Tuesday, April 23, 2024
Homeब्लॉगBlog : बघा जमते का?

Blog : बघा जमते का?

नाशिक | अविनाश जाधव

शांत सुरळीत सुरु असलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एखादा तरी ‘बॅड पॅच’ म्हणजे प्रतिकूल काळ येतोच येतो. तो कुठल्याही पद्धतीने येतो. मात्र अशी संकटे मोजक्याच दिवसांचे पाहुणे असतात….

- Advertisement -

उदा. सध्या ‘करोना’ महामारीचे भयाण संकट! कधीकाळी नोकरीबाबत काहीतरी बिघडते. नात्यांत कुठेतरी उणीवा भासतात. दुरावा येतो. मध्येच व्यवहारांचा काहीतरी गोंधळ होतो. पैशांची बिकट वाट लागते. खिसा अचानक रिकामा होतो. बहुदा हे सारे एकदमच, एकाच वेळी घडतं!

बॅड पॅच आला की, तो आपल्या आयुष्यात महिना-दोन महिने किंवा क्वचित दोन-चार वर्षेसुद्धा रेंगाळतो. मात्र त्यातून संयमाने आणि तडजोडीने नक्कीच मुक्त होता येते. मात्र आपले आयुष्य आंतर्बाह्य हलवून टाकतो. काही काळ आयुष्य नकोसे करुन सोडतो. ना भूक-तहान… ना झोप! फक्त चिंता उरते.

आपण कितीही नको म्हटले किंवा टाळायचे ठरवले तरी हा ‘बॅड पॅच’ येतच असतो अधूनमधून! आयुष्यात फक्त खंबीर होऊन लढा देणे हेच प्राथमिक काम असायला हवे. संपूर्ण आयुष्यात ‘बॅड पॅच’ एक, दोन, चार, सहा किती वेळा येऊ शकतो? सांगता येत नाही. आपल्याला तो ठराविक वेळेपुरता भोगावा आणि अनुभवावाच लागतो. कितीही नकोसा वाटला, कितीही त्रास झाला तरी या त्याचे काही विलक्षण फायदेसुद्धा असतात. दोन प्रमुख फायदे! बघूया…हा खरे तर स्वपरीक्षेचा काळ!

खरोखर आपले कोण आहे? आणि कोण नाही? हे ‘बॅडपॅच’ असतानाच कळते. आपल्या वाईट आणि पडत्या काळातही कोण आपल्या सोबत खंबीरपणे उभे राहते? कोण आपला हात सोडत नाही? कोण आपल्या आधार देऊन पाठीशी उभे राहते? हे फक्त बॅडपॅच असतानाच उमगते. स्वत:ची ओळख…

आपली स्वतःची आपल्याला नव्याने ओळख होते. अत्यंत वाईट परिस्थितीत आणि प्रसंगांत आपण कसे वागतो? आपल्या क्षमता कोणत्या? याविषयी आत्मपरीक्षण करता येते. आपण काय बोलतो? काय करतो? काय निर्णय घेतो? ते आपले आपल्याला समजून येते. आपली शक्तिस्थळे आणि मर्यादा यांची नव्याने जाणीव होते. हा वाईट काळ प्रत्येकाला काहीतरी शिकवून जातो. त्यामुळे स्वतःवरचा विश्वास वाढतो. जगण्याविषयीची नम्रताही येते.

अर्थात, बॅडपॅच येणे आपल्या हाती नाही आणि टाळणेही! संकटे येतात तेव्हा त्यांना प्रतिसाद कसा द्यायचा किंवा कसे हाताळायचे ते आपल्यावर अवलंबून असते. आपला काळ वाईट आहे म्हणून त्याला नाकारून व दुर्लक्ष करून जगत राहायचे का? स्वतःचे नुकसान करून बसायचे? की त्याचा स्वीकार करून नम्र व्हायचे? आत्मपरीक्षण करून स्वतःला घडवायचे, सजग जगायचे? हे आपल्याच हाती असते. सर्वांच्या आयुष्यात कमीत-कमी बॅडपॅच येवोत आणि जे येतील त्यातून आपले आयुष्य अधिकाधिक समृद्ध करण्याची ताकद सर्वांना लाभो!

संघर्षातून जीवन जगण्याची मजा काही औरच असते. प्रयत्न आणि अनुभव हाच ज्याचा-त्याचा शिक्षक असतो. शिक्षक फक्त आपले भरकटलेपण दाखवतात. यशाचा मार्ग आपला आपणच शोधायचा असतो.

तुमचे आयुष्य कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस, प्रेयसी बदलल्यामुळे बदलत नाही. ते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही स्वतःला बदलता तेव्हाच! तुम्हाला प्रगतीपासून रोखू शकते ते फक्त आणि फक्त तुम्ही स्वतःच! कंटाळा, नकारात्मक दृष्टी, नाकर्तेपणा आणि प्रत्येक गोष्टीतून पळवाट काढणे हे फक्त तुम्ही स्वतःसाठी करीत असता.

मी गरीब आहे, पैसा नाही, हे नाही ते नाही, असे म्हणत जगासमोर गेला तर लोक मदत करतीलच असे नाही, पण आपल्या मजबुरीचा फायदा नक्कीच घेतला जातो. समाजाचा हा चुकीचा नियम आहे. स्वतःला नेहमी मजबूत करा, मजबूर नव्हे!

चांगल्या कामात ‘निर्लज्ज’ व्हा! प्रामाणिक व्हा! नक्कीच संकटांची तीव्रता कमी वाटू लागेल. संकटे आलीत किंवा अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावे ठेवली, प्रगतीच्या पथावर पाय ओढले, कोणी चांगल्या कामात अडवले किंवा थांबवले, असे काहीही झाले तरी जगणे सोडू नका.

ठाम राहायला शिका. बघा तुमची प्रबळ इच्छाशक्ती पाहून बॅड पॅचेस किंवा संकटे तुमच्या आयुष्यात यायला घाबरतील आणि लांबूनच दंडवत ठोकून माघारी फिरतील. आपत्तीसुद्धा इष्टापत्ती घेऊन येत असते. मात्र हे खरे ठरवणे आपल्याच हाती असते! बघा जमते का ते?

लेखक युवा ब्लॉगर आहेत

- Advertisment -

ताज्या बातम्या