Saturday, May 11, 2024
Homeब्लॉगअमेरिकन टॅवर्नवरून जाणारे रस्ते

अमेरिकन टॅवर्नवरून जाणारे रस्ते

कोणत्याही देशाला विकसित देश होण्यासाठी जे निकष पूर्ण करावे लागतात. त्यामध्ये त्या देशातील दळणवळण हा एक प्रमुख घटक आहे. देशातील दळणवळण व्यवस्था त्या देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असते. कृषी उत्पादनांपासून सर्व प्रकारच्या उत्पदनांची वाहतूक करणे जेवढे सुलभ-जलद तेवढा व्यापारी-औद्योगीक-आर्थिक विकास. हे समीकरणच आहे. विविध प्रकारच्या उत्पादनांसोबतच देशातील नागरिकांचा जलद व सुखद प्रवास देशाच्या आर्थिक विकासात महत्वाचा असतो.

आज महासत्ता म्हणून उदयाला येऊ पाहणा-या चीनने त्यामुळेच आपले दळणवळण क्षेत्र प्रचंड विकसित केले आहे. दळणवळणाच्या प्रत्येक प्रकारात अजस्त्र प्रयोग सुरू केले आहेत. जगातील सर्वात मोठी महासत्ता अमेरिकेने सुरवातीपासूनच दळणवळणाचे महत्व हेरले होते. युरोपातील वसाहतवादी उत्तर अमेरिकेच्या भूमीवर पोहचले. तेंव्हापासूनच त्यांनी दळणवळण व्यवस्था निर्माण करण्यास सुरवात केली. तसे करणे त्यांची अपरिहार्यता देखील होती. कारण हे वसाहतवादी जेंव्हा या भूमीवर पोहचले तेंव्हा शेती-व्यापार हाच त्यांचा या भूमिवर वास्तव्य करण्याचा मुख्य हेतू होता. अमेरिकेचे मुळ रहिवासी आदिम अवस्थेत असल्यामुळे त्यांचे दळणवळण जुजबी व निसर्गसुसंवादी होते.

- Advertisement -

विजयापूर्वीचा हलकल्लोळ

वसाहतवादयांना हया भूमीवर पोहचल्यावर दळणवळणासाठी सर्वप्रथम रस्त्यांची निर्मिती करावी लागली. त्यामध्ये नवीन अपरिचित भूमी व नैसर्गिक परिस्थिती हे अडथळे होतेच. असे असले तरी रस्त्यांची निर्मिती करणे अनिवार्य होते. वसाहतींच्या स्थापनेपासूनच वसाहतवादयांनी रस्त्यांच्या निर्मितीला प्राधान्य दिले. सुरवातीचे हे रस्ते पक्के नव्हते तरी दळणवळणाचे काम करत होते. उन्हाळयात हया रस्त्यांवर धूळीचे लोट आणि हिवाळयात चिखल अशी अवस्था होती. हया रस्त्यांवरचा प्रवास थकवणारा आणि असुविधाजनक होता. असे असले तरी अमेरिकन राज्य क्रांतीच्या आधीच पूर्व अमेरिकेतील सर्व प्रमुख शहरं आणि खेडे रस्त्यांनी जोडले गेले होते. बोस्टन ते सवान्नापर्यंत राजमार्गांचे जाळ निर्माण करण्यात आले होते. पूर्व आणि पश्चिम अमेरिकेला जोडणा-या रस्त्यांची निर्मिती देखील झालेली होती. हया रस्त्यांवर प्रवास आणि मालवाहतूक करण्याचे विविध प्रकार विकसित करण्यात आले होते. काही लोक पायी चालून प्रवास करत असले, तरी हळूहळू घोडे व घोडागाडी यांचा उपयोग प्रवासासाठी करण्यात येऊ लागला. याकाळात महिला आपल्या कुटुंबातील पुरुषांसोबत घोडयावर मागे बसून प्रवास करत असत.

अठराव्या शतकात उत्तर आणि मध्य अमेरिकेत हिवाळयात बर्फावरील घसरगाडी (Sledge) चा वापर सुरू झालेला होता. घोडागाडीच्या प्रवासाला अठराव्या शतकात व्यावसायिक स्वरूप देण्यात आले. याकाळात आजच्या ट्रॅव्हल कंपन्यांप्रमाणे घोडागाडयांच्या ट्रॅव्हल कंपन्या सुरू करण्यात आल्या. एकटया व्यक्तिचा आणि महिलांचा प्रवास यामुळे सुरक्षित व सुखकर झाला. अशा घोडागाडयांना ‘स्टेज कोच’ असे म्हणत. आज ट्रॅव्हल कंपन्यांच्या बस ज्याप्रमाणे सर्व सुविधायुक्त,आरामदायी व आलिशान असतात तशाच स्टेज कोच असत. हया घोडागाडीचा ‘ड्रायव्हर’ म्हणजे ‘कोचवान’ हा प्रामुख्याने नीग्रो गुलामच असे. त्याच्या शेजारी त्याचा सहाय्यक म्हणजे ‘क्लिनर’ बसलेला असे आणि रस्त्यात येणारे अडथळे दुर करण्यासाठी एकजण गाडीसोबत पायी चालणारा असे. माल वाहतूक करणा-या घोडागाडयांना देखील अशीच सोय होती.

स्वातंत्र्याची अस्वस्थ पहाट

व्हर्जिनियाच्या विस्तारलेल्या कृषी क्षेत्रात प्रवासाचा वेग वाढवण्यासाठी सहा घोडे असलेल्या घोडागाडयांचा वापर केला जात असे. घोड्यावरचा किंवा घोडागाडीतून केला जाणारा प्रवास. हा आजच्या तुलनेत अत्यंत मंद होता. लांबच्या पल्ल्याचा प्रवास असल्यास मुक्काम,भोजन व विश्रांतीसाठी सोय असणे आवश्यक होते. भारतात किंवा जगाच्या कोणत्याही भागात प्राचीन काळापासून व्यापारी मार्गांवर अशा सोयी होत्या. अरबस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात वाळवंटातील व्यापारी मार्गांवर मरुस्थळांच्या ठिकाणी अशी मुक्कामाची सोय होती. तेथे माणसांच्या व उंटांच्या चार-पाण्याची सोय होती. भारतात यांना ‘धर्मशाळा’ किंवा ‘सराय’ असे संबोधण्यात येते. अमेरिका हा वसवण्यात आलेला देश असल्यामुळे तेथे जसे रस्ते निर्माण करावे लागले तसेच त्यांच्यावर मुक्कामाची ठिकाणं देखील निर्माण करावी लागली. प्राचीन काळापासून जगात व्यापारी मार्गावरील अशा मुक्कामांच्या ठिकाणांचा एक मोठा इतिहास आहे. ही ठिकाणं व्यापारासोबतच ‘राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक’ केंद्रं देखील होती.

धर्म, भाषा, कला, तत्त्वज्ञान, विचारधन, ज्ञान, परंपरा, वेशभूषा, खाद्यसंस्कृती इत्यादींच्या प्रचार-प्रसारात आणि आदान-प्रदानात हया ठिकाणांचे महत्व व योगदान इतिहासात अत्यंत महत्वाचे राहिले आहे. अमेरिकेत रस्त्यांसोबतच हळूहळू अशा ठिकाण्यांची निर्मिती होत गेली. त्यांना अमेरिकेत ‘टॅवर्न'(Tavern) असे संबोधले गेले. मराठीत या शब्दासाठी ‘खानावळ’ अथवा ‘पथिकाश्रम’ हे पर्यायी शब्द वापरले जातात. टॅवर्नमध्ये प्रवाशांना राहण्याची व खाण्याची सोय असे. त्यांच्या घोडयांना देखील येथे चारा-पाणी मिळण्याची व्यवस्था होती. मदिरा आणि मदिराक्षी मिळण्याची सोय देखील टॅवर्नचा अविभाज्य भाग होता. त्याकाळी अमेरिकेच्या ग्रामीण सामाजिक जीवनात टॅवर्नला अत्यंत महत्व प्राप्त झाले. प्रवाशांच्या गप्पा-गोष्टी,माहितेचे आदान-प्रदान,व्यापार यांच्याबरोबरच ग्रामीण अमेरिकेतील मालाची विक्री ,व्यापार,सार्वजनिक सभा,उत्सव,सामूहिक गायन-वादन-नृत्य इत्यादींचे केंद्र म्हणून ‘टॅवर्न’ ओळखली जाऊ लागली. तत्कालीन अमेरिकेच्या सर्वांगिण विकासात टॅवर्नचा मोठा वाटा आहे.

संविधान हाच धर्म

टॅवर्नसाठी इंग्रजी शब्दकोशात टॉपरूम (taproom),इन (inn), ॲलेहाऊस (alehouse), रोडहाऊस (roadhouse), ड्रिंकर (drinker), सलून (saloon), बिस्ट्रो (bistro), बार (bar), बाररूम (bar room), कॅबरेट (cabaret), एस्टॅब्लिशमेंट(establishment) कॅफे, रेस्टॉरंट, पब, इत्यादी एकूण २२ शब्द आढळतात. यापैकी काही शब्द भारतीय जनतेच्या चांगल्याच परिचयाचे आहेत. सलून (saloon) हा शब्द उच्चारल्यानंतर आपल्याकडे ‘केशकर्तनालय’ डोळयासमोर उभे राहते. मात्र हॉलिवूड आणि स्पॅनिश चित्रपटसृष्टीमध्ये बनलेल्या ‘काऊबॉय’ चित्रपटांमध्ये आपल्या घोडयावर बसलेला,हॅट घातलेला,लाँग बूट पायात असलेला,कमरेला पिस्तुल असलेला नायक. एखाद्या गावात शिरल्याबरोबर ‘सलून’ लिहिलेली जागा दिसते. तिच्या बाहेर घोडा बांधण्याची व्यवस्था केलेली असते. तेथे घोडा बांधून नायक दाराच्या चौकटीत मधोमध लावलेले दोन छोटी दार बाजूला करून आत प्रवेश करतो. तेथे काही लोक मद्य पित बसलेले असतात. ते संशयाने आणि बिनकामाच्या रासवट खुन्नसने नायकाकडे पाहू लागतात. दोन-चार मधुबाला तेथे वावरत असतात. वरच्या मजल्यावर खोल्या असतात इत्यादी इत्यादी.

या चित्रपटांना प्रामुख्याने मॅक्सिकन पार्श्वभूमी अधिक होती. या चित्रपटांची बिनडोक कॉपी करण्याचे प्रयत्न आपल्याला ऐंशीच्या दशकातील काही हिंदी चित्रपटांमध्ये दिसतात. तो सगळा मोठा हास्यास्पद प्रकार होता. भारतातील एखाद्या पारंपरिक खेडयाच्या मधोमध बार किंवा सलून दाखवले जायचे. एखादी ख्रिश्चन महिला त्याची मालक असायची. गावात धोतरं-घागरे घालून फिरणारे स्त्री-पुरूष. ही एकटीच स्कर्ट-मिडी व टॉप अथवा फ्रॉक घातलेली. नायकाचा आणि त्याला ज्यांच्याशी फाईट करायची त्या मारखाऊंचा पेहराव फक्त काऊबॉयसारखा. असला हास्यास्पद प्रकार पाहात आमची एक आख्खी पिढी लहानची मोठी झाली. आता हा प्रकार हास्यास्पद वाटत असला तरी तेंव्हा आमच्या मनोरंजनात हया चित्रपटांनी काही कमी केली नाही. कधी कधी घोर अज्ञातच मनोरंजनाचा निखळ आनंद मिळतो. आपल्याकडील काऊबॉयपटांचा जनक होते फिरोजखान. त्याला पाहून मॅक्सिकन काऊबॉय आपल्या खेड्यात फिरत असल्याचा उगीच भास व्हायचा. असो !, हॉलिवूडमधील काऊबॉयपटांमध्ये त्यावेळच्या घोडाबग्गी ट्रॅव्हल कंपनीच्या बग्ग्या, त्यांचे थांबे, घोडाबग्गीवर असलेले कंपनीचे नाव,प्रवासी घेणे,त्यांना त्यांच्या ईच्छित स्थळी पोहचवणे इत्यादीमधून अठराव्या शतकातील अमेरिकेतील दळणवळण व्यवस्थेची साधारण झलक पाहायला मिळते.

आम्ही संयुक्त राज्यांचे साधारण लोक..

तसेच अमेरिकेच्या नसांमध्ये असलेली व्यावसायिक व भांडवलदारी वृत्तीचा देखील परिचय होतो. कालांतराने रस्त्यांबरोबरच अमेरिकेने त्याकाळात आपल्या नद्या आणि सरोवरांचा उपयोग जलद वाहतूकीसाठी केला. रॉबर्ट फुलटनच्या स्टिम बोटने अमेरिकेचा जलप्रवास अधिक वेगवान केला. असे असले तरी सतराव्या-अठराव्या शतकातील टॅवर्नचे अमेरिकन इतिहासात एक आगळेवेगळे स्थान होते. अमेरिकेचा सुमारे दोनशे वर्षांचा इतिहास ह्या टॅवर्ननी आपल्या समोरून जाणाऱ्या रस्त्यांवर धावतांना पाहिला आहे. यासाठी हॉलिवूडच्या काउबॉय चित्रपट बाजूला ठेवून ‘टॅवर्न’कडे पाहावे लागते. अमेरिकेच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व कलात्मक इतिहासात व परिवर्तनांमध्ये टॅवर्नचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. अमेरिकेच्या रस्ते दळणवळणाचा खरा विकास २० व्या शतकात सुरू झाला.

१८९३ साली अमेरिकेच्या कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत ‘रोड इंक्वायरी ऑफिस’ (ORI) ची स्थापना करण्यात आली. अमेरिकन गृहयुद्धाचा नायक असलेले जनरल रॉय स्टोन यांच्या अध्यक्षतेखाली हा विभाग सुरू करण्यात आला. ग्रामीण अमेरिकेतील रस्त्यांची सुधारणा करणे हा या विभागाचा हेतू होता. ग्रामीण भागात पक्के रस्ते करण्यासाठी त्यावेळच्या दहा हजार डॉलर्सचे बजेट मंजूर करण्यात आले. १९०८ मध्ये फोर्ड कंपनीचे मालक हेन्री फोर्ड यांनी शेतक-यांना-सर्वसामान्यांना परवडेल अशी ‘मॉडेल टी फोर्ड’ कार बाजारात आणली. आपल्याकडे ऐंशीच्या दशकात संजय गांधी यांच्या प्रयत्नातून आलेल्या मारूती कारसारखा हा प्रयत्न होता.

अमेरिकन भूमीवरचे अखेरचे युद्ध..

मॉडेल टी फोर्डमध्ये फिरण्याची स्वप्ने पाहू लागलेल्या ग्रामीण अमेरिकन जनतेने त्यावेळच्या अमेरिकन निवडणूकीत ‘आम्हाला गाळातून काढा’. अशी घोषणा दिली. कारण रस्ते चांगले झाल्याशिवाय मॉडेल टी फोर्डमध्ये फिरणे शक्य नव्हते. ग्रामीण अमेरिकेच्या या घोषणेमुळे १९१६ साली अमेरिकन सरकारने शहरांबरोबरच ग्रामीण भागात पक्के व टिकाऊ रस्ते बनवण्यासाठी ‘फेडरल ऐड रोड ॲक्ट १९१६’ (केंद्रानुदानित रस्ते कायदा) मंजूर करण्यात आला. वसाहत स्थापनेच्या प्रारंभापासून सुरू झालेले अमेरिकेतील रस्ते दळणवळणाने आता मॉडेल टी फोर्डचा वेग पकडला. ग्रामीण अमेरिकेतील रस्ते पक्के व टिकाऊ झाल्यावरच अमेरिका महासत्ता होण्यासाठी आवश्यक प्राथमिक पात्रता पूर्ण करू शकला.

– प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६

(लेखक धर्म,इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -

ताज्या बातम्या