Saturday, April 27, 2024
Homeब्लॉगBlog : साक्षेपी ज्ञानयोगी

Blog : साक्षेपी ज्ञानयोगी

द्रष्टे शिक्षणतज्ज्ञ डॉ. मो.स.गोसावी आज (दि.१५) वयाच्या ८८ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंची ओळख करून देणारे मनोगत.

डॉ. मो.स.गोसावी सर आज वयाच्या ८८ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. एक द्रष्टा शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बीवायके महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची धुरा तरुण वयात सांभाळण्याऱ्या सरांनी प्रिं.टी.ए. कुलकर्णी सरांचा विश्वास सार्थ ठरवला. फक्त महाविद्यालयालाच नव्हे तर संस्थेच्या सचिव व महासंचालकपदाची जबाबदारी अत्यंत यशस्वीपणे सांभाळून संस्थेची ओळख निर्माण केली. गोखले एज्युकेशन सोसायटीचे सर खऱ्या अर्थाने शिल्पकार आहेत. संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रवाह सर्वदूर पोहोचवून महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रगतीत सरांनी महत्वाचे योगदान दिले आहे.

- Advertisement -

शिक्षण हे सामाजिक विकासाचे मोठे साधन आहे. त्याच्या योग्य वापरावर समाजाचे भवितव्य ठरते. त्यामुळे हे साधन डॉ. मो.स. गोसावी यांच्यासारख्या योग्य व्यक्तीच्या हातात असते तेंव्हा समाजाला निश्चितच योग्य दिशा मिळते. समाजातील प्रत्येक वर्गाची शिक्षणाची गरज वेगवेगळी असते, हे ओळखून सरांनी आदिवासी, ग्रामीण, कृषी, शहरी, निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे शैक्षणिक सुविधा पुरवल्या. यामागे फक्त संस्थेचा विकास व विस्तार एवढाच उद्देश नव्हता तर सामाजिक विकासाचा व्यापक दृष्टिकोनही होता. त्यासाठी ते अविरतपणे कार्यरत आहेत.

डॉ. गोसावी यांच्या कार्याला त्यांच्या दार्शनिक, आधात्मिक, शास्त्रीय आणि सांस्कृतिक उच्च विचारांची बैठक आहे. त्यांच्यात  तीव्र ज्ञान लालसा आहे. त्यामुळे वाणिज्य, व्यवस्थापन, अध्यात्म, साहित्य, संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान अशा सर्व विषयांचा सखोल अभ्यास त्यांनी केला आहे. त्यावर स्वतंत्र मनन-चिंतन करणारे लेखन त्यांनी केले आहे. डॉ. गोसावी यांच्याकडे असणारे ज्ञानाचे अमर्याद भांडार आहे व ते ज्ञान मुक्त हस्ताने सर्वांना देत असतात. प्रत्येक व्याख्यान, लेख, एवढेच नाही तर त्यांच्या बरोबर झालेले थोडेसे संभाषणसुद्धा प्रत्येकाला भरभरून ज्ञान देते. ‘स्वयंप्रकाश’ मध्ये त्यांनी लिहिलेला ‘टेलोमिअर सायन्स’बद्दलचा अभ्यासपूर्ण लेख नुकताच वाचनात आला.

सकारात्मक विचारसरणी ही आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी किती आवश्यक आहे याचे स्पष्टीकरण त्या लेखात अत्यंत सोप्या पद्धतीने विशद केले आहे. जीवनातील सक्रियता, कृतिशीलता यासाठी सकारात्मक वृत्ती आवश्यक आहे. हे विचार फक्त इतरांना सांगत नाहीत तर त्याआधी ते स्वतः आचरणात आणतात. त्यामुळेच तरुण ही मागे पडतील अशा उत्साहाने ते स्वतः कार्यरत असतात. पहाटेपासून सुरु होणारा त्यांचा दिवस वाचन, लेखन, मनन आणि नवीन ध्येय साकारण्यात जातो. शिस्तप्रियता हे सरांच्या जीवनाचे मोठे वैशिष्ट्य! त्यामुळे प्रत्येक गोष्ट ते ठराविक वेळेत पूर्ण करू शकतात. डॉ. गोसावी यांची शोधक नजर दर दिवशी अध्ययनासाठी, संशोधनासाठी नवे विषय, नवी क्षेत्रे त्यांना उपलब्ध करून देते  आणि पुन्हा नव्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल सुरु होते. ही नवनवी क्षितीजे त्यांना खुणावतात. नव्या दमाने त्यांचा अथक प्रवास सुरु होतो.

तरुण पीढीकडून सरांची एक मात्र अपेक्षा आहे. ती म्हणजे विविध क्षेत्रात संशोधन करण्याची. भारतातील युवक संशोधन क्षेत्रात पुढे असावेत तसेच विविध क्षेत्रातील संशोधनाबद्दल त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पेटंटस् मिळवावीत ही रास्त अपेक्षा ते  ठेवतात. त्यासाठी प्रेरणा देतात. मार्गदर्शन करतात. आज संस्थेचा विस्तार होत आहे. सेवक, अध्यापक आणि विद्यार्थी संख्या वाढत आहे. परंतु उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अध्यापकांचे कौतुक सरांकडून होते. तसे कुणावर कठीण परिस्थिती आली तर धीर देणारे शब्दही सरांचेच असतात. परिवार प्रमुखाप्रमाणेच त्यांचा सर्वांना आधार वाटतो.

कधी न शमणारी ज्ञानलालसा त्यांच्यात आहे आणि ते ज्ञान इतरांपर्यंत पोचवण्याची वृत्तीसुद्धा! समाजाला भरभरून देणाऱ्या डॉ. गोसावी सरांचे हात सशक्त आहेतच; समाजाची झोळी दुबळी नसावी हीच प्रार्थना! गोखले शिक्षण संस्थेत काम करण्याची संधी मला मिळाली, सरांचा आदर्श समोर राहिला हे माझे परम भाग्य! सरांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन आणि अभीष्टचिंतन! जीवेत शरदः शतम्।

– रसिका अजय सप्रे,
एसएमआरके बीकेएके महाविद्यालय

- Advertisment -

ताज्या बातम्या