विमुक्त नंदनवनातील नरक

इंग्रजांची आजची समृद्धी नीग्रोंचे श्रम आणि दुःखे यांवर आधरलेली आहे.... त्यांच्या गोद्या बांधण्याचे आणि वाफेची इंजिने तयार करण्याचे काम नीग्रोंनीच केल्यासारखा हा प्रकार आहे.प्रा. एच .मेरिव्हेल यांचे हे विधान अत्यंत महत्वाचे होते. अमेरिकेतील आपल्या वसाहतींमध्ये नीग्रोंना जनावरांपेक्षा वाईट वागणूक देऊन इंग्लंडची समृद्धी मोहरली होती... धर्म, इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक प्रा.डॉ.राहुल हांडे यांची ‘बखर अमेरिकेची’ ब्लॉगमालिका...
विमुक्त नंदनवनातील नरक

१८४० साली ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रा. एच. मेरिव्हेल यांनी 'वसाहतीकरण आणि वसाहती' या विषयावर अनेक व्याख्याने दिली. त्यांच्या व्याख्यानमालेत त्यांनी दोन महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आणि त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न देखील केला. "लिव्हरपूल आणि मॅचेस्टर या दोन नगरांचे महानगरांमध्ये रुपांतर करण्याची किमया कोणी केली? आज तेथे जोमाने चालणारे उद्योगधंदे आणि प्रचंड वेगाने होणारा संपत्तीचा संचय कोणच्या जिवावर चालू आहे?....

इंग्रजांची आजची समृद्धी नीग्रोंचे श्रम आणि दुःखे यांवर आधरलेली आहे.... त्यांच्या गोद्या बांधण्याचे आणि वाफेची इंजिने तयार करण्याचे काम नीग्रोंनीच केल्यासारखा हा प्रकार आहे.प्रा. एच .मेरिव्हेल यांचे हे विधान अत्यंत महत्वाचे होते. अमेरिकेतील आपल्या वसाहतींमध्ये नीग्रोंना जनावरांपेक्षा वाईट वागणूक देऊन इंग्लंडची समृद्धी मोहरली होती. ३१ ऑगस्ट १६१९ रोजी व्हर्जिनियाच्या किना-यावर २० नीग्रो गुलाम विकण्यासाठी आलल्या जहाजाने नांगर टाकला. हया नांगराने समुद्रात जहाजाला स्थीर करण्याबरोबरच पुढील सुमारे २५० वर्षांसाठी नीग्रो वंशातील लाखो निष्पाप जीवांना गुलामीच्या जोखडात बांधून टाकले.

विमुक्त नंदनवनातील नरक
गो-यांचा इतिहासातील काळा अध्याय

अमेरिकेचा इतिहास आपल्या पोटात घेऊन वाहणारी 'मिसिसिपी' जर कदाचित बोलू लागली तरच ख-या अर्थाने नीग्रोंच्या गुलामीचे विदारक स्वरूप जगासमोर येऊ शकेल. "अमेरिकन नीग्रोंची गुलामगिरी जगातील कोणत्याही गुलामगिरीपेक्षा वेगळी आहे." असे विधान डॉ. जनादर्न वाघमारे आपल्या 'अमेरिकन नीग्रो:साहित्य आणि संस्कृती' या ग्रंथात केले आहे. त्यांचे हे विधान नीग्रोंच्या गुलामगिरीचे जगावेगळे स्वरूपाविषयी निश्चितच विचार करायला लावणारे आहे. जगभरात सरंजामशाही काळात कमी अधिक प्रमाणात प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे गुलामगिरी अस्तित्वात होती. समाज आणि सत्ता यांची मान्यता तिला मिळालेली होती. मध्ययुगीन युरोपात गुलामगिरी असली तरी अमेरिकेत मात्र नीग्रोंच्या गुलामगिरीने अमानुषतेचा कळस गाठला होता.

नीग्रोंच्या गुलामीचे जगातील सर्वात भयानक व हिडीस रूप अमेरिकेत पाहयला मिळाले. अमेरिकन गो-यांच्या ढोरांचे आयुष्य नीग्रोंपेक्षा चांगले होते. कारण नीग्रो गो-यांचेच नाही, तर त्यांच्या ढोरांचे देखील गुलाम होते. अमेरिकन गो-यांना नीग्रोंचे श्रम स्वतःच्या सुख-समृद्धीसाठी जेवढे प्रिय होते. तेवढीच नीग्रोंच्या काळया कातडयाची घृणा त्यांच्या मनात भरलेली होती. नीग्रो गुलाम म्हणजे एक वस्तू. वस्तूला जीव-जाणीवा, भाव-भावना, व्यथा-वेदना, विचार-कल्पना इत्यादी असूच शकत नाही. तिचा वाटले तसा उपभोग घेता येतो. ती तोडता येते, मोडता येते, फोडता येते आणि विकता देखील येते. अमेरिकन गो-यांच्या तत्कालीन कायदयानेच नीग्रोंना व्यापारी वस्तू ठरवलेले होते.

विमुक्त नंदनवनातील नरक
कॅलिफोर्निया गोल्ड रश

रेडइंडियन्सनंतर नीग्रोंच्या अश्रूंनी मिसिसिपीला निश्चितच पूर आला असावा. मिसिसिपीत वाहून गेलेले हया दोन्ही मानव जमतींचे अश्रू तिच्यातील माशांच्या अश्रूंप्रमाणे कधीच कोणाला दिसले नाही. गुलामीतून मुक्तीनंतर नीग्रोंनी लिहिलेल्या साहित्यात म्हणजेच 'ब्लॅक लिटरेचर' मध्ये हया अश्रूंमागील असीम वेदनांना शब्दरूप मिळाले असले तरी ते चार आंधळयांनी हत्ती पाहण्यासारखे आहे. शब्दांच्या पलिकडच्या कृष्णविवरात दडलेल्या नीग्रो गुलामीला पुस्तकांच्या पानांवर समग्रपणे उतरवणे अशक्य आहे. 'नीग्रोंची गुलामी जगावेगळी का?', या प्रश्नाचे उत्तर शोधतांना आपल्याला श्वेत अथवा गो-या अमेरिकन लोकांच्या इतिहासात थोडं डोकवावे लागते.

अमेरिका खंडाचा शोध म्हणजेच नव्या जगाचा शोध लागल्यानंतर हया भूमीला पापमुक्त नंदवन असे युरोपियन लोकांनी संबोधण्यास सुरवात केली. यामागे 'बायबल' मधील 'ॲडम व ईव्ह' च्या मिथकाचा संदर्भ असलेला दिसतो. परमेश्वराने विश्वाची निर्मिती केल्यानंतर पहिला पुरुष 'ॲडम' बनवला. ॲडमला एकटपणाचा कंटाळा आला म्हणून त्याच्या निर्मितीपासून तिस-या दिवशी त्याच्यात बरगडीपासून 'ईव्ह' म्हणजे आद्य स्त्री निर्माण केली. त्यांना जगण्यासाठी ईडन गार्डन नावाचे नंदनवन उपलब्ध करून दिले. अमर्याद विमुक्तता, आनंद आणि सुख यांनी भरलेले जीवन म्हणजे ईडन गार्डनमधील ॲडम-ईव्हचे अस्तित्व. भविष्यात ॲडम-ईव्ह यांनी केलेल्या पापांमुळे त्यांना दुःखाच्या छायेत दिवस काढावे लागले. ईडन गार्डन म्हणजे ॲडम-ईव्हचे ईश्वरदत्त नंदनवन युरोपातच असणार. कारण जवळपास संबध युरोप ख्रिश्चन धर्मानुयायी झालेला.

विमुक्त नंदनवनातील नरक
अखेर नदीचे पाणी पेटले..

अमेरिका खंडाचा शोध लागेपर्यंत युरोप खरोखरच पापाच्या छायेत असल्यासारखाच होता. अमेरिकेच्या रूपाने लाभलेले नव्या जगासाठी अनेक ग्रंथामध्ये पापमुक्त नंदनवन असे करण्यात आलेले आहे. युरोपातून अमेरिकेच्या पापमुक्त नंदनवनात आलेले सर्व ॲडम-ईव्ह अमर्याद स्वातंत्र्य व पापमुक्त जीवन जगण्यासाठी हया नंदनवनात विहार करू लागले. हया नवीन जगासंदर्भात 'मिथ्स' तयार करण्यासाठी अमेरिकेचे वर्णन 'विमुक्त नंदनवन' असे करण्यास अमेरिकन लोकांनी सुरवात केली. ज्यू स्वतःला ईश्वराने निवडलेले लोक समजत होते. असे असले तरी मोझेसच्या आधीपासून ते हिटलरच्या पतनापर्यंत त्यांना गुलामीच्या जोखडात आणि वंशभेदाच्या छळछावण्यांचा अनुभव घ्यावा लागला. त्यांच्याप्रमाणे अमेरिकेत आलेले युरोपियन देखील स्वतःला ईश्वराने निवडलेले लोक समजू लागले. हे लोक मात्र ज्यूं पेक्षा सुदैवी होते. कदाचित अमेरिकेचा शोध लागल्यानंतर ईश्वरालाही हया लोकांचा शोध लागला असावा आणि त्यांने त्यांना आपले आवडते लोक म्हणून निवडले असावे.

अमेरिकेच्या भूमीवर पोहचण्याचे साहस, तिथे वस्ती करणे, शेती करणे, नगरे वसवणे इत्यादी सर्व बाबतीत हया गो-या लोकांच्या धाडसाला व कर्तबगारीला सलामच करावा लागतो. असे असले तरी त्यांच्या याच कर्तबगारीने त्यांच्यात सर्वश्रेष्ठत्वाचा आणि अमेरिकेचे अनभिष्कित स्वामी असल्याचा दंभ निर्माण केला. नीग्रो लोक गुलाम म्हणून मिळाल्याने तर हया गो-यांच्या डोळयांवर त्यांचे श्वेत कातडेच ओढले गेले. त्यामुळे माणसाचे मूल्यमापन फक्त त्याच्या कातडीच्या रंगावरुन करण्याचा अमानवी निकष त्यांनी निर्माण केला. अमेरिकन गो-यांना आपला वर्ण आणि वंश जगात सर्वात श्रेष्ठ वाटू लागला. त्यात नीग्रो लोकांचा कातळासारखा काळा रंग म्हणजे त्यांच्या शुद्रतेचा ईश्वर मान्य पुरावा हया गो-यांनी निश्चित केला.

विमुक्त नंदनवनातील नरक
आम्ही संयुक्त राज्यांचे साधारण लोक..

युरोपियन-अमेरिकन गोरे स्वतःला कॉकेशियन वंशाचे मानतात. आपला श्वेत वर्ण व आकर्षक चेहरेपट्टी याच्या एकदम विरुद्ध काळाकभीन्न रंग आणि अनकार्षक दिसणे. यामुळे गो-यांनी हया भेदाचे सर्व श्रेय परमेश्वराला देत स्वतःच्या सर्वश्रेष्ठत्वाचा उद्घोष केला. काळा रंग म्हणजे अशुभ, अमंगल आणि अपवित्र असतो. अंधार काळा असतो. अंधार आणि मृत्यू हया दोन्हीही गोष्टी अशुभ आणि भयंकर आहेत. त्यामुळेच नीग्रो हे अमंगल आणि अपवित्र वस्तूंचे प्रतीक आहेत. असे समर्थन धार्मिक स्तरावरून देखील सातत्याने करण्यात आले. जगातील इतर गुलामांपेक्षा नीग्रो गुलामांची एक निसर्गदत्त लपवताच न येऊ शकणारी कमजोरी त्यांचा वर्ण वा रंग होती. गो-यांच्या अमेरिकेत ते कोणत्याच प्रकारे स्वतःची ओळख लपवू शकत नव्हते.

महाभारतातील अभागी कर्ण कवचकुंडलांमुळे ज्याप्रमाणे स्वतःची ओळख लपवू शकत नव्हता, अगदी तसाच हा प्रकार. काळया कातडीपासून स्वतःला वेगळे करताच येणे शक्य नव्हते. भारतातील मनुप्रणित चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील गुलामी असो किंवा जगातील वेगवेगळया भागात असेलेली वंशाधारित गुलामी यांच्यापेक्षा नीग्रो गुलामी आणखी एका स्तरावर वैशिष्टयपूर्ण होती. गुलामी करण्यासाठी नीग्रोंना त्यांच्या जन्मस्थानातून अपहरण करून कायमचे हया 'नव्या जगात' आणले गेले. युरोपातून अमेरिकेत आलेल्या गो-यांना अमेरिका म्हणजे नवे जग वाटले. त्यापेक्षा नीग्रोंमध्ये ही भावना अमर्याद स्वरूपात तीव्र होती. या नव्या जगात त्यांना त्यांची माणूस म्हणून ओळख नव्हती, भाषा नव्हती, संस्कृती नव्हती, कुटुंब नव्हते. एवढेच काय तर स्वतःचे म्हणून साधे नावं देखील नव्हते. त्यामुळे गो-यांसाठी हे नवे जग होते की काळया नीग्रोंसाठी हयाची कल्पना आपल्याला येऊ शकते.

विमुक्त नंदनवनातील नरक
संविधान हाच धर्म

गो-यांच्या हया पापमुक्त वा विमुक्त नंदनवनात आल्यानंतर त्यांना पुण्य म्हणजे काय हे कधी समजले नाही. तसेच विमुक्तता तर नाहीच नाही; परंतु साधं माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य अनुभवता आले नाही. गुलाम म्हणून त्यांची हतबलतेचा आपण विचार केला, तर त्यांना गुलाम म्हणून गुरा-ढोरांपेक्षा वाईट वागवणा-या त्यांच्या मालकांचाच धर्म त्यांना स्वीकारावा लागला. म्हणजे ज्या धर्माच्या आधारे त्यांचे मालक स्वतःला ईश्वराने निवडलेले लोक समजत होते. त्यांना अवर्णनीय क्रुर व अमानवी वागणूक देत होते. त्याच ईश्वराकडे त्यानेच निवडलेल्या लोकांच्या दमनातून व शोषणातून सुटण्यासाठी नीग्रो प्रार्थना करत होते. गो-यांचे हे विमुक्त नंदनवन नीग्रोंसाठी केवळ नरक ठरला.

विमुक्त नंदनवनातील नरक
स्वातंत्र्याची अस्वस्थ पहाट

३१ ऑगस्ट १६१९ रोजी व्हर्जिनियाच्या भूमीवर उतरवण्यात आलेल्या पहिल्या २० गुलामांपासून ४ एप्रिल १९६८ ला हत्या करण्यात आलेल्या मार्टिन ल्यूथर किंग या अमेरिकन नीग्रोंच्या मानवाधिकारासाठी लढणा-या त्यांच्या सर्वोच्च नेत्यापर्यंत. प्रत्येक नीग्रोचे आयुष्य मी कोण आहे? हया एका प्रश्नाचे उत्तर शोधण्यात बरबाद झाले. हया प्रश्नाचे उत्तर कोणत्याही सर्वसामान्य नीग्रो गुलामाला तर सोडा मार्टिन ल्यूथर किंगला देखील सापडले नाही. म्हणूनच त्याने आपल्या शवपेटीवर नीग्रोंची अगतिकता व्यक्त करणारे एक विधान कोरण्यास सांगितले-

Thanks God

I am Free at Last !

प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६

(लेखक धर्म,इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत)

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com