Thursday, April 25, 2024
Homeब्लॉगनीग्रो चोखामेळा

नीग्रो चोखामेळा

मिसिसिपी नदीच्या प्रवाहातून एक वाफेची बोट पाण्याला कापत चाललेली असते. बोटीवर काही नीग्रो गुलाम न्यू ऑर्लिन्सला विक्रीसाठी चालवले असतात. दक्षिण अमेरिकेतील गुलामांच्या बाजारात हया मालाची विक्री होणार असते. मिस्टर हेली नावाचा काळया नीग्रोंचा ‘गोरा’ व्यापारी हा माल बोटीवर लादून चाललेला असतो. त्यातील एक गुलाम बोटीमधून मिसिसिपीच्या पाण्याकडे पाहत असतो.

अमेरिकेतील केंटकी भागातील आर्थर शेल्बी आणि त्याची पत्नी एमिली शेल्बी हया शेतकरी जोडप्याकडे अनेक वर्ष गुलाम म्हणून त्याने काम केलेले असते. आर्थिक अडचणीत आलेल्या त्याच्या मालक जोडप्याने अत्यंत जड अंतःकरणाने आपले दोन गुलाम विकण्याचा निर्णय घेतलेला असतो. विक्रीसाठी निश्चित करण्यात आलेल्या दोघांपैकी हा एक. त्याच्या पत्नी आणि मुलांपासून तो आता कायमचा तोडला जाणार हया विचाराने तो अस्वस्थ होण्याच्या पलिकडे काहीही करू शकत नसतो. गुलाम नीग्रो परिवाराची एकदा झालेली ताटातूट म्हणजे आयुष्यभराचा वियोग. याची कल्पना प्रत्येक नीग्रो गुलामाप्रमाणेच त्याला ही होतीच.

- Advertisement -

स्वातंत्र्याची अस्वस्थ पहाट

त्याचे मालक असलेले ऑर्थर आणि एमिली शेल्बी हे जोडपे गोरे असले तरी मानवतावादी असते. हा नीग्रो त्यांचा गुलाम नसून त्यांच्या कुटुंबाचा सद्स्यच असतो. त्याला विक्रिला नेतांना पाहणे ऑर्थर व एमिलीच्या मुलगा जॉर्जला सहन होत नाही. विक्रिला जाणारा गुलाम माणूस वयाने मोठा असला तरी त्याचा मित्र आणि मार्गदर्शक असतो. त्याच्या राहण्याच्या खोलीकडे म्हणजेच केबिनकडे पाहून जॉर्ज अधिकच अस्वस्थ होतो. बोटीवर स्वकियांच्या विरहाने अस्वस्थ झालेला, ह्या नीग्रो गुलामाला अचानक एक छोटी गोरी मुलगी भेटते.

तिचे नाव ‘ईवा’ असते. त्या दोघांची लवकरच गट्टी जमते. एके दिवशी ईवा बोटीवरून पाण्यात पडतांना त्याला दिसते. तो जीवाची पर्वा न करता मिसिसिपीच्या खोल-अथांग पाण्यात उडी घेतो आणि ईवाला वाचवतो. ईवाचे वडिल ऑगस्टिन सेंट क्लेअर हे हया नीग्रो गुलामाविषयी कृतज्ञ असतात. ईवा आपल्या वडिलांना त्याला विकत घेण्यास सांगते. तिचे वडिल त्याला विकत घेतात आणि न्यू ऑर्लिन्सला आपल्या घरी घेऊन जातात. ऑगस्टिन सेंट क्लेअर त्याला गुलाम म्हणून न राबवत नाही. ऑगस्टिन हा एक अत्यंत धार्मिक;परंतु सुधारणावादी माणूस असतो. दास्यप्रथेला विरोध करणारा असतो ईवा आणि हा नीग्रो गुलाम येशू ख्रिस्तांवर असीम श्रद्धा ठेवणारे असतात.

संविधान हाच धर्म

येशूच्या ‘प्रेम’ आणि ‘क्षमा’ याविषयीचा दिव्य संदेश त्या दोघांना जोडणारा मजबूत धागा ठरतो. दोन वर्षांच्या सहवासात हा नीग्रो गुलाम ऑगस्टिन सेंट क्लेअर यांना देवदूत तर ईवाला देवदूताची मुलगी समजू लागतो. ईवाचा गंभीर आजाराने अकाली मृत्यू होतो. त्यावेळी तिच्याकडील सर्व नीग्रो गुलामांकडून ती येशूच्या मार्ग अवलंबण्याचे वचन घेते. जेणे करून मृत्यूनंतर प्रत्येकाची एकमेकाशी स्वर्गात भेट होऊ शकेल. ईवाच्या मृत्यूनंतर ऑगस्टिन त्या नीग्रो गुलामाला बायबलची शिकवण देतात. काही काळानंतर ऑगस्टिन सेंट क्लेअर यांची हत्या होते. त्याची स्वार्थी पत्नी नीग्रोंच्या गुलामीविरोधातील त्याच्या महान तत्त्वांचा त्याग करत, हया नीग्रो गुलामाला लुसियिनामधील ‘सायमन लेग्री’ नावाच्या क्रूर व दुष्ट गो-या जमिनदाराला विकते.

लेग्री हा एकप्रकारचा शैतानच असतो. गुलामांचा ईश्वरावरील विश्वास नष्ट होण्यासाठी तो त्यांना अतोनात यातना देतो. लेग्री आपल्याकडील गुलामांकडून लैंगिक गुलामी देखील करुन घेत असतो. पशुंप्रमाणे त्यांच्याकडून प्रजोत्पादन करुन त्या मुलांची गुलाम म्हणून विक्री करणे, हा लेग्रीचा साईड बिझनेस असतो. हा नीग्रो गुलाम त्याच्या अत्याचार सहन करत, इतर गुलामांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतो. कारण तो आता एक सच्चा ख्रिश्चन झालेला असतो. परमेश्वर आपल्याला एक दिवस निश्चितच असल्या मरणप्राय यातनांमधून सोडवेल. असा विश्वास त्यांच्यामध्ये पेरत असतो. लेग्रीच्या लैंगिक अत्याचा-याचा बळी ठरलेल्या आणि दोन अपत्य झालेल्या कॅसी नावाच्या गुलाम नीग्रो स्त्रीची हया नीग्रो गुलामाची भेट होते.

आम्ही संयुक्त राज्यांचे साधारण लोक..

लेग्रीने कॅसीला झालेली एक मुलगी व एक मुलगा यांना विकले होते. तिस-या वेळेला मात्र आपल्या अपत्यापासून आपल्याला वेगळे केले जाणार, हया वेदनेने ही माताच आपला गर्भपात करुन घेते. एमली हा एक दुसरा पुरुष नीग्रो गुलाम असतो. ज्याला लेग्रीने लैंगिक गुलाम म्हणून वापरलेले असते. हया दोघांची भेट झाल्यानंतर हा नीग्रो गुलाम त्यांची सुटका करण्याचा निश्चय करतो. कॅसी व एमली त्याच्या मदतीने पळून जातात. ही गोष्ट लेग्रीला कळल्यानंतर तो त्याच्या मळयातील सुपरवायझरांना हया नीग्रो गुलामाला मारण्याचा आदेश देतो. त्यांच्या क्रूर मारहाणीमुळे मरत असलेला, हा गुलाम सुपरवायझर व लेग्रीला क्षमा करतो.

हा नीग्रो गुलाम मरत असतांनाच जॉर्ज शेल्बी त्याला गुलामीतून मुक्त करण्यासाठी तेथे पोहचतो. त्यांची भेट होते; परंतु ती अखेरची ठरते. कॅसी आणि एमेली पळून जात असतांना त्यांना बोटीवर त्यांना जॉर्ज शेल्बीकडे असलेली दासी एलिझाचा पती जॉर्ज हॅरिस भेटतो. गोरा पिता आणि नीग्रो माता यांच्या वर्णसंकरातून झालेल्या जॉर्ज हॅरिसमुळे कॅसीला कळते की एलिझा तिची मुलगी आहे. हे सर्वजण एकमेकांना भेटतात फ्रांसमार्गे हे लोक पश्चिम आफ्रिकेतील ‘लाईबेरिये’ देशात पोहचतात आणि तेथे स्थायिक होतात. जॉर्ज शेल्बी आपल्या मित्राला व मार्गदशर्काला गमावण्याचे दुःख मनात घेऊन केंटकीच्या आपल्या मळयात परततो.

अखेर नदीचे पाणी पेटले..

त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तो त्याच्या सर्व गुलामांना मुक्त करतो. आपल्या म्हाता-या मित्राच्या व मार्गदर्शकाच्या खोलीकडे म्हणजेच केबिनकडे पाहिल्यानंतर त्याला त्याच्या बलिदानाची आठवण होते. अखेर तो त्याच्याप्रमाणेच धार्मिक जीवन जगण्याचा निर्णय घेतो. हया नीग्रो गुलामाचे नाव असते टॉम आणि त्याच्या केबिनला अंकल टॉमची केबिन म्हणून जॉर्ज संबोधत असतो. ही अंकल टॉमची केबिन जॉर्जला कायम मानवता,प्रेम,त्याग,श्रद्धा,क्षमा इत्यादी जीवनातील उच्च मूल्यांची प्रेरणा देत राहते.

अमेरिकन लेखिका हॅरिएट बीचर स्टोव यांच्या ‘अंकल टॉम्स केबिन’ हया १८५२ मध्ये दोन खंडांमध्ये प्रकाशित कादंबरीचे हे कथानक होते. अंकल टॉम हा नीग्रो गुलाम हया कादंबरीचा नायक आणि नीग्रो गुलामाला नायक म्हणून सादर करणारी ही जगातील पहिली कादंबरी. १९ व्या शतकातील बायबलनंतर विकले जाणारे दुस-या क्रमांकाचे बेस्ट सेलिंग पुस्तक म्हणून हया कादंबरीचा उल्लेख केला जातो. लेखिका हॅरिएट बीचर स्टोव हया ब्रिटिश मुळच्या अमेरिकन शिक्षिकेने लिहिलेल्या या कादंबरीने जगाच्या इतिहासात नीग्रो दास्यमुक्तीचे एक नवे पर्व प्रारंभ झाले. असे म्हंटले जाते की हया कादंबरीचा अमेरिकेतील नीग्रो लोकांवर सखोल प्रभाव पडला. त्यांना अमानुष गुलामीच्या बेडया तोडण्याची प्रेरणा मिळाली.

कॅलिफोर्निया गोल्ड रश

सुधारणावादी अमेरिकन गो-या लोकांनाच नव्हे, तर युरोपातील सुधारणावादी गो-यांना देखील हया कादंबरीमुळे गो-यांच्या अमानुषतेची जाणीव झाली. ५ जून १८५१ साली ‘द नॅशनल ऐरा’ हया सुधारणावदी नियतकालिकात ४० भागांची साप्ताहिक मालिका म्हणून ‘अंकल टॉम्स केबिन’ कादंबरी प्रसिद्ध झाली. हया मालिकेचा एका आठवडयाचा भाग काही कारणामुळे स्टोव यांना देता आला नाही. त्यावेळी असंख्य वाचकांनी पत्रांद्वारे आपली नाराजी नियतकालिकाच्या संपादकांना कळवली. या प्रसंगामुळे हया मालिकेची लोकप्रियता हॅरिएट बीचर स्टोव यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी हया कथानकात योग्य ती भर घालून १८५२ साली ही कादंबरी दोन खंडात प्रसिद्ध केली.

नीग्रो दास्यामुक्तीच्या कारणावरून पेटलेल्या अमेरिकन सिव्हिल वॉरला देखील ही कादंबरी कारणीभूत ठरली. कादंबरीचा स्वतःवरील प्रभाव आणि हॅरिएट बीचर स्टोव यांच्या लेखनाचे महत्व सांगतांना अमेरिकन नीग्रो मुक्तीचे अग्रदूत अब्राहम लिंकन म्हणाले होते की, “हया छोटया वयाच्या महिलेमुळे हया महान युद्धाची सुरवात झाली.” हया कादंबरीचे कथानक संक्षिप्त रूपात पाहिले तरी नीग्रोंच्या अमानुष छळाची आणि गो-यांच्या क्रौर्याची कल्पना येते. एक कादंबरी अमेरिकन सिव्हिल वॉरला कारणीभूत ठरते आणि अब्राहम लिंकन यांच्यासारखा महान नेता या कादंबरीने प्रभावीत होतो. हे वास्तवाला भिडण्याचे लेखिकेने दाखवलेल्या असीम धैर्याचे प्रतिकच म्हणावे लागेल.

गो-यांचा इतिहासातील काळा अध्याय

हया गो-या लेखिकेमुळे ख-या अर्थाने ‘ब्लॅक लिटरेचर’ ची मुहूर्तमेढ रोवली गेली असे म्हणणे वावगे ठरणार नाही. १८५२ सालात एक महिला अमेरिकन समाजाची अर्थव्यवस्था ज्या नीग्रों गुलामांच्या मानगुटीवर उभी होती, त्या अमेरिकन समाजाची शोषक प्रवृत्ती जगासमोर आणण्याचे धाडस दाखवते, ही खूपच मोठी गोष्ट आहे. अन्यथा परिसंवादात साहित्यिकांनी व्यवस्थेला प्रश्न विचारायला हवेत !वास्तवाला भिडायला हवे ! असे राणा भीमदेवी थाटात गर्जना करणारे ‘साहित्यकेसरी’ पद-पुरस्कारांसाठी याचक म्हणून कोणाच्या दारात उभे असतात,हे आपण याची देही याची डोळा अनुभवतो.

अंकल टॉम्स केबिनमधील सर्व पात्रे लेखिका हॅरिएट बीचर स्टोव यांनी त्यांच्या भोवतालच्या लोकांवरूनच घेतलेली आहेत. अंकल टॉम्स हा नीग्रोंमधील संतशिरोमणी चोखामेळांसारखा जाणवल्याशिवाय राहत नाही. कादंबरीत येशू ख्रिस्तांच्या संदेशावर अढळ श्रद्धा असलेला टॉम नकळतपणे ‘याती हीन मी देवा । कैसी घडो तुझी सेवा।’ असा सवाल करणा-या चोखोबांच्या जातकुळीचा वाटल्याशिवाय राहत नाही. आज चोखोबांनी प्रस्थापित धर्मश्रद्धेचे पालन केले किंवा महान विद्रोह केला नाही. असे म्हणणारे विद्वान आपल्या आसपास भरपूर दिसतात हेच लोक आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे अभेद्य कवच लाभले असतांनाही आपण काय करतोय ? हा प्रश्न मात्र स्वतःला विचारणार नाहीत.

विमुक्त नंदनवनातील नरक

आजचे काही ब्लॅक लिटरेचरवाले अंकल टॉमचे मूल्यमापन अशाच पद्धतीने करण्याची चूक करत असतील. मात्र पंढरपूरला संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी महाराष्ट्रातील पहिल्या आरक्षणासाठी झगडा दिला आणि चोखोबांना पांडुरंगाच्या मंदिराच्या शेवटच्या पायरीवर अखेरचा विसावा मिळाला. आज अखेरच्या पायरीवरील चोखोबांची समाधी श्रेष्ठत्व जन्मावर नव्हे तर विचार आणि कर्मावर आधारित असते, याचा संदेश देत उभी असलेली दिसते. तसेच तिच्याकडे बघून अंतरबाहय पांडुरंगमय झालेल्या चोखोबांना आयुष्यभर त्याचे दर्शन का होऊ शकले नाही? हा विचार देखील मनाला अस्वस्थ करुन जातो.

अंकल टॉमचे जीवन रंगवतांना हॅरिएट बीचर स्टोव यांनी ख्रिश्चन म्हणून येशू ख्रिस्तांनी दिलेल्या तत्त्वावर चालत असल्याचे अवडंबर करणा-या गो-यांना हाच सवाल केलेला दिसतो. ज्याप्रमाणे एखादा शहाणा चोखोबांनी विद्रोह केला नाही,त्यामुळे त्यांच्या काव्याला विद्रोही साहित्यातून बेदखल करू शकतो. त्याचप्रमाणे एखादा शहाणा अंकल टॉमने अशी कोणती कांती केली, असे म्हणून अंकल टॉम्स केबिन कादंबरीला ब्लॅक लिटरेचरचा आरंभ बिंदू म्हणून नकार देऊ शकतो. तरी पण १३ व्या शतकातील चोखोबा आणि १९ व्या शतकातील अंकल टॉम हे विद्रोहाचे आद्य उद्घोषच आहेत. त्यामुळेच आजही चोखोबांच्या समाधीजवळ अंकल टॉम बसलेला दिसेल आणि अंकल टॉम्सच्या केबिनमधून चोखोबा डोकावतांना दिसतील.

प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६

(लेखक धर्म,इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -

ताज्या बातम्या