Friday, April 26, 2024
Homeब्लॉगBlog : महिला सरपंच

Blog : महिला सरपंच

गावाकडे सरपंच म्हणजे एक वेगळाच रुबाब, अनोखी ऐट, चार लोकांमध्ये ईज्जत समोरून मिळणारा राम राम सरपंचाने फक्त हात करून स्वीकारायचा. मोठ्या हॉटेलमध्ये सरपंचाचे कुणी बिल घेत नाही. टपरीवर मात्र सरपंच बिल देत नाही अशी एकूण गावकीची परिस्थिती.

पण जर महिला सरपंच असेल तर
घर-दार, पोर-बाळ सांभाळून ओट्यावरच्या दगडावर धुनी धुताना ती दिसेल किंवा नसेलच रांजणात पाणी तर ओढ्यावर इतर बायांसारखी तीही जाईन. दोन हंडे आणि एक कळशी घेऊन खालच्या आळीतल्या हापशा वरून पाणी आणताना दिसेल. डोक्यावर घमेलं, घमेल्यात ईळा नाहीतर खुरप, आणि भाकरी घेऊन रानात खुरपायला जाता जाता एक कडेवर तान्हुल्याला बालवाडी मध्ये सोडतानाही दिसेल.
सरपंच बाई लोकांच्या रानात शे-दोनशे रुपये रोजाने कामाला जाताना दिसत असल तरी काही नवल वाटून घेऊन नका. यापुढचेही सांगतो. गावात दुष्काळ असेल रानात काही काम नसेल तर कुकडीच्या कॅनलवर, एखाद्या कच्च्या रस्त्यावर खडी फोडताना ती दिसेल. खटल्याच घर असेल तर ती दिसेलही गिरणीवर. घरी गोठा असेल तर ती दिसेलही गुर वळताना.

- Advertisement -

एक महिला सरपंच एवढी सगळी कामे करते का?

तर हो.
चार दिवसांपूर्वीची गोष्ट. कामानिमित्त गावाकडे जाणे होत असतं. बर्‍याच दिवसांनी गावाकडे चाललो होतो. त्यावेळी आमच्या शेजारच्या गावची सरपंच दिसली. मित्राची भाऊजयी आहे ती.

सकाळी सकाळी ओढ्याला म्हशी धूत होती. पिकप चा होर्न ऐकून म्हशी धुण्याच काम अर्ध्यात टाकून ती पिकप मध्ये जाऊन बसली. तो पिकप रस्त्याची काम करणार्‍या बायांना घेऊन चालला होता. तिला सरपंच होऊन तीन वर्षे झाली असतील. ती फक्त एकाच 15 ऑगस्टला गेली. कारण तिच्या सासूला तीचं पांढर्‍या कपड्यामध्ये बसलेल्या पुरुषांमध्ये बसणं आवडत नाही. मागच्या स्वातंत्र्यदिनाला ती शेतात फवारणी करायला गेली होती आणि तिचा नवरा गावात झेंडे फडकावत होता.

आता मि दुसर्‍या महिला सरपंचाची गोष्ट सांगतो. आमच्या गावची पहिली महिला सरपंच. तिच्या सरपंचपदाचा काळ 1995 ते 2000 असावं. एप्रिल मध्ये निवडणुका झाल्या, सप्टेंबर मध्ये तिची सरपंच म्हणून निवड झाली. हि सरपंचही संपूर्ण 5 वर्षात फक्त 3 कार्यक्रमांना गेली होती. ग्रामपंचायत मिटींगला हजर असल्यावर सही करावी लागते. ते सही करण्याचे रजिस्टर घरी यायचे. मग तिची सही घेऊन वापस जायचे.

हि 5 वर्ष अशीच गेली. पुढच्या काही वर्षात तिचा पोरगा पत्रकारिता सदृश काहीतरी करत होता. मग त्याने तीला मनामधारीफ या शब्दाचा अर्थ समजून सांगितला मग ती म्हणाली कि मि पण नामधारी सरपंच होते. दुसरी गोष्ट हि माझ्या आईची आहे.

वरील दोनही गोष्टीत 20 वर्षांचे अंतर आहेत. तब्बल 20 वर्षात परिस्थितीत काहीच बदल झालेला नाही. याच शेजारी गावच्या सरपंच बाईची पोरगी 12 वी पास झाल्यामुळे तीच लग्न लावून दिलय. पोरीला शिक्षणाची आणि एस.टीच्या पासची मोफत सोय आहे याचा तीला तपासही नाही.

बाकी बेटी बचाव बेटी पढाव जोरात चालूय.

ही सरपंच बाई ग्रामपंचायत मिटींगला जात नाहीत किंवा तिला जाऊ दिलं जात नाही. त्यामुळे तीला ग्रामपंचायतमध्ये येत असलेले वृत्तपत्र बघून स्री अत्याचार विरोधात एक मोहीम सुरु झालीय याचा मागमूसही नाही.

बहुदा या महिला सरपंचाना स्वातंत्र्यदिनाला जाऊ दिल जात नसावं म्हणून त्यांना स्वातंत्र्याचा अर्थ माहित नसावा.

– विनोद भीमराव सुर्यवंशी

    9142587777

- Advertisment -

ताज्या बातम्या