BLOG: मोदीपर्वाचा उत्साह!

0
आज तीन वर्षापूर्वी भारताच्या राजकीय इतिहासात एका नव्या पर्वाचा प्रारंभ झाला होता.

मोदीपर्व हे या पर्वाचे माध्यमी नामकरण! त्याला आता तीन वर्षे उलटली आहेत. देशात सत्ता येतात, जातात. पण हा बदल ठळक होता.

या बदलाशी नव्या भारताच्या आकांक्षा, स्वप्ने निगडीत होती. काहीतरी बदलणार ही अपेक्षा होती. अच्छे दिनच्या प्रचारकी थाटाला एवढी चकाकी देण्यात आली होती की दीपलेले डोळे आजही चुरचुरतात! पण मूळ प्रश्‍न आहे, या तीन वर्षात काय बदलले? खरे तर अनेक वर्षानंतर भारताने एका बहुमतातील सरकारला निवडले आहे.

त्रस्त जनतेला त्रासातून मुक्ती हवी होती, ती देण्याचा वायदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता. काही आश्‍वासक गोष्टी निश्‍चित घडल्या. सरकार काहीतरी करते आहे, हा विश्‍वास निर्माण झाला, याचे श्रेय मोदींना दिलेच पाहिजे. धोरणात्मक बदलांसाठी सरकारने पावले उचलली. नोटाबंदीसारखा निर्णय चांगल्या वाईट परिणामांची चिंता न करता राबवता आला.

जीएसटीसारखा दूरगामी परिणाम करणारे धोरण लागू करण्याचे धाडस याच सरकारने दाखविले. जुन्याच योजना नव्या वेष्टनात लपेटून जनतेसमोर आल्या. त्यांच्या मार्केटींगचा भास असा की त्या नव्या आहेत. त्या जनतेला पटल्या, हे देखिल मोदी सरकारचे यशच! पण तरीही कोठेतरी अपेक्षांचा आणि स्वप्नपूर्तीचा वेग मंदावला, हे मान्य करण्याचे धाडस मोदी सरकारने दाखविले पाहिजे. देशाची नव्याने उभारणी करताना काही सोसावे लागेल, याचा अंदाज होता. त्यासाठी जनताही तयार होती. पण हे सोसणे थेट जगणेच अस्वस्थ करून सोडेल, याची अपेक्षा नव्हती. सध्या रोजगाराच्या पातळीवर रोज नव्या बेकारांची भर पडत आहे. नगर शहरासारखी लहान शहरे तर भरडून निघाली आहेत. उद्योग नव्या अर्थकोंडीत अडकली आहेत.

कंपन्यांची अडखळणारी चाके चिंतेचा विषय आहे. पूर्वी याबाबत ओरड तरी व्हायची. आता तर सर्व चिडीचूप आहेत. ही सरकारची जरब आहे, धाक आहे की दहशत हे कळत नाही. पण व्यक्त होण्याच्या अधिकारावर आलेल्या अप्रत्यक्ष मर्यादा स्पष्टपणे जाणवतात.

शेतीची अवस्था तर अधिकच वाईट! शेतकरी आणि शेती मोडीत निघणार, अशीच शंका आता शेतकर्‍यांना वाटू लागली आहे. शेतीला भाव मिळत नाही. आत्महत्या थांबलेल्या नाही. राज्यात तर प्रथमच शेतकरी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत.

तरीही मोदीपर्व झोकात साजरे होत आहे. अद्याप दोन वर्षे आहेत. या काळात तरी अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा ठेवूया! सरकार केवळ आश्‍वासन आणि भाषण करण्यातच अग्रेसर आहे, ही नव्याने तयार होत असलेली ओळख पुसून काढण्यासाठी हा कालावधी पुरेसा आहे.

LEAVE A REPLY

*