Blog : थोडीशी झिंग आणि डोक्याला करताय स्विंग!

जागतिक तंबाखूविरोधी दिनविशेष
Blog : थोडीशी झिंग आणि डोक्याला करताय स्विंग!

नाशिक | प्रतिनिधी

आज दिनांक 31 मे! जागतिक तंबाखू विरोधी दिन...! कोणताही 'दिन' म्हटला की तो साजरा करायचा हे आजवरचे ठरलेले समीकरण! पण काही दिनविशेष साजरे करायचे नसून राबवायचे असतात. कशासाठी? तर समाजात काही सकारात्मक बदल घडवण्यासाठी! जसा जागतिक धूम्रपानविरोधी दिन असेल किंवा आजचा जागतिक तंबाखूविरोधी दिन!...

हे दिन ते राबवायचेच आणि समाजातल्या व्यसनांच्या आहारी गेलेल्या लोकांना त्या व्यसनांपासून मुक्ततेकडे नेण्यासाठी काही नवीन मार्ग अवलंबता येतील का? याचा प्रयत्न करणे होय.आजची तरुण पिढी तसेच काही वयोवृद्ध माणसे तंबाखूच्या आहारी मोठ्या प्रमाणात गेले आहेत. थोड्याशा एक्साइटमेंटपायी हा नाद सुरू होतो आणि नंतर स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घ्यायला आपण तयार होतो.

धोंडा स्वतःच्याच भाग्यावर व सरत चाललेल्या आयुष्यावर अचानकच मारला जातो; तोही जाणतेपणीच!कशासाठी करतोय आपण हा व्यसनांधपणा? क्षणीच सुखासाठीच ना? पण या क्षणिक सुखाच्या हव्यासापोटी आपले व आपल्या कुटुंबाचे जीवन एका गर्तेत रोज ढकलत आहोत मरण्यासाठी!

तुम्ही तर शौक करून मरून जाल हो, पण या शौकापायी जो पैसा खर्च झाला आणि तुमच्या या व्यसनामधून झालेल्या रोगामुळे जो अधिकचा बोजा पडला त्यामुळे तर सर्व कुटुंब उद्ध्वस्तच होईल. एकाचा शौक झाला, पण बाकीच्यांच्या वाट्याला तर आजन्म भोगच आला की! तुमची चिखलात रुतलेली गाडी दुसऱ्याने काढायची; आणि तुम्ही खुशाल पळून जाणार, नाही का!थोडीशी झिंग आणि डोक्याला करताय स्विंग!

ते पण बेफाम, अंदाधुंद! गरागरा फिरवणे, आडवे-तिडवे कसेही! काय पाहिजे तर फक्त झिंग यायला हवी म्हणे! मुळात आशा कृत्रिम झिंगची गरज का पडते? तर तुमची आयुष्यातील काम करण्याची झिंग सम्पली आहे, उमेदीचा मसाला विटला आहे म्हणून फोडणी द्यायला हलक्या दर्जाचा बाहेरचा नको असलेला मसाला मागवत आहात? आता त्या मसाल्याची इतकी सवय झाली आहे की, चांगला कोणता आणि वाईट कोणता?

हेही कळेनासे झाले आहे. कारण विचार करणारा मेंदू सारखा स्विंग होऊन चक्रावून गेला आहे. इतका चक्रावून गेला की तो त्याचे काम आणि शरिरातील त्याचे दाम विसरून गेला आहे. कारण मालकातला राम आता मेला आहे.तंबाखू-विडीत, सिगारेटमध्ये, जर्दा, खर्रा, गुटखा आशा बऱ्याच व्यसनी घटकात असतो घातक घटक!

'निकोटिन' नावाचे द्रव्य त्यात आहे हे स्पष्ट त्या उत्पादनावर लिहिलेले असते. तरीही आपण ते खातोच. म्हणजे 'पुढे खड्डा आहे, सांभाळून जा!' असे म्हटल्यावरही पुढे जाणे व बेसुमार जाणे म्हणजे मूर्खपणाच! हा मूर्खपणा कधी जीवावर बेतेल याचा तीळमात्र भरोसा नाही.धूम्रपान केल्याने शरिरातील 'डोपामाइन'चे प्रमाण वाढते.

ज्यामुळे आपल्याला आनंदाची अनुभूती होते. त्यामुळे व्यसनी व्यक्तीला ते परत-परत करण्याची इच्छा निर्माण होते. आता हे धुम्रपान करणारे म्हणतात की, मी चिंतामुक्तीसाठी सिगार ओढतो. काही असेच उत्तेजनासाठी धूम्रपान करतात. कारणे-परंपरा हा भाग वेगळा; परंतु याचे दुष्परिणाम माहिती असतानादेखील या व्यसनांध व्यक्तींच्या मानसिकतेत काहीच फरक पडत नाही हीच खरी चिंतेची बाब आहे.

तंबाखूमध्ये ४,००० प्रकारचे विषारी घटक असतात, ज्यातील २०० घटक तर मानवी शरिरासाठी अत्यंत घातक आहेत. त्यातला मुख्य विषारी घटक म्हणजे निकोटिन! जो वेगवेगळ्या कर्करोगासाठी कारणीभूत ठरत आहे.

सर्व रोगांचा बाप 'कर्करोग' आहे. घरी मोठी नोकरी नाही तर नाही, निदान मोठा रोग तर आणू नका! फुफ्फुसाच्या कर्करोगापासून ते हदय, तोंडाचा, अन्ननलिकेचा कर्करोग होऊन यात मृत्यूसुध्दा ओढवतात. स्वतः साठी नाही निदान कुटुंबासाठी तरी तंबाखूसारखे पदार्थ सोडायलाच हवे.तंबाखू खाऊन आलेला रोग हा आपल्या वाईट सवयीचे कडू फळ आहे, पण तुम्ही घेतलेल्या आनंदात परिवारातील सदस्य फक्त दुःखच वाटून घेत असतात.

नववर्षाचा पहिल्या दिवशी काहीतरी संकल्प करतात. तसा आज तंबाखू न खाण्याचा संकल्प करा. भविष्यात अनेक वर्ष पाहू शकाल. वाईट सवय लागत असेल तर ती सोडणारे पण बरेच आहे. वाटल्यास त्या लोकांचा आदर्श घ्या. आदर्श घ्यायचाच असेल तर निर्व्यसनी लोकांचा घ्या! जीवन जगण्यात काय आनंद असतो ते अनुभवून तर एकदा पाहा!

उत्तेजना येण्यासाठी खूप साधने आहेत. त्यांचा उपयोग घ्या. खेळात, संगीतात, नृत्यात, मुलांच्या शिक्षणात, तुमच्या व्यवसायात, कामात लक्ष्य द्या! सोडत-सोडत ही वाईट सवय नक्कीच सुटेल.शेवटी माझ्या कवितेच्या या काही ओळी.....

विडी- सिगारेट आहे एक पाईपाची कांडीकरू नको तंबाखूचा नाद राजा,निघून जाईल नशीबातील चांदी…चार दिवस आनंदाचे घेण्यापरीसंसाराची का सोडतोय खुशाल नांदीरोगाच्या मुळाने मरशील जेव्हाजगण्याचीच तुटून जाईल फांदीजगण्याचीच तुटून जाईल फांदी...!.....

- अमोल चंद्रशेखर भारती

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com