Friday, April 26, 2024
Homeब्लॉगउत्साहासनामुळे बाबांचे ‘कोरोनील’ शीर्षासनात

उत्साहासनामुळे बाबांचे ‘कोरोनील’ शीर्षासनात

‘अतिउत्साह’ किंवा ‘आति घाई’ कशी नडते हे योगगुरू रामदेवबाबा यांच्या करोनावरील औषधासंदर्भात दिसून आले. रामदेवबाबा योगांमध्ये माहीर आहेत, हे सारे जण जाणतात. पण सर्वच बाबतीत अतिउत्हासामुळे त्यांच्या मेहनतीचे ‘भजे’ होते हे दिसून येते. सध्या ‘करोना’ या भयानक संसर्गजन्य व्याधीने थैमान घातले आहे. या व्याधीवर ‘रामबाण’ उपाय शोधण्यात जगातील औषध निर्मितील यच्चयावत शास्त्रज्ञ आणि औषधी कंपन्या रात्रंदिवस गर्क आहेत. अजूनही त्यांना यश मिळालेले नाही.

योगगुरू रामदेवबाबा यांच्या पतंजली या योग आणि आयुर्वेद संस्थेनेही या कामी पुढाकार घेतला व त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. ‘करोना’वर ‘रामबाण’ असे ‘कोरोनील’ हे औषध पतंजलीने शोधल्याचे रामदेवबाबांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले, अन् लगेच गहजब सुरू झाला. आपले संशोधन किंवा एकूणच भारतीय आयुर्वेदाला हाणून पाडण्यासाठी जगभरातील रासायनिक औषधी कंपन्या बाह्या सरसावतील याची पुसटशी कल्पना रामदेवबाबांना कशी काय आली नाही? ते ‘निद्रासन’ घालून बसले होते की काय? भारतीय लोक नैसर्गिक जीवन न जगता, निसर्गाशी सख्य न करता राहिल्यास ते कायम आजारी पडतील व आपली औषधे खपतील अशी धारणा या परदेशी रासायनिक औषधे बनविणार्‍या कंपन्यांची आहे. ते त्या दृष्टीने सर्व योजना आखतात. त्यासाठी भारतातील काही राजकीय मुखंडांना, प्रसिद्धी माध्यमातील काही जणांना हाताशी धरून बेमालूपणे ते आतापर्यंत औषधे खपवीत आले आहेत. रामदेवबाबांसारखा एक संन्यासी त्यांना आव्हान देतो आहे, हे त्यांना पचणारे नव्हते.

- Advertisement -

‘कोरोनील’चे सादरीकरण होताच लगेच परवानगीचा विषय बाहेर आला. आयुष्य मंत्रालयाने देखील आपण परवानगी दिली नसल्याचे म्हणून हात झटकले. सादरीकरण करण्यापूर्वी रामदेवबाबांनी या सर्व बाबींचा अभ्यास करायला हवा होता. सर्वच गोष्टी कायदेशीर मार्गांनी झाल्याच पाहिजेत, मग ती व्यक्ती कितीही मोठी असो. रामदेवबाबा येथेच चुकले. टप्प्याटप्प्याने ते पुढे जायाला हवे होते.

सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्यानंतरच औषधाचे सादरीकरण झाले असते तर ही वेळ आली नसती; परंतु बाबा भ्रमासनात राहिले. ‘कोरोनील’ औषधामुळे रुग्ण ‘करोना’तून ‘शंभर टक्के’ मुक्त होतो, असा त्यांचा दावा असला तरी जोपर्यंत ते सामान्य लोकांच्या उपयोगाचे होणार नाही तोपर्यंत रामदेवबाबांना ‘पश्चिमोत्तानासन’ घालून म्हणजे पाय लांब करून व डोके गुडघ्यांना टेकवून बसावे लागेल. त्यांच्या अतिघाईमुळे ‘कोरोनील’ला मात्र ‘शीर्षासन’ अवस्थेत दिवस काढावे लागतील.

एकतर रासायनिक औषधी कंपन्यांना आयुर्वेदिक आणि त्यातील भारतातून ‘करोना’वर ‘रामबाण’ औषध नको आहे. त्यांना त्यांच्याच संशोधकांनी निर्माण केलेले ‘व्हॅक्सिन’ हवे आहे. जो कोणी शोधून काढेल त्याला ‘नोबेल’ पुरस्कार देऊन गौरवही करता येईल. नाहीतरी नोबेल पुरस्कार काहीही कर्तृत्व नसणार्‍यांना मिळतो.

ज्यांच्या अर्थशास्त्रामुळे कोणत्याही राष्ट्राचा अर्थगाडा सुधारला नाही अश अर्थशास्त्रींना ‘नोबेल’ पुरस्कार मिळालेला आहे. शांततेचा पुरस्काराचेही असेच आहे. पाकिस्तानच्या ‘मलाला युसूफजाई’ नावाच्या पंधरा वर्षांच्या मुलीला शांततेसाठीचा नोबेल’ पुरस्कार मिळाला. ती अतिरेक्यांविरोधात बोलली, अतिरेक्यांनी तिला गोळी मारली, त्यातून ती वाचली. नंतर यापुढेही आपण अतिरेक्यांविरोधात असाच लढा देऊ असे म्हणाली.

बस एवढ्या एकाच गोष्टीवर ती नोबेल पुरस्काराची मानकरी ठरली. जगात शांतता नांदण्यासाठी तिने काय दिवे लावले हे अजूनही कुणाला उमगले नाही. विशेष म्हणजे ‘सध्या ती काय करते?’ हेही कुणाच्या ऐकिवात नाही. तेव्हा असाच नोबेल पुरस्कार करोनावरील ‘व्हॅक्सिन’ शोधणार्‍यांना द्यायचे आहे. भले ते व्हॅक्सिनच्या साईड इफेक्ट्सनी अन्य दुर्धर रोग जडले तरी हरकत नाही; परंतु बाबांचे औषध नको ही त्यामागची भूमिका आहे.

त्याभूमिकेला धरूनच इथल्या त्या औषधी कंपन्यांच्या हस्तकांनी ‘कोरोनील’ हाणून पाडले व रामदेवबाबांना अजून काही काळ पद्मासनात बसावे लागणार आहे. अनुलोमविलोम, कपालभाती, भस्रिका, उज्जयी आदी प्राणायामांनी शरीरप्रकृती नीट होत असते हे जरी खरे असले तरी ते संबंधितांना नको आहे. त्यांना अनुलोमविलोम नको आहे. व्हेंटिलेटर व व्हॅक्सिनद्वारे रुग्णांचे खिसे रिकामे करायचे आहेत व ते पैसे भारतातून आपल्या देशात न्यायचे आहेत.

रामदेवबाबांनी या सार्‍या गोष्टी ओळखून वाटचाल करायला हवी होती. ‘शीर्षासन’ आणि ‘खाली डोके वर पाय’ यात खूप फरक आहे. शीर्षासन हे शास्त्रोक्त आहे तर ‘खाली डोके वर पाय’ हा टांगण्याचा प्रकार आहे. तेव्हा रामदेवबाबांनी अशा चुका पुढे करू नयेत. रोज दारू पिणार्‍याकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही; परंतु एखादा दारू न पिणारा दारूच्या दुकानापुढून चालला तरी त्याच्याबद्दल काहूर माजविले जाते. रामदेवबाबांनी ‘अतिउत्साहासन’ केल्याने ‘कोरोनील’ शीर्षासनात गेले एवढे मात्र निश्चित !

– प्र. के. कुलकर्णी

7448177995

- Advertisment -

ताज्या बातम्या