अमेरिकेत की अमेरिकन घुसखोरी…

jalgaon-digital
8 Min Read

डोनाल्ड ट्रंप यांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात एक भावनीक मुद्दा महत्वाचा केला होता. तो म्हणजे अमेरिकेत होत असलेली घुसखारी. यामध्ये स्वतःला मुळ अमेरिकन समजणा-या युरोपियन लोकांच्या एका दुख-या नसीला दाबून मतं मिळवण्याचा प्रयत्न होता. अमेरिकेत आलेले सगळेच घुसखोर आहेत. याचा स्वतःला मूळ अमेरिकन समजणा-यांना एव्हाना विसर पडलेला दिसतो.

२० व्या शतकापासून शिक्षण,नोकरी, व्यवसाय इत्यादी कारणांनी अमेरिकेत स्थिरावलेले लोक या ‘खानदानी’ अमेरिकन लोकांना कायमच सलत आले आहेत. ट्रंप यांनी आपल्या निवडणूकीत नेमका याचाच वापर केला. मतदार जेंव्हा विचारांपेक्षा व जगण्याच्या मुद्दयांपेक्षा भावनांच्या आहारी जाऊन मतदान करतात तेंव्हा डोनाल्ड ट्रंपसारखे नमुने जगाच्या कोणत्याही देशात निवडून येऊ शकतात. ट्रंप यांनी आपल्या ‘घुसखोरी’ च्या व्याख्येत कॅनडा आणि मॅक्सिकोमधून होणा-या घुसखोरीलाही महत्व दिले होते. त्यासाठी चीनच्या भिंतीसारखी भिंत बांधण्याची योजना देखील होती. भिंतीचे काम त्यांच्या कार्यकाळात सुरु झाले होते; परंतु अमेरिकन जनतेला आपली ऐतिहासिक चूक लक्षात आली आणि ‘अबकी बार’ फसले.

अमेरिकन टॅवर्नवरून जाणारे रस्ते

अमेरिका मेक्सिकन लोकांच्या घुसखोरीचा कांगावा करतो तेंव्हा आपल्याला अमेरिका-मेक्सिको यांच्या परस्परसंबंधांच्या इतिहासात डोकवावे लागते. अमेरिका आणि मेक्सिको यांच्यातील वैराची ठिणगी म्हणजे टेक्सास. मेक्सिकोचा भाग असलेल्या टेक्सासवरून अमेरिका-मेक्सिको संबंध कायमचे बिघडले. १८०३ साली थॉमस जेफरसन यांनी लुईसियाना प्रदेशाची नेपोलियन बोनापार्टकडून खरेदी केली तेंव्हा या खरेदीत टेक्सासदेखील समाविष्ट आहे. अशी अमेरिकन नेत्यांची धारणा होती. मेक्सिको ही स्पेनची वसाहत होती. १८२१ साली मेक्सिको स्पॅनिश राजवटीकडून स्वतंत्र झाला. मेक्सिको हा आता एक स्वतंत्र देश होता. त्यावेळी टेक्सास मेक्सिकोचे एक राज्य बनले.

१८२७ साली अमेरिकने मेक्सिकोकडून टेक्सास खरेदी करण्याचा प्रयत्न करून पाहिला. मात्र तो असफल ठरला. असे असले तरी अमेरिकन जनता टेक्सासमध्ये घुसखोरी करून तेथे स्थायिक होत होती. टेक्सासला अमेरिकन अतिक्रमणाने ग्रासले होते. मोसज ऑस्टिन हा टेक्सासमधील अमेरिकन विस्थापितांचा नेता होता. त्याने टेक्सासच्या सरकारकडून ३०० कॅथोलिक ख्रिश्चन कुटुंबाच्या वास्तव्यासाठी पर्याप्त असा विशाल भूभाग खरेदी केला होता. त्याच्या मृत्यू पश्च्यात त्याचा मुलगा स्टिफन याने त्याचे हे स्वप्न प्रत्यक्षात साकार केले. १९३२ साली स्टिफन ऑस्टिन याने ‘सेन फिलिप डी ऑस्टिन’ नावाची पहिली ॲग्लो-अमेरिकन वसाहत टेक्सासमध्ये वसवली. आपल्या पित्याने खरेदी केलेल्या विशाल भूभागातील बरीच जमिन स्टिफनने बेनेसी, मिसिसिपी आणि लुईसियाना हया टेक्सास शेजारच्या अमेरिकन राज्यातील प्रांतातील आपल्या बांधवांना अत्यंत स्वस्त भावात विकली. त्यामुळे टेक्सासमध्ये अमेरिकन लोकांची संख्या वाढली.

विजयापूर्वीचा हलकल्लोळ

१९३५ सालापर्यंत सुमारे २०००० ॲग्लो अमेरिकन टेक्सासचे कायमचे रहिवासी झाले. अमेरिकन लोकांची वाढती संख्या पाहून मेक्सिकोमधील जनता भयभीत होऊ लागली. अमेरिकन घुसखोरांचे लोंढे रोखण्यासाठी उपाय म्हणून टेक्सासच्या तत्कालीन राष्ट्रपतींनी टेक्सासमध्ये गुलामी प्रथेवर कायदयाने बंदी आणली. अमेरिकन लोकांची शेती निग्रो गुलामांवर अवलंबून असल्यामुळे हया कायदयाने ते अडचणीत येतील असा यामागे कयास होता. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कारण तोपर्यंत ॲग्लो अमेरिकन टेक्सासचे अधिकृत नागरिक झाले होते. तेथील विधानसभेत देखील त्यांना मोठया प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले होते. त्यांच्या दबावामुळे १८३० साली राष्ट्रपतींना दास प्रथा विरोधी कायदयात सुधारणा करून काही दिखाऊ नियमांवर गुलाम बाळगण्यास परवानगी दयावी लागली.

मुळच्या टेक्सासवासीयांच्या समाधानासाठी भविष्यात आणखी अमेरिकन घुसखोर टेक्सासमध्ये येऊ नये या करता, त्या भागात लष्कर तैनात करण्यात आले. यामुळे टेक्सासमधील ॲग्लो अमेरिकन लोक नाराज झाले. त्यांच्या नाराजीची आणखी काही कारणं होती. ती म्हणजे टेक्सासच्या विधानसभेत त्यांचे प्रतिनिधी कमी करण्यात आले होते. ॲग्लो अमेरिकन लोकांना आपल्या धार्मिक स्वातंत्र्यावर आक्रमण होण्याचे देखील भय वाटत होते. अखेर त्यांच्या समाधानासाठी मेक्सिको सरकारला विधानसभेत ॲग्लो अमेरिकन लोकांचे प्रतिनिधींची संख्या वाढवावी लागली. अशा सर्व बाबींचा विचार करता टेक्सासच्या सरकारवर प्रचंड दबाव निर्माण करण्याइतकी लोकसंख्या ॲग्लो अमेरिकन लोकांची टेक्सासमध्ये झालेली होती. टेक्सास ज्या नव्याने स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळालेल्या मेक्सिकोचा प्रांत होता. तो मेक्सिको देश म्हणून सुस्थिर होऊ शकलेला नव्हता. उलट तो अधिकाधिक अस्थिर आणि उजाड होत चाललेला होता.

स्वातंत्र्याची अस्वस्थ पहाट

स्पॅनिश राजवटीतून मुक्त झाल्यानंतर मेक्सिकोचे लष्करी व राजकीय सामर्थ्य क्षीण झाले होते. उत्तर मेक्सिको हा त्याचा भाग देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या जवळपास अर्धा होता. कोमाची,अपाची आणि नेव्हाहो हया रेडइंडियन जमातीचे लोक हया भागात मोठया प्रमाणात होते. मेक्सिकोच्या दुर्बल परिस्थितीचा लाभ यापैकी कोमाची जमातीने मोठया प्रमाणात उठवला. मुळचे स्पॅनिश असलेल्या मेक्सिकन शेतक-यांवर त्यांनी हल्ले करण्यास सुरवात केली. अचानक हल्ला करून मेक्सिकन लोकांची लूटमार करणे. तसेच त्यांची पशुधन पळवून नेणे. पळवून आणलेल्या गुरढोरांची अमेरिका व टेक्सासमध्ये विक्री करणे. असे प्रकार कोमाची आणि काही प्रमाणता अपाची जमातीने मोठया प्रमाणात सुरू केले. सर्वार्थाने दुर्बल असलेले मेक्सिको प्रशासन या परिस्थितीला हाताळू शकण्यास असमर्थ ठरले होते. कोमाची व अपाची जमातींना अमेरिकेची फूस व सहकार्य असावे. असा दाट संशय मेक्सिको प्रशासनला होता.

रेड इंडियन जमातींच्या उपद्रवामुळे उत्तर मेक्सिको हतबल,हताश व उजाड झाला होता. हया हल्ल्यांमध्ये हजारो मेक्सिकन लोकांना प्राण गमवावे लागले. जे लोक वाचले ते मानसिक दृष्टया इतके खचले होते की पुढे ‘अमेरिका-मेक्सिको’ युद्धात जेंव्हा अमेरिकन फौजा हया भागात शिरल्या तेंव्हा त्यांना कोणताच विरोध करण्याचे बळ या लोकांमध्ये शिल्लक राहिले नाही. अत्यंत सहजपणे उत्तर मेक्सिको अमेरिकेच्या ताब्यात आला. टेक्सासमधील मेक्सिकन आणि ॲग्लो अमेरिकन यांच्यात वैमनस्य वाढत गेले. हा संघर्ष इतका पेटला की १९३५ साली टेक्सासमध्ये उठाव झाला. १८३७ सालच्या दरम्यान टेक्सासमध्ये मेक्सिकोपासून स्वतंत्र होण्याचे वारे अधिक वेगाने वाहू लागले. तेथे वाढलेल्या ॲग्लो अमेरिकन लोकसंख्येमुळे असे झाले. तसेच त्यांच्या हया प्रयत्नांना आतून अमेरिकेची मदत मिळाली होती. यावेळी लोकप्रिय सेनानायक आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले ॲड्रयू जॅक्सन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी अमेरिकन राजकारणात द्विपक्षीय पद्धत रूजवण्यासाठी मोठे योगदान दिले होते.

संविधान हाच धर्म

तसेच न्यू ऑर्लिन्स लढाई आणि रेड स्टिक मुस्कोगी टोळयांविरूद्ध झालेली टॅलापूसा नदीच्या लढाईत अमेरिकी फौजांचे यशस्वी नेतृत्व केले होते. अशा जॅक्सन यांनी जॉन ॲडम्स यांच्याप्रमाणेच मेक्सिकोकडून टेक्सास विकत घेण्याची तयारी दर्शवली होती. ॲडम्स यांचाप्रमाणे त्यांना देखील यामध्ये यश आले ना.ही १९३५ साली मेक्सिकोपासून स्वातंत्र्यासाठी टेक्सासमधील ॲग्लो अमेरिकन लोकांनी केलेला उठाव मेक्सिकन सरकारने अत्यंत कठोरपणे चिरडून टाकला होता. असे असले तरी उठाव क्षमल्यानंतर जॅक्सन यांनी आपला एक परममित्र व विश्वासू सहकारी सॅम हयूस्टन याला टेक्सासला पाठवले. त्याने तेथील ॲग्लो अमेरिकन लोकांना सर्वोतोपरी सहाकार्य केले. त्यामुळे मेक्सिकन सरकारविरुद्धच्या बंडाने १९३७ साली पुन्हा डोकं वर काढले.

एवढेच नाही तर तत्कालीन मेक्सिकन राष्ट्रपतीला ॲग्लो अमेरिकन लोकांनी बंदी बनवले. यामुळे टेक्सासला एक स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याखेरीज मेक्सिकोसमोर पर्याय उरला नाही. हया संधीचा लाभ घेत जॅक्सन यांनी आपल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या अखेरच्या महिन्यात म्हणजे मार्च १८३७ ला स्वतंत्र देश म्हणून टेक्सासला त्वरीत मान्यता दिली. मात्र टेक्सासच्या जनतेला स्वतंत्र देश म्हणून न राहता संयुक्त राज्य अमेरिकेत आपले विलिनीकरण व्हावे असे वाटत होते. जॅक्सन यांचा कार्यकाळ आता संपला होता.

आम्ही संयुक्त राज्यांचे साधारण लोक..

संकल्प आणि त्यासाठी आवश्यक साहस असलेल्या जॅक्सन यांच्यानंतर टेक्सासचा विषय अमेरिकेने काही काळ बाजूला ठेवला. यावेळी अमेरिका आर्थिक संकटाशी सामना करत होता. त्यामुळे टेक्साससाठी मेक्सिकोशी उघड वैर घेणे त्याला परवडणारे नव्हते. टेक्सास स्वतंत्र होऊन देखील त्याची अस्वस्थता संपलेली नव्हती. अमेरिकेत विलिन होण्याचे प्रयत्न थांबलेले नव्हते. अखेर १८४५ साली टेक्सास संयुक्त राज्य अमेरिकेचे एक राज्य म्हणून अमेरिकेत विलिन करण्यात आले. टेक्सासच्या विलिनीकरणामुळे अमेरिका-मेक्सिको युद्धाला तोंड फुटले. या युद्धामुळे उत्तर अमेरिका खंडाचा इतिहास,भूगोल आणि राजकारण बदलणार होते. एवढेच नव्हे तर अमेरिकेतील गृह युद्धाची नांदी देखील होणार होती.

– प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६

(लेखक धर्म,इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *