल्याने महिलांवरील अत्याचार थांबतील का? असे किती एन्काउंटर करायचे? उलट हैद्राबाद घटनेत एन्काउंटर करून पोलिसांनी पळवाटच शोधली.

या एन्काउंटरच्या आडून पोलिसांनी एखाद्या मोठ्या व्यक्तीला वाचवले का? पीडित मुलीच्या बहिणीने तक्रार दाखल केल्यावर पोलिसांकडून तपासात उशीर का झाला? न्याय देण्याची ही पद्धत योग्य आहे का? पोलिसांची भूमिका आरोपींना पकडून न्यायालयात हजर करणे आहे, न्याय करणे नाही. न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही का? या घटनेनंतर पोलिसांनी दिलेले स्पष्टीकरण खरेही असू शकेल. पण काही प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतात. गुन्हेगारांना फाशी दिली किंवा त्यांचा एन्काउंटर केला म्हणजे अत्याचार थांबतील हा भाबडा समज उराशी बाळगून तरी कसे चालेल. महिलांवरील अत्याचार थांबण्यासाठी प्रथम तिच्याकडे माणूस म्हणून बघण्याची गरज आहे. कोणत्याही देशाची व्यवस्था तथ्यांवर चालते, नागरिकांच्या भावनेवर नाही.

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी दिल्लीतील निर्भयाच्या गुन्हेगारांना लवकरात लवकर फाशी व्हावी यासाठी मौन धरले आहे. त्यापेक्षा अण्णांनी काही धोरणात्मक अंमलबजावणीसाठी आग्रही राहावे असे वाटते. प्रलंबित महिला अत्याचाराचे खटले तातडीने मार्गी लावणे, महिलांच्या सुरक्षासाठी कडक कायदे करणे, तरुणांसाठी समुपदेशन केंद्र स्थापन करणे, लैंगिक शिक्षण देणे यासाठी त्यांनी आपले उपोषण पणाला लावले तर ते अधिक संयुक्तीक होईल. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ अनेक व्याख्यानात बोलताना म्हणतात की, मुलींवर बलात्कार होण्याला त्यांचे कमी कपडे घालणं कारणीभूत आहे.

एका अर्थाने त्या गुन्हेगारांना क्लिन चीट तर देत नाहीत ना अशी शंका मनात येते. मात्र देशात पाच वर्षे मुलीवर आणि सत्तर वर्षांच्या वृद्धेवर देखील अत्याचार होतात. मग येथे कमी कपड्यांचा मुद्दा कसा लागू पडतो? एखाद्या महिलेचा विनयभंग झाला तर तिचे कपडे, बोलणं वगैरे बाबींची चर्चा होते. तिनेच त्याला उत्तेजित केलं असेल असं अनेक घटनांत सहज बोललं जातं. गुन्हेगार पुरुष काही दिवस सजा भोगून पुन्हा समाजात उजळ माथ्याने वावरतो. मात्र पीडितेेला आयुष्यभर निंदानालस्ती सहन करावी लागते.

प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) विनोदी कीर्तनासाठी राज्यभरात प्रसिध्द आहेत. मात्र विनोदनिर्मिती करताना महिलांबद्दल नकारात्मकपणे बोलून श्रोत्यांचे प्रबोधन करणे हा महिला अन् मुलींचा अपमान नाही का? त्यांची काही विधाने ऐकली तर त्यातून काय मतितार्थ घ्यायचा असा प्रश्न पडतो. ‘चप्पल कितीही भारी झाली म्हणून काय गळ्यात घालतो का?’, ‘अहो चप्पल कुठं शोभती? बायको आहे ती. तिनं त्या मापात असावं.‘ ‘पोरीच्या अंगात जितके कपडे कमी तितकी पोरगी फटकावली पाहिजे’, ‘नोकरीवाल्याच्या बायकांनो, सांगा, काय काम करता तुम्ही? लाज धरा लाज.’, ‘नवरदेवापुढे पोरींनी नाचायला सुरुवात केली लग्नात, अरे खानदान तपासा आपले कोणते आहेत?’, ‘पालकांनी जरा आपल्या मुलींचे हात तपासा. बांगडी आहे का बघा. नाहीतर बुडालाच धर्म?’, ‘पोरीलाबी अकली नाही राहिल्या. कुणावरबी प्रेम करायला लागल्या. आम्ही एका वर्गात होतो आणि प्रेम झालं म्हणे.

कानफाड फोडलं पाहिजे’ ‘गोरी बायको करू नये, कारण ज्यांनी ज्यांनी गोर्‍या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या’ इंदुरीकर महाराजांची अशी अनेक विधानं यू ट्यूबवर सहज उपलब्ध आहेत. काहींना ही विधानं विनोदी वाटू शकतात. पण नकळत त्याचा नकारात्मक परिणाम स्त्रियांच्या मानसिकतेवर होणार नाही हे कशावरून?

नात्यामध्ये समर्पण, आनंद, आदर आणि त्याग हवा. परंतु आपल्याकडे स्त्री-पुरुषांच्या नात्यात भरडली जाते ती फक्त स्त्री. प्रेमभंग केला म्हणून रोमीयोकडून अत्याचार होतो. आणि तिच्या प्रेम करण्याने कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीला मिळाली असा कांगावा करत तिचा बळी घेतला जातो. स्त्रियांच्या होकार आणि नकारातच दडली आहे प्रतिष्ठा. अ‍ॅसिड अ‍ॅटॅक, बलात्कार, पेट्रोल टाकून जाळण्यापर्यंतची विकृत मानसिकता तयार झाली आहे. लग्नानंतर शरीर संबंध ठेवताना प्रत्येक वेळी तिची सहमती असते असं नाही. केवळ नवरा आहे म्हणून तिला गपचूप सहन करावं लागतं. हा समाजमान्य बलात्कार नाही का? चित्रपटातील आयटम साँगदेखील स्त्रियांच्या देहाचं उदात्तीकरण करणारेच असतात. प्रियंका चोप्रा एका आयटम सॉगमध्ये म्हणते, ‘मुंबई की ना दिल्लीवालों की, पिंकी है पैसे वालो की..’ यातून समाजाने काय विचार घ्यावे? हे समजण्यापलीकडे असते.

असुरक्षित वातावरणामुळे अनेक पालक मुलींना बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवायला नकार देतात. मुलगी अठरा वर्षांची झाली की लग्न लावून देतात. कुटुंबात जसे मुलींवर बंधन लादले जातात तसे मुलांवर का नाही? त्याच कुटुंबातील तरूण मुलगा दिवसरात्र घराबाहेर असतो. त्यावेळी त्यांना विचारलं जातं का? दिवसभर काय केलं? रात्री उशिरापर्यंत कुठे होतास? सातच्या आत त्याला घरात यायला का नाही सांगितलं जात? मुलींसाठी काळजी वाटते तशी मुलांची का नाही वाटत? सध्याच्या असुरक्षित वातावरणात महिलांवर अत्याचार होऊ नयेत म्हणून कडक कायदे करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

– प्रशांत शिंदे
9673499181

- Advertisment -

ताज्या बातम्या