हवेहवेसे स्वप्नील बालपण

हवेहवेसे स्वप्नील बालपण

प्रत्येक माणसाला जगताना व्यवहाराचे भान ठेवावेच लागते हे त्रिकाल सत्य. परंतु या व्यवहाराचे भान नसतानाच देखील एक सुंदर हवेहवेसे म्हणजे (व्यवहारात जगताना चटके सोसता सोसता जे आठवून जाते आणि त्याची फक्त आठवणच तुम्हाला सुखावते)असे देखील एक स्वप्नील आयुष्य असते ते म्हणजे तुम्हा आम्हा सगळ्यांचे बालपण.

मोहन उपासनी

कशाचीही चिंता नाही, कुठलाही घोर नाही. काळजी नावाचा शब्द तर अजून कणाने शिवलेला देखील नसतो. स्वप्नील जगणं.. बेफिकीर जगणं... अज्ञानापोटी अनेक चुका नकळत घडतात आणि त्या पोटात घेणारे तुम्हा आम्हांवर मनःपूर्वक प्रेम करणारे देखील मुबलक प्रमाणात आसपास असतात. त्या चुका घडतात पोटात घातल्या जातात आणि हळूहळू त्यातूनच व्यवहाराचे, जगरहाटीचे ज्ञान नकळत होऊ लागते. ‘गल्ली युनिव्हर्सिटी’चा विद्यार्थी जगात कुठेही कसाही तरुन जातो असे म्हणतात. नाही तसा तो तरतोच, हे अंशात्मक पुढील एकेक किस्यातून तुम्हाला देखील ते उमगेल.

कानडे मारुती लेन असे आमच्या गल्लीचे नाव. नर्सरी म्हणजे तेंव्हाच्या बालवाडीत जात असताना आमच्याकडून घोटून घेतलेला आमचा नाव-पत्ता मुक्काम पोस्ट कानडे मारुती लेन. फोनचा मोबाईलचा दुरान्वये संबंध नसलेला तो काळ. आम्ही आमच्या गल्लीनुसार ओळखले जायचो. प्रसाद मोरे, बाबा गोसावी, बंडू परदेशी, बाळ्या पंडित, सुभ्या देशपांडे, नान्या पंडित ही आमची समवयस्क मित्रमंडळी आणि आम्ही म्हणजे डॉक्टर, वकील, मास्तरांची, भिक्षुकांची, व्यापार्‍यांची पोरं. पण सकाळची सगळ्यांची पहिली भेट बोळीतल्या कुंडीवर (उकिरड्यावर) व्हायची. तिथे दिवसभराचे सारे प्लॅन फिक्स व्हायचे आणि मग दिवसभर शाळेचा वेळ सोडला तर बाकी सारा त्या ठरलेल्या प्लॅनच्या अंमलबजावणीचा काळ. अंमलबजावणी म्हणजे नेमकी समजून घ्या. त्याकाळी गाढवं, डुकरं गल्लोगल्ली मोकाट फिरायची. त्यामुळे त्या मालकलेस मोकाट गाढवाना पकडायचे त्यावर गोणपाटाची आम्हीच शिवलेली खोगिरे टाकायची. गाढवाला लगाम, पाय अडकवायला रकीब हे सारे सेट आम्ही तयार करून ठेवलेले असायचे. गाढव गल्लीत आले की घे त्याला बोळीत अन् ह्या साधनसुविधा त्यावर टाकल्या की त्या गाढवाचे घोड्यात रूपांतर व्हायचे आणि आम्ही शूर सरदाराला लाजवेल असे त्यावर बनियन आणि इल्यास्टीकची (बहुधा नको तिथे फाटलेली ) छोटी हाफ पॅन्ट घालून त्यावर स्वार होऊन बोळीतल्या बोळीत फिरत असू. आम्ही भरगल्लीत देखील ही गाढववारी केली तेंव्हा पाच सहा जणांचा घरी सन्मानपूर्वक खरपूस आदरसत्कार झाला. तेव्हापासून बोळीतल्या बोळीत हे रासभ नाट्य रंगायचे. त्यातही शर्यती लागायच्या. गल्लीत एका ठिकाणी बांधकामासाठी वाळूचा ढीग पडलेला असायचा. सगळे वरच्या गल्लीत चढावर आपल्या गाढवरूपी घोड्याला सन्मानाने वर न्यायचे. तिथे लाईनशिर सगळी गाढवे उभी करून त्यावर आम्ही सार्‍यांनी स्वार व्हायचे आणि वर चढावरून गाढवास घोड्यासारखे पळवत आणायचे आणि खालच्या गल्लीतील त्या वाळूच्या ढिगार्‍यावर पळत्या गाढवावरून सूर मारायचा ( आज विचार केलातर गाढवचाळे वाटतात पण खरे सांगतो आम्हाला फार मजा यायची त्याकाळी ही गद्धे सरदारी करताना.....!)तेंव्हा गल्लीत आम्ही सर्व मित्रांनी मिळून कबुतरे पाळली होती. एका दुकानाच्या मागच्या मोकळ्या जागेत खुराडे बनवून इकडच्या तिकडच्या अड्ड्यांवरून वेगवेगळ्या प्रजातीच्या भारिभारी कबुतरांच्या जोड्या आणून त्यात ठेवल्या. पिलीआख, पायमोज अशी आजही त्यांच्या प्रजातींची नावे आठवतात. त्यात मी मुंबई भायखळ्याच्या माझ्या बहिणीकडून आणलेली 4 पारव्याची मध्यम पिल्ले देखील होती. तिथे रोज विशिष्ट वेळी ती कबुतरे खुरड्यातून बाहेर काढायची, त्यांना पकडून वर आकाशात भडी द्यायची ( म्हणजे त्या कबुतरांस उडवायचे) आणि तासन्तास वर उडणारी ती कबुतरे बघत बसायची. असे म्हणतात की आपण भडी दिलेली कबुतरे दुसर्‍या अड्ड्यावरील कबुतरांना आपल्याकडे आकर्षित करून घेऊन येतात आणि आपल्या कबुतरांच्या संख्येत वाढ होते. या कबुतरगिरीचा दुर्दैवी शेवट एका मांजराने केला. एकेदिवशी सकाळी सगळी कबुतरे गट्ट करून टाकली. काही जीव वाचवून उडून गेली. पण ती आणि त्यांची पिलावळ अजूनही त्या अड्ड्याच्या भोवताली वस्ती करून आहेत असा माझा घट्ट समज आहे. कारण कबुतर त्याचा अधिवास कधीच विसरत नाही!मग काय रोजची सकाळची कबुतरांच्या अड्ड्यावर होणारी भेट बंद होऊन ती पुनश्च कुंडीवरच होऊ लागली. आंब्याच्या कोई , साले, कचर्‍याचा तो विशिष्ट दर्प आम्हाला कधीही दर्प म्हणून जाणवला नाही आणि कुंडी काही सुटली नाही. कारण दुपारची भेट तिथेच व्हायची. आंब्याच्या सालीवर बसणार्‍या रंगीत माश्या तासन्तास पकडत बसायचेे. त्याला आम्ही छोटे भिंग म्हणत असू. असे करता करता संध्याकाळ उजाडायची. संध्याकाळी अंधारात नवीन प्लॅन अमलात यायचे. लोकांचा सतत राबता असलेल्या ठिकाणी तुरटी गरम करून ती रसरसली की रस्तावर ओतायची आणि त्यावर एक रुपयांचा तो मोठा डॉलर रस्त्यावर चीटकवायचा. आजकालचे सगळे चिकट गम झक मारेल असा तो रुपयाचा छन्ना रस्त्यावर चिटकायचा. मोह वाईट असतो, मी मी म्हणणार्‍याला देखील तो सोडत नाही. येणारे जाणारे खुपशे या छन्याच्या मोहात पडून तो उचलायला खाली वाकायचे. पण छन्ना पक्का रस्त्याला चिकटल्याने तो कितीही प्रयत्न केला तरी निघायचाच नाही. मग काय आम्ही खिदीखिदी हसायचो, समोरचा ओशाळायचा. एक माणूस तर रस्त्यावर बसून दगड घेऊन तो डॉलर प्रयत्नपूर्वक काढत बसल्याचे मला आठवते. एक भाजीवाला डोक्यावर भरलेली भाजीची पाटी घेऊन जात होता त्यालाही डॉलरचा मोह आडवा आला. तो डॉलरचा अंदाज घेऊन खाली वाकला आणि हाताने डॉलर उचलण्याचा प्रयत्न करीत होता पण तुरटी द ग्रेट कंजूस कसली सोडतेय डॉलरला? सरतेशेवटी याने भाजीची टोपली बाजूला ठेवली आणि वजनाच्या मापाने तो डॉलरला फटके मारून काढत बसला होता.

असे एक ना अनेक किस्से आमची हसून पुरेवाट करायचे. पेनला काळा दोरा बांधून तो रस्त्यात टाकायचा आणि दूर कोपर्‍यात अंधारात बसून राहायचे. इथेही फुकट ते पौष्टीक या मोह प्रवर्ग न्यायाने भले भले चांगल्या घरचे लोक तो रस्त्यात पडलेला पेन उचलायला बघायचे, पण त्यांचा हात पेनला लागायच्या आत आम्ही पेन ओढून घ्यायचो. समोरच्याची भावावस्था बिकट व्हायची. त्याच्या चेहर्‍यावर साफ भाव उमटायचे की आतातर पेन इथे होता, अचानक गायब कसा झाला? म्हणून आसपास डोके खाजवत शोधत बसायचे. इकडे हसून हसून आमची मुरकुंडी उडायची. दुसर्‍या दिवशीं नवीन प्लॅन रंग धरायचा. संध्याकाळी दोन समोरासमोरच्या बोळी, जिथे आत मोठमोठे वाडे, जे या गल्लीचे त्या गल्लीला निघणारे असत. तेच आमचे चोररस्ते होते. मग काय वर्दळीच्या वेळी संध्याकाळी आमच्यातील एक जण बोळीच्या या टोकाला आणि दुसरा समोरच्या बोळीच्या टोकाला हातात काळा दोरा घेऊन वर्दळीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजू कव्हर करत उभे राहायचे. रस्त्यातील माणसाला मध्ये काळा आडवा दोरा त्यांच्या डोक्याच्या लेव्हलला आहे हे बिलकुल कळायचे नाही. त्याकाळी पांढरी गांधी टोपी खूप प्रचलित होती. खूप लोक ती घालायचे अन नेमके तेच लोक आमच्या काळ्या दोर्‍याची शिकार व्हायचे. रोजच्या रियाजाने आम्ही सारेच यात मास्टर झालो होतो. टोपी घातलेला माणूस रेंजमध्ये आला की बरोबर इकडचा तिकडचा आमचा मित्र त्या माणसाच्या कपाळावर बरोबर टोपीखाली दोरा अडकवायचे आणि ती उडवायचे. लोकांना क्षणभर कळायचेच नाही की टोपी आपोआप उडाली कशी? मग आमच्या हसण्याने त्याला कळायचे. मग तो आमच्या मागे आणि आम्ही सारेच त्या आरपार वाड्यांमधून पसार होऊन दुसर्‍या रस्त्याने चेहर्‍यावर निर्विकार भाव ठेवून गल्लीत परतायचो. यात कित्येकदा आम्ही मार देखील खाल्लाय.

विशिष्ट वेळी नित्याने पोहायला गंगेवर जाणे, चोरपोलिस, इस्टॉप पालटी, घोडी घोडी ,आट्यापाट्या, लगोरी, सुई सुई , चल्लस, क्रिकेट, कब्बडी, विटीदांडू , धुस, गलढाय हे गोट्यांचे विविध खेळ जे आताच्या पिढीला माहीत देखील नाहीत ते सगळेच व्यायाम पोषक मैदानी खेळ आम्ही आमचा गौरवर्ण सावळा होईपर्यंत यथेच्छ खेळलो हे फार मोठे समाधान आज जाणवतेय. आम्ही सारेच मित्र एक ना एक अनेक अशा क्लुप्त्या लढवून रोजच नित्यनैमिक धमाल करीत मनसोक्त जगल्याचे सात्विक समाधान काही औरच. साधारण किशोरावस्थेनंतर हे गल्लीतील दुसर्‍याला त्रासदायक पण आम्हाला आनंददायी असे धिकच्याव प्रकार हळूहळू बंद केले आणि आम्ही व्यावहारिक सुजाण नागरिक बनलो.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com