"आखाजीना सन, नका परतावा मुराई।

"आखाजीना सन, नका परतावा मुराई।

अनिल पाटील
वेले.
Vele ता. चोपडा ( वार्ताहर )


"आखाजीना सन, नका परतावा मुराई।
बहिनीना बिगर, भाऊ किलावना जाई।।
आखाजीले वाट दखस मायबाई।
झोका खेयु, खेयु गवराई।.....


अशी आहिराणी गाण्याची मनाला आठवण करुण देणारा सण म्हणजे अक्षय तृतीया ( आखाजी ) अक्षय तृतीया ( आखाजी ) सण खान्देशात नवचैत्यनं निर्माण करणारा, तसेच शेतकरी आणि नव्यानेच लग्न झालेल्या सासरवाशी सुवासिनींना माहेरची ओढ लावणारा सण म्हणुन ओळखला जातो. परंतु यंदा कोरोनाची भीती जवळपास संपल्याने अक्षय तृतीया उत्सवाला आनंदाचे उधाण आले आहे. कोरोनाच्या सावटामूळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या झुलयाच्या गाठीं उलगडल्या जाणार आहेत. त्यामुळे यंदा माहेरवाशीनिंना ही झुल्याचे हिंदोळे घेण्याचा मुक्त आणि मनमुराद आनंद लाभणार आहे.

पूर्वी आखाजी येण्याच्या १५ ते २० दिवस आधी गावागावात करमणूक म्हणून पत्यांचे डाव रंगत असत. मात्र आता तरी तसे चित्र दिसत नाही. फक्त आखाजीच्या एक दोन दिवशीच पत्ते करमणूक म्हणून खेळले जातात.
अक्षय तृतीयेला पुर्वजांचे स्मरण व्हावे म्हणुन घागर ( करा) भरण्याचा विधी आजही खान्देशात घरोघरी केला जातो. आखाजीला प्रत्येक मराठी माणसाच्या घरात ही पुजा केली जाते. नव्या मातीच्या लाल घागरीत या वर्षात मृत पुर्वजांचे स्मरण करुन पाणी भरणे व त्यावर डांगर, सांजोरी ( साखरपेटी ) ठेवण्याची प्रथा आहे. घागरी जवळ पुरणपोळी व आब्यांच्या रसाचा नैवेद्य ठेवला जातो .यालाच आखाजीची घागर फुंकणे किंवा अहिराणी भाषेत डेरगं भरणे असे म्हटले जाते .ही परंपरा आजही खान्देशात कायम आहे.

आखाजीला समाजातील एका व्यक्तीला भोजनासाठी आमंत्रित केले जाते .त्यांना पितर असे संबोधले जाते. आपले वाडवडील जे वैकुंठात गेलेले आहेत त्यांचे स्मरण करून त्यांना नैवेदय दाखवुन त्या पित्तरांची देखील पुजा करुन त्यांना गोडधोड जेवण दिले जाते.
या पितरांच्या जेवणानंतरच घरातील इतर व्यक्ती परीवारासह जेवण करतात. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते. म्हणून हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो.

या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ 'अक्षय' (न संपणारे) असे मिळते, असा समज आज ही ग्रामीण भागात आहे. तसेच या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही म्हणून हिला ‘अक्षय तृतीया’ असे म्हटले आहे.

सुवासिनींना माहेरची ओढ

अक्षय तृतीया सणाला नवीन लग्न झालेल्या सुवासींनीना आपल्या माहेरची ओढ लागलेली असते, आणि त्या आपल्या लाडक्या भाऊरायाची वाट पहात असतात, तसेच ह्या सुवासिनी माहेरी आल्यावर आपल्या सर्व मैत्रिणी एकत्र येऊन उंच झोका बांधुन त्यावर खेळ खेळुन आहिराणी भाषेतील " आथानी कैरी, तथानी कैरी, कैरी झोका खाय व , कैरी तुट नी खडक फुटना, झुय झुय पाणी वाय वं" अशी प्रसिद्ध गाणे म्हणत असतात. आणि आखाजी सणाचा आनंद लुटत असतात, आपल्या मुलीला सासरी वाटी लावत असताना आई वडील मुलीला,नातवंडे यांना नवीन कपडे, जावयाला देखील कपडे घेत असतात,

नवीन सालगड्याचा शोध

अक्षय तुतिया आली म्हणजे शेतीसाठी सालदार शोधण्या साठी पारंपारीकता आहे. म्हणून कामसू व प्रामाणिक गड़ी फार पूर्वी सालदारक़ी करण्यास उत्सुक असे.सालदाराला ही चांगला मालक व मालकाला चांगला सालदार मिळावा म्हणून दोन्ही बाजू कसोशीने प्रयत्न केला जात असे .परंतु आता सालगडी सालदार म्हणून काम करण्यास इच्छुक नसल्याने शेतकऱ्यास सालदार शोधून काढ़ने जिकरीचे झाले आहे. शेतकरी नवीन सालगड्याच्या शोधात असतात, मात्र क्वचित सालगडी सालाने लागतात जास्त करुण दैनंदिन मजुरी करणे मजुरवर्ग पसंत करत आहे.

भारतीय पंचांगामध्ये दसरा दिवाळीप्रमाणेच अक्षयतृतीया महत्त्वाची मानली जाते. ग्रामीण भागात आजही या दिवशी वर्षभराचे सर्व शेती कामाचे करार ग्रामीण भागात करण्याची प्रथा आहे. सालदार, शेतगडी, गहाणखत खान्देशात या दिवशी केले जाते. अनेक घरात तर केवळ अक्षय तृतीयेपासूनच आंबे खायला सुरुवात होते.

झोक्याच्या दोरीच्या गाठी उलगडणार

सासरी आलेली माहेरवाशीन परिसरातील झाडाला वा घराच्या प्रवेशद्वारावर झोका बांधुन " आथानी कैरी तथानी कैरी,कैरी झोका खायव, कैरी झोका खाय तठे कसाना बजार व " असे म्हणत आईच्या कुशीतील आठवणींना मन मोकळे करित संसाराच्या गाड्यात खडतर प्रवासातुन वाटचाल करित सुखाचा शोध ती घेत असते. या सणासुदीत महिला ही आपल्या आईवडीलांच्या सानिध्यात मन मोकळे करित आनंदी आनंद गडे,जिकडे - तिकडे चोहीकडेचा आनंद द्विगुणित करते. क्षणभर संसारिक दु:ख विसरुन झोक्यात रमणारी माहेरवशींच्या आनंदाला उधाण येणार आहे. झोक्याच्या दोरीला कोरोनाचे ग्रहनातून या वर्षी मुक्ती मिळणार असल्याने माहेरवशींनीनचा आनंद द्विगुणित होणार आहे.
एकंदरीत: कोरोनाचा हाहाकार संपल्याने समाजातील सर्वच घटकांची अक्षय तृतीया अक्षय आनंद घेऊन येणार आहे

Related Stories

No stories found.