Blog : चला आपण गळे काढू; जोरजोरात ‘डान्स करू

0

जमले का हो सगळे?…

छान ! चला तर, आता मोठमोठ्याने गळे काढू, छान पैकी ‘डान्स’ करू

ऐ छोरा… चल बजाव डीजे…

म्हणा माझ्यामागे ‘एक लिंबू झेलू चला, दोन लिंबू झेलू’…..

काय हे गाणं नाही आवडलं? बालिश होतंय, पांचट होतंय, वेड लागल्यासारखं वाटतंय?

ठिक आहे, तर मग या ओळी म्हणू, बघा तुम्हाला नक्कीच आवडेल

चांगभलं, चांगभलं, सरकारी दवाखान्याचं चांगभलं

चांगभलं चांगभलं, सार्वजनिक आरोग्यसेवेचं चांगभलं

सरकारी औषधांचं चांगभलं, सरकारी ऑक्सिजनचं चांगभलं

कंत्राटदारांचं चांगभलं, टग्या अधिकाऱ्यांचं चांगभलं

सोम्या गोम्यांचं चांगभलं, ऐऱ्यागैऱ्यांचं चांगभलं

चांगभलं हो चांगभलं, खासगी दवाखान्याचं चांगभलं

लक्झरी रुमचं चांगभलं, लाखांच्या ऑक्सीजनचं चांगभलं

चकाचक आरोग्याचं चांगभलं, पटापट बिलाचं चांगभलं

झटपट पैशांचं चांगभलं, आरोग्याच्या विम्याचं चांगभलं

.. अरे काय झालं रे, परत तुम्ही थांबला?…

कोण….? कोणी आलंय म्हणून थांबला का? डिस्टर्ब झालं तुम्हाला..कोण आलंय बघू?

अरे ही तर गरिब बाई.फाटकी बाई.मरतुकडं पोरगं घेऊन आली कडेवर…

उगाच आपल्या रंगात भंग करेल ती. फुकटात औषधं मागेल. फुकटात रुग्णालयात जागा मागेल, फुकटात ऑक्सीजन मागेल.‍…लोकशाहीची आण देईल, पाच वर्षातून कधी तरी दिलेल्या मताची जाण करून देईल. बाबासाहेबाच्या घटनेबद्दल सांगून पकवेल. गांधीबाबाची मानवता सांगून उबवेल. आन आपल्याला त्रास देईल, समाजावर बोझा टाकेल. हाकला, हाकला तिला कुणीतरी…!!

हाकलले छान, मरु दे पोर तिचं, काढू दे मेलीला मेडिक्लेम, कळू दे तिला ‘ग्लोबलायझेशन’चे तत्व. ही फुकटी प्रवृत्ती काय कामाची…

गेली एकदाची तिची ब्याद. ..

छान वाटलं ना आता. मोकळं वाटतं ना आता. आपल्या वाटेचा ऑक्सीजन घेऊन जात होती. भिकारीन कुठची.

चला तर, पुन्हा एकदा माझ्याबरोबर नाचा, मोठमोठ्याने गळे काढा, धूंद होऊन गाणे म्हणा

लोकशाहीच्या नावानं चांगभलं, मानवतेच्या नावानं चांगभलं

मूल्यांच्या नावानं चांगभलं, घटनेच्या नावानं चांगभलं

ग्लोबलायझेशनच्या नावानं चांगभलं. चांगल्या दिवसासाठी चांगभलं.

राष्ट्रवादाचं चांगभलं, देशप्रेमाचं चांगभलं

चांगभलं हो चांगभलं, स्वातंत्र्याचं चांगभलं, लोकशाहीच्या नावानं चांगभलं!!!

-पंकज जोशी (digi.edit1@deshdoot.com)

LEAVE A REPLY

*