BLOG : मोदींनी पिळले कान!

0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वपक्षाच्या राज्यसभा खासदारांना काल चांगलेच फटकारले. लोकसभा असो की राज्यसभा दांडीबहद्दर खासदार अलीकडे सर्वच पक्षांना डोकेदुखी ठरले आहेत. हक्कासाठी आग्रही मात्र जबाबदारीकडे दुर्लक्ष हा प्रकार खासदारातही दिसतो. मोजकेच खासदार सभागृहातील चर्चेत सक्रिय असतात. अर्थात त्यासाठी अभ्यास लागतो. अलीकडे तो करायची तसदी घेण्याची गरज अनेक खासदारांना वाटत नाही. त्यामुळे अभ्यासपूर्ण चर्चाऐवजी कविता आणि चुटकुल्यांवर वेळ मारून नेण्याची कमाल अनेकजण करतात. भाजप खासदार राज्यसभेत उपस्थित न राहिल्याने अलीकडे पक्षाला अनेकदा फटका बसला. मोदी यांचा संताप म्हणून महत्वाचा! पुढच्या लोकसभेला पाहून घेईन या शब्दात त्यांनी खासदारांना फटकारले. देशाच्या पंतप्रधानांना या भाषेचा वापर करावा लागणे, हे पक्षशिस्तीचे अपयशच म्हटले पाहिजे. तुम्ही किंवा मी कोणी नाही. पक्ष मोठा आहे याची आठवण त्यांनी करून दिली आहे. भाजप सत्तेत आल्यावर शिस्तीच्या अनेक कथा पसरल्या होत्या. पंतप्रधान स्वतः 16 तास काम करतात. मात्र त्यांच्या खासदारांना सभागृहात द्यायला वेळ नाही, हे देखील यामुळे पटलावर आले. तीन वर्षांपूर्वी मोदींनी संसदेत प्रवेश केला त्यावेळी किमान भाजप खासदारांच्या सवयी बदलतील, असे वाटले होते. ते घडले नाही , हे या झटकन स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली होती. आता मोदींनी कान पिळले आहेत. भाजपात किमान कान पिळणारे नेतृत्व आहे. त्यांचा धाक असतो. अन्य पक्षात तर आनंदीआनंद आहे. कोणाचा पायपोस कोणात नाही. त्यामुळे परिस्तिथी अधिकच कठीण. आपला खासदार सभागृहात काय करतो, हे जनतेलाही कळत नाही. मोदींनी दिलेला इशारा केवळ भाजप नव्हे तर अन्य पक्षातील खासदारांनीही गंभीरपणे घ्यावा. भले भाजपातील खासदारांचा हिशेब मोदी घेतील, अन्य खासदारांचा हिशेब त्यांच्या पक्षाने नाही घेतला तर जनता घेईलच!

LEAVE A REPLY

*