पाऊस
पाऊस
ब्लॉग

पाऊस दरसालचा, तरी हवाहवासा !

'नेमिची येतो पावसाळा'

Gokul Pawar

Gokul Pawar

- एन. व्ही. निकाळे

-

आकाशात काळ्या ढगांची दाटी होऊ लागली की, पाऊस येणार याची वर्दी मिळते. संवेदनशील मनात बालपणीच्या पाऊस कविता आणि पाऊस गाणी फेर धरू लागतात. त्यातील ओळी ओठावर येऊन गुणगुण सुरू होते. कधी एकदा पाऊस येतो, हवाहवासा सुखद गारवा, मंद-धुंद मृद्गंध अनुभवायला मिळतो आणि कधी उन्हाळ्यातील चार महिन्यांची होरपळ थांबते याची आतुरता लागते.

नकोनकोसा झालेला मे महिना संपण्याच्या मार्गावर असतो. अंगाची काहिली करणार्‍या आणि अंग पोळून काढणार्‍या उन्हाळ्याने बहुतेक भागातील तापमानाचा पारा चाळीशीत पोहोचलेला वा त्यापुढे सरकलेला असतो. घरोघर सदैव पंखे गरगरत राहतात. कूलर, एसी नावाची शीतयंत्रे अहोरात्र सुरू असतात. थंडावा देऊन उकाड्याचा त्रास सुसह्य करतात. ज्यांना अशी साधने आवाक्याबाहेरची असतात ती माणसे आपापल्या परीने गारवा शोधतात. खेडोपाडी घरांच्या ओसरीत, घरासमोरच्या झाडाखाली किंवा शेतात लिंब, आंबा वा बाभळीच्या सावलीत माणसे उन्हाळा घालवतात. गारवा आणणार्‍या पावसाची आतुरतेने वाट पाहतात. दुष्काळी भागात, विशेषत: दुर्गम खेड्यापाड्यांत बाया-बापड्यांना तळपत्या उन्हात डोक्यावर पाण्याचे दोन-दोन हंडे-गुंडे भरून आणण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागते. उन्हाळा सरत असताना मोसमी पावसाआधी रोहिणीच्या सरी बर्‍याचदा कोसळतात. कधी-कधी वादळी पाऊस धिंगाणा घालतो. शेती-मातीचे नुकसान करतो. पावसासाठी आसुसलेला बळीराजा पावसाची ही सुरूवात समजून हेही नुकसान सोसतो. सालबादप्रमाणे निसर्गाला हिरवाईचे दान देणार्‍या आणि बरसणार्‍या पावसाळी कृष्णमेघांची ओढ प्रत्येकालाच लागते.

वर्षानुवर्षे ऋतूमागून ऋतू येतात आणि जातात. ‘नेमिची येतो मग पावसाळा...’ या काव्यपंक्तीच्या चालीवर दरवर्षी पावसाचे आगमन होते. कधी तो लवकर येतो तर कधी उशिरा! त्याचे वेळेवर येणे फार कमी वेळा घडते. यावेळचा पाऊस कसा असेल याचे अंदाज हवामान खाते दरवर्षी न चुकता दोन-तीन महिने आधीच देते. ‘यंदा चांगला पाऊस होणार’, ‘सर्वसाधारण पर्जन्यवृष्टी होणार’, ‘90 टक्के पाऊस बरसणार’, ‘पर्जन्यमान कमी राहणार’, ‘पाऊस वेळेवर येणार’, ‘पाऊस लांबणार’ अशी कितीतरी भाकिते पावसाआधी केली जातात. ही भाकिते अपवादाने खरी ठरतात. हवामान खात्याचे अंदाज फोल ठरवण्यात पावसाला मौज वाटत असावी. कारण ‘पाऊस वेळेवर येणार’, ‘मुसळधार बरसणार’ असा अंदाज हवामान खात्याने केला की, आगमनाचे वेळापत्रक पाऊस हमखास चुकवणार... ओढ देणार हे ठरलेले! पाऊस अंदाज चुकवतो. तरीही हवामान खात्याचे अधिकारी जराही नाऊमेद होत नाहीत. दरवर्षी न चुकता पावसाचे अंदाज नव्या उत्साहाने देतात. हवामान खात्याचे अंदाज चुकत असले तरी पावसाविषयीचे अंदाज ऐकायची व वाचायची लोकांना उत्सुकता असतेच. हवामान खात्याच्या पावसाविषयीच्या नुसत्या अंदाजानेसुद्धा माणसाला कितीतरी दिलासा मिळतो.

वाट पाहायला लावणारा पाऊस सुखासुखी येईल तर शपथ! आकाशात जलसंचयाने ओथंबलेले ढग जमू लागल्यावर तळपता सूर्यही नजरेआड होतो. सोसाट्याचा वारा वाहू लागतो. ढगांचा गडगडाट सुरू होतो. विद्युलता कडाडत ढगांच्या अंगणात मुक्तपणे खेळू-बागडू लागते. पावसाच्या स्वागताची ही जय्यत तयारीच निसर्ग करीत असावा. पावसाचा पहिला थेंब धरतीवर येतो. एक... दोन... चार... आठ... असे म्हणता-म्हणता आणि पाहता-पाहता पाऊसधारा बरसू लागतात. पत्र्यांची वा कौलांची छपरे तडतडू लागतात. खोडकर पावसाला गोरगरिबांच्या घरात डोकावयाची भारी होैस! छपरांच्या फटींतून, फुटक्या कौलांमधून वाट काढत तो अनाहूतपणे घरात शिरतो. कधी-कधी माणसांना घरात उभे राहायलासुद्धा कोरडी जागा शिल्लक ठेवत नाही.

इंग्रजीत ज्याला ‘मान्सून’ म्हणतात, तो मोसमी पाऊस दरवर्षी सर्वसाधारपणे 20 मेपर्यंत अंदमानात दाखल होतो, पण आता तेथे दाखल होण्याचे वेळापत्रक पाळणे पावसाने सोडले असावे. शालेय पुस्तकांतील धड्यांमधील नोंदीनुसार पाऊस हल्ली सात जूनला सहसा पडत नाही. हुलकावणी देण्याचा हेका कायम ठेऊन, वेळेवर येण्याचा वक्तशीरपणा पाळणे पावसानेही सोडलेले दिसते. त्यामुळेच त्याच्या आगमनाची वाट पाहणार्‍या जीवसृष्टीची, विशेषत: मानवाची तो फटफजिती करतो.

कधी-कधी हवामान खाते आणि हवामान तज्ञांच्या अंदाजाचा आदर पाऊस करतो. त्यांची लाज राखतो. अंदाजानुसार गपगुमान वेळेवर हजर होतो. तो धो-धो बरसू लागल्यावर नदी-नाल्यांना पूर येतात. ते दुधडी भरून वाहू लागतात. नदीकाठच्या गावांत पुराचे पाणी शिरते. हल्ली तर नदीकाठावर नसलेल्या किंवा नदीपात्र दूर असूनसुद्धा मोठ्या शहरांमध्ये पावसाचे पाणी साचून परिसर जलमय होतो. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक आदी शहरांनी गेल्या वर्षी तो अनुभव घेतला आहे. मुंबईची तर दरवर्षी ‘तुंबई’ होते. मुंबईकरांना जलमय होण्याचा अनुभव आता नवीन राहिलेला नाही. त्याला मानवी चुकाच जास्त कारणीभूत आहेत. जागतिक तापमान वाढ (ग्लोबल वॉर्मिंग), हवामान बदल यांचा परिणाम पावसाच्या प्रमाणावर झाल्याच्या चर्चा तज्ञमंडळींकडून नेहमीच ऐकवल्या जातात. पावसाचे प्रमाण वर्षागणिक कमी होत असल्याचे सांगितले जाते. हा निष्कर्ष अगदी खरा आहे, असे ऐकणार्‍याला वा वाचणार्‍याला वाटावे म्हणून काही आकडेवारीही आवर्जून दिली जाते. तथापि, दुष्काळ, अपुरा पाऊस, अतिवृष्टी, समाधानकारक पाऊस, कडाक्याचा उन्हाळा, कडाक्याची थंडी किंवा थंडीच गायब होणे असे विचित्र अनुभव मानव घेत आला आहे आणि अलीकडच्या काळात घेत आहे.

पाऊस सृजनशील आहे. तो नवनिर्मिती करतो. त्याला नवनिर्मितीचा ध्यास असतो. कोणी काहीही सांगत असले तरी बळीराजाचा पावसावर पुरेपूर विश्वास आहे. आज ना उद्या पाऊस येणारच, याची त्याला खात्री असते. म्हणूनच त्याच्या आगमनाच्या महिना-दोन महिने आधीच बळीराजा शेती मशागतीची कामे सुरू करतो. नांगरून, वखरून शेते निर्मळ केली जातात. प्रतीक्षा असते ती पावसाची! एकदा का तो पडता झाला की, शेतकरी ‘पेरते’ होतात. पाऊस आल्यावर तळपत्या उन्हांनी पोळून निघालेल्या चराचराला सुखद दिलासा मिळतो. हळूहळू सर्वत्र वातावरणात हवाहवासा गारवा निर्माण होतो. निसर्गावर पाऊस मायेची पाखर धरतो. चार महिन्यांच्या सेवाकाळात तो धरतीचे रुप पालटून टाकतो. सार्‍यांचीच त्याला काळजी असते. उन्हाळ्यात कोरडे झालेले नदी-नाले तो जिवंत करतो. त्यांच्या खळाळटाचा मंजूळ ध्वनी हवाहवासा वाटतो. डोंगरमाथ्यांवरून उगम पावणारे छोटे-मोठे जलप्रवाह धबधब्यांच्या रुपाने खुणावतात. पाऊस धरणे, विहिरी आणि तळीेही भरतो. शिवार फुलवतो. धनधान्य पिकवतो. पशुपक्ष्यांच्या चारा-पाण्याची सोयही तोच करतो. नद्यांचे रितेपण दूर करून त्यांना जलसमृद्धी देतो आणि सागरही भरतो.

पाऊस दरवर्षी येत असला तरी त्याचे येणे नेहमीच नवी उमेद जागवणारे आणि हवेहवेसे वाटते. यंदाचा पावसाळा सुरू झाला आहे. त्याची सुरूवात झोकात झाली, पण काही भागांत पाऊस दिसेनासा झाला आहे. अधून-मधून जमणारे ढग शिडकावा करतात. मात्र समाधानकारक पावसाची आस अजून पुरी झालेली नाही. आज ना उद्या पाऊस ती पुरी करीन, याबद्दल अवनी कायमच आश्वस्त असते.

(लेखक दैनिक ‘देशदूत’चे वृत्तसंपादक आहेत.)

Deshdoot
www.deshdoot.com