Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक ब्लॉग मुख्य बातम्या

Blog : एका सायकलची गोष्ट

Share

लहानपणी सर्वांचीच आवडती अशी सायकल. आपल्या वयाचा कोणी सायकल चालवत असे तर आपल्या मनात देखील सायकल चालविण्याची उत्कट इच्छा निर्माण व्हायची. पण सायकल खरेदी करण्याऐवढं पैसे जवळ असायचे नाही म्हणून एक तर त्या सायकलवाल्या मुलांशी मैत्री करायची आणि एखादं चक्कर मिळवायची. गावात काही दुकानदार छोटी छोटी चार पाच सायकल ठेवायची आणि घंटाच्या हिशोबाने सायकल फिरविण्यास किरायाने द्यायचे. खाऊसाठी दिलेला पैसा मग या किरायाच्या सायकलसाठी खर्च करायचं.

घंटा ओलांडून गेल्यास तो जास्तीचे पैसे घेई म्हणून तीन चार वेळा त्याला विचारायचं झाला का घंटा, तो नाही म्हणे पर्यंत फिरवीत राहायचं. सुट्टीच्या दिवसांत आम्ही सारेच मुलं सायकल फिरवायचो त्यामुळे किरायाची सायकल देखील कधी कधी वेळेवर मिळायची नाही. छोटी सायकल चालविणे सोपे असायचे, त्याच्यासाठी कोणी शिकविणे गरजेचे नसायचे पण मोठ्यांची सायकल चालवणे जरासे अवघड जायचे. मग सुरुवातीला कोणी तरी सायकलला धरायचे आणि चालवायचे. एकदा तोल सांभाळता आले की मग मोठी सायकल देखील चालवायचो.

सुरुवातीला कैंची सायकल चालवायची म्हणजे सीट च्या खाली एक दंडी असायची त्यात पाय घालून चालवायची. काही दिवसांनी सीट वर बसून सायकल चालवायची जरी पायडलला पाय पुरत नसेल तरी. जेंव्हा मोठी सायकल चांगली चालविता येऊ लागली की मित्रांना डबल सीट बसवून सायकल चालवायची. असा सायकल चालविण्याचा प्रवास चालू असायचा.

त्याकाळी मोटारसायकल फार कमी पाहायला मिळायचे. लग्न कार्यात नवरदेवाला खास करून सायकल दिल्या जायचं. लग्नाची वरात देखील सायकल वरून काढली जायची. लग्नात सायकल नाही मिळालं तर नवरोबा रुसून बसायचा. जवळच्या शहरात जाणे असो वा शेताला जाणे असो त्यासाठी सायकलचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होता.

प्रत्येकाच्या घरी एखादं सायकल हमखास असायची, त्याची जागा आज मोटारसायकलने घेतली आहे. गावातले एखादं कोणी व्यक्ती सायकल मागितले की त्यांना ते दिले जायचे कारण त्याला सायकल दिल्याने आपला काही खर्च व्हायचा नाही. कारण त्याला ना पेट्रोल लागतो ना डिझेल, त्यामुळे मागेपुढे काही विचार न करता मागितल्या बरोबर सायकल मिळायची.

गावात कोणाचं मृत्यू झाला असेल तर त्याची बातमी सगेसोयरे, नातेवाईक यांना सांगण्यासाठी सायकलवर जावे लागत असे. दळणवळण साठी बैलगाडीच्या नंतर सायकलचा क्रमांक लागत होता. सायकलवरून कोणाचा अपघात झाला तरी कोणाचा मृत्यू झालेले आजपर्यंत ऐकण्यात नाही. जास्तीत जास्त खर्चटते किंवा मुका मार लागतो. सायकल हे पर्यावरण पूरक आहे कारण याला कोणत्याच प्रकारचे इंधन लागत नाही, त्यामुळे प्रदूषण होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.

त्याचसोबत सायकल चालविण्यासाठी हातपाय हलवावे लागते त्यामुळे आपला शारीरिक व्यायाम देखील होतो. आज सायकल वापरणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली. माध्यमिक शाळेत शिकत असतांना सायकल मिळायची आणि ती एकचसायकल शिक्षण पूर्ण होईपर्यंत सोबत असायची. स्वतःची नोकरी लागल्यावरच हातात गाडी यायची आणि ते ही स्वतःच्या पैश्याने. शाळा महाविद्यालयात जाणारी मुलं देखील सायकल ऐवजी गाडीची मागणी करतांना दिसत आहेत.

तसेच आजची पालक मंडळी पैश्याने समृद्ध असल्या कारणाने ते आपल्या मुलांना गाडी घेऊन देत आहेत. मात्र पालकांनी यावर एकवेळ विचार करावा आणि आपल्या मुलामुलींना शाळा महाविद्यालयात किंवा शिकवणीला जाण्यासाठी गाडी ऐवजी सायकलचा पर्याय निवडावा. त्यामुळे एक फायदा होऊ शकतो, आपल्या मुलामुलींची शारीरिक हालचाल होईल, आणि इंधन भरण्यासाठी पॉकेटमनी द्यावे लागणार नाही.

शालेय जीवनातील मुलांसाठी सायकलचे महत्व आपण जाणून घ्यावे आणि सायकलच वापरण्याची सक्ती करावी. तरुण वयातील ही मुले हातात गाडी आल्यामुळे बेफामपणे गाडी चालवितात, ज्यामुळे स्वतःच्या मुलामुलींना दुखापत होतेच शिवाय दुसऱ्यांना देखील त्रास होतो. जीव कोणाचेही असेल ते अनमोल आहे, असे हकनाक जीव जाण्यापासून वाचवावे.

– नागोराव सा. येवतीकर, मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!