Saturday, April 27, 2024
Homeब्लॉगस्पंदन : दूरदर्शनच्या नवलाईचे दिवस...

स्पंदन : दूरदर्शनच्या नवलाईचे दिवस…

भारतात १५ सप्टेंबर १९५९ या दिवशी दूरदर्शनचं प्रक्षेपण सुरु झालं. या घटनेला यावर्षी ६२ वर्षे पूर्ण झालीत. आपल्या मराठी जनतेसाठी आनंदाची बाब म्हणजे पु.ल. देशपांडे यांना दूरदर्शनचे पहिले संचालक होण्याचा सन्मान मिळाला. पु. ल. आणि शिवेंद्र सिन्हा यांनी पहिला कार्यक्रम दूरदर्शनवर सादर केला. यामध्ये बाहुलीचा खेळ (पपेट शो ), अभिनेत्री-नृत्यांगणा वैजयंती माला यांचं नृत्य आणि भेसळ प्रतिबंधात्मक कारवाईची माहिती या घटकांचा समावेश होता. म्हणजे करमणूक आणि लोकप्रबोधन यांचा मिलाफ यात साधण्यात आला होता. सुरुवातीला दूरदर्शनचं प्रक्षेपण आठवड्यात तीन दिवसचं दिल्लीकरांना बघता येत होतं. मात्र हे पाहायला लोकांकडे टीव्ही सेट नव्हतेच. यासाठी सन १९६५ पर्यंत म्हणजे तब्बल ६ वर्षे वाट पाहायला लागली. काही लोकांच्या मतानुसार हीच खरी दूरदर्शनची सुरुवात म्हटली पाहिजे. दिल्ली इथल्या एकमेव केंद्रापासून सुरु झालेला दूरदर्शनचा हा पसारा आता संपूर्ण देशात व विदेशातही पोहचला आहे. १९७२ मध्ये मुंबई दूरदर्शन सुरू झाल्याने मराठी कार्यक्रमांचा आस्वाद घेता येऊ लागला.

स्पंदन :ओ जानेवाले हो सके तो लौट के आना…

- Advertisement -

१९८२ हे वर्ष आलं नि आपल्या देशात दूरचित्रवाणीच्या विश्वात एक क्रांती घडून आली असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. आतापर्यंत काळ्या-पांढऱ्या रंगात असलेला टीव्ही रंगीत झाला. याचवर्षी भारतात एशियाड क्रीडा स्पर्धा भरवण्यात आल्या. या निमित्ताने दूरदर्शनचे प्रक्षेपण रंगीत व्हावे असं तत्कालीन केंद्र सरकारला वाटलं. तेव्हाच्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी यात पुढाकार घेऊन दूरदर्शनला रंगीत रुपडं बहाल करण्यात महत्वाची भूमिका बजावली. एशियाडच्या निमित्ताने आपल्या देशांत क्रीडा संस्कृती रुजावी आणि तिचं संवर्धन व्हावं अशी अपेक्षा होती. ही अपेक्षा कितपत फलद्रूप झाली याची माहिती नाही पण या निमित्ताने आपल्या देशांतल्या तमाम जनतेला टीव्ही पाहण्याचे वेड लागलं यात शंका नाही.

‘हमलोग’ ही पहिली मालिका

दूरदर्शन या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीवरून प्रक्षेपित होणारी ‘हमलोग’ ही पहिली मालिका (धारावाहिक/ सिरीयल ) ठरली. हिंदीतले नामवंत लेखक मनोहर श्याम जोशी यांनी ही मालिका लिहिली होती. ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. या मालिकेचा पहिला भाग ४ जुलै १९८४ रोजी प्रक्षेपित झाला होता. बुजुर्ग अभिनेता दादामुनी उर्फ अशोककुमार हे या मालिकेचे सूत्रनिवेदक होते. या मालिकेनंतर बुनियाद, यह जो है जिंदगी, रजनी, तमस, दर्पण, द वर्ल्ड धिस वीक, सुरभी, वागले की दुनिया, सर्कस, मालगुडी डेज, तेनाली रामन, चंद्रकांता, व्यंमकोश बक्षी, जंगल बुक, टिपू सुलतान, विक्रम और वेताल, फौजी, शक्तिमान, तमस, देख भाई देख… आणि रामायण व महाभारत या मालिकांना तुफान लोकप्रियता लाभली. ‘फूल खिले है गुलशन गुलशन…’ हा तबस्सुम सादर करीत असलेला कार्यक्रम सुद्धा लोकांना फार आवडायचा.

चित्रहार व रंगोली कमालीचे लोकप्रिय

चित्रहार व रंगोली यासारखे हिंदी चित्रपट गाण्यांचे कार्यक्रम देखील कमालीचे लोकप्रिय झाले.१९८५ नंतर टीव्ही चा प्रसार आणि प्रचार खूप वेगाने झाला. मराठीतही दर्जेदार, सकस आणि लोकप्रिय मालिका व कार्यक्रमांची निर्मिती झाली. चिमणराव व गुंड्याभाऊ, चाळ नावाची वाचाळ वस्ती, गोट्या, बंदिनी, एक शून्य शून्य, सर्जा राजा, प्रतिभा आणि प्रतिमा, ज्ञानदीप, आमची माती आमची माणसं, रानजाई, चित्रगीत या मालिका तसेच कार्यक्रमांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. रविवारी दाखवण्यात येणारा हिंदी चित्रपट हे देखील तेव्हा एक आकर्षण असायाचे. तर शनिवारी मराठी चित्रपट दाखवला जायचा. शिवाय दर रविवारी दुपारी प्रादेशिक भाषेतला चित्रपट दिल्ली दूरदर्शनवरून दाखवण्यात यायचा. यात मराठी चित्रपट कधी येतो याची प्रतीक्षा आणि उत्सुकता असायची.

‘मेरी आवाज सुनो’चे सादरीकरण

आमच्या शहरांत अंमळ उशिरानेच टीव्हीचे आगमन झालं. घरी त्याहून उशिरा. साधारणत: १९८७ मध्ये घरी टीव्ही आला. तोवर प्रारंभीच्या काळातल्या आशयसंपन्न मालिका संपलेल्या होत्या. पण त्या काळ्या-पांढऱ्या रंगातल्या इडीयट बॉक्सने चांगलाच नाद लावला होता. तेव्हाची ‘मैला आचल’ सारखी मालिका अजून स्मरणात आहे. ‘करमचंद’ या लोकप्रिय मालिकेचे सुद्धा काही भाग पाहिल्याचे आठवतात. मृगनयनी, मुल्ला नसुरुद्धीन या मालिकाही लक्षात आहेत. जसपाल भट्टी यांचा ‘उलटा-पुलटा’ हा धमाल कार्यक्रम मजा आणायचा. यात ते समकालीन प्रश्न, विषयांवर, मुद्द्यांवर आपल्या खोचक, तिरकस शैलीत भाष्य करायचे. हसता हसता अंतर्मुख करणारा हा कार्यक्रम होता. मराठीतला ‘रानजाई’ हा कार्यक्रम आजही लक्षात राहिलेला आहे. कारण यात ज्येष्ठ लेखिका व संशोधक सरोजिनी बाबर यांच्याशी कवयत्री शांताबाई शेळके यांनी साधलेला संवाद अतिशय माहितीप्रद आणि ज्ञानवर्धक होता. यामधून आपल्या लोकसंकृतीचे अनेक पैलू त्यांनी उलगडून दाखवले होते. पुढे ‘मेरी आवाज सुनो’ हा गाण्यांचा कार्यक्रम दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सुरु झाला. अभिनेता अन्नू कपूर याने हा कार्यक्रम एका आगळ्या उंचीवर नेऊन ठेवला होता. या कार्यक्रमाच्या सादरीकरणाची खूप तारीफ झाल्याने अन्नू कपूर प्रकाशझोतात आलेत. याच कार्यकमातून ‘सुनिधी चौहान’ नावाची गायिका चित्रपट सृष्टीला मिळाली. हा पहिला रियालिटी शो म्हटला पाहिजे. दूरदर्शनच्या फौजी,सर्कस या सारख्या मालिकांमध्ये काम केलेला शाहरुख खान सारखा अभिनेता हिंदी चित्रपटविश्वाला लाभला.

दूरदर्शनवरील बातम्यांमध्ये सरकारची सकारात्मक बाजूच

१९९१ नंतर उदारीकरणाच्या पर्वात अनेक खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांचा उदय झाला. परिणामी दूरदर्शनवरील अनेक कलाकार, तंत्रज्ञ, लेखक नव्या संधीच्या शोधात या ठिकाणी रुजू झालेत. लोकांना अधिक पर्याय उपलब्ध झाले. कार्यक्रम सादरीकरणात अमूलाग्र बदल झालेत. हळूहळू दूरदर्शनची लोकप्रियता कमी होऊ लागली. इथले कार्यक्रम प्रेक्षकांना रटाळ वाटू लागले. एकेकाळी दिमाखात उभ्या असलेल्या टोलेजंग इमारतीची रया जावी तशी अवस्था दूरदर्शनची झाली. मला वाटतं अलीकडच्या काळात दूरदर्शनवर सादर झालेला शेवटचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे अमीर खानचा ‘सत्यमेव जयते’ हाच असावा. हा कार्यक्रम दूरदर्शन खेरीज एका खाजगी वाहिनीवरही सादर व्हायचा.

दररोज प्रक्षेपित होणाऱ्या मालिकेची सुरुवात दूरदर्शननेच केली आहे. ‘स्वाभिमान’ या मालिकेने हा पायंडा पाडला. नाही म्हणायला दर रविवारी सकाळी सादर होणारा ‘रंगोली’ हा गाण्यांचा कार्यक्रम आवडीने पाहणारे चाहते आहेत अजून. सध्या हा कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध भारती या लोकप्रिय वाहिनी वरील उद्घोषक सादर करतात. पण असं असलं तरी बातम्यांसाठी मात्र अजूनही समाजातला एक मोठा वर्ग दूरदर्शनच्या बातम्यांना जास्त विश्वासर्ह समजतो. यात तथ्य आहेच. कारण खाजगी वृत्त वाहिन्या सध्या ज्या पद्धतीने काम करतात ते पाहून खूप चीड येते. मन व्यथित होतं. पण अलीकडच्या काळात दूरदर्शन वरील बातम्यांमध्ये सरकारची केवळ सकारात्मक बाजूच जास्त दाखवली जाते. वस्तुनिष्ठतेपेक्षा प्रचारी रूप समोर येताना दिसते. अर्थात सरकारच्या अधिपत्याखाली असलेली यंत्रणा असल्याने असं होणं स्वाभाविक आहे.

आता OTT नावाचा पर्याय

सुरुवातीच्या काळात लोकं चित्रहार, छायागीत, चित्रपट आणि क्रिकेट सामन्यांचे थेट प्रक्षेपण यांचा आस्वाद आणि आनंद सामुहिकपणे घेत असायचे. यासाठी चौकात, बगीच्यात, वाचनालयात, खेड्यात ग्राम पंचायत कार्यालयात, पटांगणात टीव्ही संचाची सोय केली जायची. नव्या पिढीला हे ऐकून नवल वाटेल. कारण आता परिस्थिती खूप बदलली आहे. हातातल्या मोबाईल सेटवर सगळं काही सहज उपलब्ध आहे. गाणी-चित्रपट-मालिका-क्रीडा सामने सर्वकाही. शिवाय OTT नावाचा पर्याय देखील आलेला आहेच. त्यामुळे आताशा लोकं टीव्ही वर वाहिन्यांचे कार्यक्रम पाहण्यापेक्षा OTT वरील मालिका-कार्यक्रम पाहण्यास प्राधान्य देतात. टीव्ही च्या आगमनाने रेडीओच्या लोकप्रियतेला थोडासा फटका बसला. मग स्वस्त आणि विना व्यत्यय इंटरनेट सुविधा मिळू लागल्याने टीव्हीची लोकप्रियता काहीशी कमी होताना दिसत आहे. कोविड काळात मालिकांचे चित्रीकरण बंद झाल्याने अनेक वाहिन्यांनी आपले जुने लोकप्रिय कार्यक्रम आणि मालिकांचे प्रक्षेपण केलं. दूरदर्शनने देखील पहिल्या टाळेबंदीच्या काळात सर्कस, रामायण, महाभारत सारख्या जुन्या मालिका पुन्हा दाखवल्या. पण ‘भारत एक खोज’ सारखी अत्यंत दर्जेदार मालिका मात्र नाही दाखवली. पंडित नेहरूंच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडीया’ या मौलिक ग्रंथावर ही मालिका आधारित आहे. सुरुवातीच्या काळातली ‘तमस’ ही मालिका सुद्धा फार चर्चेत आली होती. कथाबाह्य कार्यक्रमात सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणे सादर करीत असलेला ‘सुरभी’ हा सांस्कृतिक पत्रिकेचा कार्यक्रम अतिशय उच्च कोटीचा होता. याशिवाय बातम्यांवर आधारित काही कार्यक्रम देखील दर्शकांच्या पसंतीला उतरले होते. दूरदर्शन या सरकारी वाहिनीने सुरुवातीच्या काळात आशयघन, सकस, उत्तम, अभिजात कार्यक्रमांची निर्मिती करून भारतीय लोकांची अभिरुची संपन्न करण्यास मोलाची भूमिका पार पाडली आहे, याबाबत कोणाचं दुमत होणार नाही !

प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार

सहयोगी प्राध्यापक,

मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखा,

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,

नाशिक

मोबाईल : ९४०३७७४५३०

- Advertisment -

ताज्या बातम्या