BLOG : मोकाटांचे आश्रयस्थान?

0

महापालिकेतील एका आंदोलनाने शहराचे लक्ष वेधले आहे. नगर शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त होत नसल्याने चिडलेल्या नागरिकांनी थेट महापालिका कार्यालयात मोकाट कुत्री सोडली.

शहर सुधार संघर्ष समिती, राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. अर्थात याला पर्यायही नव्हता.

एकीकडे राजकारण मोकाट सुटल्याने साधन-सुविधांबाबत तीनतेरा वाजले आहेत. शहरावर कोणाचे नियंत्रण नाही, याची जाणीव बहुधा त्या मुक्या जनावरालाही झालेली दिसते. बालकांवर कुत्र्यांकडून होणारे हल्ले चिंता वाढविणारे आहेत.

लहान मुले जर सुरक्षितरित्या रस्त्यावर फिरू शकणार नसतील, मैदानावर खेळू शकणार नसतील आणि याबाबत महापालिका ‘बहिरे’धोरण अवलंबणार असेल तर नागरिकांकडून यापेक्षा वेगळे वर्तन होणे शक्य नाही! पण एक झाले महापालिकेत मोकाट कुत्र्यांचा अधिकृत वावर झाल्याने या स्थानाचे महात्म्य वाढले आहे. या कृतीतून आंदोलकांनी श्‍वानवंशाचे स्थान उंचावले की तेथे वावरणार्‍या दोन पायाच्या आणि बुद्धी(?) असलेल्यांचे अवमूल्यन केले, हा प्रश्‍नही आहेच! गटारी तुंबलेल्या, कचर्‍याचे वाढते ढीग, पाऊस पडला की वाहून जाणारे रस्ते, कामांसाठी महापालिकेची पायरी चढणार्‍या ‘सामान्य’ माणसाची होणारी अडवणूक, डोळे वटारणारे ‘गब्बर’ कुळातील दाखल झाले की त्यांच्यापुढे लेंड्या टाकणारी व्यवस्था तशी नवी नाही. याचा अनुभव नगरकर वारंवार घेत आले आहेत. पण या शहरातील पुढील भविष्य असलेली लहान बालकेही सुरक्षित नसतील तर ज्यांच्यावर ही व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी आहे, त्यांच्याही गळ्यात आता दोर टाकण्याची वेळ आली आहे, असे समजायचे काय? या शहरात सर्वच मोकाट आहे.

महापालिकेतील तथाकथित नेते मोकाट आहेत. प्रशासन व्यवस्था मोकाट आहे. त्यामुळे रस्त्यावरील कुत्रेही मोकाट आहेत, असा समज या बालकांच्या मनावर बिंबला तर नगर शहराच्या प्रतिमेचे काय होणार? आई-वडील आपल्या बालकांना ‘बाहेर जाऊ नको, मोकाट कुत्रे असतील तेथे’ अशी समज द्यायला लागली तर पुढील पिढीच्या मनात नेमके कोणते चित्र आकार घेईल, याची तरी काळजी महापालिकेतील ‘काळजीवंतां’ना आहे की नाही? काहींनी या मुद्याचे भांडवल करून उगाच या प्रश्‍नावर उड्या मारून घेतल्या. पण त्यांनीही एक बोट समोरच्याकडे केल्यावर आपल्याकडे वळलेली चार बोटे नीटपणे पाहिली पाहिजे.

अधिकार्‍यांनी आता कारवाईचे सोपस्कार सुरू केले आहे. काहींना नोटिसा बजावल्या आहेत. कुत्र्यांचा बंदोबस्त झालाच पाहिजे. सोबतच शहरातील प्रश्‍नांकडे बघण्याची संवेदनशीलता वाढली पाहिजे. अन्यथा चार पाय आणि दोन पायातील अंतर वेगाने घटत आहे, असा समज नागरिकांत अधिक दृढ होईल!

LEAVE A REPLY

*