रक्तानंतर आता फुफ्फुसातही प्लॅस्टिक

रक्तानंतर आता फुफ्फुसातही प्लॅस्टिक

रक्तानंतर पहिल्यांदाच मानवी फुफ्फुसांच्या आत मायक्रोप्लॅस्टिक कणांची उपस्थिती आढळली आहे. शरीरात मायक्रोप्लॅस्टिक्सची उपस्थिती हे आणखी एका मोठ्या धोक्याचे संकेत आहे. त्यावरून असे दिसून येते की प्लॅस्टिकचे हे वाढते विष वातावरणातच नाही तर आपल्या नसा आणि शरीराच्या अवयवांमध्येही विरघळले आहे. प्रदूषणाच्या या नव्या घातक धोक्याचा मागोवा.

आज पृथ्वीवर असे एकही ठिकाण नाही, जे वाढत्या प्लॅस्टिकपासून मुक्त आहे. मायक्रोप्लॅस्टिक्सचे हे कण उंच हिमालयापासून महासागराच्या खोलीपर्यंत आणि अगदी आर्क्टिक आणि अंटार्क्टिकसारख्या ठिकाणी पोहोचले आहेत, जिथे मानवाचा पत्ता नाही. ‘सायन्स ऑफ द टोटल एन्व्हायर्न्मेंट’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनानुसार मायक्रोप्लॅस्टिकचे हे कण केवळ फुफ्फुसाच्या ऊतींच्या खोलीतच नाही तर फुफ्फुसाच्या प्रत्येक भागात आढळून आले. शास्त्रज्ञांना हे कण 13 पैकी 11 रुग्णांच्या ऊतींमध्ये आढळून आले, ज्यामध्ये पॉलीप्रोपायलीन आणि पीईटी (पॉलिथीलीन टेरेफ्थालेट) सर्वात सामान्य आहेत. विशेष म्हणजे, पॉलिप्रोपायलीनचा वापर सामान्यतः पॅकेजिंग आणि पाईप्समध्ये केला जातो तर ‘पीईटी’ प्लॅस्टिक बाटल्यांच्या निर्मितीमध्ये वापरला जातो. ब्रिटनच्या संशोधकांच्या मते, हे मायक्रोप्लॅस्टिक कण श्वासाद्वारे फुफ्फुसात पोहोचले असण्याची शक्यता आहे. या अभ्यासात संशोधकांना मायक्रोप्लॅस्टिकचे 39 कण आढळले. याशिवाय संशोधनातून दिसून आले की, पुरुषांमधल्या नमुन्यांमध्ये किती तरी जास्त कण आढळून आले आहेत. संशोधकांना या नमुन्यांमध्ये एकूण 12 प्रकारचे पॉलिमर कण आढळले आहेत. संशोधनानुसार, प्लॅस्टिकच्या या 39 तुकड्यांपैकी 11 फुफ्फुसाच्या वरच्या भागात, सात मध्यभागी आणि 21 फुफ्फुसाच्या आतील भागात आढळून आले. याआधी ‘जर्नल एन्व्हायर्नमेंट इंटरनॅशनल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात शास्त्रज्ञांनी माहिती दिली होती की, हे मायक्रोप्लॅस्टिक कण आपल्या रक्तातही सापडले आहेत. त्यांच्या अभ्यासात, शास्त्रज्ञांना दहापैकी आठ लोकांच्या रक्तात मायक्रोप्लॅस्टिकचे कण आढळले, जवळजवळ अर्ध्या नमुन्यांमध्ये पीईटी प्लॅस्टिक आढळले.

यापूर्वी, कॉर्नेल आणि उटाह स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात दिसून आले आहे की, पॅकेजिंग वस्तू आणि सोड्याच्या बाटल्यांमध्ये वापरल्या जाणार्‍या प्लॅस्टिकचे छोटे कण हवेतून जगभर प्रवास करू शकतात. त्याचे शरीरात अस्तित्व असण्याआधीच पुरावे समोर आले आहेत. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, हे मायक्रोप्लॅस्टिक कण वातावरणात गेल्यानंतर सुमारे सहा दिवस हवेत राहू शकतात. विशेष म्हणजे या काळात ते अनेक खंडांमध्ये जाऊ शकतात किंवा श्वासाद्वारे शरीराच्या अंतर्गत अवयवांमध्ये जाऊ शकतात. ‘फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटी’ने केलेल्या अभ्यासात शास्त्रज्ञांना आढळून आले आहे की, प्लॅस्टिकचे हे सूक्ष्म कण शरीरात पोहोचल्याने पेशींच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. एवढेच नाही तर एकदा फुफ्फुसात पोहोचल्यानंतर हे कण फुफ्फुसाच्या पेशींच्या चयापचय आणि विकासावर परिणाम करू शकतात. ते पेशींच्या आकारावर परिणाम करून त्यांची हालचाल रोखू शकतात. ‘जर्नल एन्व्हायर्न्मेंट इंटरनॅशनल’मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनातही न जन्मलेल्या मुलाच्या नाळेमध्ये मायक्रोप्लॅस्टिक्स आढळले आहे. ‘जर्नल ऑफ हॅझार्डस मटेरिअल्स लेटर्स’मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनातून टूथपेस्ट, क्रिम इत्यादी दैनंदिन गोष्टींपासून आपले अन्न, हवा आणि पिण्याच्या पाण्यातून प्लॅस्टिकचे कण शरीरात जातात, असे समोर आले आहे. सुरुवातीला वरदान समजले जाणारे हे प्लॅस्टिक भविष्यात एवढ्या मोठ्या समस्येचे रूप धारण करेल, असे कोणाला वाटले नसेल. 1907 मध्ये पहिल्यांदा सिंथेटिक प्लॅस्टिक ‘बेकेलाईट’चे उत्पादन सुरू झाले.

तथापि, 1950 पासून त्याचे उत्पादन वाढले. शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की, तेव्हापासून आम्ही सुमारे 830 दशलक्ष टन प्लॅस्टिकचे उत्पादन केले आहे, जे 2025 पर्यंत दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत ही समस्या वेळोवेळी किती तीव्र होईल याची आपण कल्पना करू शकतो. अशा परिस्थितीत ही समस्या केवळ पर्यावरणासाठीच नाही तर आपल्या आरोग्यासाठीही मोठा धोका आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. प्लॅस्टिक प्रदूषण अत्यंत धोकादायक आहे. कारण त्याचे कण इतके लहान असतात की ते रक्ताद्वारे शरीरात सहज पोहोचू शकतात. यावरून मायक्रोप्लॅस्टिकचा वाढता धोका लक्षात येऊ शकतो. ते आता पृथ्वीवर सर्वत्र अस्तित्वात आहे. जगातील सर्वात उंच ग्लेशियर्स असो किंवा सर्वात खोल महासागर; ते सर्वत्र असते.

वस्तूत: याआधीही रक्त आणि मानवी फुफ्फुसात खोलवर प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण आढळून आले आहेत. मात्र आता मानवी नसांमध्ये पेंट आणि फूड पॅकेजिंगमध्ये वापरल्या जाणार्‍या सूक्ष्म प्लॅस्टिक कणांच्या उपस्थितीमुळे हे स्पष्ट होते की, वातावरणात वाढणारे त्याचे विष आपल्या नसांमध्ये विरघळले आहे. काही काळापूर्वी न जन्मलेल्या बाळांच्या नाळांमध्ये मायक्रोप्लॅस्टिक सापडले. आता ते शिरांमध्ये आढळून येणे ही गंभीर चिंतेची बाब आहे. अलीकडील अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, प्लॉस्टिक अधिक टिकाऊ बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पदार्थांच्या संपर्कात आल्याने विशेषतः महिलांमध्ये मधुमेहाचा धोका वाढू शकतो. संशोधकांच्या म्हणण्यानुसार मायक्रोप्लॅस्टिक्स रक्तवाहिन्यांमध्ये घुसू शकतात का, हे यापूर्वीच्या कोणत्याही अभ्यासात तपासले गेले नव्हते. त्यांच्या मते, नसांमध्ये सापडलेले हे सूक्ष्म प्लॅस्टिकचे कण पाच वेगवेगळ्या प्रकारच्या प्लॅस्टिक पॉलिमरचे होते. ते पूर्वीपेक्षा वेगळे होते. त्यांच्या नसांमधील उपस्थितीमुळे आतील अस्तरांचे नुकसान होऊ शकते.अमेरिकन केमिकल सोसायटीने केलेल्या याआधीच्या अभ्यासात, शास्त्रज्ञांना मानवी अवयवांच्या 47 नमुन्यांमध्ये प्लॅस्टिकचे प्रदूषण आढळून आले. या अभ्यासात फुफ्फुसे, यकृत, प्लिहा आणि मूत्रपिंड यांच्या नमुन्यांमध्ये मायक्रोप्लॅस्टिक्स आणि नॅनोप्लॅस्टिक्स आढळून आले. ‘केमिकल रिसर्च टॉक्सिकॉलॉजी’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातही मायक्रोप्लॅस्टिक्समुळे शरीरातील पेशींच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो, असे स्पष्ट झाले आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, प्लॅस्टिकचे हे सूक्ष्म कण श्वासोच्छवासाद्वारे किंवा इतर कोणत्याही मार्गाने शरीरात पोहोचतात तेव्हा ते काही दिवसांमध्ये फुफ्फुसाच्या पेशी, चयापचय आणि विकासावर परिणाम करू शकतात. अभ्यासात असेही दिसून आले आहे की, हे मायक्रोप्लॅस्टिक्स जिवाणूंमध्ये प्रतिजैविक प्रतिरोधक क्षमता तीस पटींनी वाढवू शकतात. ‘एनव्हायर्न्मेंट इंटरनॅशनल’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात संशोधकांनी यापूर्वीच पृथ्वीच्या कानाकोपर्‍यात पोहोचलेले मायक्रोप्लॅस्टिक्स न जन्मलेल्या बालकांच्या नाभीसंबंधित सापडल्याचे समोर आणले आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे, कारण गर्भाच्या विकासात नाभीसंबंधीची भूमिका खूप महत्त्वाची असते. हे संशोधन रोमचे फेटेबेनेफ्रेटेली हॉस्पिटल आणि पॉलिटेक्निका डेल मार्शा विद्यापीठाने केले आहे.

प्लॅस्टिकच्या रसायनांमुळे किंवा कणांमुळे होणारी जळजळ पाचन अवयवांना नुकसान पोहोचवू शकते. म्हणूनच सूक्ष्म प्लॅस्टिक मानवी शरीरात जाण्यापासून रोखण्याचा सर्वोत्तम आणि प्रभावी मार्ग म्हणजे प्लॅस्टिकचे उत्पादन आणि वापर कमी करणे. त्यादृष्टीने आता विचार व्हायला हवा.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com