Thursday, April 25, 2024
Homeब्लॉगपुन्हा बहरणार !

पुन्हा बहरणार !

कृषी अर्थव्यवस्था…सध्या सर्वांचे लक्ष असलेला प्रांत. ग्रामीण भागाला उभारी देण्यासाठी कृषी व्यवसायाशिवाय पर्याय नाही, हे करोना आणि लॉकडाऊनने स्पष्ट केले. पण पुढे काय? या विषयावर मंथन करण्यासाठी, कृषीक्षेत्रातील आव्हाने आणि संधी यावर भाष्य करण्यासाठी प्रा.डॉ.मारूती कुसमुडे खास सार्वमत-देशदूत डिजिटलच्या वाचकांसाठी ‘शेतीउद्योग’ या ब्लॉग मालिकेतून दर मंगळवारी भेटीला येणार आहेत. आज प्रारंभ. संगमनेर येथील श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करणारे प्रा.डॉ.कुसमुडे यांनी शेती व फायनान्स या विषयात संशोधन केले आहे. यासाठी विद्यापीठाने त्यांना विद्यावाचस्पती पदवी बहाल केली आहे. शेती आणि शेतीचे अर्थशास्त्र या विषयावरील त्यांचे अभ्यासपूर्ण लेखन आपणास नक्कीच आवडेल. तेव्हा प्रतिक्रीया नोंदविण्यास विसरू नका!

– डिजिटल टिम

सध्या संपूर्ण जग हे करोनाशी दोन हात करण्यात गुंतले आहे. 2019 च्या शेवटी चीनमध्ये सुरू झालेली ही महामारी बघता बघता संपूर्ण जगभर पसरली. या महामारीने कमी विकसित, विकसनशील आणि विकसित अशा सर्व प्रकारच्या अर्थव्यवस्थांमध्ये प्रचंड अशा आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक उलथापालथी निर्माण केल्या.

करोना महामारीच्या तडाख्यातून वाचण्याचा अनेक देशांनी प्रयत्न केला. या प्रयत्नांना कमी-अधिक प्रमाणात यश देखील आले. परंतु इटली आणि अमेरिकेसारखे विकसित आणि आरोग्य सुविधांच्या दृष्टिकोनातून पुढारलेले देश सुद्धा या महामारीमुळे हादरून गेले. अशा स्थितीत जगातील आरोग्य सुविधांची कमतरता असलेल्या देशांसमोर लॉकडाऊन चा आधार घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर होणार्‍या दुष्परिणामांचा विचार न करता जगातील अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केले. या लॉकडाऊनचा कालावधी गरजेनुसार टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आला. भारतही त्याला अपवाद ठरला नाही.

- Advertisement -

लॉकडाऊनचा परिणाम इतका विस्तृत प्रमाणात झाला की त्यामुळे शेती, उद्योग आणि व्यवसायासमोर ‘न भूतो न भविष्यती’ अशा प्रकारच्या अडचणी उभ्या राहिल्या. यामध्ये सर्वच क्षेत्रांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. मोठ्या व्यावसायिकांनी आपला उत्पादन खर्च कमी करण्यासाठी अनेकविध मार्गांचा अवलंब केला. यामध्ये मुख्यतः कामगारांची कपात करणे, उत्पादन प्रक्रिया थांबविणे, कच्च्या मालाची खरेदी थांबविणे, पक्क्या मालाची साठवणूक करणे, कामगारांच्या पगारात कपात करणे, बँकांचे कर्जाचे हप्ते स्थगित करणे इत्यादींचा समावेश होतो.

करोना महामारीमुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनचे कारखानदारी आणि सेवा क्षेत्रावर झालेले दुष्परिणाम एका विशिष्ट पातळीपर्यंत नियंत्रित करता आले. कारण ही दोन्हीही क्षेत्रे मानवी नियंत्रणात आहेत. या क्षेत्रातील उत्पादन हे चार भिंतीच्या आत होत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यात मानवाला बर्यापैकी यश मिळते. नफा नाही झाला तरीही किमान तोटा कमीत कमी कसा होईल हे तरी पाहता येते. त्याचबरोबर या दोन्ही क्षेत्रात झालेल्या नुकसानीचे अनुमान योग्य पातळीवर करून घेता येते. कारखानदारांची आणि सेवा क्षेत्रात कार्यरत असणार्‍या व्यावसायिकांच्या मोठ्या संघटना शासनावर दबाव आणण्यात यशस्वी होतात आणि आपले झालेले नुकसान काही प्रमाणात का होईना भरून काढू शकतात.

परंतु करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे शेती आणि संलग्न व्यवसायावर झालेले दुष्परिणाम वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पहावे लागतील .कारण कृषी उत्पादन हे चार भिंतीच्या आत नाही तर खुल्या निसर्गात करावे लागते. पिकांची लागवड झाल्यानंतर उत्पादन कमी करणे ,उत्पादनाची प्रक्रिया थांबविणे किंवा उत्पादनासाठी आवश्यक असणारा खर्च कमी करणे हे शेतकर्‍यांच्या नियंत्रणात नसते. पिकांच्या लागवडी नंतर ते पीक तयार होण्याची नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना उत्पादन खर्च करावाच लागतो.

बहुसंख्य शेतकरी तर उसनवारी करून अथवा कर्ज काढून शेतीचा उत्पादन खर्च करतात. अशा स्थितीत पिकांचे योग्य उत्पादन न झाल्यास किंवा त्या पिकांचा योग्य तो मोबदला न मिळाल्यास शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे या समस्यांमध्ये अधिकच भर पडते. त्याचबरोबर बहुतेक शेतमाल हा नाशवंत स्वरूपाचा असल्यामुळे (उदा. फळे ,भाजीपाला, दूध, अंडी इत्यादी) त्याची फार काळ साठवणूक देखील करता येत नाही. अशा परिस्थितीत कोरोनामुळे बाजारपेठा बंद असल्याने असंख्य शेतकर्‍यांचा शेतमाल अक्षरशः मातीमोल भावात विकावा लागला किंवा शेतातच नष्ट करावा लागला. काही शेतकर्‍यांना तर तो शेतमाल नष्ट करण्यासाठी त्यावर अक्षरशः नांगर फिरवावा लागला. म्हणूनच लॉकडाऊनमुळे शेतकर्‍यांची अपरिमित हानी झाली आहे. हे आपल्याला मान्यच करावे लागेल.

एवढेच नव्हे तर करोनामुळे शेती व्यवसायाचा प्रमुख जोडधंदा असलेला दुग्ध व्यवसाय देखील प्रचंड प्रभावित झाला आहे. एकीकडे पशुखाद्याच्या वाढत असलेल्या किमती आणि दुसरीकडे मागणीअभावी कमी होत गेलेल्या दुधाच्या किमती, या कात्रीत दुग्ध व्यावसायिक सापडलेले आहेत. दुग्धव्यवसायात देखील कारखान्यांप्रमाणे लॉकडाऊन करता येत नाही किंवा थोड्या कालावधीसाठी उत्पादन बंद देखील करता येत नाही. हे उत्पादन सुरूच ठेवावे लागल्यामुळे आणि दुधाच्या घटलेल्या किमतीमुळे शेतकर्‍यांचा तोटा दिवसेंदिवस वाढतच आहे. करोनामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे शासनाच्या तिजोरीवर देखील अपरिमित ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाला देखील शेतकर्‍यांना मदत करताना अनेक मर्यादा निर्माण आल्या आहेत. म्हणूनच शेतकर्‍यांनी खचून न जाता आशावादी राहणे आवश्यक आहे. करोनाची ही स्थिती निघून गेल्यानंतर हळूहळू सर्वच व्यवसाय पूर्वपदावर येतील. यामध्ये कारखान्यांबरोबरच शेती व्यवसाय देखील पूर्वपदावर येईल.

– प्रा.डॉ.मारुती कुसमुडे

- Advertisment -

ताज्या बातम्या