Blog : ...अन् माझ्या एका कृतीने सर्वांनाच भुरळ घातली

Blog : ...अन् माझ्या एका कृतीने सर्वांनाच भुरळ घातली

आमचं एक जॉइंन अकाउंट पण आहे , त्यात बॅलन्स कमी असेल म्हणून पैसे कट होत होते , माझे मिस्टर बोलले, तू बॅकेत जावुन, अकाउंट वर थोडे पैसे टाकुन ये . त्यासाठीच मी काल बॅकेत गेले होते...

बँकेत पोहचले आणि लक्षात आले की गडबडीत बॅकेचे पासबुक आणायचीच विसरली. आधारकार्ड वरून पैसे टाकता येतात का याची चौकशी केली तेव्हा एक कर्मचारी एका टेबलाकडे बोट करत बोलला, मॅडम तिकडे ते साहेब बसलेत ना त्यांच्या कडुन तुमचा अकाउंट नंबर आणा मग मी पैसे टाकुन देतो, मी त्या टेबल कडे बघितले तर तिथे सात ते आठ लोक आधीच रांगेत उभे होते, मी ही जावुन त्यांच्या मागे उभी राहिली, मनात आलं माझा नंबर येई पर्यंत बराच वेळ लागेल तेवढ्या वेळात तर मी घरी जावुन पासबुक घेऊन आले असते, बाहेरच खायला उठणाऱ्या सूर्याकडे बघुन मनातला विचार मनात जळुन खाक झाला.

खुर्चीवर बसलेल्या साहेबांकडे सगळेच, आपले काम करून घेण्यासाठी विनवण्या करत होते, टेबला समोरच एक वृध्द , खुर्ची वर बसलेले होते, त्याचच काम ते साहेब करत होते, मी ही मध्येच बोलली, "मला फक्त माझा अकाउंट नंबर हवाय" पण साहेबाने ऐकुन न ऐकल्या सारखे केले. त्यानेच काय पण माझ्या शेजारच्या लोकांना सुध्दा माझा आवाज गेला नसावा बहुतेक कारण कोणी ही नजर वर करून बघीतले ही नाही माझ्याकडे.

मग मी ठरवले जेव्हा नंबर येईल तेव्हा च बघु, नको पुन्हा पुन्हा अपमान . त्या खुर्ची वर बसलेल्या बाबांच काम झाले होते, त्याच्या हातात कागदपत्रे देत, साहेबांनी दुसऱ्या एका मुलाचे कागदपत्रे हातात घेत त्यांच्या अडचणींची विचारणा करायला सुरुवात केली, खुर्ची वर बसलेले बाबा आता उठण्याचा प्रयत्न करत होते, हातातले पेपर त्यांनी पुन्हा टेबलवर ठेवले, आणि टेबलाचा आधार घेत पुन्हा उठण्याचा प्रयत्न करायले लागले, बराच वेळ प्रयत्न करूनही त्यांना उभे राहता येईना, टेबला जवळ उभे राहिलेल्या सगळ्या माणसांकडे त्यांनी एक कटाक्ष टाकला, कोणीतरी मला मदत करेल या आशेने पण त्यांच्या कडे कोणाचच लक्ष नाही किंवा लक्ष असुनही मदत करण्यापेक्षा त्यांना त्याच काम महत्त्वाचे वाटले असावे , प्रत्येकांचे डोके त्या मोबाईल मध्ये घुसलेले होते .

त्यावेळी मी माझा हात पुढे केला, बाबानीं माझ्या कडे बघुन हसत हसत त्यांचा हात माझ्या हातात दिला, रडणाऱ्या लेकराला एखादं चॉकलेट दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरच निर्मळ हसु, बाबांच्या चेहऱ्यावर उमटलं.

बाबा माझा आधार घेऊन उभे राहिले, बाबांच्या हातात मी भिंतीला टेकवलेली त्यांची काठी दिली आणि माझ्या डोक्यावर मायेने हात फिरवत बाबा बोलले "सुखी रहा पोरी" मला तेव्हा मी खूप काही मिळवल्या चा आनंद मिळाला, मदत करतांना मला ती खूप किरकोळ वाटली, पण बाबांच्या चेहऱ्यावरचा कृतज्ञतेचा हाव अलौकिक होता.

बॅकेत सभोवार नजर टाकली तर सर्व हे दृश्य एकटक पहात होते, खूर्चीतले साहेब देखिल काम सोडून आमच्या कडे पहात होता, आणि लगेच बोलला "मॅडम तुम्हाला फक्त अकाउंट नंबर पाहिजे ना, आधारकार्ड आणले असेल तर द्या" मी पटकन पर्समधुन , आधारकार्ड टेबलावर ठेवले, त्यांनी काही सेकंदात अकाउंट नंबर दिला, मी तो घेऊन दुसऱ्या टेबला कडे आली, आणि त्या कर्मचाऱ्याकडुन अकाउंट वर पैसे टाकुन घेतले आणि बॅकेच्या बाहेर पडली, बाबा तो पर्यंत रिक्षात बसले होते, ते पुन्हा माझ्या कडे बघुन हसले.

मी सहज बॅकेत वळून बघितले तर अजुनही बरेच लोक मला पाठमोरी जातानां बघत होते... मी खूप मोठे काम केले नव्हतेच पण लोकांच्या नजरेत अविर्भाव तसाच होता, खूप शुल्लक गोष्टी असतात ज्या मनाला आनंद देवुन जातात मग त्यासाठी पैसाच खर्च करावा लागतो असे नाही फक्त त्याची देवाणघेवाण जमली पाहिजे जी दुर्मिळ झालीय, बहुतेक वेळेअभावी ...

आधुनिकतेच्या जाळ्यात तो इतका अडकत चाललाय की माणूस माणसांमध्ये असूनही नसल्या सारखाच...आधुनिक वस्तू या जीवनावश्यक वस्तू बनल्या आणि नाती, परंपरा, चालीरिती, सण उत्सव या गोष्टी फक्त फेसबुक इस्टा व्हाट्सऍप च्या स्टेट्स वर पुरत्या मर्यादित राहील्या.

- प्रतिभा खैरनार (लेखिका गृहिणी आणि कवयित्री आहेत)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com