Type to search

Breaking News Featured ब्लॉग मुख्य बातम्या

Blog : ज्ञानदायिनी सरस्वती

Share

कुठल्यातरीच वस्तुला घाबरून बाळ आईच्या पायाला मिठी घालतं. त्यावेळी आई त्याला हळुच उचलून आपल्या मांडीवर घेते. ती वस्तु उलट सुलट करून दाखवते. बाळाला समजावते. त्याला ज्याची भीती वाटत होती त्याला घाबरण्यासारखं काहीच नाही हे बाळाला कळलं कि रडणारं बाळं खुदकन् हसतं आणि नंतर खेळ खेळ म्हणून त्याच वस्तूशी खेळत राहतं.

शारदाम्बेचंही तसच आहे. त्रैलोक्यातील सारे जीव तिच्या पायी शरण आले आहेत. ही शारदाम्बा सर्वांना बोध करून देते. हा बोध झाल्यावर अरे, आपण ज्याला भीत होतो त्याला घाबरण्याचं काही कारण नाही हे पटून सारे निर्भय होतात.

लहान बाळ “मला नको हे जुने कपडे मला नवीन नवीन कपडे पाहिजेत” म्हणून हट्ट धरतं आणि आईही त्याचा हट्ट पुरवून त्याला नवीन कपडे घालते. बाळाच्या कपड्यांप्रमाणे ही शारदाम्बा तिच्या भक्तांची वेडी वाकडी वाणी काढून टाकते आणि नवीन वाणी मुखी घालून त्यांना चतुर बनवते. आनंदी करते.

बाळ नवीन कपडे घालून चारचौघांमधे मिरवून येतं. सारेजणं त्याचं कौतुक करतात. छकुली/ छकुला किती सुंदर दिसतो आहे असं म्हणतात. एकनूर आदमी दसनूर कपडा अशी म्हणच आहे. वाणी ही कपड्यांप्रमाणे असते. वाणी सुंदर असली की काळासावळा माणूसही सार्‍या जनसमुदायावर छाप टाकतो. त्याचं भाषण ऐकून लोक त्याला डोक्यावर घेतात. आणि गोरागोमटा अडाणी तोंड उघडताच लोकांच्या उपहासाला पात्र ठरतो.

ज्ञान हे आकाशासारखं आहे. आकाश जसं कुठेही आणि कुठल्याही वस्तुत असतच. त्याप्रमाणे ज्ञानही सर्वव्यापी आहे. ज्ञान जेवढे व्यापक तेवढी सरस्वतीची व्यापकता आहे. सर्वांचं प्रबोधन करणारी ही जगदम्बा सर्वांचीच आई आहे. शंभूमहादेवाचीही.
असं म्हणतात की,

काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम् ।
व्यसनेन तु मूर्खाणां निद्रया कलहेन वा ।।

बुद्धीमान माणसांचा वेळ काव्य, विद्या, विज्ञान अशा मनोरंजन करणार्‍या विषयांमधे आनंदात जातो. मूर्खांचा वेळ मात्र संकटांशी (व्यसन) झुंजता झुंजता नाहीतर झोपा काढण्यात किंवा भांडणं करण्यातच संपून जातो.

ज्या जगज्जननीच्या पायाला तिनही लोकांनी मिठी घातली आहे ती शारदाम्बेची पावलं आहेत तरी कशी? ह्याचं फार सुरेख वर्णन एका अनाम कवीने केलं आहे. इतकी सुंदर पावलं आजवर मी पाहिली नव्हती. –

सरस्वतीस्तोत्रम् –

शिव, विष्णु, प्रजापति, सूर्य, शशी । जननी अति नम्र तुझ्या चरणी
हरिचंदन-कुंकुमयुक्त उटी । पदपंकज हे तव भूषविती।।1.1
रमतात मुनींद्र गजेंद्र पदी । झुकते मम मस्तक त्या चरणी
शरणागत देवि सरस्वति मी । सुकुमार तुझ्या चरणावरती।।1.2

शरदातिल शुभ्र सुधांशु जसा। मधु अमृत शिंपित जाय जसा
अति शुभ्र हिमावर चंद्रप्रभा । अति दिव्य दिसे उजळीच जगा।।2.1
अथवा शरदातिल नील नभी । दवबिंदुतुनी झिरपेच शशी
बहुमोल सुरत्न-लडींवरुनी । परिवर्तित हो किरणेच जशी ।।2.2
गमती पदयुग्म तसे जननि। सुखदायक उज्ज्वल कांतिमती
नतमस्तक देवि सरस्वति मी । सुकुमार तुझ्या चरणावरती।।2.3

मणिकांचनकांति सरोज किती । तव भूषविती पद रम्य अती
जगतासचि भूषण श्रेष्ठ अति । तव नाजुक नाजुक पाय किती।।3.1
पदवर्णन हे करण्यास्तवची । अति भिन्न मते कथितीच मुनी
परि भिन्न मतातुन एक दिसे । पदपल्लव हे तव हृद्य असे।।3.2
रमतेच प्रजापति-चित्त जिथे। शुभ सत्य असे शिव पाय तुझे
नतमस्तक त्या सुकुमार पदी । नित देवि सरस्वति मी सहजी।।3.3

लेखणी अरुंधतीची

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!