अग्निदिव्यातून घडलेलं नेतृत्व

महाराष्ट्राचे शिल्पकार : यशवंतराव चव्हाण (भाग-1)
अग्निदिव्यातून घडलेलं नेतृत्व

महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आणि आधुनिक महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये अनेक व्यक्तींनी कष्ट घेतले. त्यामध्ये राजकीय नेतृत्वाची भूमिका ही अत्यंत महत्वाची असते. स्वातंत्र्यपूर्व काळ, द्विभाषिक राज्य आणि त्यानंतर संयुक्त राज्य झाल्यापासून ते आत्तापर्यंतच्या महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये जी प्रगती झाली त्यामध्ये राजकीय नेतृत्वाचाही मोठा वाटा आहे. एरवी आपण एका विशिष्ट वैचारिक बांधिलकीच्या नजरेतून त्या व्यक्तिमत्वाचे निरीक्षण अथवा विश्लेषण करत असतो. परंतु जेव्हा या व्यक्तीमत्वांचा, कार्याचा, त्यांचा विचारांचा, राजकारणाचा, निर्णयांचा, कर्तुत्वाचा या सर्वांगाने विचार करतो, तेव्हा ही माणसे मोठी का असतात हे आपल्या लक्षात येते. अशा राजकीय व्यक्तीच्या जीवनातील घटनांची, प्रसंगांची, त्यांनी केलेल्या कार्याची, घेतलेल्या भूमिकेची माहिती आपल्याला नसते कारण आपण त्या व्यक्तीकडे एक राजकीय व्यक्ती म्हणून बघतो. सध्याच्या राजकारणातील संपत चाललेली सभ्यता आणि विवेक हे बघितल्यानंतर राजकारण आणि त्याच्याही पलीकडे जाऊन हे व्यक्तिमत्व कशी होती अथवा आहेत, त्यांच्या जीवनातील समाजासमोर जास्त न आलेले प्रसंग, घटना माझ्या ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’.... ब्लॉगच्या माध्यमातून मालिका स्वरूपात वाचकांसाठी मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.

-राजेंद्र पाटील, पुणे

9822753219

आधुनिक महाराष्ट्राची

उभारणी करण्यामध्ये ज्या-ज्या व्यक्तींनी कष्ट घेतले, प्रयत्न केले त्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. यशवंतरावांचे व्यक्तिमत्व इतके महान आहे की, काही शब्दांच्या मर्यादेत राहून एका ब्लॉगच्या माध्यमातून मांडणे सोपे नाही. त्यामुळे यशवंतराव समजून घेताना आपण काही भागांमध्ये त्यांचे व्यक्तिमत्व समजून घेऊया. सांगली जिल्हयातील देवराष्ट्रे या आपल्या आजोळी यशवंतरावांचा जन्म झाला. त्यांचे वडील मूळचे विटे, तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील रहिवासी होते. तेथे त्यांचे लहानसे घर व एकर दोन एकराची शेतीवाडी होती. सरकारी नोकरीच्या निमित्ताने यशवंतरावांचे वडील कराडमध्ये बरेच दिवस राहून तेथेच दिवंगत झाले. वडील बंधू ज्ञानोबांना वडिलांचे जागेवरच नोकरीची संधी मिळाल्याने या कुटुंबाचे वास्तव्य कराडासच कायम झाले. वडिलांच्या मृत्यूसमयी श्री. यशवंतराव केवळ दोन तीन वर्षाचे होते. त्यांना पितृसुख लाभले नाही असे म्हणावे लागेल.

वडील बंधू ज्ञानोबा व गणपतराव. तसेच धार्मिक प्रवृतीच्या त्यांच्या मातोश्री विठाबाई यांच्या छायेखाली श्री. यशवंतरावांनी आपले शिक्षण कराड येथे सुरू केले. पण अंत:करणातील स्वातंत्र्यप्रेमाच्या उर्मीनी शालांत परिक्षेपर्यंतचा कालही सुरळीतपणे त्यांना चोखाळता आला नाही. टिळक हायस्कूलमधील झेंडा प्रकरण, श्री छत्रपती मंडळातील श्री शिवाजी उत्सव, राष्ट्रीय चळवळींतील संघटनाकर्य, भिंतीपत्रके, बुलेटिन आदिमुळे शालांत परीक्षा उत्तीर्ण होण्यासही कारावासामुळे त्यांना दोन तीन वर्षे आधिक कालावधी घालवावा लागला. या सर्व कालावधीत तसेच महाविद्यालयीन अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अन्यविषयावरील ग्रंथाचे सखोल वाचन व ज्ञान संपादन त्यांनी केले. त्यायोगे झालेल्या ज्ञानाच्या जोरावर वादविवाद व चर्चा करून त्यांनी वैचारिक बैठक पक्की केली.

सन १९४० – १९४१ च्या सुमारास वकिलीची परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर काही महिने त्यांनी वकिलीही केली. पण यशवंतरावांच्या मनाचा कल राजकीय चळवळीकडेच प्रामुख्याने असल्यामुळे लोकजागृतीचे त्यांचे कार्य अव्याहत चालू होते. त्याच सुमारास त्यांचा विवाह फलटणच्या मोरे घराण्यातील स्व. वेणूताई या सुकन्येशी झाला. सन १९४२ च्या राष्ट्रीय आंदोलनांत यशवंतराव भूमिगत राहून लोकजागृतीचे कार्य अविरतपणे करीत होते. सन १९४४ मध्ये त्यांना अटक करून स्थानबध्द केले. पण लवकरच सरकारी हुकूमात झालेल्या एका गफलतीमुळे ते बंधमुक्त झाले. नंतर झालेली चूक सरकारी नोकरांचे नजरेस आल्यावर त्यांना पुन्हा अटक करून येरवडा जेलमध्ये स्थानबध्द करून ठेवण्यात आले.

सन १९४४ मध्ये त्यांना कन्यारत्न झाले. पण दुर्देवाने ही कन्या त्यांना फार दिवस लाभली नाही. सन १९४४ मध्ये श्री. यशवंतराव चव्हाण जेलमध्ये असतांना त्यांचे वडील बंधू ज्ञानोबा निधन पावले. श्री. यशवंतरावांना त्यांच्या अकाली मृत्यूचे दु:ख सहन करावे लागले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर यशवंतराव आपल्या तेजाने विधीमंडळात पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून चमकू लागल्यावेळी त्यांचे द्वितीय बंधू श्री. गणपतराव यांचे निधन १५-१२-४७ या दिवशी क्षयरोगाने झाले. पुढे यशवंतरावांची पत्नी वेणूताई याही क्षयरोगाची बाधा झाली. मिरजेच्या हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले अशा सर्व सांसारिक दु:खात हालअपेष्टा सहन करीत यशवंतराव राजकीय क्षेत्रांत आपले पाऊल पुढे पुढे टाकीत चालले होते. याठिकाणी एक गोष्ट नमूद करावयास पाहिजे की, स्वातंत्र्य पूर्वकाळी जेमतेम कुटुंब पोषणाच्या परिस्थितीत यशवंतरावाच्या मातोश्री व वडील बंधु यांनी त्यांच्या राजकीय कार्यात अडथळा तर नाहीच आणला, पण त्यांच्या सहकार्यासही कोणत्याहि प्रकारे दोष दिला नाही.

(संदर्भ-माझ्या राजकीय आठवणी)

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com