विश्लेषण : दूध संघ निवडणूक संपली आता लढाई सुरू

जळगाव जिल्हा दूध संघ
जळगाव जिल्हा दूध संघ

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची रणधुमाळी आज आटोपली. विजयी उमेदवार जल्लोष साजरा करीत आहेत, तर पराभूत उमेदवार हे चिंतन करीत आहेत. सहकार क्षेत्रातील दूध उत्पादक शेतकर्‍यांची मायबाप संस्था असलेल्या जिल्हा दूध संघाची यंदाची निवडणूक ही वेगळी ठरली.

चेतन साखरे (उपसंपादक व शहर प्रमुख )

सन 2015 मध्ये आ. एकनाथराव खडसे हे भाजपामध्ये असतांना त्यांनी सर्वपक्षीय पॅनलची संकल्पना मांडून दूध संघावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. याच काळात जिल्हा बँकेवरही कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसे यांच्या रूपाने सत्ता कायम ठेवली होती. मात्र वर्षभरापूर्वी आ. खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि जिल्ह्यातील सत्तासमीकरणेही बदलली. राज्यातील सत्ता परिवर्तनाने जिल्ह्यातील गुलाबराव पाटील, गिरीश महाजन विरूध्द एकनाथराव खडसे ही राजकीय दुश्मनी अधिकच घट्ट केली. या राजकीय दुश्मनीनेच राष्ट्रवादीच्या आ. खडसेंचा दूध संघाच्या निवडणूकीत घात केला.

जळगाव जिल्हा दूध संघ
जिल्हा दूध संघातील खडसे पर्वाचा अस्त

गैरव्यवहाराचा मुद्दा ठरला कळीचा

सलग दोन वर्ष मुदतवाढ मिळणार्‍या जिल्हा दूध संघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर दूध संघातील सात वर्षातील मंदाकिनी खडसे यांच्या कारकिर्दीतील नोकर भरतीसह गैरव्यवहाराची प्रकरणे भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी बाहेर काढली. ही प्रकरणे नुसतीच बाहेर न काढता या प्रकरणांमध्ये खडसेंचे जवळचे विश्वासू असलेल्या चार अधिकार्‍यांना यात अटकही झाली. राष्ट्रवादीचे नेते आ. एकनाथराव खडसे यांच्यासाठी हा पहिला हादरा ठरला. गेल्या सात वर्षांपासून दूध उत्पादक शेतकर्‍यांनी या संचालक मंडळावर ठेवलेला विश्वास गैरव्यवहाराच्या आरोपांनी डगमगला. नवा पर्याय शोधत दूध उत्पादक शेतकर्‍यांनी राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा- शिंदे गट प्रणित शेतकरी विकास पॅनलच्या बाजूने कौल दिला.

जळगाव जिल्हा दूध संघ
दूध संघ निवडणुकीत विजय ; मुक्ताईनगरात जल्लोष...

सामाजिक गणितही ठरले प्रभावी

जिल्ह्यातील बहुतांश सहकारी संस्थांमध्ये मराठा समाजाचे प्राबल्य राहिले आहे. सन 2014 नंतर मात्र आ. एकनाथराव खडसे यांनी सत्तेत असतांना हे प्राबल्य कमी करून त्याठिकाणी लेवा समाजाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला. मंत्रीपद असतांना सहकारी संस्थांची पदे खडसेंनी घरातच ठेवल्यामुळेही स्वपक्षातही त्यांच्याविषयी भाजपात मोठी नाराजी होती. राष्ट्रवादी प्रवेशानंतर जिल्हा बँक निवडणुकीत चेअरमनपदासाठी अ‍ॅड. रोहिणी खडसेंना पुढे करून राष्ट्रवादीतील प्रस्थापित नेत्यांची नाराजी खडसेंनी ओढवून घेतली होती. तेव्हा तर मराठा विरूध्द लेवा असा सामाजिक वाद उभा राहिला होता. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत बहुतांश उमेदवार हे मराठा समाजाचे होते. त्यामुळे स्वाभाविकच लेवा बहुल भागातील सहकार पॅनलच्या उमेदवारांना फटका बसला.यंदाच्या निवडणुकीत सामाजिक गणितही महत्वाचा फॅक्टर ठरले.

एकनाथराव खडसे
एकनाथराव खडसेEknathrao Khadase

स्वभावानुसार खडसे सूड उगविणार

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत पॅनलच्या उमेदवारांसह मंदाकिनी खडसे यांना निवडुन आणणे हे मोठेच आव्हान होते. कारण यंदाच्या निवडणुकीत समोरून दोन मंत्री, पाच आमदार आणि दोन खासदार अशी मोठी शक्ती खडसेंच्या विरोधात होती. या निवडणुकीत पैशांचा महापूर वाहणार आरोप आ. एकनाथराव खडसेंनी सुरूवातीपासूनच केला. आणि तसे झाल्याचीही चर्चा आहे. मुक्ताईनगर मतदार संघातील मंदाकिनी खडसे आणि भाजपाचे आ. मंगेश चव्हाण यांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष होते.

या लढतीत आ. मंगेश चव्हाण यांनी मंदाकिनी खडसेंना पराभूत करून आ. एकनाथराव खडसेंना चांगलेच डिवचले आहे. काहिसा खुन्शी आणि सूड घेण्याचा आ. एकनाथराव खडसेंचा स्थायी स्वभाव राहिला आहे. स्वभावानुसार पत्नीच्या पराभवाचा सूड घेतल्याशिवाय आ. खडसेही स्वस्थ बसणार नाही. एका अपयशाने मी खचून जाणार नाही असा सूचक इशाराही त्यांनी आपल्या विरोधकांना दिला आहे. आगामी काळात जिल्हा परिषद, नगरपरिषदा आणि महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे दूध संघाची निवडणूक संपली असली तरी खरी लढाई आता सुरू होणार आहे.

ना. गुलाबराव पाटलांसह ना. महाजनांची कसोटी

शिंदे गटाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि भाजपाचे मंत्री ना. गिरीश महाजन या दोन्ही नेत्यांची दूध संघात एन्ट्री झाली आहे. गत पाच वर्षात गिरीश महाजन हे मंत्री असतांना जिल्हा बँकेवरही संचालक होते. मात्र त्यांनी संचालक मंडळाच्या सहा वर्षाच्या कार्यकाळात जिल्हा बँकेत एकदाही पाय ठेवला नव्हता. याउलट मंत्री असतांना आ. खडसे यांनी जिल्हा दूध संघाच्या आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणासाठी 100 कोटी रूपयांचा निधी खेचून आणला होता. त्यामुळे जिल्हा दूध संघाला राज्यभरात ‘ब्रॅण्ड’ बनविण्यासाठी ना. गुलाबराव पाटील आणि ना. गिरीश महाजन यांची खरी कसोटी लागणार आहे.

चेतन साखरे (उपसंपादक व शहर प्रमुख )

(9890618263)

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com