आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार (Architects of Modern Maharashtra) या शब्दातून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण (Late Yashwantrao Chavan) यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख आपल्यासमोर उभा राहतो.

भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दोन-तीन दशकात यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, सहकार, औद्योगीकरण आणि याच बरोबर साहित्य, संस्कृती कला ,क्रीडा आणि संगीत अशा मानवी जीवनाच्या सर्व अंगांच्या विकासाला स्पर्श करून त्याचा कायापालट करण्याचे कार्य जी दूरदृष्टी ठेवून केले ते अतुलनीय असे आहे.

त्याबरोबरच समाजातील सर्वाधिक मागासलेल्या घटकाला विकासाच्या (Development) प्रवाहात आणण्याच्या कार्याचा प्रारंभ यशवंतराव चव्हाण यांनी केला. नव्या महाराष्ट्र राज्याला (State of Maharashtra) पुरोगामी प्रगतीशील महाराष्ट्र राज्य अशी उपाधी त्यांच्या कार्यामुळेच मिळाली. सर्व क्षेत्रातील विकासाचा पाया त्यांनी रचला. तेव्हापासून आजपर्यंत महाराष्ट्र राज्य त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावरूनच आपली वाटचाल करीत आहे .

यशवंतरावांनी कुशलतेने, संयमाने मुंबईसह (mumbai) महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. त्यावेळी तत्कालीन परिस्थितीत मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र हा एक खूप मोठा प्रश्न होता. भांडून , त्रास करून नेहरूंसारख्या अत्यंत प्रभावी नेत्याचा विरोध पत्करून तो सुटणार नाही हे बुद्धिमान यशवंतरावांनी ओळखले आणि मोठ्या कुशलने, संयमाने, धूर्तपणे बेरजेचे राजकारण केले. विरोधी पक्षांनी, संघटनांनी कितीही आग पाखर केली तरी त्यांनी शांत, संयमी पद्धतीनेच हा प्रश्न हाताळला आणि म्हणूनच ते महाराष्ट्राच्या मंगल कलशाचे मानकरी ठरले.

काँग्रेसची (Congress) प्रतिमा उजळ करण्यासाठी, महाराष्ट्राच्या जनमताचा संयम पूर्वक आदर ठेवण्यासाठी, राष्ट्रीय नेत्यांचा रोष न पत्करता महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद कर्तुत्ववान नेत्यांकडे जाणे क्रमप्राप्त होते. अशा महाराष्ट्राच्या बिकट कालखंडात अतिशय धुर्तपणे भविष्यावर लक्ष ठेवून, राजकारणी डाव टाकत यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री म्हणून द्विभाषिक राज्याचा कारभार 1 नोव्हेंबर 1956 रोजी स्वीकारला. 1 मे 1960 रोजी मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याचे ते पहिले मुख्यमंत्री म्हणून कार्यरत झाले.

1962 मध्ये पंडित नेहरूंच्या आग्रहावरून देशाचे संरक्षण मंत्री म्हणून ते दिल्लीत गेले. म्हणजे अवघे सहा-सात वर्षे ते मुख्यमंत्री होते. पण या काळात त्यांनी राज्याची जी पायाभरणी केली ती अभूतपूर्व अशी होती.या सहा-सात वर्षाच्या काळात महाराष्ट्राच्या जीवनात विलक्षण क्रांतिकारक बदल त्यांच्या नेतृत्वाखाली घडून आले. यशवंतराव चव्हाण यांच्या कारकिर्दीत वर्षानुवर्ष संथपणे चालणारा इतिहासाचा प्रभाव क्षणार्धात अशा काही वेगाने उफाळून वाहू लागला की त्यामुळे व्यक्तीचे, समाजाचे आणि राष्ट्राचे जीवन अमुलाग्र बदलून गेले.

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील महान महाराष्ट्राचा थोर वैचारिक वारसा यशवंतरावांनी गतिमान केला. राष्ट्रीय जीवनात त्यांनी महाराष्ट्राला निर्धारित स्थानी नेले. प्रखर स्वातंत्र्य सेनानी, सावध राजकारणी, मुत्सद्दी व सुसंस्कृत विचारवंत, लोकाग्रणी म्हणून त्यांचा प्रभाव लोक माणसात चिरंतर राहणार आहे‌. राष्ट्रीय मूल्यांवर त्यांची डोळस श्रद्धा होती ‌. गरीब, मागास आणि सामान्य माणसातही आत्मविश्वास जागवून त्यांना जागृत, संघटित करुन कर्तृत्व शक्तीतून आधुनिक महाराष्ट्राचे समतावादी नवे चैतन्य निर्माण करण्यात ते यशस्वी झाले .त्यांनी दिलेली नवी दिशा आणि दृष्टी भावी पिढ्यांना मार्गदर्शक ठरणारी आहे.कारण महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सारख्या महान समाजसुधारकाच्या विचारांचे ते प्रवक्ते होते.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करताना महाराष्ट्राचा सर्वांगीण उत्कर्ष, सामाजिक न्याय, समतोल विकास ,सत्ता केंद्रांचे विकेंद्रीकरण आणि सर्व स्तरावरील सत्तेत जनसामान्यांचा सहभाग यांना यशवंतराव चव्हाण यांनी केंद्रबिंदू मानून सत्तेत त्या गोष्टीची पायाभरणी केली. राज्याचा आणि मनुष्यबळाचा सर्वांगीण विकास सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उत्कर्षाशिवाय अशक्य आहे हे त्यांनी जाणले. ते म्हणत," जेव्हा सर्वार्थाने समर्थ लोकशाही उभी राहते. तेव्हा प्रत्येक व्यक्तीला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा लाभ होतो आणि तोच समाज सामर्थ्यवान बनतो." शिक्षण आणि संस्कृतीचे महत्त्व विशद करतांना यशवंतराव यांनी म्हटले आहे की," देशातील लेखक, विचारवंत, शास्त्रज्ञ, संशोधक यांच्या प्रयत्नाने निर्माण होणारे जे विचारधन आहे. तेच खरे समाजाचे मोठे धन आहे."

यशवंतराव चव्हाण साहेब सत्तरच्या दशकातील राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असे त्यांच्याविषयी म्हटले जाते. सुसंस्कृत व्यक्तिमत्व, दांडगा व्यासंग असलेला एक साहित्यिक म्हणूनही अवघा भारत त्यांना ओळखतो. राजकारणातही साहित्यिक वारसा त्यांनी जपला,

" एक कडी तो जंजीर नाही

एक नुक्ता तो तस्बीर नहीं

तकदीर कौंमो की होती है

एक शख्स की तकदीर ही नहीं ।"

कवि अमीर खुसरो यांच्या ओळी यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्या भाषणात वापरल्या होत्या .यावरून त्यांचे साहित्याचे प्रेम लक्षात येते. प्रगतिशील महाराष्ट्राचे स्वप्न पाहताना सहकारी बँका, सहकारी साखर कारखानदारी यांना यशवंतराव चव्हाण यांनी भरीव मदत केली. त्यांच्या या धोरणामुळेच ग्रामीण महाराष्ट्रात कृषी व ग्रामीण विकासाची गुरुकिल्ली सहकारी साखर उद्योग सुरू होऊ शकले. ते म्हणत, "शेतकरी महाराष्ट्राचा प्राण असून शेतकरी हेच महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहेत. " या विधानावरून यशवंतरावांच्या हृदयात शेतकरी होता हे स्पष्ट होते.

लोकशाही शासन व्यवस्थेत सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून स्थानिक स्वराज्य संस्थांची त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था निर्माण करण्याचा महत्त्वाचा निर्णय यशवंतराव यांनी घेतला. या सर्व प्रयत्नांमुळेच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास गतिमान झाला. कृषी ,उद्योग ,सहकार ,शिक्षण ,संस्कृती कला, साहित्य, विज्ञान अशा जीवनाच्या विविध क्षेत्रांवर त्यांनी आपल्या कार्याची छाप पाडली. यशवंतराव चव्हाण यांचे नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व अफाट स्वरूपाचे होते.सर्वार्थाने ते लोकोत्तर लोकनेते, समतोल राजकारणी, कुशल मुत्सद्दी, व्यवहार चतुर, कुशल प्रशासक, साहित्यिक, उत्तम वक्ते,कलारसिक, तत्त्वचिंतक आणि कुटुंबवत्सल अशा विविध पैलूंनी बहरलेले असे समृद्ध नेतृत्व त्यांच्या रुपाने महाराष्ट्राला लाभले.

लोकशाही आणि राष्ट्रीय एकात्मता यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उत्कर्षाच्या कालप्रवाहावर यांच्या कार्याचे जे ठसे उमटले आहेत ते जतन करण्याची जबाबदारी समाजाची आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या निधनानंतर सुसंस्कृत महाराष्ट्र निर्मितीचे त्यांचे कार्य अविरतपणे पुढे सुरू राहावे म्हणून मा. शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या अनुयायांनी, सहृदय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन 1985 रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापना केली. धर्मनिरपेक्ष, पक्ष निरपेक्षपणे महाराष्ट्राचा सांस्कृतिक विकास साधण्याचे लक्ष प्रतिष्ठानचे आहे.

माननीय शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कार्य आजही चव्हाण साहेबांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून सुरू आहे. प्रतिष्ठानच्या अंतर्गत नाशिक केंद्रातून माझ्या अध्यक्षतेखाली समाजामुख चांगले कार्य सुरू आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे ' विश्वासहार्य सर्वोत्तम सेवा' हे ब्रीद घेऊन आधुनिक आणि समृद्ध समाजाच्या निर्मिती करता समान संधी निर्माण करून देणे हा दृष्टिकोन ठेवून महिला, युवा, आरोग्य, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक आणि सांस्कृतिक यासाठी विविध कार्यक्रम नाशिक सेंटरमध्ये घेण्यात येतात.

सुसंस्कृत दूरदृष्टी, नेतृत्वाचा आदर्श वस्तू पाठ ठरलेल्या यशवंतरावांनी आपल्या संस्कारांची, संस्कृतीची,शिक्षणाची आणि समाजकारणाची जी शिदोरी महाराष्ट्राला दिली आहे. ती महाराष्ट्राला दीर्घकाळ संजीवनी देत राहील ‌. यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नेहमी कार्यरत राहून चांगले कार्य करीत राहणार आहे. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या 25 नोव्हेंबर या स्मृतिदिनी त्यांच्या कार्याचे पुण्यस्मरण करून त्यांनी दाखवलेल्या मार्गावर सहकार्याने पुढे वाटचाल क‌रुया !

लेखन - ॲड. नितीन ठाकरे

(सरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक आणि अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण सेंटर,नाशिक)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com