Blog : सार्वजनिक बांधकाम निरंकुश ?

नेवासा तालुक्यातील प्रमुख रहदारीच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. विशेषतः नेवासा तालुक्याच्या हद्दीतील श्रीरामपूर ते नेवासा व नेवासा ते शेवगाव या राज्यमार्गावरील वाहतुकीचा विचार करता रस्त्याची रुंदी दुहेरी रस्ता म्हणावा अशी नाही. रस्ता चांगला असतानाही दोन मोठी वाहने जाताना एक वाहन साईडपट्ट्यावर घेतल्याशिवाय वाहन जावू शकत नाही. रहदारीचा विचार करता हा रस्ता चारपदरी होणे आवश्यक आहे. या रस्त्याची रुंदी वाढवण्याच्या महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष देणे तर दूरच. मात्र पडलेल्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावर अनेकांना जीव गमवावा लागला तरीही या रस्त्याची दुरुस्ती होण्याची खड्डे बुजवण्याची कार्यवाही व्हायला तयार नाही.

आठवड्यापूर्वी रास्तारोको आंदोलन झाले मात्र रस्त्याचे संथगतीने सुरु असलेले काम पाहता किमान झालेल्या कामाच्या जागेवर पुन्हा खड्डे पडेपर्यंत हे काम पूर्णत्वास न्यायचे नाही असे ठरवले आहे की काय असे वाटू लागते. 50 किलोमीटरपेक्षाही कमी लांबीच्या या रस्त्यावरील खड्डे आठवडाभरातही बुजवता आले नाहीत. काम लवकरच होणार, पुढच्या महिन्यात होणार असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दिले जात आले. महिनाभरात तिघांचे बळी गेल्यानंतरही कामाबाबत गांभीर्याने घेतले गेले नाही. आता आश्वासन देवून काम सुरु केल्याचे भासविले गेले असले तरी अद्याप शेवगावपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवलेले नाहीत तसेच नेवासा ते श्रीरामपूर रस्त्यावरील नेवासा तालुका हद्दीतील खड्डेही बुजवले गेले नाहीत.

केवळ सुरुवात केली जाते व थोडेफार काम करुन पुन्हा आंदोलनाची वाट पाहिली जाते. मागील सरकारप्रमाणे या सरकारच्या काळातही विकास कामांबाबत अशीच बेपर्वाई दिसून येत आहे. एखाद्या मोठ्या नेत्याचे आगमन होणार असल्यास दोन दिवसात अनेक किलोमीटरचा नवीन रस्ता करण्याची करामत दाखवण्याची क्षमता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे असताना केवळ खड्डे बुजवण्याचा निर्णय घेण्यासाठी व तो कृतीत आणण्यासाठी तीन महिन्याचा काळ का लागावा? लांबलेल्या पावसाळ्यानंतर दोन महिन्यापूर्वी श्रीरामपूर हद्दीतील श्रीरामपूर नेवासा रस्त्यावरील खड्डे बुजवले गेले. मग नेवासा तालुक्याच्या हद्दीतील खड्ड्यांनाच मुहूर्त कसा मिळाला नाही ?

सार्वजनिक बांधकाम विभागावर कोणाचेच नियंत्रण कसे नाही? विशेषतः मतदारसंघाचे प्रतिनिधी मंत्री असतानाही सार्वजनिक बांधकाम अधिकार्‍यांवर धाक असल्याचे जाणवत नाही. शेतकरी व जनतेसाठी पाण्याइतकेच महत्व रस्त्यांना देखील आहे. जनतेने ओरडून ओरडून अनेकदा जागे करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा सुस्त प्रशासनावर परिणाम होत नाही. फडणवीस सरकार गेले व ठाकरे सरकार आले परंतु प्रशासन गतीमान असल्याचे नेवासा तालुक्यात तरी दिसले नाही.

ठेकेदार व्यवस्थित काम करतो की नाही? त्यावर नियंत्रणासाठी कोणी खरेच असते का? असा प्रश्नही जनतेला पडतो. नुकताच तरवडी रस्त्यावर पुलाच्या बेपर्वाईच्या कामामुळे एका तरुणाचा बळी गेला. याला जबाबदार कोण?

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीतील रस्त्यांची डागडुजी, त्यावर होणारा खर्च, प्राधान्यक्रम याची माहिती जनतेला होण्याची गरज आहे. बेपर्वाई-निष्काळजीपणाच्या बळींना जबाबदार असलेल्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल तेव्हाच प्रशासन गतीमान होईल. ती हिंमत दाखवली जायला हवी.

– अशोक पटारे, नेवासा