Blog : अडगळीतील सामान
ब्लॉग

Blog : अडगळीतील सामान

Sarvmat Digital

शहरात स्थायिक झालेल्या लोकांना गावी जायचा बहाणा म्हणजे जवळच्या नातेवाईकाचं लग्न. बर्‍याच वर्षांनी मुंबईहून सोलापूरवाडीला आलो होतो. डोंगराच्या पायथ्याशी नदीच्या संगमावर असलेलं हे सुंदर गाव. सिमा आत्याच्या लग्नासाठी आई अन मी पंधरा दिवस अगोदरच आलो होतो. बाबा चार-पाच दिवसांनंतर येणार होता. खूप दिवसांनी आल्यामुळे सोलापूरवाडीत सगळं नवीन वाटत होत. जुनी वडाची झाडं तोडून झालेलं रस्ता रुंदीकरण… किल्ल्यासारखं दिसणार्‍या वाड्याचं खिळपाट झालेलं… रस्त्याच्या बाजूने नवीन घरं, इमारती अन् हॉटेल… पूर्वी गावात दगडाचं एकच मंदिर होतं. आता उंच शिखराचे चार मंदिर आहेत. गावच्या लोकांचे घड्याळ तसं खूप संथ. त्यांच्याकडे एकमेकांसाठी वेळेची कमतरता नसते. एकत्र स्वयंपाक आणि नंतर जेवताना होणार्‍या गप्पा… असं खूप छान वातावरण गावाकडं होतं.

आईच बालपण खेडेगावात गेल्याने मुंबईहून आलं की ती लगेच रमली. आई मुंबईत ज्या टीव्ही सीरिअल बघते त्याच सिरिअल काकूपण गावी पाहते. त्यामुळे गावकडच्या आणि शहरातील लोकांमध्ये तो एक समान धागा जाणवला. दुसरा समान धागा म्हणजे ‘स्त्रीयांना एका वेळी न चुकता अनेक काम करण्याची कला’. उदाहरण सांगतो… ‘काकू भाकरी बनवते, आई भाजी बनवते, आत्या तिच्या होणार्‍या नवर्‍याबरोबर फोनवर बोलते, आजी काकूच्या बाळाला सांभाळते… घरात वरील सर्व कामे एकाच वेळी होत असतानाच सिरियलचा एकही एपिसोड चुकवला जात नाही! दिवसभराच्या कामाचा थकवा, एकमेकींतील मतभेद विसरून सिरिअल बघताना ‘हम साथ साथ है’ असे प्रत्येक घरात असणारं वातावरण इथंही होतंच.

गावात शिवजयंतीची मिरवणूक जोरात सुरू होती. डीजेवर मिरवणूक असल्याने घरात बोलताना सगळ्यांना मोठ्या आवाजात बोलावं लागत होतं. त्यामुळे टिव्हीचा देखील आवाज वाढला होता. हल्ली ऐतिहासिक सिनेमा आणि सिरिअलचा मोठा बोलबाला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबातील इतिहासप्रेमी ड्रामा सिरिअलमध्ये इतिहास शोधतात. तसं इथंही होतं. घरातील वातावरण प्रत्येक सिरिअलनुसार ऐतिहासिक असतं. भविष्यात ‘आता पुस्तकं वाचण्यापेक्षा दोन तासांचा सिनेमा आणि अर्ध्या तासाची सिरिअल बघून इतिहास समजून घ्या’ असा सल्ला कोणी दिला तर आश्चर्य वाटू नये. असे झालेच तर शाळेतल्या विद्यार्थ्यांसमोर मोठं आव्हान असेल की, ‘उत्तर पत्रिकेत पुस्तकातील इतिहास लिहावा का टिव्हीतला?’… असो..

गावी गेल्यापासून संपूर्ण दिवस शेतात भटकण्यात जात. त्यामुळे टिव्ही बघण्याची अजिबात इच्छा नव्हती. मग गावातल्या शिवजयंती मिरवणुकीकडं मोर्चा वळवला. डिजेवर मिरवणुकीत ‘मै हू डॉन’ गाणं सुरू होतं. त्या गाण्यावर डिजेपुढं नाचणारे तरुण जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देत थिरकत होते. बाजूला जेसीबीच्या मदतीने गुलालाची उधळण करत होते. युवा नेत्याचे फोटो फ्लेक्सवर झळकत होते. गाणं बदलण्यासाठी त्यांची झुंबड उडत होती. काही वेळाने मिरवणूक पुढच्या चौकात गेली.

मी तिथच थांबलो. जवळच एक वृद्ध गृहस्थ दिव्याच्या उजेडात काहीतरी गुंफीत होते. त्यांचा चेहरा उजेडात स्पष्ट दिसत होता. दाढीचे वाढलेले खुंट, कपाळावर अष्टगंध, एका कानात बाळी, अंगात पांढरा कुडता, गुडघ्यापर्यंत धोतर, पिवळ्या रंगाचा फेटा, शरीर काटकुळं… ते वयाने 75/80 वर्षांचे असतील. येवढ्या गर्दीत एकच उद्योगी माणूस दिसला होता. मी त्यांच्या शेजारी जाऊन बसलो. त्यांनी माझ्याकडे कटाक्ष टाकून दुर्लक्ष केले. बोलायला कुठून सुरुवात करावी हा प्रश्न पडला होता. विचारायचे म्हणून विचारले, ‘आजोबा कुठे राहता?’ आजोबांनी एका चांगल्या टोलेजंग वाड्याकडं बोट केलं. वाड्याचं बांधकाम ऐतिहासिक किल्ल्याप्रमाणे होतं. ‘मग इथं का बसलात.’ असं विचारल्यावर आजोबांनी काहीच उत्तर दिलं नाही.

‘आजोबा, तहान लागलीय. मी गावात नवीन आहे. प्यायला पाणी मिळंल का?’ मी विचारले. आजोबा, ‘चल घरला.’ त्याचं घर जवळच होतु. आजोबाुनी माठातील गार पाणी प्यायला दिलं. ‘आजोबा! पाणी खूपच गोड कसं’ ‘मळ्यातल्या हिरीचं हाय. अन दिसभर मडक्यात व्हतं, म्हणोन गार पडलंय‘ आजोबा म्हणाले. आजोबांनी घोंगडी बसायला आणली. नको नको म्हणलं तरी खूप आग्रह केला. ‘तुम्ही गावातलं पाव्हणं दिसताय? खाली कस बसतावा.’ घोंगडी हातरत ते म्हणाले, ‘कुणाच्या हिथं आलास?‘ ‘मुंबईला असतो. तुकाराम पाटलांचा नातू आहे. ‘बरं, बरं! कव्हामव्हा गावाला येत जावा, वळखी व्हत्यात.’ मी हसून, ‘काही कार्यक्रम असला तर येत असतो की.’ ‘आजोबा घरी कोण कोण आहे.’ मी विचारलं. पिशवीतील साहित्याची आवराअवरी करत आजोबा म्हणाले, ‘मीच हाय! म्हतारीला जाऊन सहा महिनं व्हतील’ आजोबाुच्या डोळ्याच्या कडा अचानक ओल्या झाल्या.

आतापर्यंत पहाडासारखा वाटणारा हा माणूस आतून पोखरल्यासारखा वाटला. ‘तुमचं जेवण कोण बनवतं’ ‘मोरल्या वाड्यातून न्यारीला एक भाकर अन राच्याला एक भाकर देत्यात, पोर महिन्याची महिन्याला पैस पाठिवत्यात त्यासनी.’ ‘तुम्हाला किती मुलं आहे?’ मी विचारले. ‘हायेत! दोन पोरं अन एक पोरगी’ ‘आजोबा मग तुम्ही त्यांच्याकडे का रहात नाहीत.’ असं विचारल्यावर ‘त्यांनीच हिथं राहायला पायजे व्हतं, त्यांच्या शिक्षणाला रुपया कमी पडून दिला नाय बघ. जेवढ शिकत गेले तस आमच्यापासून तुटत गेले. थोरला पोरगा दिल्लीत हाय. बारका कर्नाटकात असतोय. पोरगी पुण्याला असती.

म्हतारी गेल्यावर समद्यांच्या हिथ चार-दोन दिस राहिला गेलतू. पण करमत नाय बघ शहरात.’ आजोबाुचे डोळे पुन्हा पाण्याने भरले. बहुतेक अनेक दिवस आजोबाला मनातलं बोलायला भेटलं नसंल. त्यामुळे आज आजोबा मनमोकळं बोलत होते. ‘शेतीवाडी कोण बघतं.’ ‘भावकीतल्या रामभाऊ बघतो.’ ‘पोरं जोडीला सालाचं लाख रुपये देत्यात’ ‘मुलं तुम्हाला खर्चायला पैसे पाठवत नाहीत का?’ ‘पाठीत्यात की, पर मी नाय घेत. या वयात कशाला लागतोय पैसाआडका?’ ‘आजोबा दिवसभर काय करता?’ अस विचारल्यावर त्यांनी वाड्याशेजारच्या गोठ्यात नेलं.

संपूर्ण गोठा वस पडला होता. त्यात गाय बांधली होती. आजोबा सांगायला लागले, ‘या कडला ते त्या कडला जनावरांची दावन होती. चार बैल, गाया, म्हशी, एक घोडा असं भरलेलं गोकुळ व्हत. आता ह्या गाईला चरायला नेतो दिसभर. ‘तसंबी चर्हाटं वळून देतू लोकायची. त्यातून मिळत्यात दहापाच रूपये’ ‘दिवसाचे किती मिळतेत’ ‘बैल जोडीचा कासर्याला 50 मिळत्यात, एका बैलाचा असंल तर 30 मिळत्यात, मोरकीला 40 देत्यात, बाशिंग, येसण असंल 20 देत्यात.‘ या वयात देखील त्याचं गणित जिथली तिथं होत. ‘हे समदं पैशासाठी करत नाय बघ. कामामुळे तर लोक भेटत्यात, हालहवाल इचारत्यात. बर वाटत.’ थोडावेळ काहीच बोलले नाहीत. ‘म्हतारी माणसं म्हणजी आडगळीचं सामान असत्यात.. नकू नकू झालेलं.’

मग बराच वेळ आजोबा एक टक बघत राहिले. आजोबा उतार वयातही पहाडासारख खंबीर वाटले. ‘आजी कशाने गेल्या?’ ‘आजार झाला व्हता! दोन वरीस एकाजागी पडून व्हती. लय अबादली, गेली ते बरच झालं. सुटली एकदाची ह्या त्रासातून.’ पुरुषांना रडायला येत नाही हा समज चुकीचा आहे. त्यांना देखील रडायला येत पण त्याचं मन समजून घेणारी व्यक्ती हवी. आजोबांचे डोळे डबडबले होते. म्हणाले, ‘आयुष्यभर राबली घरासाठी. पण कधी चार दिस सुखाचं पाहिले नाहीत. तिचा लेकरात लय जीव होता, पर मरताना एकपण लेकरू जवळ नव्हत बघ’ आजोबा अंधारात कुठंंतरी बघत बोलले, ‘या वयातला एकटेपणा लय वाईट असतो.’ तेवढ्यात शेजारच्या काकूंनी त्यांना जेवणाचं ताट आणलं. त्यामुळे आमचं बोलणं थांबलं.

शिवजयंतीची मिरवणूक लांब गेली होती. डिजेचा आवाज खोल येत होता. टिव्हीवरील फॅमिली सिरिअल संपून आता घरचे जेवणासाठी वाट बघत असतील याची आठवण झाली. ‘पुन्हा कधी येशील बाबा’ ‘सोलापूरवाडीत आहे तोपर्यंत रोज येईल तुम्हाला भेटायला’ पुन्हा भेटायला येण्याचं आश्वासन देऊन उठलो. त्यांच्या चेहर्‍यावर समाधान दिसत होतं. तर माझ्या मनात मात्र काहूर उठलं होतं.

गाव आता निपचित पडला होता. गल्ल्या रिकाम्या झाल्या होत्या. कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. दुर कुठंतरी कोल्हे इवाळल्याचा आवाज कानी पडत होता. रस्त्याच्या बाजूने पाच सहा वडांचे मोठाले झाडं होती. पण तेही मला लहान वाटत होती. पहाडापेक्षा मोठा माणूस कोसळताना मी पाहिला होता. रातकिड्याची किरकिर मनाला डुसण्या देत होती. किरअंधार्‍या रात्रीत पायवाट तुडवित अनेक प्रश्न घेवून निघालो होतो.

ज्यांच्या मांडीवर मुलांना लहानाचं मोठं केलं त्यांचाच विसर पोटच्या मुलांना पडावा यासारखं मोठं दुःख नाही. वृद्धत्व आलं म्हणजे ते आडगळीचं सामान कसं होईल या एकाच विचारानं आंथरूणावर पडलो.

– प्रशांत शिंदे
  9673499181

Deshdoot
www.deshdoot.com