Blog : लाईमलाईट, पत्रकारिता आणि अनुभवाचं जगणं

0

पत्रकार उर्फ ‘जर्नलिस्ट’ ला ‘जनरलिस्ट’ही असावं लागतं. म्हणजेच प्रत्येक विषयावरची किमान माहिती आणि ठराविक विषयांमध्ये विशेष ज्ञान. मुळात भारतीय शिक्षणव्यवस्थेत दहावीनंतरचे शिक्षण नोकरी मिळवण्यापुरतं उपयोगी असतंं, पण प्रत्यक्ष अंमलात येते ती ‘माहिती आणि ज्ञान’, जे आपण दहावीपर्यंत मिळवून मोकळे होतो. सुखद अपघात आणि इष्टापत्तींच्या साखळीतून पत्रकारितेतल्या कारकीर्दीत माझी सुरुवात झाली.

इतर आईवडिलांप्रमाणे माझ्यावर अमुक एका व्यवसायाची स्वप्नं लादण्यात आली नाही; त्यामुळेच अनेक कल्पनांचं-शक्यतांचं जग नियतीने माझ्या समोर उलगडलं. पत्रकारितेचं स्वप्न करियर म्हणून तसं उराशी कधीच बाळगलं नव्हतं. परंतु महाविद्यालयीन जीवनापासूनच माझ्या  रुममध्ये मी एक बोर्ड तयार करुन प्रत्येक आठवड्याला त्यामध्ये एक विषय घेऊन भिंतीवृतपत्र विशेषांक काढत असे.  वाचन, लेखन याची आवड शालेय जीवनातच लागगी. त्यामुळे एमबीए, वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रिकीच्या चाकोरीत मन कधीच रमलं नसतं. बहुतेक म्हणूनच देवाने माझ्या पदरच्या शिदोरीत भाषांवर पकड, शब्दसंग्रह, सादरीकरणाची हातोटी, जिज्ञासा आणि लोकांना बोलतं करायचं कसब दिलं असावं.

बालपण जालन्याला गेल्यानंतर औरंगाबाद माझ्या आयुष्यात आलं आणि मी माझ्याच नकळत औरंगाबादकर झालो. औरंगाबादचं वेगळेपण, औद्योगीकरणाची भरभराट तरी पुण्यामुंबईचा नसलेला बजबजाट हा मला भावला. ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्याने भारलेल्या परिसराचा लळा लागला. प्रारंभी जालन्याच्या सरस्वती भूवन (एसबी) शाळेत प्रवेश झाला आणि औरंगाबादच्या याच महाविद्यायलयात मी प्रवेश घेतला. नंतर पत्रकरितेचे स्वप्न उराशी बाळगून लोकमतच्या हॉनिर्मन कॉलेज ऑफ मास कम्युनिकेशन येथे पत्रकारितेची पदवीसाठी दाखल झालो.

तिथेच ही बीजं रुजली. शाळेतल्या प्रार्थनासभांत सामान्यज्ञानाची प्रश्नोत्तरं मुलांना विचारत, वक्तृत्वस्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या चढाओढी यातूनच सामाजिक जाणिवा आणि सभा धीटपणा रुजवायला शाळेने खूप हातभार लावला. शैक्षणिक वाचनाशिवाय अवांतर वाचनावर गुरुजन आम्हाला भर द्यायला सांगत आणि आम्हीही तो पाळत असू. यामुळे सार्वजनिक आयुष्यात वावरतांना, चमूत राहून काम करतांना जो आत्मविश्वास मिळतो, तो इथून आला.

महाविद्यालयीन शिक्षणाच्या निमित्ताने ‘हॉनिर्मन’ कॉलेज मध्ये पत्रकारिता शिकवणार्‍या प्राचार्य डॉ. उमा महेरोत्रा आणि प्रा. शाहेद शेख सरांनी  कुठल्याही विषयाचं आकलन आणि विश्लेषण नानाविध प्रकारे करणं फार महत्वाचं आहे हे शिकवले. त्यामुळे एक प्रसंग- समर्थक आणि विरोधक कुठल्याप्रकारे हाताळतात, तुम्ही नि:पक्ष राहून प्रत्येकाच्या मानसिकतेत कसे शिरता आणि सर्वांगीण दृष्टिकोनातून मांडणी कशी करता हे त्याचं सार. वाणिज्य,विज्ञान आणि संगणक सॉफ्टवेयर चे शिक्षण घेतेले पण त्याची नाळ जुळू शकली नाही. जी पत्रकारिता शब्दसंवादामध्ये जुळली.

त्यानंतर पदव्युत्तर शिक्षणात ज्या विषयांना न्याय देता येणार नाही शिवाय बुध्दांक(आयक्यू) आणि रस नाही त्यांच्यापेक्षा कौशल्यांवर आधारित अभ्यासक्रमांचा शोध होता. एक सणकेत बीएससीजेनंतर जनसंज्ञापनआणि पत्रकारिता महाविद्यालयाचा मास्टर डिग्रीसाठी अर्जही भरला.

परीक्षेत व्यवस्थित उत्तीर्ण होऊन मास कम्युनिकेशनला दाखल झालो. कॉलेजमधली लुटुपुटूची लढाई आयुष्यातल्या पानपताला सामोरं जायला कितपत मदत करते हा वादाचा विषय ठरेल. मात्र ‘लोकमत‘च्या कॉलेजमधील वलयाने ख्यातनाम प्राध्यापक, व्यवसायातील दिग्गजांचं मार्गदर्शन मिळत गेलं.

मुद्रित/टीव्ही पत्रकारितेसाठी लागणारी यंत्रं हाताळणं, विषयाची मांडणी आणि माध्यमाच्या गरजांचा मेळ बसवणं, प्रोजेक्ट्स हाताळणं, कॉलेजमधील अभ्यासक्रमाचा भाग म्हणून व्हिडिओ बुलेटिन्स, माहितीपट(ड्युक्यूमेंट्ररीज) आणि अनियतकालिक वर्तमानपत्रं काढणं इत्यादी धडे वास्तवाच्या पत्रकारितेची झलक देऊ लागले.

उन्हाळी सुट्या म्हणजे मजा ही व्याख्या इतिहासजमा झाली. त्यामुळे सुट्टयातही कामे करत गेलो. मोठ्या चॅनल्समध्ये उमेदवारी करायला आमचा अख्खा वर्ग भारताच्या महानगरांत गेला. कुणी दिल्ली, मुंबई, चैन्नै, कोलकाता इथल्या कार्यसंस्कृतींशी जुळवून घेत गेला. मलाही एका साखळी दैनिकात फलोशिप मिळाली. ही बिनपगारी शिकवणी व्यवसायाचे छक्केपंजे दाखवून गेली. एक विद्यार्थी म्हणून व्यवसायाप्रती जे कुतुहल, समज-गैरसमज होते, ते तावून-सुलाखून निघाले.

सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे टीव्ही पत्रकारितेतल्या ग्लॅमरचा. टीव्हीवर तर स्टूडियोत भिरभिरणारी माशीही दिसते, आणि चेहर्यावरची माशीही न हलणारे महाभागही दिसतात. तुमचं दर्शन व्हावं म्हणून लोक टीव्ही लावत नाहीत, तर तुमच्या बातमीचा परिणाम त्यांच्यावर कसा होणार आहे ते त्यांना जाणायचं असतं. त्याखालोखाल तुम्ही किचकट बातमी किती सुलभतेने समजावता यावर तो लोकाश्रय ठरतो. या निकषांवर तुमची गफलत झाली तर तुमचा अध्याय सुरू व्हायच्या आधी संपू लागतो.

पडद्यावर दिसणारे वृत्तनिवेदक हे चॅनेलच्या हिमनगाचं टोक असतात. चॅनेलवर दिसणारं एकूण एक अक्षर, एकूण एक दृश्य ह्यांची सांगड घालणारे जाणकार, संपादक, संकलक, आणि निवेदकाच्या तोंडी जाणार्या 80 टक्के शब्दांचे बोलविते धनी हे लाइमलाइटच्या कवडशात न्हात नाहीत, पण त्यांचा सिंहाचा वाटा असतो. जवळजवळ दहा महिने याचा अभ्यास केला. मुंबईतल्या इंग्रजी दैनिकात सर्वप्रथम वृतसंकलनासाठी संधी मिळाली. दरम्यान, आकाशवाणीवरील निवेदन, रेडिओ जॉकीचे दोन अभ्यासक्रम मी पदरात पाडून घेतले.

व्यापार जगतातले आकडे, गुन्हेगारी जगतातली रक्ताची थारोळी, ग्लॅमरचं बेगडी कचखड्यांचे चकचकाटीत जीवन, क्रिकेटमधले विक्रम यापलिकडेही सामान्य नागरिकांना हवे असतात दैनंदिन आयुष्यातले अपडेट्स. कांदाचे भाव वाढले, पाणीकपातीने काय अडचण होते आहे. खड्ड्यांची डागडुजी सोडून नेते त्यांच्यावर ड्रामा कसा करतात, मलेरिया, डेंगी शहरात का पसरत आहे, आपण त्यात स्वत:साठी काय करावं, पेट्रोलचे भाव, नोटाबंदी-या बातम्या त्यांच्या दैनंदिन जीवनात खरंच अर्थपूर्ण ठरतात.

गेल्या चार वर्षांत भेटलेल्या सेलेब्रिटींपेक्षाही केलेल्या बातम्यांचं वेगळेपण जास्त लक्षणीय वाटतं… वांद्रे-वरळी सीलिंकवर उद्घाटनापूर्वी जायला मिळणं,  मुंबईच्या जमिनीखाली शेकडो फूट पसरलेल्या जलवाहिन्यांतून फिरणं, मोनोरेल-मेट्रो सारख्या प्रकल्पांची रचना-डब्बे ’याचि देही’ पाहणं,  एचाअयव्ही बाधितांसाठी विवाह नोंदणीची वेबसाईट इत्यादी असाइनमेंट आजन्म लक्षात राहतील.

नाशिकला आल्यावर ‘देशदूत’मध्ये घुमान येथे पार पडलेल्या साहित्य संमेलनाचा अनुभव.  तेथील शिख बांधवांनी 7 दिवस दिलेले प्रेम, आदर, एका मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीची हैद्राबादला झालेली राष्ट्रीय पत्रपरिषद, विमानातील तो सुखद अनुभव, तृतीयपंथीयांची दिवाळी, समरतींची दु:ख याबद्दल बातम्या करताना आयुष्यात बरेच काही शिकायला मिळाले.

या बातम्या, पत्रपरिषदा करताना रिपोर्टरच्या आयुष्यात रोमांचकता नाही असं कोण म्हणेल? दुसर्‍या पक्षी वेगळा अनुभव  दादरला कबुतरखान्यात झालेला बॉम्बहल्ला कामयस्वरुपी मनात कोरला गेला. माणूस पत्रकार झाला म्हणून शिक्षण थांबत नाही. प्रत्येक दिवस, प्रत्येक व्यक्ती ही कुठल्या न कुठल्या नात्याने काही न काही शिकवून जाते. अगदी तान्हेपणी टीव्हीवर सलमा सुलतान, सरला माहेश्वरींनी यांना बातम्या देतांना पाहायोचो आणि आपणही कधी काळी बातमी या क्षेत्रात यावे असे वाटायचे. औरंगाबाहून प्रकाशित होणारा अंनत भालेराव यांच्या ‘मराठवाडा’चा कृष्णधवल अंक मी मुखपृष्ट ते मूलपृष्ट वाचून काढत असे त्यातून वाचनाचे आणि बातम्यांचे बाळकडू मिळालं.

त्यातून पुढे वाचन, लेखनाची आवड वाढत गेली. माझ्याकडे असलेली भाषांवरील पकड आणि शब्दसामर्थ, संग्रह या डिव्हाईन देणगीसाठी कुणाची पुण्याई साकारली हे माझं मलाच माहित नाही. यामध्ये सर्वांत मोठं योगदान औरंगाबादचे माझे गुरुजन आणि खुद्द औरंगाबादचं आहे. आमच्या लहानपणी केबल टीव्हीचं लोण नुकतंच पसरू लागलं होतं. शहरपातळीच्या बातम्या रोज केबलवर पहायला मिळणं खूप नाविन्यपूर्ण वाटायचं. औरंगाबादचं रोजचं एसीएन बुलेटिन, नीलिमा गठडी अशा निवेदकांचं सूत्रसंचलन पाहून पहिल्यांदा जाणवलं की, ही कला फक्त महानगरांची मक्तेदारी नाही. औरंगाबादमध्येही याला मूर्त रूप देणारे जाणकार नव्वदीच्या दशकापासून होतेच, याचं महत्त्व आज जाणवतं.  आज सॅटेलाइट वाहिन्यांच्या निर्मितीमूल्यांना पाहतो, तेव्हां औरंगाबाद केबल वरील बातम्या, आकाशवाणी औरंगाबाद अविनाश पायगुढे प्रादेशिक बातम्या देत आहे हा कणखर आवाज कानात गुंजतो/ औरंगाबादच्याच कलाकारांनी बनवलेल्या जाहिरातींचा  गोडवा मनाला भिडतो.

मराठी मुलं हिंदी संभाषणात कमी नाहीत, तरी आपल्या उच्चारांवर मराठी हेल जाणवतात. हीच गोष्ट बर्‍यापैकी इंग्रजीबाबतही जाणवते. त्यासाठी दर्जेदार हिंदी आणि इंग्रजी वाचन,वेचनं खूप महत्वाचं आहे. माझी आई सौ. माधुरी कुळकर्णी वाचनप्रेमी. ती माझ्या बालपणीच खूप म्हणी आणि वाक्प्रचार वापरत असे. त्याचा पत्रकारितेत  खूप उपयोग झाला. बाबांची साहित्याची आवड माझ्यातही रुजत गेली.

ते मागील अनेक दशकांपासून (सुमारे 50 वर्षांपासून) आजही सकाळी नभोवाणीचे सातपन्नासचे औरंगाबाद नभोवाणीवरुन दिले जाणारे बातमीपत्र ऐकतात. त्यांच्यातला गुण  माझ्या रक्तात उतरला असावा.. वाचनाची आवडही विरासत मध्ये मिळालेली देणीगीच.

अगदी त्यांच्या लाकडी कपाटात आजही ठेवल्याल्या मृत्यूंजयचे अवस्था आज जीर्ण झाली असेल परंतु त्यांचे कादंबरी वाचनाचे गुण तंतोतंत माझ्यातही उतरले असावे … कोण म्हणतं माणूस स्वकर्तृत्त्वाने पूढे जातो…..? आई-वडिलांचे  अनुवंशिक गुण, संस्कारही तूम्हाला नकळत घडवत असतातच. जीवनाच्या प्रत्येक वळणावर.

माझा मराठी व्यासंगही त्यांनीच फुलवला. नेमकंपणा आणि समर्पकता हे सर्व नोकरीत लागू होते. ते लिखाणात आणि पत्रकारितेत जास्त महत्वपूर्ण आहें, ते अनुवांशिकतेने मलाही उपयोगी आलं. पत्रकाराला भीडभाड नसावी आणि असल्यास ती काढण्यात हे सगळं खूप कामी आलं. ‘कुठलंही काम करायला लाजू नकोस, श्रमप्रतिष्ठा जप’ असं आई-बाबा नेहमी सांगायचे…. त्या श्रमप्रतिष्ठेचा आदर मी सदैव करत आलोय.

पुढे चारचौघांमध्ये पुढाकार घेऊन संभाषण, वाटाघाटी करायला हेच कसब कामी आलं. आज विद्यार्थीदशा एक तप उलटले आहे. ही बीजं पेरणार्‍या गुरुजनांची खूप आठवण येते,  बहिणीचा-तनुजाताईचा- वाटाही माझ्या जडणघडणीत मोलाचा आहे. तिनेच माझ्यातील पत्रकारितेतील किडा हेरला आणि याला पत्रकारितेचे शिक्षण द्या म्हणून पाठिंबा दिला… औरंगाबादच्या एका साप्ताहिकात काही महिने आणि नंतर इंग्रजी दैनिकामधील माझा उणापूरा अनुभव मला खूप काही शिकवून गेला. या वळणावर मागे वळून पाहतांना कृतार्थ वाटते.

आज नाशिकमधील एका नामांकित दैनिकामध्ये मी कार्यरत आहे…… इथपर्यतचा प्रवास संघर्ष आणि असंख्य अडीचणींचा ठरला असला तरी मी कृतकृत्य आहे. कारण बातमी आणि कला माझ्या श्वास आहे.. मनाच्या एका कप्प्यात तो मी आजही जतन करतो तेव्हा जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती मला मीच वाटतो.

मनुष्यासाठी काय हवे असते याचे उत्तर व्यक्तीसाक्षेप आणि बदलणारे मिळेल परंतु मला वार्तांकण करताना समाधी अवस्थेचा अनुभव मिळतो. भलेही माझ्याकडे आज भौतिक संपत्ती, लक्झरियस सुखे नसतील तरीही मी स्वत:ला सर्वात श्रीमंत समजतो. कारण माझ्याकडे कामात समाधान, कृतकृता आहे… कोण म्हणेल की जेमतेम वेतनावर माणसाला सुखी राहता येत नाही.?

पत्रकारितेमुळे मला  परम संगणकाचे जनक डॉ. विजय भटकर, डॉ. ऐपीजे अब्दुल कलाम, अभिनेता प्रशांत दामले. अतुल कुलकर्णी, स्मिता तळवळकर, सोनाली कुलकर्णी, डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे, मेळघाट अभयारण्यात आदिवासींसाठी काम करणारे डॉ. अविनाश कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे, राज ठाकरे, अध्यात्मिक धर्मगुरू दलाई लामा, नाना पाटेकर, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, परेश मोकाशी, हरिश्चंद्रांची फॅक्टरीमधील नंदू माधव, वीणा जामकर, प्रथमेश परब, महेश मांजरेकर, आशा भोसले, सचिन तेंडुलकर हे आणि अजून कितीतरी कलाकार, खेळाडू, राजकारणी, उद्योगपती यांच्याशी संवाद साधून मुलाखत मला कधी घेता आली असती का? रिपोर्टरच्या आयुष्यात रोमांचकता, थरार, नावीन्य नाही असं कोण म्हणेल?

-प्रिन्स ऑफ केव्हेज लॅण्ड

LEAVE A REPLY

*