Thursday, April 25, 2024
Homeब्लॉगब्लॉग : मी पाहिलेली कविता

ब्लॉग : मी पाहिलेली कविता

कविता आपण वाचतो, ऐकतो, अनुभवतो…पण तुम्ही कविता प्रत्यक्षात बघितली आहे कधी? मी बघितली आहे… एक नाही तर 7 कविता प्रत्यक्षात अवतरल्या होत्या… एकाहून सुंदर, सुरेल आवाजाच्या… पण त्याहूनही जास्त मनात घर करुन गेल्यात त्या त्यांच्या हृदय पिळवटून टाकणार्‍या भावना…

लीना लेले

कोल्हटकरांच्या लेखणीतून शब्दात उतरले काही स्त्रियांचे दुःख… आणि ती वही झाली-भिजकी वही… 2004 साली प्रदर्शित झालेला कोल्हटकरांच्या कवितासंग्रह!

- Advertisement -

‘परिवर्तन’, जळगावच्या शंभु पाटील सरांनी त्याच शब्दांना, दुःखांना चेहेरे दिलेत… रुप रंग दिला… आणि महिला कलाकारांनी त्या कवितेला शब्दशः जगत, त्याचे अप्रतिम सादरीकरण करत प्रेक्षकांना खिळवून ठेवले…

दिग्दर्शक पुरुषोत्तम चौधरी यांनी कमालीच्या संयमाने व कौशल्याने हा कठीण विषय हाताळला आहे.

’भिजकी वही’ म्हणजे-परिवर्तन या जळगावस्थित संस्थेच्या कलाकारांनी मिळून अरुण कोल्हटकरांच्या निवडक कवितांचे केलेले रसग्रहण आणि सादरीकरण… कार्यक्रमाची सुरुवात होते ती ’अरण्य’ कवितेतून, ज्यातून सुतोवाच होते ती अनेक स्त्रियांच्या दुःखांची जी पुढच्या कवितांमधून प्रेक्षकांना समोर येतात…

थेंब… सहसा आपण ओळखतो ते थेंब फक्त पाण्याचेच… पण थेंबही असतात कितीतरी प्रकारचे… कितीतरी चवीचे… अगदी खारट अश्रूंचेही… खनिजांचे, रसायनाचे, अणूचे, ज्वालाग्राही पदार्थाचे या थेंबांची कविता सादर करतात जयश्री पाटील… त्यांच्या अभिनयात प्रत्येक थेंबाचे प्रतिबिंब दिसते… आणि मागोवा सुरु होतो तो अश्रूंच्या थेंबांच्या प्रवासाचा…

आधी भेटते ती अपाला… अंगावर कोड असल्यामुळे नवर्‍याने झिडकारलेली, दुःखी पण तरीही, कधीतरी ती बरी होवून नवर्‍याच्या घरी परत जाईल अशी आशावादी असायला… बापाने आणि नवर्‍याने दुर्लक्ष्य केले असले तरी इंद्राला ती आपल्या दुःख निवारण्यासाठी मनधरणी करु शकते हा तिचा आत्मविश्वास आणि नवर्‍याने माफी मागितली तरच परत जाईल हा आत्मसम्मान हे सगळे भाव हर्षदा कोल्हटकर अगदी निरागसपणे आणि यथायोग्यपणे मांडतात… त्यांच्या दिसण्यातला गोडवा आणि आणि आवाजातला मधाळ साधेपणा भूमिकेला पूरक वाटतो.

मग येते मदर मेरी… नवजीव निर्मितीचे काम हे स्त्रिचेच असते आणि अगदी देवालाही तिची मदत घ्यावी लागते, त्याच्या मुलाला जन्म देण्यासाठी.. पण पुढे काय? शेवटी देवाचा मुलगा… देवच तो… इतरांचे दुःख दूर करताना तो तिच्या वाटेला येतच नाही…अगदी मेल्यावरही… हीच भळभळती जखम, अंजली पाटील जेव्हा प्रभावीपणे कवितेतून व्यक्त करतात तेव्हा सभागृहातली प्रत्येक आई डोळ्यातल्या आसवांना वाट मोकळी करुन देते… त्यांच्यातील आईच्या भूमिकेशी समरस होते, मग प्रत्यक्षात अवतरली अस वाटत.

मायेच्या या भवसागरातून वाहत असतानाच भावनांची नाव पोहोचते ती क्रूरतेच्या देशात…

हिपेशियाच्या बुद्धीचा कौतुक करणार्‍या तुरळक बुद्धिजीवींना काही कळायच्या आतच तथाकथित धर्मरक्षकांचा जमाव तिला घेरतो आणि शब्दशः ओरबाडतो… लाथाडतो… आणि हिपेशियाचा कवितेतील आक्रोश, आपल्याला धर्म म्हणजे काय, धर्मरक्षक म्हणजे काय आणि पुरुष सत्ताक संस्कृती म्हणजे काय? याच्या तोकड्या कल्पनांना सुरुंग लावतो… हा आक्रोश प्रभावीपणे मांडतात नेहा पवार… त्यांचा आवाज आणि अभिनय कवितेला अक्षशः जागवणारा…

एकीकडे धर्म आणि देव म्हणजे काय? हा वैचारिक गोंधळ अनुभवत असताना रबिया समोर येते… देवावर अगाधभक्ती आणि विश्वास असणारी… स्वतःच्या वाईट परिस्थितीही त्यातली चांगली बाजू पाहणारी… ही साधी, भोळीभाळी अवतरते ती सुदिप्ता सरकार यांच्या गोड आणि निर्मळ आवाजातून… त्यांचा मराठी भाषेला असणारा बंगाली बाज त्या भूमिकेला, रबियाला अजूनच आपलासा करतो… भाव, भक्ती, विश्वास यामधून येणार्‍या त्यागामुळे भक्तीचे दर्शन घडत.

यानंतर भेट होते ती लैलेची… हो तीच ती लैला-मजनूमधली लैला… तिला प्रेमच नाही तर दुःखही व्यक्त करायलाही परवानगी नाही… आणि एवढे सहन करुनही ज्यावर जीवापाड प्रेम केले तो कैस, तिची भेट झाल्यावर तिला दूर सारुन तिच्या काल्पनिक सावलीमागे पळतो तेव्हा हतबल झालेली लैला रंगवतात सोनाली पाटील… तिला ’मजनू’ नाही तर शुद्धीत असून तिच्यावर प्रेम करणारा साधा प्रियकर हवा असतो… ज्यांच्या नावाने प्रेमाचे दाखले दिले जातात त्यातल्या लैलेची वेगळीच दुखरी नस इथे अरुण कोल्हटकर दाखवतात आणि सोनालींनी हुबेहूब वठवलेल्या लैलेसोबत प्रत्येक प्रेयसी आपल्या प्रियकराकडली माफक अपेक्षा शोधू पहाते… ही कविता प्रेम करणार्‍यांना कळली तर सगळे ताणतणाव दूर होऊन नाती घट्ट होतील.

लैलेच दुःख खुज वाटावे असे पहाडाएवढे दुःख समोर घेऊन येते ती मंजुषा भिडे यांनी साकारलेली ’मयमून’… एका शब्दात सांगायचे तर केपेी घळश्रश्रळपस ची बळी… पण कवितेची प्रत्येक ओळ वाचताना पदोपदी मरण यातनेचा अनुभव… आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करण्याची एवढी कठोर शिक्षा? आणि तीही घरच्यांच्या संमतीने… मयमूनचा राग, पिडा, हतबलता साकारताना मंजुषा भिडेंचा कविता वाचन शहारा आणणारे… त्यांच्या, कधी कातरत्या तर कधी तीक्ष्ण शब्दांनी सगळेच स्तब्ध होतात….. ही गोष्ट आजच्या काळात पण समकालीन वाटते ही किती लाजिरवाणी बाब आहे…. मन सुन्न होत आणि शेवटी परत एकदा जयश्री सादर करतात ती कविता जी कोल्हटकरांच्या मनातले सार आहे…

‘ही वही कोरडी नकोस ठेऊ माझी…. या कवितेद्वारे ते प्रत्येक जीवापर्यंत पोहोचू इच्छितात… आणि पोहचतातदेखील…

भावनांच्या सागरात डुबकी मारुन प्रेक्षक बाहेर पडतात ते भिजलेल्या मनानेच…

एका छोट्या शहरात इतक्या गुणसंपन्न व समज असलेल्या अभिनेत्री परिवर्तनला गवसल्या आहेत.

या पूर्ण प्रवासाला माहितेची आणि विवेचनाची जोड देऊन आशय संपन्न केलाय शंभू पाटील सरांनी प्रत्येक कवितेला आणि त्यातल्या आशयाला, भावनांना शब्दांनी गुंफत ते प्रेक्षकांना बांधून ठेवतात… आणि मुख्य म्हणजे प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतात…

अरुण कोल्हटकर यांची कविताही अनेकस्तरावर व्यक्त होणारी कविता आहे. यामधील प्रतीक, प्रतिमा, यमक, रुपक हे सगळेच उच्चस्तरावरचा अनुभव आहे.

विराम चिन्हाचा वापर न करणे, भाषिक तोडामोड, शब्दाच्या छटां, यामधील व्याकरण, क्रियापद, कर्ता हे सगळेच इतके प्रयोगशील आहे की आपण थक्क होऊन हे अनुभवतो. अनेक अनवट व अवघड जागा आपल्याला बुचकाळ्यात पडतात. वाटा हरवतात हीच त्याच्या कवितेतील अतिवास्तवता वादाची खूण आहे. हा कवी दुर्बोध आहे असे सर्व म्हणतात, याला कारण ही कविता अजिबात दुर्बोध नाही. पण आपल्याला अशी अनेकस्तरीय कविता व भाषेची मोडतोड सवयीची नाही म्हणून चकवा पडतो.

इथेच ‘परिवर्तन’ची टीम मदतीला येते. आपले बोट धरुन ते आपल्याला या कवितेचा गाभा उलगडून आपल्या पुढे मांडतात. तेव्हा या अरुपाच देखणे रुप आपल्यासमोर साकारत. एक सर्वांगसुंदर अनुभव देणारी ही कलाकृती दीर्घकाळ मनात रेंगाळत राहील.

सर्वप्रकारचे साहित्य, प्रयोग हे अनुभव संपन्न करणारे असतात हेच खरे… आणि ’भिजकी वही’देखील तेच करत… एक सुन्न करणारा, कारुण्यमय अनुभव तरीही बघत राहावा असा सुंदर प्रयोग.

- Advertisment -

ताज्या बातम्या