मी उन्हाने पांढरा झालो का?

धंदा-पाणी करणं वाटतं तेवढं सोपं नाही. पण म्हणून व्यवसाय करायचाच नाही असं पण नाही.
मी उन्हाने पांढरा झालो का?

साहेबराव: राम राम महादबा! काय आज कसं काय वाट चुकलात ?आणि हे काय आज चक्क बाळूला घेऊन आलास.

महादबा : राम राम साहेबराव. राम राम! काय नाही हो. आलो असाच. म्हटलं तुमच्याशी थोडं बोलावं .कसं तुम्ही चार बुकं शिकलेली माणसं. आपल्या गावात नावलौकिक हाय तुमचा.

साहेबराव : या या बसा .तसाही आता कोरोनामुळे मीही थोडा मोकळाच आहे म्हणा. आणि बरेच दिवस झाले निवांत असं बसण-बोलणं पण नाही झालं. बरं झालं तुम्ही आलात. छान वाटलं बघा. अग ऐकलं का? महादबा आलाय. जरा चहा टाक बघू.

महादबा: चहाबिहा काय बी नको. आपण इथ ओसरीवरच बसू. सध्या करोनामुळे कुठे काय जाणं नाय की कुठं काय खाण नाय.

साहेबराव: अरे हो! मी कुठे काय तुला खाण्याचा आग्रह करतोय. इथेच बसू बाहेर. खुर्च्या पण लांब लांब ठेऊ. आपण तोंडाला उपरणे पण बांधले आहेतच की. गप्पा मारता मारता थोडासा चहा घेऊ ऐवढच. बाकी तुमच्याकडे कोरोना काय म्हणतो?

महादबा: काय नाही हो? दररोज वेगवेगळ्या बातम्या ऐकायला मिळतात. कोण म्हणतोय कोरोना याच्यामुळे पसरतोय कोण म्हणतो त्याच्यामुळे पसरतोय. काही कळना झाल बघा .

साहेबराव : काही घाबरायचं नाही हो. सरकारने सांगितलेले सगळे नियम पाळायचे. गरज असेल तरच घराच्या बाहेर पडायचं. नाही तर आपलं घरच आणि शेतीचे काम चालू द्यायच. कोरोना सारखे अनेक महाभयंकर आजार तुम्ही

तुमच्या लहानपणी पाहिले नाहीत का? काय झालं, माणसाने काढलाच ना काहीतरी मार्ग. मग कोरोनाच काय ?हा काय कायमस्वरूपी थोडाच राहणार. याच्यावर पण काहीतरी उपाय येईलच की.

महादबा: हो. ते बी खरंच हाय म्हणा.

जना : हा घ्या चहा. कसे आहात काका? घरचे सर्व बरे आहेत ना?

महादबा: हो हो सगळे खुशाल आहेती. तुम्ही खुशाल आहे ना?

जना : हो हो !

साहेबराव: बर, बोला आता. काय काम काढलं म्हणायचं?

महादबा: त्याचं काय झालं साहेबराव, आमच्या बाळूच आता शिक्षण पूर्ण झालंया. म्हटलं कुठं नोकरी करीन आणि चार पैसे कमविल आणि नाहीच लागली नोकरी तर मग शेतात मदत करील. पण काय, त्याच्या डोक्यात खूळ भरलंया. म्हणतो काहीतरी धंदा-पाणी करायचा. आता मला सांगा, मी काय उन्हानी पांढरा झालो व्हय? धंदा-पाणी आपल्यासारख्या शेतकरी माणसाला जमणार हाय व्हय? पण, ऐकायलाच तयार नाही. म्हणून त्याला घेऊन तडक तुमच्याकडे आलो बघा. तुम्ही आपल्या गावातलं जुन जाणत् माणूस. ज्या काळात मुलं शाळेच नाव घेत नव्हते, त्या काळात तुम्ही शिकला. जेंव्हा अनेक नोकर्‍या होत्या तेव्हा तुम्ही नोकरी न करता आपला व्यवसाय सुरू केला आणि आज आपल्या अख्ख्या जिल्ह्यात तुमचं नाव हाय बघा. म्हणून आणला बाळूला तुमच्याकडे. साहेबराव: महादबा तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे बघा. तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप कष्ट केले. अनेक उन्हाळे- पावसाळे झेलले आणि अगदी गरीब परिस्थिती असतांना देखील मुलांना शिकविल. पण, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तुमच्या आजोबांना 100 एकर जमीन होती. तुमचे वडील आणि चुलते मिळून पाच जण भाऊ. प्रत्येकाला 20 -20 एकर जमीन आली. आता तुम्ही चौघेजण भाऊ. तुम्हाला 5-5 एकर जमीन आली. आता तुमचे बाळासाहेब आणि तुकाराम हे दोन मुलं. त्यांना अडीच- अडीच एकर जमीन येणार. आता मला सांगा त्यांच्या मुलांना किती जमीन येणार? आणि त्या एवढ्याशा जमिनीत पिकवायचं कुठं? राहायचं कुठं? आणि तेवढ्या जमिनीत त्यांचं भागणार आहे का? याचा विचार आपण मोठ्यांनी नको का करायला? आपल्या डोळ्यादेखत शंभर एकरांची जमीन दोन-अडीच एकरांवर आली की नाही?

महादबा: हो! याचा तर मी इच्यारच नाही केला .तुम्ही म्हणता ते अगदी खरं हाय बघा .मला पटतया.

साहेबराव :हो मी तेच सांगतोय की, आपल्या स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी संभाजीराजांना वयाच्या आठव्या वर्षापासूनच स्वराज्याचे धडे द्यायला सुरुवात केली. आणि आपण काय करतोय? आपली मुलं तीस- तीस वर्षाची झाली तरी आईवडिलांवर अवलंबून . अशाने ते जबाबदार माणूस म्हणून कसे उभे राहणार? त्यांना पडूद्याना समाजात. थोडे दिवस ठेचकळतील, धडपडतील पण एकदा का उभे राहिले म्हणजे ते स्वतःच्या हिम्मतीवर उभे राहतील. आपल्या आडोशाला किती दिवस ठेवणार? काय बाळासाहेब पटतंय का?

बाळासाहेब: हो ! पटतय मला. पण तात्याला वाटतं मला धंदा-पाणी जमायचा नाही .

साहेबराव : अरे, महादबा म्हणतो ते पण खरंच आहे. कारण धंदा-पाणी करणं वाटतं तेवढं सोपं नाही.हो पण म्हणून व्यवसाय करायचाच नाही असं पण नाही बर का? पण व्यवसाय करतांना डायरेक्ट व्यवसाय सुरू नाही करायचा. अगोदर आपल्याला जो व्यवसाय करावासा वाटतो त्या व्यवसायाचा बारीक अभ्यास करायचा. तो व्यवसाय करणार्‍यांचे अनुभव ऐकायचे .आणि मी तर म्हणेल तुला जो व्यवसाय करायचा आहे तो व्यवसाय करणाराकडे तू अगोदर चार-दोन वर्ष स्वतः काम कर. तुझ्यातली कार्यक्षमता, तुझा आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता यांची तूच परीक्षा घे. त्या व्यवसायातल्या बारीक-सारीक गोष्टी अगदी वेड्यासारख्या शिकून घे. व्यवसाय स्वतःच्या हिम्मतीवर उभा करायचा असतो आणि स्वतःच्या हिम्मतीवरच चालवायचा असतो. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव प्रत्येक व्यवसायात चढ-उतार येतच असतात. संकटांना तोंड देण्याचे मार्ग शोधायचे असतात. त्यांच्याकडे पाठ फिरवायची नसते. आपल्या व्यवसायात भविष्यात काय बदल होऊ घातले आहेत याचा अचूक अंदाज घ्यायला शिकलं पाहिजे. त्यासाठी अनुभवी, प्रामाणिक आणि होतकरू व्यवसायीकांसोबत राहायला शिक आणि बाकी काही काळजी करू नकोस, अडचणी आल्याच तर मी आहेच की .

-प्रा. डॉ. मारुती कुसमुडे

75 880 77 461

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com