Type to search

Breaking News Featured ब्लॉग मुख्य बातम्या

Blog : विचार तरुणाईचा स्वच्छ सुंदर गावाचा

Share

मन करारे प्रसन्न !
सर्व सिद्धीचे कारण”

मन हा सर्वात सुंदर गोष्टींचा सुंदर शिल्पकार असतो. निरोगी शरीरात निरोगी मन वास करते. आपले शरीर एक सुंदर देवालय आहे आणि देवालयात मनरुपी देव वास करत असतो. मन जर सात्विक असेल, सात्विक विचाराने परिपूर्ण असेल तर आपल्या हातून नवनिर्मितीचे कार्य घडते व या कार्याने आसमंतांच्या चारी दिशा उजळून जातील यासाठी निरोगी मन असणे महत्त्वाचे आहे. निरोगी मन हे निरोगी शरीरात असते. शरीर निरोगी राहण्यासाठी स्वच्छतेचा फार मोठा वाटा असतो.

समाजपरिवर्तनाच्या कळसावर पताका लावण्याचे कार्य संत गाडगेबाबांनी केले. स्वतः निरक्षर असणाऱ्या या महामानवाला स्वच्छतेचे महत्व समजले. स्वतःचे आयुष्य त्यासाठी समर्पित केले. आपल्या अभूतपूर्व कर्तृत्वाने ‘स्वच्छतेचा’ वसा या राष्ट्रसंताने भारताला ज्ञात करून दिला. ‘जीवनात स्वच्छता श्रेष्ठ आहे’ हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे बाबांनी स्वतःच्या आचरणातून पटवून दिले. त्यांच्या उपदेशातूनच स्वच्छतेचा मंत्र मिळाला.

“भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. समृद्धीने व विविधतेने नटलेल्या भारताचा मला अभिमान आहे.” ही प्रतिज्ञा म्हणतांना आपल्याला आपल्या देशाविषयी अभिमान असण्याबरोबरच देशासाठी आपण स्वतःला करावयाच्या कर्तव्यविषयी जागरूकता असणे गरजेचे आहे. विविध नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या देशात सध्या वाढत्या लोकसंख्येमुळे, असंख्य बाबींमुळे कचऱ्याचे प्रमाण, अस्वच्छतेचे प्रमाण वाढतच आहे. अशा गलिच्छ वातावरणात राहिल्यामुळे आपली शाररिक क्षमता कमी होतेच आहे.

पण मानसिक आजार देखील होऊ शकतात. मी वैयक्तिक स्वच्छता राखू शकेल तरच आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यास पात्र ठरेन नाहीतर ‘दुसऱ्या शिकवी ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण अशी अवस्था होईल.’

आपण विदेशातील शहरांची स्वच्छता पाहून त्यांचे गुणगान गातो, मात्र तेथील स्वच्छता, शिस्त, सौंदर्य, सृष्टी व हिरवळ वाखण्याजोगी आहे, ती केवळ तेथे राहणाऱ्या लोकांमुळेच. त्यांच्या स्वच्छतेच्या सवयीमुळेच आहे, हे मात्र आपण विसरतो. आपण आपल्या मनाला, शरीराला, घराला, परिसराला स्वच्छ बनविण्यासाठी पाऊल उचलण्याची नितांत आवशक्यता आहे. आपण आपले घर स्वच्छ ठेवतो. पण आपला परिसर स्वच्छ ठेवत नाही.

अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांमुळे आपले आरोग्य धोक्यात येऊन आपला घामाचा पैसा व वेळ वाया जात आहे. आज सार्वजनिक ठिकाणी बसमध्ये, लोकल,ऑफिस,उद्यान, इमारती, रस्त्यांवर, गल्ली बोळात, आपल्याला अस्वच्छता दिसते. कुठेही थुंकणे, पान खाऊन पिचकाराने, सिगारेटची थोटके, खाद्य पदार्थांची वेष्टने, कागदाचे तुकडे, तंबाखू, गुटख्याच्या पिचकर्यांनी रंगविलेल्या भिंती दिसतात. आपल्या नद्या या सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारी बनल्या आहेत. कचऱ्याचे डोंगराच्या डोंगर शहरांमध्ये तयार होत आहेत.

किती जण आपल्या मुलांना स्वच्छतेचे महत्व सांगतात? त्याचे अनुकरण करतात? आपल्याकडे अनेक रोग हे अस्वच्छतेमुळे होतात. त्यामुळे घराची व परिसराची स्वच्छता हे उत्तम आरोग्याचे महत्वाचे अंग आहे. स्वतःप्रमाणेच, सबोवतालचा परिसरही स्वच्छ ठेण्याची जबाबदारी अंगी बांधावयास हवी.

“Cleanliness is next to godliness”- महात्मा गांधी या घोषवाक्यास अनुसरून मा. पंतप्रधान यांनी नेमके आपल्या मर्मावर बोट ठेऊन स्वच्छता अभियानाची सुरुवात केली आहे. आपण केवळ वैयक्तीक स्वार्थ साधत नाहीतर , ती एक मोठी देश सेवा व निसर्ग सेवाही आहे. “माझं गाव स्वच्छ असेल तर माझा देश स्वच्छ होईल” ही भावना रुजवायाची आहे.

आपला देश खेड्यांचा देश आहे. जोपर्यंत खेडे-स्वच्छ, सुंदर व निर्मल होणार नाहीत तोपर्यंत भारत स्वच्छ व सुंदर बनू शकणार नाही. स्वच्छतेच्या पायरीवर खंबीरपणे उभे राहून आरोग्याची कास धरूनच विकासाची समृद्धीची फळे चाखता येणार आहेत. माझ्या देशातील प्रत्येक परिसर माझाच आहे. मला त्या परिसरात अस्वच्छता पसरू द्यावयाची नाही हे माझे कर्तव्य राहील व मी सतत त्यासाठी प्रयत्नशील राहीन. राष्ट्रसंतांचे विचार जगवण्यासाठी-

“स्वच्छतेचे देशविकासाचे स्वप्न पाहून!
नित्याची धडपड ठेऊन!!
संतांचे विचार घेऊन!
देशाला , राष्ट्राला बनवू महान!!”

मृणाल पाटील, बी.वाय. के.कॉलेज

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!