Thursday, April 25, 2024
Homeब्लॉगआनंददायी समाजासाठी सृजनशील समाज गरजेचा

आनंददायी समाजासाठी सृजनशील समाज गरजेचा

शिक्षण कसे असावे ?

असा प्रश्न केला तर शिक्षण सृजनशील, विवेकशील, चिकित्सक विचार निर्माण करावे अशी अपेक्षा व्यक्त होते. शिक्षण हे सृजनशील असायला हवे असे सातत्यांने बोलले जाते. नव्या शैक्षणिक धोरणातही तीच अपेक्षा व्यक्त केली आहे. जगभरात शिक्षणाकडून हीच अपेक्षा व्यक्त होते. उत्तम व आऩंददायी समाज व्यवस्थेसाठी सृजनशील समाज निंतात गरजेचा असतो. समाजातील अधिकाधिक लोक सृजनशील असतील तर समाज अधिक लोकशाहीयुक्त आणि स्वातंत्र्याचा भोक्ता ठरतो.

- Advertisement -

शिक्षणातून सृजनशीलता

विकसित करण्याचे आव्हान आहे. आज मार्क हवे आहेत. शिक्षण आकलन व समजपूर्वकतेने नको आहे. आनंदासाठी देखील नको आहे. सर्वांना चांगले मार्क हवेत. ते केवळ नोकरीसाठी निर्माण झालेल्या वाटेने जाण्यास मदत करणा-या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी हवेत. त्यासाठी शिक्षणाचा मार्ग निवडला जातो. त्यामुळे शिकूनही जीवनात आनंद मिळत नाही. जे आवडते त्यापेक्षा पोटाचा प्रश्न सोडविणारी व्यवस्था शिक्षणातून अपेक्षित केली जाते.

सर्जनशीलतेपेक्षा घोकंपट्टीला

त्यामुळे महत्व आले आहे. आनंददायी शिक्षणाच्या वाटा निराशेच्या दिशेने जाता आहेत. शिक्षणांतून आनंदाच्या पाऊलवाटा निर्माण करण्यासाठी सृजनशीलतेची वाट येत्या काही काळात धरावी लागणार आहे.

अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी

कधी एकेकाळी चीनने आपली शिक्षणाची दिशा बदलत नवी वाट धुंडाळली होती. त्यामुळे हाताला काम मिळाले,अर्थव्यवस्था भक्कम झाली. पैसा आला पण माणसांना जीवनाती आऩंद गमवावा लागला. आज ते पुन्हा नव्याने आनंदाच्या वाटा शोधतांना दिसत आहेत. विकासासाठी पैसा महत्वाचा आहे, पण त्या पैशापेक्षा महत्वाचे आहेत देशातील नागरीकांची आऩंदी मने. समाज दु:खात असेल आणि विकासाचे वेग उंचावला असला तरी आत्महत्या वाढत राहातात.

आर्थिक विकासाच्या आलेखापेक्षा

व्यक्ती आणि समाज जीवनातील आऩंदाचा आलेख उंचावयला हवा असतो.त्यासाठी शिक्षणातून आनंदाच्या वाटा निर्माण करणारी व्यवस्था उभी करण्याची गरज आहे. शेवटी आपण कितीही पैसा मिळविला तरी कोठे थांबायचे हे कळणे हे शिक्षणातून अधोरेखित व्हायला हवे. जीवनात एखादी गोष्ट कधी, काय आणि किती महत्वाची आहे हे लक्षात यायला हवे. हे कळण्यासाठी शिक्षणातून विचाराची प्रक्रिया घडायला हवी असते. केवळ पाठांतरावरती आधारित आणि शब्दांच्या जंजाळात आपण हया आनंदाच्या वाटा विकसित करू शकत नाही. त्यामुळे समृध्द समाजासाठी शिक्षणातून सृजनशीलतेचा प्रवास सुरू व्हावया हवा.

ब्रिटिश शिक्षणतज्ज्ञ केन रॉबिन्सन

यांनी सृजनशीलते संदर्भाने एका मुलीची गोष्ट सांगितली आहे.त्या गोष्टीत एक मुलगी चित्र काढत आहे.शिक्षिका त्या मुलीचे चित्र काढताना निरिक्षण करीत आहेत.त्यांनी तीला विचारले “ तु कशाचे चित्र काढते आहेस ? ” तेव्हा ती मुलगी म्हणाली “ मी देवाचे चित्र काढते आहे.” हे उत्तर ऐकून शिक्षिका तिला विचारते, “ पण देवा कसा असतो हे कोणालाच ठाऊक नाही. ” तेव्हा ती छोटीसी मुलगी म्हणाली “ आता तुम्हाला कळेल,माझं चित्र पूर्ण झाल की ! ” खरेतर लहान मुलांना किती आत्मविश्वास असतो ना ! ना त्यांना चुकण्याची भिती ,ना त्यांना मोठया व्यक्तीची चिंता असते.

त्यामुळे ही मुले स्वतःच्या मनात लपलेल्या भावनाना मोकळी वाट करून देत असतात.त्यांना या वाटेने जाण्यासाठीचा मार्ग शाळेत शिक्षकांनी आणि घरात पालकांनी निर्माण करायला हवा. त्यासाठी मुलांना स्वतःच्या मनातील अपेक्षित वाटेनी जाऊ देण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवे. फक्त धोक्याच्या अडथळ्यांची जाणीव करून द्यायला हवी इतकेच. मोठयांनी मुलांचे चुकते असे मानने सोडायला हवे.लहान मुलांच्या प्रत्येक कृतीकडे मोठयांनी मोठयांच्या नजरेने न पाहाता आत्मविश्वास दुणावेल असा संवाद साधायला हवा.

मुलांच्या प्रत्येक कृतीकडे त्यांच्या क्षमतेने ,त्यांच्या पातळीवर जाऊन पाहायला हवे.प्रत्येक मुल जे काही करते त्यामागे तर्कशुध्द विचार असतो.त्यांत त्यांची स्वतःच्या अऩुभवाने आलेली दृष्टी असते.अर्थात त्यात त्यांचे अऩुभवाची व्याप्ती कमी असल्यांने कदाचित मोठयांच्या नजरेने ते चुकीचे असेलही .त्यामुळे मोठी माणस रागावतात,चिडतात आणि मुलांच्या दडलेल्या सर्जनशीलतेला कायमचे गमावून बसतात.

अनेकदा मोठया माणंसाच्या

आय़ुष्यातील व्यवहाराने आणि अनुभवाने आनंदाच्या वाटा गमावलेल्या असतात. त्यातील वास्तवाच्या जवळ जाणा-या नजरा पक्क्या होतात.त्यामुळे त्यापेक्षा वेगळे काही असू शकत नाही ही त्यांची धारणा पक्की झालेली असते.मात्र बालकांच्या आय़ुष्यात ते कल्पनेच्या भरा-या घेण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य हवे असते.अऩेकदा बालक घर रंगवितांना एकाच घराच्या भिंती अनेक रंगाने रंगवितात.त्या चित्राकडे पाहात किती हे घाणेरडे असे म्हणून त्याला नावे ठेवतात.पण ते करणे म्हणजे मुलांना स्वतःकाही वेगळे करण्यापासून दूर सारणे असते.

प्रत्येक मुल वेगळे असते

त्या प्रत्येकाची विचारप्रक्रिया वेगळी असते. त्यामुळे मुलांची शक्ती जितकी भरारी मारेल तितकी मारू देण्यासाठी स्वातंत्र्ययुक्त वातावरण निर्माण करण्याची गरज आहे.अनेकदा वर्गात शिक्षक जेव्हा एखादी गोष्ट अर्धी सांगतात. त्यानंतर ती गोष्ट विद्यार्थ्यांना पूर्ण करण्यास सांगतात,तेव्हा वर्गातील प्रत्येक विद्यार्थी ती गोष्ट भन्नाटरित्या पूर्ण करीत असतात. त्या गोष्टीची पूर्णता फार थोडया मुलांची समान असू शकेल.

अनेकदा वर्गात केवळ गोष्ट सांगितल्या जातात,पण त्यांना सृजनशीलतेने जाण्याची संधी मिळत नाही.पाठयपुस्तकात कधी कवितेच्या दोन ओळी दिल्या जातात आणि त्या पूर्ण करण्यासाठी सांगितले जाते, तेव्हा त्या ओळी म्हणजे मुलांच्या मनातील भावनाचे प्रकटीकरण असते. पाठयपुस्तकात “ एक होता फळा..दिसायचा काळा…” आता त्यानंतर त्या ओळी मुलांवरती सोडून पूर्ण करण्यास सांगितल्या, तर मुले काय काय जोडतात त्याचा अनुभव घ्यायला हवा.

अनेकदा फळ्यावरती त्रिकोण काढायला सांगितला तर एकाच विशिष्ट प्रकारचाच त्रिकोण असतो. वरच्या बाजूला दोन रेषा जोडणारा बिंदू असतो. खाली आडवी रेषा असते. तो त्रिकोण उलटा कधीच नसतो. कारण उलटा त्रिकोण नसतो ही तर धारणा बनत जाते.

नेहमी एकादिशेन

जाण्याच्या प्रयत्नामुळे चुकिच्या धारणा पक्क्या होत जातात आणि सृजनशीलतेचा प्रवास थांबतो.त्यामुळे मुक्त स्वातंत्र्य हेच सृजनशीलतेचा प्रवास घडू शकेल. शाळेत आणि घरात मुलांच्या स्वातंत्र्यावर येणा-या गदेमुळे आपण मुलांचे किती नुकसान करतो यापेक्षा अधिक नुकसान तर आपल्या समाज व राष्ट्राचे होत असते.

समाजात सृजनशीलतेमुळे

विविध कलाकार, विचारवंत, वैज्ञानिक, पत्रकार, साहित्यिक, व्यावसायिक, वकिल, डॉक्टर, शिक्षक, राजकारणी निर्माण होत असतात. समाजाची उंची केवळ एका घटकाच्या उंचीने वाढत नाही, तर सर्वांनी मिळून उंची गाठली तर समृध्दतेचा प्रवास सुरू होतो. त्यामुळे सर्वक्षेत्रात आनंदाच्या वाटा निर्माण होण्यासाठी शिक्षणात आणि घराच्या वातावरणात अधिक चांगले वातावरण निर्माण करण्याची गरज आहे.

शिक्षणांच्या प्रक्रियेत

देखील त्यासाठीच्या संधी शोधाव्या लागतील. त्या संधी दिल्या तरी त्या करीता प्रतिक्षेचा कालखंड द्यावा लागतो. आज शिकविल्यानंतर उद्या ते यावे या अपेक्षांनी सृजनशीलता विकसित करता येणार नाही. त्यामुळे जीवनात अशी उंच भरारी घेण्याचे राहून जाते.

कवीच्या मनात

येणा-या कल्पना या अधिक उंच असतात.कदाचित त्या वास्तवात नसतील पण त्या मात्र अधिक आनंददायी असतात हे लक्षात घ्यायला हवे. जे न देखे रवी, ते देखे कवी असे म्हटले जाते त्यामागे कवीच्या सृजनशीलतेचा विचार असतो. भविष्यात अनेकदा पैशाचे मार्ग सापडतील पण आऩंदाच्या वाटेसाठी शोधत भटकत राहावे लागेल. आपण जीवन आऩंदासाठी असेत आणि शिक्षण आनंदाच्या वाटा निर्मितीचे केंद्र असते.

वर्तमानात

मात्र तसे काही दिसत नाही. त्यामुळे वर्तमानातील शिक्षण आणि मानवी जीवन दुःखमुळ आहे. त्यातून मुक्त होण्यासाठी सृजनशीलतेच्या पाऊलवाटा निर्माण करण्याचे आव्हान पेलायल तयार राहावे लागेल. त्यातून विकासाची दिशा आणि प्रमाण देखील येणा-या काळात आनंदावरती मोजले जाईल. म्हणून भूतानने पैशाच्या श्रीमंतीपेक्षा आनंदाच्या श्रीमंतीवर आपली वाट आखली आहे. त्याच दिशेचा प्रवास आपल्याला माणूस म्हणून जगण्याला श्रीमंत करेल.

– संदीप वाकचौरे

- Advertisment -

ताज्या बातम्या