BLOG : आम्ही राज्याचे गोंधळी!

0

राज्यात राजकीय गोंधळ उडवून देण्यात वाकब्गार असलेल्या शरद पवारांशी संबंधीत दोन बातम्यांनी 24 तासात लक्ष वेधून घेतले आहे.

एक आहे त्यांच्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील थेट सह्याद्री अतिथीगृहावर  झालेल्या गुफ्तगूची…तर दुसरी पवारांचे स्वप्न असलेल्या लवासावर राज्य सरकारने आणलेल्या टाचेची! दोन बातम्यांतील तर्क परस्परविरोधी. पण धागा मात्र एक…तोही पवारांचा! त्यामुळे याची चर्चा होणे अटळ. तशी झालीही! सत्तेतील भाजपा-सेनेतील विस्तव थंडावण्याचे चिन्हे नाहीत. उलटपक्षी सेनेकडून आता थेट भाजपावर राजकीय हल्ले सुरू झाले आहेत. तिरकमान हाती घेवून खुद्द उद्धव ठाकरेच भाजपावर तुटून पडल्याचे चित्र आहे.

शेतकरी संपावरून जमेल तेवढे भाजपाला अडचणीत आणण्यासाठी विरोधी पक्षांपेक्षा अधिक सेना सक्रीय आहे. या स्थितीत भाजपाचे अस्वस्थ असणे सहाजिक आहे. त्यामुळे पवारांनी फडणवीसांशी झालेले गुफ्तगू राजकीय फोडणीसह पसरवले. त्यात भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांचा हवाला देवून मध्यावधीचा केलेला दावा याच काळातील. त्यामुळे पवार काय शिजवतात? की फडणवीस सेनेला रोखण्यासाठी पटावर नवी चाल आखत आहेत? ही भाजपा-राष्ट्रवादीकडून मध्यावधीपूर्व स्थितीची चाचपणी तर नव्हती, अशा तर्कवितर्कांना ऊत आला आहे. पण याप्रकरणाला दुसरी बाजूही आहे.

कालच मुख्यमंत्र्यांनी कॅगच्या अहवालानंतर पवारांचे स्वप्न असलेल्या लवासा प्रकल्पाला असलेला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा रद्द केला. हा एकप्रकारे पवारांना राजकीय दणका मानला जातो. आधीच्या आघाडी सरकारने लवासासाठी नियम वाकवत, तुकवत अनेक करामती केल्या होत्या. त्याची चर्चाही झाली.

अनेकदा अडचणीत येवूनही लवासा प्रकल्प धावत राहिला. पण आताच्या सरकारी फर्मानानंतर त्याची वाटचाल बिकट होणार, हे वास्तव! त्यामुळे पवारांनी फडणवीसांना यासाठी काही गळ घातली की काय, असाही एक कयास बांधला जातो. पण पवार माहीर खिलाडी आहेत. ते लवासासाठी प्रतिष्ठा याप्रकारे पणाला लावतील, याची शक्यता कमीच! त्यांचे मोठा राजकीय डाव मांडण्याचे कसब सर्वश्रृत आहे. त्यामुळे एकीकडे लवासाला दणक्याचा संभ्रम निर्माण करून वेगळाच डाव टाकण्याची खेळी यामागे तर नाही, ही शंकाही आहेच! पवार कोणालाही उमगले नाहीत. त्यामुळे ते काय करतात, याचे सातत्याने राजकीय आकर्षण.

राजकारणाला तर गोंधळ आणि गोंधळी अधिक प्रिय! तेव्हा काही शिजलच असेल तर ते लवकर समोर येवो!!

LEAVE A REPLY

*