‘मिसि-जिइबी’च्या तीरावर..

उत्तर अमेरिका खंडाचा खरा इतिहास आपल्या पाण्यात सामावून एका नदीचा प्रवाह अखंड वाहत आहे. ती आणि तिच्या उपनदयांनाच पंधराव्या शतकात त्यांच्या काठावर पोहचलेल्यांचा खरा इतिहास व कर्तबगारी ज्ञात आहे. धर्म, इतिहास व साहित्य प्रा.डॉ.राहुल हांडे यांची ‘बखर अमेरिकेची’ ब्लॉगमालिका...
‘मिसि-जिइबी’च्या तीरावर..

जगातील सर्व मानवी संस्कृतींना जन्म देणारी, घडवणारी, फुलवणारी आणि संपवणारी ही कोणत्याही नदीची मानवी ओळख. नदी मानवी संस्कृतीची जन्मदात्री (The river is the birthplace of human culture) असली तरी तिच्या स्वतःच्या जन्माचे रहस्य निसर्गात आणि भूगोलात दडलेले आहे. मानवाने तिच्या काठावर वस्ती करून स्वतःची संस्कृती घडवली. अनेक मानवी संस्कृत्या नदयांच्या पाण्यावर उभ्या राहून गगनाला भिडल्या आणि जमिनदोस्त ही झाल्या. ही प्रक्रिया निरंतर सुरूच आहे. असे असले तरी कोणत्याही नदीचे नैसर्गिक व भौगोलिक स्थान मात्र चिरंतन आहे. नदीचा उगम, तिचा प्रवास, प्रवासातील वाटां-वळणं आणि अखेर सागराला मिळणं, हे मानवाने संस्कृती निर्माण करण्याच्या आधीही असेच होते आणि जगातील सर्व मानवी संस्कृत्या नष्ट झाल्या तरी असेच राहणार आहे.

मानवाने भाषेची निर्मिती केल्यानंतर त्याची संस्कृती निर्माण होत गेली. मात्र मानवाची भाषा आणि तिच्या आधारे निर्माण झालेली संस्कृती मानवाच्या विविध टोळया नदीच्या काठावर स्थिरावल्यानंतरच अस्तित्वात येऊ शकल्या. निसर्गाच्या व्याख्येत ‘पशु’च असलेल्या मानवाच्या टोळयांचे रुपांतर समाजात करणा-या नदयाच आहेत. आपल्या कथां किंवा दंतकथांमध्ये गंगेला पुन्हा धरतीवर आणणारा भगिरथ रंगवून माणसाने नदीवर नियंत्रण मिळवण्याचा कितीही प्रयत्न केला. तरी हा सर्व त्याच्या मनाचा खेळच असतो. कारण त्याच्या अगणित पूर्वजांना, त्याला आणि त्याच्या अगणित भावी पिढयांना आपल्यात सामावून घेऊन नदी अशीच वाहत राहणार आहे.

कितीही गौरवशाली सांगितला किंवा विकृत केला तरी माणसाचा खरा इतिहास नदयांनाच माहित आहे. त्या बोलू लागल्या तर आजच्या अनेक मान्यतांना हादरा बसेल. त्या बोलू शकत नाहीत. त्यामुळेच माणूस आपल्या ऐतिहासिक घोटाळयांच्या नावा त्यांच्या प्रवाहावर वाटेल तसा फिरवत असतो. हया चिरंतन तत्त्वाला अनुसरून उत्तर अमेरिका खंडाचा खरा इतिहास आपल्या पाण्यात सामावून एका नदीचा प्रवाह अखंड वाहत आहे. ती आणि तिच्या उपनदयांनाच पंधराव्या शतकात त्यांच्या काठावर पोहचलेल्यांचा खरा इतिहास व कर्तबगारी ज्ञात आहे. युरोपातील हे लोक येथे पोहचण्याच्या आधी दहा हजार वर्षांपासून काही मानवी समूह तेथे वास्तव्य करून होते. या नव्या लोकांनी त्यांना ‘आदिवासी’ अथवा ‘रेडइंडियन्स’ (Red Indians) असे संबोधले. या भूमीवरचे आदिवासी लोकांची भाषा ‘आनिश्नाबे’ (Anishnabe) किंवा ‘ओजिब्वे’ (Ojibwe) म्हणून ओळखली जाते.

आपल्या या भाषेत हे आदिवासी या नदीला ‘मिसि-जिइबी’ असे संबोधत. ‘मिसि-जिइबी’ याचा अर्थ ‘महान नदी’ (Great river)असा होतो. पंधराव्या शतकात आलेल्या फ्रेंच लोकांनी मिसि-जिइबीचे उच्चारण आपल्या उच्चारण पद्धतीने ‘मिसिसिपी’ असे करण्यास सुरवात केली. त्यामुळे मिसि-जिइबी म्हणजे महान नदी आज मिसिसिपी ( Mississippi ) म्हणून ओळखली जाते.

मिसि-जिइबी म्हणजेच आजच्या मिसिसिपी नदीच्या खो-यात राहणारे काही आदिवासी समूह शेती करत असल्याचे पुरावे उपलब्ध झाले आहेत. आजच्या संयुक्त राज्य अमेरिकेतील ( United States ) ‘मिनेसोटा’ (Minnesota) राज्यातील ‘इतास्का’ (Itaska) सरोवरातून मिसिसिपी उगम पावते. 3730 किमी वळसे-वळणे घेत मेक्सिकोच्या खाडीत (Gulf of Mexico) मिसिसिपी नदी सागरात विलिन होते. मिनेसोटा ते मेक्सिको खाडीपर्यंत वाहतांना मिसिसिपीला अनेक उपनदया येऊन मिळतात. मिसिसिपी आपल्या उत्तर-दक्षिण प्रवासात अमेरिकेतील 31 राज्ये आणि (Southern Canada) दक्षिण कॅनडाच्या काही भूभागाला ‘सुजलाम-सुफलाम’ करत जाते.

मिसिसिपी जगातील चौथी लांब अंतर कापणारी नदी आहे. तसेच प्रतितास वाहणार्‍या पाण्याच्या प्रमाणात दहाव्या क्रमांकावर येते. मिसिसिपीची संयुक्त राज्य अमेरिकेच्या इतिहासात व समृद्धीत अत्यंत महत्वाची भूमिका आहे. पंधराव्या शतकात युरोपियन लोक उत्तर अमेरिका खंडात येऊन वसल्यावर त्यांनी आदिवासी लोकांची कत्तल केली. उरलेसुरले नदी काठावरून दुर्गम जंगलात किंवा दक्षिण अमेरिका खंडाकडे पळून गेले. प्रारंभीच्या काळात युरोपातून येऊन अमेरिकेचे रहिवासी झालेल्या लोकांसाठी ही महान नदी खूप मोठा अडथळा होता.

मिसिसिपीमुळे त्यांना उत्तर अमेरिका खंडाच्या (North America continent) पश्चिम भागात पसरणे अवघड ठरत होते. काळाच्या ओघात मिसिसिपीचा वापर नाविक किंवा जलप्रवासाठी होऊ लागला. आजही मिसिसिपी अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम विभागणीची सीमारेखा मानली जाते. अमेरिकन संस्कृतीत आजही ‘अमुक कारखाना मिसिसिपीपासून पश्चिमकडील सर्वात मोठा कारखाना आहे किंवा तमुक पर्वत हा मिसिसिपीच्या पूर्वकडील सर्वात उंच पर्वत आहे’ असे बोलले जाते. 30 एप्रिल 1803 हा दिवस मिसिसिपी आणि अमेरिकेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. (The third president of the United States) अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन (Thomas Jefferson) यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीतील त्यांची सर्वात मोठी कामगिरी. त्यांनी या दिवशी त्यांनी केली होती.

नेपालियन बोनापार्टकडून (Napoleon Bonaparte ) त्यांनी मिसिसिपी नदीच्या पश्चिमेकडील 2,144,510 वर्ग किमी भूमी विकत घेतली. फ्रांसचा अधिकार असलेला हा भूभाग आता अमेरिकेचे ‘लुइसियाना’ ( Louisiana) राज्य म्हणून गणले जाऊ लागले. थॉमस जेफरसन यांच्या या कर्तबगारीमुळे संयुक्त राज्य अमेरिकेचा आकार दुप्पट झाला होता. नव्याने राष्ट्र म्हणून जन्माला आलेल्या अमेरिकेच्या वाढत्या लोकसंख्येसाठी अधिक भूमीची निर्माण झालेली आवश्यकता यामुळे पूर्ण होणार होती. लुइसियानाची खरेदी म्हणजे अमेरिकेसाठी अत्यंत लाभाचा सौदा ठरला होता. पाच सेंट प्रति एकर भावाने अवघ्या 1 कोटी पन्नास लाखांमध्ये (आजचे 283 मिलियन डॉलर) ही भूमी जेफरसन यांनी अमेरिकेच्या पदरात पाडून घेतली. (French) फ्रेंचांच्या मते ही एक निबिड अरण्य असलेली निरपयोगी जमिन होती. अमेरिकेने हा लुइसियाना भूभाग विकत घेतला. त्यावेळी सर्वसाधारणपणे पूर्वेला मिसिसिपी नदीचा उगमापासून उत्तरेकडील रॉकी पर्वत असे मोजमाप करण्यात आले.

फ्रेंच दर्यावदी ‘रॉबर्ट कॅविलेयर डी ला सैले’ (Robert Cavalier de la Salle) हा 9 एप्रिल 1682 साली या भूमीवर पोहचला होता. जो अमेरिकेच्या ज्या भूमीवर प्रथम पोहचेल ती भूमी त्याची. या त्यावेळच्या अलिखित नियमानुसार लुइसियानावर फ्रांसचे स्वामित्व मान्य करण्यात आले होते. जो अमेरिकेच्या ज्या भूमीवर प्रथम पोहचेल. ती भूमी त्याची या त्यावेळच्या अलिखित नियमानुसार लुइसियानावर फ्रांसचे स्वामित्व मान्य करण्यात आले होते. 1699 ते 1762 पर्यंत मिसिसिपीचा भाग म्हणजे लुइसियानावर फ्रांसचे प्रत्यक्ष शासन होते, त्यानंतर फ्रांसने ( France ) स्पेनला ( Spain) ही भूमी वापरण्यासाठी दिली.

1800 साली नेपोलियनने स्पेनकडून हा भूभाग परत घेतला. हया भागात आपले स्वामित्व सिद्ध करण्याची नेपोलियनची तीव्र ईच्छा होती. मात्र नियतीला ते मान्य नव्हते. त्याच्या भोवताली अशी परिस्थिती निर्माण झाली की त्याला हा भूभाग अमेरिकेला विकावाच लागला. इंग्लंड या आपल्या आद्य शत्रुला नमवण्यासाठी नेपोलियनला पैशाची आवश्यकता होती. 1800 सालाच्या दरम्यान त्याच्या एका जनरलने इंग्लंडशी झालेल्या लढाईत ‘सेंट डोमिंगु’ (St. Dominguez) बेट गमावले (आज ज्याला ‘हैती’ Haiti असे संबोधले जाते ) त्यामुळे अमेरिकेच्या दक्षिण किनार्‍यावरील बंदरांकडे जाणारे सर्व मार्ग बंद झाले होते.

फ्रांस आणि पश्चिम अमेरिकेची (West America) ही भूमी यांच्यामधील अटलांटिक महासागरामुळे ( Atlantic Ocean) तिच्यावर नियंत्रण ठेवणे देखील शक्य नव्हते. तसेच अमेरिकेच्या वाढत्या लोकसंख्येमुळे हया भूभागात अतिक्रमण होणे अटळ होते. नेपोलियनच्या सततच्या युद्धांमुळे त्याची फ्रांसची आर्थिक व सैनिकी क्षमता देखील कमकुवत झाली होती. अशा विविध कारणांनी नेपोलियनने हा भूभाग अमेरिकेला विकण्याचा निर्णय घेतला. अमेरिका महासत्ता का होऊ शकली? याचा एक दाखला आपल्याला लुइसियानाच्या खरेदीत दिसून येतो. हा भूभाग विकत घेण्यापूर्वी ‘लुईस आणि क्लार्क’ या दोन सर्वेक्षणकर्त्यांकडून थॉमस जेफरसन यांनी या भूभागाचे सर्वेक्षण करुन घेतले होते. लुईस व क्लार्क यांनी 8000 मैलांचा (12800 किमी) प्रवास करून या भूभागाचे सर्वेक्षण केले. ‘मिसुरी’ नदी प्रशांत महासागराला (Pacific Ocean) जेथे मिळते. तेथून तिच्या उगम स्थानापर्यंत, तसेच नदीच्या उत्तर-पश्चिम भागात लुईस आणि क्लार्क यांनी सर्वेक्षण केले. त्यांनी हया भागातील माणसांपासून जीवजंतूपर्यंत सगळया नोंदी केल्या.

त्यांच्या सर्वेक्षणात त्यांनी 180 वनस्पती आणि 125 प्राणी-पक्षी असे नोंदवले जे त्यावेळच्या संशोधकांना माहित नव्हते. त्यांच्या सर्वेक्षणात हा भूभाग आज जरी दुर्गम असला तरी नैसर्गिक संपत्तीने समृद्ध आहे. मेहनत घेऊन हा माणसांच्या जगण्यासाठी सुगम करता येईल. याची खात्री अमेरिकेला झाली. लुइसियानामध्ये आरकान्सस, कोलोराडो, ओहायो, कंसास, मिनेसोटा, मोंटाना, नेब्रास्का, न्यू मॅक्सिको, नॉर्थ डेकोटा, ओक्लाहोमा, साऊथ डेकोटा, टेक्सास आणि व्योमिंग (Arkansas, Colorado, Ohio, Kansas, Minnesota, Montana, Nebraska, New Mexico, North Dakota, Oklahoma, South Dakota, Texas and Wyoming) यांचा समावेश होता. मिसिसिपी आणि तिच्या उपनदया यांच्यामुळे हा भूभाग अत्यंत सुपिक होता.

मिसिसिपीच्या डाव्या बाजूच्या उपनदया सेंट क्रोइन्स, विस्कॉनसिन, रॉक, इलिनॉय, कास्कासिया आणि ओहायो (St. Croix, Wisconsin, Rock, Illinois, Cascasia and Ohio) या आहेत. तसेच उजव्या बाजूच्या मिनेसोटा, देसमानिस, मिसुरी, व्हाइट, आरकान्सस, रेड अशा आहेत. मिसिसिपी नदीवर संपूर्ण नियंत्रण आल्यामुळे अमेरिकेच्या इतिहासात एक नवे पर्व सुरू होणार होते. मिसिसिपीच्या दोन्ही तीरावर आता अमेरिका विस्तारला होता. नेपोलियननंतर रशियाच्या झारने अमेरिकेला ‘अलास्का’ ( Alaska) विकण्यात अशीच चूक केली. झारने अत्यंत कवडीमोलाने विकेलेल्या अलास्काने आज अमेरिकेला आपल्या खनिजसंपत्तीने मालामाल केले आहे. थॉमस जेफरसन यांच्यामुळे मिसिसिपीचे दोन्ही सुपिक व नैसर्गिक संपत्तीने समृद्ध तीर भविष्यातील एका महासत्तेचा इतिहास घडवणार होते.

- प्रा.डॉ.राहुल हांडे (8308155086)

(लेखक धर्म, इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com