Saturday, May 11, 2024
Homeब्लॉगनितीश ‘सरकार’चे सुकाणू कोणा हाती?

नितीश ‘सरकार’चे सुकाणू कोणा हाती?

नाशिक | एन. व्ही. निकाळे

बिहार निवडणुकीत जदयूची झालेली पीछेहाट, विरोधकांची टीका-टिप्पणी आणि पुढील काळात सरकारवर आपले नव्हे तर भाजपचे वर्चस्व राहणार, याचा अंदाज येताच नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत सावधगिरीचा पवित्रा घेतला होता. ‘आपण मुख्यमंत्रीपदाचा दावा केलेला नाही’ असे नितीश कुमार अखेरपर्यंत सांगत होते.

- Advertisement -

मात्र, नितीशबाबूंनी साथ सोडल्यास किंवा त्यांची सुटल्यास बिहारची सत्ताही हातून निसटेल आणि केलेले प्रयत्न पाण्यात जातील ही भीती भाजपलाही वाटत असावी. त्यामुळेच मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची गळ भाजप नेतृत्वाने नितीश कुमारांनाच घातली.

तूर्तास नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्रीपदी बसवून सत्ता हाती राखण्याचे मुत्सद्दीपण भाजपने दाखवले असावे. ‘एनडीए’चे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार किती काळ पदावर राहतील ते पुढील काळच ठरवेल….

बिहार निवडणुकीत ‘एनडीए’त भाजपला जास्त जागा मिळाल्या तरी मुख्यमंत्री नितीश कुमार हेच असतील, अशी घोषणा निवडणूक जाहीर होताच भाजपने केली होती. निवडणूक प्रचारातही वारंवार ती ग्वाही जाहीरपणे दिली गेली.

निवडणुकीचे निकाल लागले. जादूची कांडी फिरली. भाजपच्या तुलनेत जदयूची मोठी पीछेहाट झाली, पण मुख्यमंत्रीपदावर नितीश कुमारच असतील, अशी ग्वाही दिल्लीत झालेल्या बिहार विजयोत्सवात पंतप्रधानांनी स्वत:च दिली. खरोखर ‘मोठा भाऊ’ बनलेल्या भाजपने तो शब्द शब्दश: तंतोतंत पाळला.

निवडणूक निकाल बिहार निवडणुकीचे अंदाज जाहीर करणार्‍या सर्व पंडितांना थक्क करण्याइतके धक्कादायक लागले. कदाचित त्यामुळेच दिलेल्या शब्दाला भाजप प्रामाणिकपणे जागला. नितीश कुमार यांच्याच नावावर ‘एनडीए’ विधिमंडळ बैठकीत नेतेपदी सर्वानुमते शिक्कामोर्तब झाले. दुसर्‍याच दिवशी त्यांचा राजभवनात शपथविधीही झाला. सोबत 14 मंत्र्यांनी शपथ घेतली. मागोमाग खातेवाटपही जाहीर झाले.

निवडणुकीत जदयूची झालेली पीछेहाट, विरोधकांची टीका-टिप्पणी आणि पुढील काळात सरकारवर आपले नव्हे तर भाजपचे वर्चस्व राहणार, याचा अंदाज येताच नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत सावधगिरीचा पवित्रा घेतला होता. ‘आपण मुख्यमंत्रीपदाचा दावा केलेला नाही’ असे नितीश कुमार अखेरपर्यंत सांगत होते.

मात्र नितीशबाबूंनी साथ सोडल्यास किंवा त्यांची सुटल्यास बिहारची सत्ताही हातून निसटेल आणि केलेले प्रयत्न पाण्यात जातील ही भीती भाजपलाही वाटत असावी. त्यामुळेच मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची गळ भाजप नेतृत्वाने नितीश कुमारांनाच घातली. तूर्तास नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्रीपदी बसवून सत्ता हाती राखण्याचे मुत्सद्दीपण भाजपने दाखवले असावे. ‘एनडीए’चे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार किती काळ पदावर राहतील ते पुढील काळच ठरवेल.

मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार पाच वर्षे कायम राहतील, असे भाजपच्या कोणत्याही नेत्याने नि:संदिग्धपणे सांगितलेले नाही. निवडणुकीत मते मागण्यासाठी नितीश कुमारांसोबतच सुशील कुमार मोदी यांचा चेहरा वापरला गेला. मात्र सत्तेत मोदी अडचणीचे ठरू शकतात हे लक्षात आल्यावर त्यांना अलगद बाजूला सारले गेले. नको-नको म्हणत नितीश कुमारांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले तरी त्यांना आता सावधगिरीने पावले टाकावी लागतील.

‘सुशासनबाबू’ अशी ओळख रुढ करणार्‍या नितीशबाबूंना कोण-कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल ते यथावकाश स्पष्ट होईल. ‘नामधारी’ मुख्यमंत्री म्हणून आपला वापर होऊ नये याचीही काळजी त्यांना घ्यावी लागेल. फार मुत्सद्दीपणाने मुख्यमंत्रीपदाचा आब राखावा लागेल.

‘आम्ही शब्द पाळतो’ हे एनडीए सोडून गेलेल्या शिवसेना, अकाली दल तसेच सोबतच्या अन्य पक्षांना दाखवून देण्यासाठी नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपदी बसवणे आवश्यकच होते. ते काम भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पूर्ण केले आहे. पुढील काळात ‘मोठ्या भावा’ची सत्तेतील ढवळाढवळ असह्य होईल व एक दिवस त्रासून नितीश कुमार स्वत:च पदावरून पायउतार होतील, अशीही अपेक्षा अनेकांनी बाळगली असेल.

बिहारात ‘शतप्रतिशत’च्या दिशेने भाजपचे महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. पुढच्या विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये स्वबळावर सत्ता आणण्यासाठी भाजप पुरेपूर प्रयत्न करील याबद्दल राजकीय वर्तुळात आतापासूनच चर्चा सुरू आहे.

जाहीरनाम्यातील आश्वासने ‘जुमले’ ठरू नयेत म्हणून आश्वासनपूर्तीसाठी बिहार राज्य आर्थिकदृष्ट्या किती सक्षम आहे? आर्थिक अडचणीतील केंद्र सरकार बिहारला ‘आत्मनिर्भर’ बनवण्यासाठी किती मदत देणार याची आर्थिकदृष्ट्या कमकुवत बनवलेल्या सर्वच राज्यांना उत्सुकता असेल. बिहारात 19 लाख रोजगार देण्याचे आश्वासन पूर्ण करण्याचे शिवधनुष्य नितीश कुमार या भाजपबाहेरील नेत्याला उचलावे लागणार आहे.

ते पूणर्र् झाले तर श्रेय भाजपचे; न झाले तर त्या अपयशाबद्दल अनायसे जदयूकडे बोट दाखवण्याची व्यवस्था म्हणून ते अवजड आश्वासन जाहीरनाम्यात आधीच दिले गेले आहे. बिहारी तरुणाईचे त्याकडे नक्कीच लक्ष असेल.

त्या अपयशाचे खापर नितीश यांच्यावर फोडण्याची संधी कोणताही राजकीय पक्ष घेणारच! भाजपच्या हाती तर ते हुकूमी हत्यारच असेल. प्रतिमा बिघडेल ती नितीश कुमारांची! त्यानंतर ‘छोटा भाऊ’ म्हणून दुय्यम स्थान मान्य करण्यास त्यांना भाग पाडले जाऊ शकते किंवा राजकारण संन्यास घेण्याची संधीही उपलब्ध करून देण्याचे श्रेय घेता येईल.

गेली पंधरा वर्षे नितीश कुमारांची सावलीसारखी पाठराखण करणारे भाजप नेते सुशील मोदी यांना नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून संधी का दिली गेली नाही? या प्रश्नाचे उत्तर नितीश कुमारांकडे नाही. ‘हा प्रश्न भाजपला विचारायला हवा’ असे मोघम उत्तर माध्यमांना देणार्‍या नितीश कुमारांचा त्रागा त्यातून स्पष्ट झालाच आहे. ‘भाजपचे दोन उपमुख्यमंत्री का? एक उपमुख्यमंत्री जदयूचा का नाही?’

या प्रश्नावरसुद्धा नितीशबाबू गडबडल्याचे जाणवले. ‘ही माझी शेवटची निवडणूक! अंत भला तो सब भला’ असे शेवटच्या प्रचारसभेत ते म्हणाले होते, पण त्यांना तूर्तास निवृत्त होऊ दिले गेले नाही. त्यांना मुदतवाढ दिली हा ‘मोठ्या भावा’च्या मनाचा ‘मोठेपणा’ नक्कीच आहे.

निवडणूक प्रचारात निवृत्तीचे संकेत देणार्‍या नितीश कुमारांच्या राजकारण संन्यासाची ही चाहूल म्हणावी का? जदयूची पीछेहाट का झाली? यावर विचारमंथन करायला त्यांना वेळ कधी मिळणार?

उपमुख्यमंत्रीपदावरून डावलले गेलेले सुशील मोदी सध्या गप्प आहेत. मौनातूनच ते नाराजी प्रकट करीत असतील का? न बोलताही त्यांचे मौन बरेच काही सांगते. पक्षाचा नेता आणि उपनेत्याची नावे जाहीर करण्याची अवघड जबाबदारी त्यांनाच पार पाडावी लागली. नव्या मंत्रिमंडळात स्वत:चेच दोन उपमुख्यमंत्री देण्याचा भाजपचा निर्णय नितीशबाबूंना पसंत पडला नसावा.

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यावर नितीश कुमारांनी त्यांची फारशी दखल घेतल्याचे माध्यमांवर जाणवले नाही. भाजपच्या दोन उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नितीश कुमारांना प्रभावीपणे काम करता येईल का? पूर्वीसारखा एकहाती कारभार चालवणे त्यांना शक्य होईल का?

उपमुख्यमंत्री म्हणून सुशील मोदींनाच नितीश कुमारांची व्यक्तिगत पसंती होती. नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपदाची सातव्यांदा संधी मिळाली तर मोदींना का नाही? असा प्रश्न मोदी समर्थकांना आणि बिहारी जनतेला पडणे स्वाभाविक आहे. गेल्या 15 वर्षांत असे अनेक प्रसंग आले; ज्यावेळी मोदी नितीशबाबूंना ठामपणे साथ देत.

त्यांचे गुणगान गाऊन कधी-कधी त्यांनी स्वपक्षालाच काहीसे अडचणीतही टाकले होते. त्यामुळे जदयूची ताकद घटून भाजपची ताकद वाढताच मोदींना बाहेरचा रस्ता दाखवला गेला असेल का? मोदींना हटवून नितीश कुमारांशी गरजेपेक्षा जास्त सलगी राखू पाहणार्‍या इतर स्वपक्षीय नेत्यांना हा सूचक इशारा असावा का? 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘एनडीए’चे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नितीश कुमारांचे नाव पुढे रेटायला जदयूने दोन वर्षे आधीच सुरूवात केली होती.

पंतप्रधानपदासाठी नितीश कुमारच लायक असल्याचे सुशील मोदींनी एका मुलाखतीत सांगून खळबळ उडवली होती. तो हिशोब आता चुकता केला गेला असेल का?

नितीश कुमार अभियांत्रिकी पदवीधर आहेत. मात्र त्यांच्या नव्या मंत्रिमंडळात जेमतेम शिकलेल्या काही नेत्यांना मंत्रिपदे द्यावी लागली. राजद नेते तेजस्वी यादव यांच्या शिक्षणावरून सत्ताधारी नेते निवडणुकीत आकाश-पाताळ एक करीत होते. आता ते नेते मौन बाळगून आहेत.

बी.एस्सी. पदवीधर सुशील मोदींना बारावी शिकलेला आणि मंत्रिपदाचा अनुभव नसलेला नेता पर्याय कसा असू शकतो?

उद्यापासून (23 नोव्हेंबर) बिहार विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. नितीश कुमारांनी मुख्यमंत्रीपदाची ‘सप्तपदी’ सुरू केली आहे.

अशावेळी घोटाळ्याच्या आरोपावरून टीकेची झोड उठल्यावर अवघ्या 72 तासांत राजीनामा देण्याची वेळ त्यांच्याच पक्षातील शिक्षणमंत्र्यांवर का आली असावी? नितीशजींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला हा अपशकून ठरणार का?

- Advertisment -

ताज्या बातम्या