तितली उड चली आकाश...

तितली उड चली आकाश...

शारदा अय्यंगार! एक निराळा आणि निरागस आवाज असलेली प्रतिभावंत गायिका! लताजी-आशाजी यांच्या सुमधूर आवाजाने सर्वांना मोहिनी घातली होती. अशा काळात तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. 'तितली उडी, उड जो चली', 'वो परी कहाँसे लाऊं...' ही तिची त्या काळातील लोकप्रिय गाणी आजही तेवढीच गुणगुणावीशी वाटतात. शारदाने नुकताच जगाचा निरोप घेतला आहे, पण गाण्यांच्या रूपाने ती अजरामर राहणार आहे...

गेलेल्या माणसांबद्दल चांगलच बोलावे, असा प्रघात आहे. त्यामुळे संगीतकार शंकर जयकिशन यांचे साम्राज्य मोडीत काढायला कारणीभूत ठरलेली ललना, असा पार्श्वगायिका शारदाचा नामोल्लेख करता येईल, पण त्याऐवजी किमान दोन दशके  आधी जन्माला आलेली, एक निराळा आणि निरागस आवाज असलेली प्रतिभावंत गायिका म्हणून तिच्याबद्दल आदर व्यक्त करणे योग्य ठरेल. शारदा अय्यंगारने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला तेव्हा लताजी-आशाजी यांच्या सुमधुर आवाजाने सर्वांना मोहिनी घातली होती.

शारदाच्या आवाजाचा बाज एकदम वेगळा होता. कदाचित तो नायिकेऐवजी कॅबेरे डान्सर किंवा व्हॅम्प व्यक्तिरेखांना जास्त सूट झाला असता आणि नंतर झालाही, पण शंकरनी सुरुवातीला त्यांचा आवाज मुख्य अभिनेत्रीसाठी वापरला. तिचे पाहिले गाजलेले गाणे म्हणजे 'तितली उडी, उड जो चली....'! 'सूरज'मधले हे गाणे तसे बरे होते, पण का कोण जाणे, तो अनुनासिक स्वर मला कुठेतरी खटकला. मात्र आम जनतेला मात्र तो बेहद्द आवडला. अर्थात पूर्वी मुबारक बेगम, शमशाद बेगम अशाच नाकात गायच्या.

पडद्यावर वैजयंतीमाला हे गाणे म्हणते तेव्हा मात्र ते किती बेसुरे वाटत होते. कदाचित तिची चित्रपटातील मैत्रीण मुमताजला ते शोभले असते. त्यात आणखी एक छान गीत होते 'देखो मेरे दिल मचल गया..'! तेही पडद्यावर विजोड जोडप्यासारखे दिसत होते. शंकर साहेबांना कशाची फिकीर नव्हती. शारदाला टॉपला न्यायचे एवढे एकच खूळ त्यांच्या डोक्यात होते. त्याच सिनेमातल्या 'बहारों फूल बरसाओ' हे रफीचे आणि शारदाचे 'तितली उडी' बेस्ट पार्श्वगायकाचे नॉमिनेशनसाठी निवडले होते. दोन्ही गायकांना समान मते पडली होती.

त्यावेळी पुरुष व स्त्री गायकांना वेगळे पुरस्कार द्यायचे नाहीत म्हणे. शेवटी रफी साहेबांची निवड झाली आणि एक ऐतिहासिक चूक(?) होता-होता दुरुस्त केली गेली. शारदाला विशेष पुरस्कार देऊन तडजोड करण्यात आली. पुढे शारदा गात राहिली. तिला 'जहाँ प्यार मिले' मधल्या 'बात जरा है आपसकी' गाण्याला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. काही वेळा तिचा आवाज त्या रूना लैलासारखा किंवा सलमा आगासारखा नशीला वाटला. 'दुनियाकी सैर कर लो', 'चले जाना जरा ठहरो' अराऊंड द वर्ल्डसारख्या गाण्यात... ! मला स्वतःला तिचे 'आयेगा कौन यहाँ' हे पहिल्यांदा रिलीज झालेल्या 'गुमनाम'मधले गाणे जास्त भावते. 'जाने चमन शोला बदन' हे रफीबरोबरचे गाणेही मस्त होते. 'वो परी कहाँसे लाऊं...' हे 'पहचान'मधले गाणेही खूप गाजले, पण लताजींना ऐकण्याची सवय असलेल्या कानांना शारदाचा हा आवाज पचवणे जड गेले. विराट कोहलीला खेळताना पाहिल्यावर हनुमा विहारीला कसे पाहणार?

शारदाला शंकरचे फाईंड म्हणतात ते मात्र चुकीचे आहे. राज कपूरने तिला तेहरानमधल्या कार्यक्रमात ऐकले आणि तो खूप प्रभावित झाला म्हणे. त्याने व्हॉइस टेस्टकरता तिला मुंबईला यायचे निमंत्रण दिले. हे ऐकून आम्ही राज कपूरचे चाहते काही दिवस तोंड लपवून फिरत होतो. त्याने शंकर जयकिशनना तिच्या अपरिपक्व आवाजावर संस्कार करायची विनंती केली. ते झाले का माहीत नाही, पण शंकर तिच्या आवाजाच्या प्रेमात पडले आणि मग त्यांचा पडतीचा काळ सुरू झाला. कालांतराने जयकिशनना आपली चूक जाणवली असावी, पण शंकर माघार घेत नव्हते. त्यामुळे त्यांच्यात फ़ूट पडली.

त्यामुळे दोघांच्या संगीताची पार वाट लागली. फिल्म जगतातील काही जण म्हणतात, शारदाचे करियर बरबाद करण्याचे षड्यंत्र रचले गेले. काही निर्माते दिग्दर्शक, शिवाय वितरक यांनी शारदाची गाणी रेकॉर्ड झाल्यावरही पिक्चरमध्ये घ्यायला मज्जाव केला. त्यांच्यामागे असणारे सूत्रधार फार बडे लोक होते म्हणे. राज कपूरने 'मेरा नाम जोकर'साठी तिच्याकडून तीन गाणी रेकॉर्ड केली. तीदेखील सिनेमात घेतली गेली नाहीत. राज कपूरवर असा दबाव टाकून काम होत असेल असे संभवत नाही, पण अंदरकी बात क्या है कुछ पता नही.! हळूहळू शारदाची पीछेहाट सुरू झाली आणि एका ऑफबीट गायिकेला बॉलिवूड सोडायला लागले. 'तितली'सारखे तिला स्वैर उडता आले नाही हे खरे असले तरी काही काळ तिने आपल्या सुरांनी मोहित केले हे मान्य करायलाच हवे. आज मात्र ही 'तितली कहे मैं चली आकाश' म्हणत सर्वांच्या नजरेपल्याड गेली आहे.

- डॉ अरुण स्वादी

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com