महासत्तांमधील संघर्षाचा ‘नवा फुगा’

महासत्तांमधील संघर्षाचा ‘नवा फुगा’

अमेरिका आणि चीन यांच्यातील संघर्षाला आता मात्र वेगळे वळण मिळत आहे. खर्‍या अर्थाने या दोन देशांमध्ये शीतयुद्ध सुरू होतेय की काय अशी सद्यस्थिती आहे. चीनचा हेरगिरी करणारा बलून अमेरिकेत फिरताना आढळून आला. हा बलून पाडण्यात अमेरिकेला यश आले असले तरी त्यातून जगात संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणार्‍या अमेरिकेच्या संरक्षण प्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

रशिया-युक्रेन युद्धानंतर आकाराला आलेल्या नव्या विश्वरचनेचे एक अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणून अमेरिका आणि चीन यांच्यातील संघर्षाकडे पाहिले जात आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा फायदा नेमका कोणाला झाला, असा प्रश्न अनेक अभ्यासकांना विचारला जातो तेव्हा त्याचे एक उत्तर समोर येते ते म्हणजे चीन. कारण या युद्धामध्ये अमेरिकेची प्रचंड आर्थिक शक्ती वापरली जात आहे. दुसरीकडे रशिया आर्थिकदृष्ट्या क्षीण होत आहे. तसेच रशियासाठी अनेक देशांची दारे बंद झाल्यामुळे चीनकडील रशियाचा ओढा वाढला आहे. तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे युरोपियन देशांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. या सर्वांचे आर्थिक विकासदर घसरणीला लागले आहेत. मात्र चीनची परिस्थिती यापेक्षा वेगळी आहे. कारण या युद्धकाळातील विस्कळीत अर्थव्यवहारांमुळे, अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांमुळे आणि अन्य काही घटकांमुळे चीनसाठी नव्या संधी खुल्या झाल्या आहेत. त्यातून आर्थिक क्षेत्रात चीनचा प्रभाव वाढत चालला आहे. दुसरीकडे लष्करीदृष्ट्याही चीनचा विस्तार सुरू असून त्यातून चिनी आक्रमकता वाढताना दिसत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या हितसंबंधांना मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

वास्तविक पाहता, अमेरिका आणि चीन यांच्यातील संघर्षाचे स्वरूप यापूर्वीच्या काळात आर्थिक आणि व्यापारी स्वरुपाचे होते. अमेरिकेच्या आर्थिक आणि व्यापारी हितसंंबंधांना आशिया खंडामध्ये खर्‍या अर्थाने अडथळा चीनकडून निर्माण करण्यात आला. त्यातून अमेरिकेला मोठा आर्थिक फटकाही बसला. त्यादृष्टीने अमेरिकेने चीनच्या या आव्हानाचे व्यवस्थापन करण्यासाठी किंवा चीनच्या वाढत्या विस्तारवादाला आळा घालण्यासाठी काही धोरणे घेतली होती. यातील पहिले धोरण म्हणजे चीनचे जगासोबत एकीकरण करणे. त्यातून चीनची आक्रमकता कमी होईल, अशी अमेरिकेची धारणा होती. दुसरे म्हणजे चीनसोबत आर्थिक संंबंध अत्यंत घनिष्ट करणे. बराक ओबामांनी त्याला अधिक महत्त्व देत या भूमिकेचा विस्तार केला. त्यातून अमेरिकेच्या चीनमधील आणि चीनच्या अमेरिकेतील गुंतवणुकींमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून आली. हे घडत असताना दुसर्‍या बाजूला कर्जाचा राजनय आणि वन बेल्ट वन रोड या दोन मोठ्या योजनांमुळे अमेरिकेचे चांगलेच धाबे दणाणले.

कारण या दोन्हींमुळे अनेक छोट्या-मोठ्या देशांवरील चीनचा प्रभाव कमालीचा वाढू शकतो, याची अमेरिकेला कल्पना होती. त्यामुळेच अमेरिकेने यामध्ये सहभागी होऊ नये यासाठी विविध देशांवर दबाव आणला, आवाहन केले. असे असूनही 100हून अधिक देश वन बेल्ट वन रोडमध्ये सहभागी झाले. 100हून अधिक देशांनी चीनकडून कर्जे घेतली आहेत. यावरून चीनशी फारकत घेऊन राहा, चीनशी संबंध वाढवू नका याबाबत आणल्या जात असलेल्या अमेरिकेच्या दबावाचा फारसा काही परिणाम होताना दिसत नाहीये. आता मात्र या संघर्षाला एक वेगळे वळण मिळताना दिसत आहे.

खर्‍या अर्थाने या दोन देशांमध्ये शीतयुद्ध सुरू होतेय की काय अशी सध्याची परिस्थिती आहे. याचे एक उत्तम उदाहरण अलीकडच्या काळात घडले आहे. चीनचा एक स्पाय बलून किंवा हेरगिरी करणारा बलून अमेरिकेत फिरताना आढळून आला. हा बलून पाडण्यात अमेरिकेला यश आले आहे. या बलूनवर कॅमेरे आणि अन्य काही यंत्रणा बसवण्यात आल्या होत्या. तरीही हा बलून उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिकेने दोन ते तीन दिवसांचा काळ घेतला आणि अखेरीस तो पाडण्यात आला. नेहमीच्या सवयीप्रमाणे चीनने या आरोपांचा इन्कार करत तो हवामानबदलांचा अभ्यास करण्यासाठी, नागरी कारणांसाठी पाठवण्यात आल्याचे सांगितले. परंतु यावर कोणाचाही विश्वास बसणे शक्य नाही.

मुळात इतक्या मोठ्या अमेरिकेमध्ये हा बलून मुंटाना भागातच का आला, हे जाणून घेणे गरजेचे आहे. अमेरिकेमध्ये तीन महत्त्वाची आण्विक केंद्रे असून त्या ठिकाणी अमेरिकेने अण्वस्रे आणि क्षेपणास्रे ठेवलेली असण्याची शक्यता आहे. मुंटाना हे यापैकी एक आहे. अशा अतिसंवेदनशील, अतिमहत्त्वाच्या ठिकाणावर चीनचा हा स्पाय बलून टेहळणी करताना आढळून आला. साहजिकच अमेरिकेच्या संरक्षण व्यवस्थेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर आहे.

टेहळणी करण्यासाठी चीनने बलूनच का पाठवला, असाही प्रश्न विचारला जातो. याचे कारण उपग्रहांच्या माध्यमातून पृथ्वीवरील बहुसंख्य भूभागांविषयीची सर्व माहिती, छायाचित्रे उपलब्ध होत असतात. परंतु बलूनचा फायदा असा असतो की, तो कमी खर्चिक असतो. तसेच पृथ्वीपासून तो कमी उंचीवरून म्हणजे सामान्यतः व्यावसायिक विमाने ज्या उंचीवरून प्रवास करतात तेथून तो टेहळणी करू शकतो. त्यामुळे यातील कॅमेर्‍यांद्वारे कॅप्चर करण्यात येणारी छायाचित्रे ही अधिक ठळक, स्पष्ट असतात. त्यामुळे बलूनचा वापर चीनकडून केला गेला. दुसरी गोष्ट म्हणजे उपग्रहांपेक्षा यासाठीचा खर्च कमी असतो. तसेच तो पकडला गेला तरी हात झटकून नामानिराळे होण्याचा मार्ग असतो. तसेच तो लष्करी हेतूने सोडण्यात आलेला नव्हता, हवामानाचा अभ्यास करण्यासाठी सोडला होता, असेही सांगता येऊ शकते. त्यामुळे चीनने अत्यंत नियोजित पद्धतीने हा बलून हेरगिरीचा पर्याय निवडला.

टेहळणी करण्यासाठी, गुप्त माहिती फोडण्यासाठी बलूनचा वापर पहिल्यांदा करण्यात आलेला नाहीये. इतिहासात डोकावल्यास शेकडो वेळा अशा प्रकारच्या बलून्सचा वापर शत्रूची गोपनीय माहिती मिळवण्यासाठी वापरण्यात आला आहेत. विशेषतः शीतयुद्धाच्या काळात, दुसर्‍या महायुद्धाच्या काळात तर स्पाय बलून हे एक महत्त्वाचे युद्धाचे साधन म्हणून ओळखले जात होते. इंग्लंड, अमेरिका यांच्याकडून जर्मनीच्या हालचाली टिपण्यासाठी, तेथील रणगाडे, युद्धसामुग्रीची पाहणी करण्यासाठी अनेकदा अशा प्रकारचे बलून जर्मनीवर पाठवण्यात आले होते. शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेने अनेकदा रशियाची गुप्तचर माहिती मिळवण्यासाठी, रशियाने अमेरिकेच्या रणनीतीवर नजर ठेवण्यासाठी कित्येकदा स्पाय बलून वापरल्याच्या नोंदी आहेत. पण शीतयुद्धोत्तर काळात त्याचा वापर फारसा झालेला नव्हता. आता चीनने तो अवलंबल्यामुळे ही शीतयुद्धाची सुरुवात आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे.

मुळात स्पाय बलूनचे हे प्रकरण दोन महत्त्वाच्या पार्श्वभूमीवर घडले आहे. अलीकडेच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी जे. ब्लिंकन हे चीनच्या भेटीवर गेले होते. चीन आणि अमेरिकेने भविष्यात एकत्र येऊन कशा पद्धतीने काम करावे, दोघांमधील संबंध घनिष्ट कसे करता येतील यादृष्टीने त्यांनी शी झिनपिंगबरोबर चर्चा केली होती. दुसरीकडे, सीआयए या अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेचे प्रमुख विल्यम बर्नस यांनी अलीकडेच एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी अमेरिकेला आजघडीला सर्वात मोठा भूराजकीय धोका चीनकडून असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे भविष्यात अमेरिकेची सर्व रणनीती चीनला घेरण्यासाठी असेल, असे त्यांनी म्हटले होते. अमेरिकेतील उच्चपदस्थ अधिकार्‍याकडून पहिल्यांदाच अशा प्रकारचे वक्तव्य केले गेले. या दोन घटनांनंतर हे बलूनचे प्रकरण घडले आहे. त्यामुळे या दोघांमधील संघर्ष एका नव्या उंचीवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यातून आणखी एक अत्यंत महत्त्वाची बाब पुढे येत आहे. अमेरिका हा संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश म्हणून जगभरात ओळखला जातो. भारताचा वर्षाचा संरक्षणावरील खर्च साधारणतः 70 ते 72 अब्ज इतका आहे, तर अमेरिकेचा हा खर्च आहे सुमारे 800 अब्ज डॉलर्स. भारताच्या दहापटींनी अधिक खर्च करणार्‍या अमेरिकेने 9/11 चा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संरक्षणात्मक उपाययोजनांसाठी बर्‍याच सुधारणा केल्या आणि नॅशनल होमलँड सिक्युरिटी अ‍ॅक्ट, नॅशनल इंटेलिजन्स अ‍ॅक्ट तयार केला. इतके सगळे असूनही एखाद्या राष्ट्राचा बलून अमेरिकेत प्रवेश करतो, त्यांच्या अतिसंवदेनशील ठिकाणापर्यंत पोहोचतो, तेथील नागरिकांच्या तो दृष्टीस पडतो; परंतु अमेरिकेच्या इंटेलिजन्स खात्याला, संरक्षण यंत्रणांना तो दिसत नाही, ही बाब आश्चर्यकारक आहे. तसेच या बलूनबाबतच्या कारवाईचा निर्णय घ्यायला दोन-तीन दिवस जातात हीदेखील धक्कादायक बाब आहे. यातून अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षेसंदर्भात मोठे प्रश्नचिन्ह या प्रकरणाने उभे केलेे आहे.

शेवटचा मुद्दा म्हणजे, स्पाय बलून प्रकरणावरून भारताने सजग होण्याची गरज आहे. कारण चीन अशा प्रकारच्या बलूनचा वापर थेट अमेरिकेविरुद्ध यशस्वीपणे करत असेल तर भारतासोबतचे संबंध तणावपूर्ण असताना आपल्याविरुद्धही हा पर्याय चीनकडून अवलंबला जाऊ शकतो. पाकिस्तानकडून ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे ड्रोनला उद्ध्वस्त करण्यासाठी आपण इस्राईलकडून एक अत्याधुनिक यंत्रणा विकत घेत आहोत. तशाप्रकारे आता बलूनभेदी यंत्रणाही भारताने तयार ठेवणे आवश्यक आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com