Type to search

Featured ब्लॉग

Blog : बना उत्तम ट्युटर

Share
Blog : बना उत्तम ट्युटर, Private Tutor Career Options

एक ट्यूटर म्हणून तुमचे सर्वात महत्त्वाचे काम आहे, ते म्हणजे आपण शिकवत असलेल्या विषयाचे मुलांना चांगले आकलन होऊन त्यांनी त्यात चांगले मार्क्स मिळवावेत, यासाठी प्रयत्न करणे.

सध्या कॉलेजच्या मुलामुलींपासून ते अगदी बालवाडीत जाणार्‍या मुलांपर्यंत प्रत्येकाला शाळा-कॉलेज सोडून इतर ठिकाणी खासगी ट्युशन लावण्याकडे पालकांचा कल वाढतो आहे. किंबहुना आपल्या पाल्याला ट्यूशन न लावलेला पालक सापडणे ही महद्कठीण गोष्ट आहे, असे म्हणणे जास्त योग्य होईल. अशा परिस्थितीत खासगी ट्युशन घेणे हा फायद्याचा व तितकाच मानाचा व्यवसाय समजला जात आहे. या ट्युशन्समध्ये शिकवणारा ट्यूटर म्हणजेच शिक्षक होणे हा देखील एक चांगला करिअरचा पर्याय बनत चालला आहे. अनेक पदवीधर वा उच्चपदवीधर अशा ट्युशन्समध्ये विशिष्ट विषय शिकवण्यासाठी जाताना दिसतात. काही जणांसाठी हा पार्टटाईम जॉब ठरत आहे. अर्थात, ट्यूटर बनणे हे अत्यंत जबाबदारीचे काम आहे. त्यासाठी तुम्ही फक्त उच्चशिक्षित असून चालत नाही. त्यासाठी इतरही काही गुण महत्त्वाचे आहेत. ते गुण काय आहेत आणि उत्तम ट्यूटर होण्यासाठी काय करावे याबद्दल काही टिप्स.

स्वतःच्या कामाचे पूर्ण ज्ञान –  एक ट्यूटर म्हणून तुमचे सर्वात महत्त्वाचे काम आहे, ते म्हणजे मुलांना आपण शिकवत असलेल्या विषयाचे चांगले आकलन होऊन त्यांनी त्यात चांगले मार्क्स मिळवावेत, यासाठी प्रयत्न करणे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाचे तंत्र सुधारता यावे यासाठीही प्रयत्न करावा. या विषयातील एखादा मुद्दा विद्यार्थ्यांना समजत नसेल तर, तो समजावून सांगण्याची व पूर्ण मुद्दा पुन्हा शिकवण्याची तयारी असावी. विद्यार्थ्यांशी मित्रत्त्वाचे नाते ठेवावे. त्यामुळे विद्यार्थी प्रश्न विचारायला संकोच करणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांशी मित्रत्त्वाने वागून तो विषय कंटाळवाणा न होता सुरस होण्यासाठी प्रयत्न करावा.

शिकवायला जाण्यापूर्वी आपली तयारी – एखाद्या विषयाचा कुठला धडा शिकवायचा आहे, त्याचा आधी नीट अभ्यास करावा. विद्यार्थ्यांनी कुठलीही शंका विचारली तरी, त्याचे उत्तर देता येईल इतकी तयारी असावी. शिवाय विद्यार्थ्यांना द्यावयाच्या स्वाध्यायाचे प्रश्नही तयार करून नेल्यास त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होतो.

विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष – एक ट्यूटर म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रगतीवरही लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. आपण शिकवत असलेला विषय विद्यार्थ्यांना समजत आहे की नाही हेही वेळोवेळी तपासून पाहावे. दिलेला स्वाध्याय विद्यार्थी करून आणतात का, हे तपासून पाहावे. ज्यांना स्वाध्याय जमला नाही त्यांना त्याची कारणे विचारून तो विषय पुन्हा समजून घेण्यास मदत करावी. विद्यार्थ्यांची शाळेतील प्रगतीही तपासून पाहावी. त्या त्या विद्यार्थ्याच्या प्रगतीची माहिती घरच्यांपर्यंत पोहचवत राहावी. त्यामुळे विद्यार्थ्याच्या पालकांचाही ट्यूटरवरचा विश्वास वाढतो.

चर्चा आणि कौतुक – एखादा विषय शिकवून झाल्यावर त्याचे विद्यार्थ्यांना किती आकलन झाले यासाठी त्यांना काही प्रश्न
विचारावेत व त्यांच्यात चर्चा घडवून आणावी. या चर्चेत जो विद्यार्थी बरोबर उत्तर देईल व मत मांडेल त्याचे कौतुक करावे. त्यामुळे बाकी
विद्यार्थ्यांनाही उत्तर देण्यास हुरूप येईल.

प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष – एक ट्यूटर म्हणून एखादा विषय शिकवत असताना एखाद्या विद्यार्थ्याला तो विषय जास्त समजला आणि तो उत्तरे देऊ लागला, तर आपले लक्ष त्याच्याकडेच जास्त जाण्याची शक्यता असते. पण असे करू नये. उत्तर देणार्‍या विद्यार्थ्याचे कौतुक करावे, पण काहीच न बोलणार्‍या विद्यार्थ्याची काय समस्या आहे, हेसुद्धा समजावून घ्यावे. त्याला एखादा विषय लवकर समजतच नसेल, तर त्याच्याकडे खास लक्ष द्यावे.

विद्यार्थ्यांना बोलायला प्रोत्साहित करणे  – ट्यूटर जरी विषय शिकवत असला तरी त्याने एकट्यानेच बोलत राहू नये. अशाने सर्व एकतर्फी होऊन विद्यार्थी कंटाळू शकतो. विषय शिकवताना वेळोवेळी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारावेत. त्यामुळे विद्यार्थी जागृत राहतो व प्रत्येक मुद्याचे काळजीपूर्वक आकलन करण्याचा प्रयत्न करतो. एक उत्तम ट्यूटर होण्यासाठी तुम्ही उच्चशिक्षित असणे तर गरजेचे आहेच, पण त्याचबरोबर विद्यार्थी आणि पालक यांची मानसिकता समजून घेऊन दोघांशी सुसंवाद साधण्याची कला अवगत असणे खूप महत्त्वाचे आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!