आभाळमाया

आभाळमाया

घराघरांतील संवादाला किती महत्त्व आहे हे वेगळे का सांगायला हवे? एक आई ते आजी या प्रवासात बदलत जाणारे संवादाचे टप्पे धुंडाळणारे सदर..

लहान मुले छान मोठी होऊ लागतात नि त्यांना आपल्या भोवतालचा परिसर व माणसे यांची ओळख होऊ लागते. अशावेळी आपण त्यांचे हे जाणतेपण हळूवारपणे जपले पाहिजे. आईबरोबर मुले आजोळी जातात. तेथील हक्काचे आजी-आजोबा त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात. हे नाते त्यांना समजू लागते. आजोळी मुलांना भेटतात इतरही नाती जसे मावशी व तिचे मुले म्हणजे मावस भावंड नि मामा-मामी व त्यांची मुले म्हणजे मामे भावंडं. भावंडांमध्ये मुले छान रमतात. ही नात्याची जपणूक फार महत्त्वाची असते कारण यावरच त्यांचे भावविश्व व भविष्यातील प्रेम व आधार अवलंबून असतो.

एखादा सण किंवा समारंभप्रसंगी दोन्ही घरातील नातेवाईक एक होतात तेव्हा या चिमुरड्यांना त्यांच्या मायेतील ओलावा समजतो. आपण त्यांना सर्व मोठ्या माणसांचा आदर करायला शिकवले पाहिजे. आपल्या संस्कृतीत मोठ्या माणसांना वाकून नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला जातो.आशीर्वादाने प्रेमाबरोबरच भावी आयुष्यासाठी सदिच्छा मिळतात. आशाताईंनी गायलेले ‘तू सुखी राहा’ या सिनेमातील जगदीश खेबूडकर लिखित ‘मामाच्या गावाला जाऊया’ या गाण्यातील गोडवा तर आपल्याला चांगलाच परिचित आहे. आगगाडीतून प्रवास करताना पळणारी झाडे व निसर्ग पाहताना मुलांना कोण आनंद होतो. मामीने प्रेमाने केलेला रुचकर स्वयंपाक त्यांना भावतो. मामाची सुगरण बायको केळाचे शिकरण, गुलाबजाम असे गोड पदार्थ पोटभर खाऊ घालते.

या मायेने केलेल्या पदार्थांचा बच्चे कंपनी एकत्र बसून छान आस्वादही घेतात. मामा भाच्यांना अंगाखांद्यावर खेळवून भरपूर लाड करतात. सुट्टी संपत येऊन आपली बहीण व तिची मुले परतण्याची वेळ आली की मामा काहीसा भावनाप्रधान होतो. मग त्याची लगबग सुरू होते. बहिणीला हक्काची साडी, लहान बालगोपाळांना छानसे कपडे व खेळणी घेण्यात त्याला मोठे कौतुक वाटते. सुट्टी संपत आली की मुलांचे बाबा त्यांना घेण्यास येतात. सासूरवाडीला त्यांचाही मानपान होतो. आजोबा नातवंडांना प्रेमाने खाऊला पैसे देतात नि आजी मुलांना आवडणारा खाऊ बनवून शिदोरी देते. मायेची आभाळमाया दाटलेली असते. ही आभाळमाया न आटणारी अशी अपरंपार असते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com