Blog : आपली भाषा, आपली अस्मिता : मराठी राजभाषा दिनविशेष
ब्लॉग

Blog : आपली भाषा, आपली अस्मिता : मराठी राजभाषा दिनविशेष

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

तात्यासाहेब शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले. वि.स. खांडेकरांनंतर मराठी साहित्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे ते दुसरे महान साहित्यिक.  त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून त्यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून शासकीय तसंच समाजाच्या सर्व स्तरांवर साजरा करण्यात येतो.

मराठी भाषा ही जगातील महत्त्वाच्या भाषांपैकी एक आहे, याबद्दल कुणाचे दुमत व्हायचे कारण नाही. मराठी भाषेचा इतिहासही तितकाच रंजक आणि उद्बोधक आहे.

त्याचा संबंध मराठी माणसाच्या कर्तृत्वाशी आहे हेदेखील तितकंच महत्वाचं. आजच्या मराठी भाषेचा विकास टप्प्याटप्प्याने होत गेला. वेगवेगळ्या शतकांमध्ये महाराष्ट्रात ज्या राजवटींची सत्ता होती त्यांचाही प्रभाव भाषेच्या विकासावर पडला. संपन्‍न ज्ञानभाषा असणारी मराठी महानुभवांची धर्मभाषाही आहे.

मराठी ही राजभाषा असणारे सातवाहन, राष्ट्रकुट आणि मराठे हे राज्यकर्ते भारतभर राज्य करत होते. आजच्या पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानावरही मराठी सत्तेची पताका फडकत होती. वैभवशाली वारसा लाभलेली आपली मराठी भाषा विसाव्या शतकात अनेक प्रवाहांना आपल्यामध्ये सामावून घेत आधिक समृद्ध झाली आहे.

एकविसाव्या शतकात ती आधुनिकतेचा बाज लेऊन आधिक व्यापक होत आहे. भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी भाषेचा चौथा आणि जगात दहावा क्रमांक लागतो. मनुष्याचा भाषाव्यवहार रोजच्या साध्यासुध्या कामापासून तो अत्युच्च पातळीवरील कलाविलास आणि तत्त्वमीमांसा यांच्यापर्यंत चालू असतो. भाषा ही माणसाच्या सुधारणेची आणि संस्कृतीची वाहक आहे.

मराठी भाषेबद्दल खंत ही की, मराठी भाषिक लोक मातृभाषेचा स्वभाव, तिची सुंदर विशेषणे, क्रियाविशेषणे, व्याकरण, वाक्प्रचार एवढेच नव्हे तर साध्यासुध्या क्रियापदांनाही तिलांजली द्यायला निघाले आहेत. वेळ-काळापरत्वे भाषादेखील बदलतात. परंतू बदलतांना त्या आपले संचित व वैशिष्ट्ये कटाक्षाने जोपासतात. मराठी भाषा उर्जितावस्थेत येत असल्याचे उत्साही वातावरण असतांना ती मरणासन्‍न असल्याचे सूर निघतात त्याची अनेक कारणं आहेत.

आपल्याच राज्यात सार्वजनिक ठिकाणी मातृभाषेत बोलण्याचा संकोच, अतिरिक्त भाषिक सहिष्णुता, परभाषिक व्यावसायिकांशी मराठीत बोलण्यातील कुचराई, इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याकडे पालकांचा वाढता कल, मराठी शब्दसंपदा वाढविण्यातील अक्षम्य बेपर्वाई आणि या सर्वांवर कळस म्हणजे तरुणाईच्या हातात स्थिरावलेल्या ‘मोबाईल’ नावाच्या गोंडस यंत्रात सामावलेल्या सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे मायमराठीचं अक्षरशः दिवस-रात्र अबालवृद्धांकडून सुरु असलेलं वस्त्रहरण.

आजच्या मराठी भाषा दिनाच्या पार्श्‍वभूमीवर सकल मराठी जनांना मला फक्त एकच प्रश्‍न विचारावासा वाटतो. संत-महात्मे-विचारवंतांनी आपल्या हाती एका समृध्द भाषेचा ठेवा सुपूर्द केला होता. आपण तो ठेवा खरंच जपून ठेवलाय का?

– गणेश जाधव (मुंबई दूरदर्शन)

Deshdoot
www.deshdoot.com